पाऊस सरता सरता आलेल्या प्रिंटेड जीन्सच्या फॅशन ट्रेण्डविषयी अधिक जाणून घेण्याची गरज वाटते, कारण त्यात बदल आहे, वेगळेपण आहे आणि धाडस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायत्री हसबनीस

फक्त अप्पर गार्मेट म्हणजे शर्ट, टी-शर्ट किंवा टॉपवरतीच प्रिंट्स हवेत आणि ते जीन्सवर का नकोत?, असा काहीसा विचार करून यंदाच्या डिझायनर्सनी फॅशनमध्ये वेगळपणा आणायचा ठरवला आणि जीन्सवर, डेनिमवर भरगच्च प्रिंट्स देऊन एक वेगळाच स्वॅग आणला. ‘कमॉन इट्स २०२१!’ अशी घोषवाक्यं तुम्ही तरुणांच्या तोंडून ऐकलीच असतील. या वाक्याचा मतितार्थ म्हणजे आपण आता काळाच्या पुढे जात आहोत त्यामुळे बदल, वेगळेपण, धाडस सध्या हरएक क्षेत्रात आजमावले जात आहेत मग ते फॅशनमध्ये येणार नाही असं होणारच नाही. पाऊस सरता सरता आलेला हा प्रिंटेड जीन्सचा फॅशन ट्रेण्ड म्हणूनच अधिक जाणून घ्यावासा वाटतो, कारण त्यात बदल आहे, वेगळेपण आहे आणि धाडस आहे.

मुलामुलींना कस्टमाईज्ड कपडे आवडतात ते मग कुठल्याही पद्धतीचे असोत. प्रिंटेड जीन्सही तितक्याच कस्टमाईज्ड आहेत. मुलींसाठी प्रिंटेड जीन्स या ‘टॉप नाइन जीन्स टू वेअर फॉर वुमन’ या प्रकारात मोडतात. त्यातून मुलींना सर्वात जास्त आवडतात त्या एम्ब्रॉयडरी प्रिंट असलेल्या जीन्स. एम्ब्रॉयडरी प्रिंट्स म्हटलं की डोळ्यासमोर फ्लोरल नक्षीकाम येतं तेव्हा या जीन्सवरही ते आहे. फक्त इथे प्रिंटेड पॅन्ट्स आणि प्रिंटेड जीन्समध्ये फरक आहे. जीन्सवर अक्षरक्ष: हाताने कलाकुसर केली जाते तर पॅन्ट्सचं मटेरियलच तसं नक्षीदार बनवून येतं. मुली बऱ्याचदा या दोन गोष्टींमध्ये गोंधळतात. काहींचा असा अनुभव आहे की ऑनलाइन खरेदी करताना बहुधा असा प्रश्न पडतो. मुलांसाठी त्यांच्या स्वभावाप्रमाणे थोडं रॉकस्टार, पॉपस्टार टाईप किंवा अँग्री यंग मॅन स्टाईलला साजेसे प्रिंट्स उपलब्ध आहेत. मुलांना जीन्सवर स्ट्राईप्स आवडतात तेही नियॉन कलरच्या. भरगच्च प्रिंटेड जीन्सना मुलांची जास्त पसंती मिळते. विशेष म्हणजे या जीन्सवर सुपरहिरो, फिल्मी हिरोचे डायलॉग्ज,काल्पनिक ग्राफिक्स असतात. मुलांसाठी स्टाईल स्टेटमेंट म्हणून या जीन्सवर बेल्ट घालून झीपर, कॅज्यूअल शर्ट, स्पोर्ट शूज, फुल हॅण्ड प्रिंटेड टी-शर्ट्स, जीन्सचे प्रिंटेड जॅकेट असे प्रकार उपलब्ध आहेत. मुलींना एम्ब्रॉयडरीप्रमाणे डिस्ने कार्टून्सच्या प्रिंट्सही जीन्सवर आवडतात. स्लोगन्सच्या प्रिंट्स असलेल्या जीन्स युनिसेक्समध्ये मोडतात. आता प्रामुख्याने स्लोगन्स म्हणा, कार्टून्स, नक्षीकाम, चित्रकला, शिवणकाम, भरतकाम आणि विणकाम अशा सर्व अंगांनी जीन्सवर होणारी कलाकुसर लोकप्रिय ठरते आहे. या डिझाइन्स जीन्सच्या खिशावर, बाजूला, गुडघ्यापाशी आणि मांडीवर असतात त्यामुळे तुम्ही जीन्सखाली हिल्स, स्निकर्स, कॅनव्हास, स्पोर्ट्स शूज आणि स्लिपरही घालू शकता. या जीन्सवर प्लेन किंवा प्रिंटेड शर्ट्स, टॉप्स, टी – शर्ट, मिनी व्हाईट कुर्ती, ऑफ शॉल्डर, स्लीव्हलेस असे अप्पर गार्मेंट परिधान करू शकता.

मुलींसाठी विशेष म्हणजे एम्ब्रॉयडरी प्रिंट्सच्या जीन्स, कारण त्या फेस्टिव्हल सीझनमध्येही घालण्याजोग्या आहेत. पण त्यातही काही निवडक जीन्सचे प्रकार आहेत. म्हणजे फेस्टिव सीझनला फ्लोरल जीन्सना तशी कमी पसंती मिळते. त्यामुळे त्यांच्यापुढे पर्यायही कमी असतात, अशावेळी एम्ब्रॉयडरीमधील विविध प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. उदाहरणार्थ, स्टीचेस (टाके) असलेल्या एम्ब्रॉयडरी जीन्स ज्यावर तुम्ही पांढराशुभ्र चिकनकारी कुर्ता घालू शकता. थोडय़ा ऑक्सिडाईझ्ड ज्वेलरी किंवा कलरफुल टास्सेलच्या ज्वेलरी त्यावर खुलून दिसतील. स्टीचेस एम्ब्रॉयडरी जीन्समध्ये असंख्य कस्टमाईज्ड डिझाइन्सची उदाहरणं आहेत ते सांगायला बराच वेळ लागेल, पण थोडक्यात एक अंदाज यावा म्हणून फ्लोरल, निसर्गाची प्रतिकं, किटक, प्राणी, पक्षी म्हणजे लिव्हिंग ऑब्जेक्टस, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टस, हार्ट्स, स्टार्स, स्लोगन्स, पॅचवर्क, टेक्श्चर डिझाइन आणि विविध रंगसंगतीच्या डिझाइन्स यात आहेत. लोकरीचे आणि रेशमाच्या धाग्यांचे डिझाइनही करून मिळते. या कलेकडे ‘रिफॅशन’ म्हणूनही पाहिलं जातं म्हणजे तुमच्या जुन्या जीन्सचा कुठला भाग खराब झाला असेल तर त्यावर अशी कलाकुसर करून तुम्ही त्या जीन्सला नटवू शकता. फु ल जीन्सप्रमाणे यात नानाविध पद्धतीच्या शॉर्ट्ससुद्धा आहेत. ऑक्टोबर हीटचा सामना करण्यासाठी समर कलेक्शन म्हणून या शॉर्ट्स उत्तम पर्याय ठरू शकतात. एम्ब्रॉयडरीमध्ये मणी, मोतीसारख्या साहित्यांनी केलेले क्रिस्टल वर्कही वाखाणण्याजोगे आहे. या प्रकारातील डिझाइनमध्ये एकसुरीपणा पाहायला मिळतो, म्हणजे पारंपरिक पद्धतीची नक्षी यात जास्त असते.

यातलाच एक वेगळा प्रकार आहे तो म्हणजे पॅचवर्क जीन्सचा. याकडेही बरेच जण रिफॅशन म्हणूनच पाहतात, परंतु जीन्सवर पॅचवर्क करणं हे जेवढं सोपं वाटतं तेवढं ते नाही. योग्य मापं, जीन्सवर पॅच नक्की कसे आणि कुठे लावायचे याचा अंदाज, रंगसंगती, स्टाईल आणि अर्थातच त्याच्या रचनेची योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यासोबतच अशा जीन्स परिधान करणं हे त्याहूनही धाडसाचे कामं आहे. यातही लोकप्रिय प्रकार आहे तो म्हणजे पॅचवर्क असलेली स्ट्रेच फॅब्रिक होल जीन्स. याची रचना म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याला ‘शो ऑफ’ करणं अशी उपमा देता येईल. खरं तर या जीन्स तुम्हाला ऑफलाइनही मिळतील, पण ऑनलाइनवर तुम्हाला यात जास्त पर्याय उपलब्ध आहेत. या जीन्सचा ट्रेण्ड प्रामुख्याने ‘लेविस’ या जगप्रसिद्ध ब्रॅण्डने यंदा आणला आहे. त्या निमित्ताने सुरू झालेला हा ट्रेण्ड सोशल मीडियावरून अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. ‘लेविस’च्या ५०१ ओरिजनल फिट जीन्सवर मध्यंतरी हा प्रिंट्सचा प्रयोग डिझायनर्सकडून केला गेला. त्यानंतर वाऱ्यासारखा फॅ शनच्या बाजारात पसरलेला प्रिटेंड जीन्सचा हा ट्रेण्ड महिनाभर तरी चर्चेत राहील यात शंका नाही.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lifestyle jeans fashion world trend ssh
First published on: 24-09-2021 at 02:43 IST