गेल्या काही दशकांमधील डिजिटल क्रांतीने आपलं जगणं, विचार करण्याची पद्धत आणि नातेसंबंध यांचंच स्वरूप बदलून टाकलं आहे. जैविकदृष्टय़ा आपण ‘होमो सेपियन्स’आहोत, परंतु तंत्रज्ञानाशी एकरूप झालेल्या आपल्या नव्या जीवनशैलीतून ‘होमो डिजिटॅलिस’ ही आपली आधुनिक ओळख घडताना दिसते. डिजिटल जिंदगी मालिकेतील हा शेवटचा लेख.
वीस लाख वर्षांपूर्वीची गोष्ट. आफ्रिकेच्या जंगलात आपले आदिपूर्वज होमो इरेक्टस ताठ कण्याने सरळ चालू लागले. आग, दगडी साधने यांच्या शोधाने मानवी प्रगतीचे नवे चक्र फिरू लागले. पुढे उत्क्रांतीच्या प्रवासात आपला मेंदू अधिक प्रगल्भ झाला आणि आपण झालो होमो सेपियन्स- शहाणा मानव. अन्नसाखळीत तळाशी असलो तरी बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण पृथ्वीवरील सर्वात प्रभावी जीव ठरलो आहोत.
प्रगतीच्या या प्रत्येक टप्प्यावर आपणच निर्माण केलेली साधनं, तंत्रज्ञान आणि सामाजिक रचनांचा आपल्या विचारपद्धती, जीवनशैली आणि स्वभावावरही परिणाम होत गेला. म्हणूनच मानवाला केवळ ‘होमो सेपियन्स’ या जैविक उत्क्रांतीच्या चौकटीत न पाहता, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजावून सांगण्यासाठी अनेक विचारवंत रूपकात्मक संज्ञा मांडतात. शेतीची अवजारं, नंतरची यंत्रं तयार करणाऱ्या माणसाला काही विचारवंतांनी होमो फॅबर म्हणजे साधनं तयार करणारा मानव म्हटलं. तत्त्वज्ञ एन्स्र्ट कॅसिरर यांनी प्रतीकांच्या माध्यमातून भाषा, कला, पुराणकथा इत्यादींना अर्थ देणाऱ्याला मानवासाठी होमो सिम्बॉलिकस नाव वापरलं. दूरदर्शन आणि दृश्य माध्यमांच्या युगात जेव्हा वेगवान चित्रं आणि दृश्य अनुभव मनावर जास्त प्रभाव टाकू लागले तेव्हा जिओव्हानी साटरेरी यांनी मानवाचं नवं रूप मांडलं, होमो व्हिडेन्स म्हणजे स्क्रीनवर पाहण्यातून घडत जाणारा मानव.
गेल्या काही दशकांमधील झपाटय़ाने झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीने मानवाच्या या विकासकथेचा चेहराच बदलून टाकला आहे. प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन, त्यातलं हाय-स्पीड इंटरनेट, सामाजिक माध्यमांचा उदय आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रचंड लाट हे सगळं आपल्या जगण्याचा नैसर्गिक भाग बनलं आहे. या सगळय़ाचा परिणाम आपल्या वैचारिक, सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक जडणघडणीवर पडणं स्वाभाविकच होतं. जैविकदृष्टय़ा आपण ‘होमो सेपियन्स’ असलो तरी आपल्या जगण्याची पद्धत, विचारांची चौकट, संवादाचे मार्ग आणि नातेसंबंधांचं स्वरूप डिजिटल तंत्रज्ञानाने पूर्णपणे बदलून टाकलं आहे. डिजिटल जिंदगी जगणारे आपण म्हणजे ‘होमो डिजिटॅलिस’ असं म्हणता येईल.
प्रख्यात स्पॅनिश अर्थशास्त्रज्ञ होसे बी. तेर्सेरो लोम्बा यांनी आपल्या ‘डिजिटल सोसायटी : फ्रॉम होमो सेपियन्स टू होमो डिजिटॅलिस’ या पुस्तकात ९०च्या दशकाच्या शेवटीच या संकल्पनेचं सूतोवाच केलं होतं. पुढे स्पॅनिश पत्रकार रोमन सेंडोया (२०१३), डॅनिश लेखिका नताशा फ्रिस सॅक्सबर्ग (२०१५), जर्मन मानसशास्त्रज्ञ ख्रिश्चन मोंटॅग (२०१८) आणि गूगल बेल्जियमचे सीईओ थियरी गीर्ट्स (२०२२) या आणि अशा अनेक विचारवंतांनी होमो डिजिटॅलिस या संकल्पनेचा सखोल विस्तार केला आहे. ‘होमो डिजिटॅलिस’ची वैशिष्टय़े, नव्या समस्या आणि उपाय याचाही ऊहापोह या विचारवंतांनी केला आहे.
नेहमी ‘कनेक्टेड’ असणं ही होमो डिजिटॅलिसची प्रमुख ओळख म्हणता येईल. घरी निवांत बसताना, ऑफिसमध्ये काम करताना, कॉलेजमध्ये लेक्चर ऐकताना, प्रवासात किंवा रांगेत उभं असताना आणि अगदी प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवत असतानाही त्याचं लक्ष अनेकदा मोबाइलच्या स्क्रीनवरच खिळलेलं असतं. होमो डिजिटॅलिस एकाच वेळी प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन जगांत जगत असतो. त्यामुळे त्याची ओळखही अनेक स्तरांवर घडत असते. त्याच्या जगात मानवी मेंदूचं बरंचसं काम आता डिजिटल साधनांकडे ‘आउटसोर्स’ झालेलं दिसतं. लक्षात ठेवणं, माहिती मिळवणं, विश्लेषण करणं, निर्णय घेणं, नवीन कल्पना सुचवणं, अशा अनेक क्रिया आता अॅप्स, सर्च इंजिन्स आणि अल्गोरिदम्सवर अवलंबून आहेत. परिणामी मानवी बुद्धी आणि यंत्र-बुद्धिमत्ता मिळून एक प्रकारची ‘संयुक्त बुद्धिमत्ता’ तयार होत जाते. असं असलं तरी आपल्या मेंदूची वायिरग मात्र अजूनही तशीच जुनी आहे. अभ्यासकांच्या मते, उत्क्रांतीच्या दीर्घ प्रवासात टिकून राहण्याच्या गरजेतून मानवी मेंदूची रचना घडली. आपल्या आदिम पूर्वजांना दररोज शिकार करायला, अन्न मिळवायला आणि हिंस्र प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करायला क्षणात निर्णय घ्यावे लागायचे. त्यामुळे मेंदू एका वेळी एका कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिस्थितीतून फक्त आवश्यक तेवढीच माहिती घेण्यासाठी तयार झाला. शिकार मिळाल्यावर येणाऱ्या यशाच्या आनंदात मेंदूची डोपामिन रिवॉर्ड सिस्टीम सक्रिय व्हायची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा द्यायची. एकटं राहण्यापेक्षा छोटय़ा समूहात राहून अन्न-संसाधनं वाटून घेणं, परस्पर संरक्षण करणं, यामुळे आपण टिकून राहिलो; म्हणूनच प्रत्यक्ष नात्यांतून मिळणाऱ्या जिव्हाळय़ाला मेंदू विशेष भावनिक महत्त्व देतो. या पार्श्वभूमीवर आजच्या डिजिटल जगात सततचा माहितीचा भडिमार, मल्टिटास्किंगची सवय आणि डिजिटल कृतीतून लगेच मिळणारा डोपामिनचा आनंद, आभासी नातेसंबंध या सगळय़ामुळे आपल्या जुन्या मेंदूवर नव्या तंत्रज्ञानाचा अनपेक्षित ताण निर्माण होतो आहे.
परिणामी ‘होमो डिजिटॅलिस’च्या आयुष्यात अनेक नव्या समस्या नकळत डोकावू लागल्या आहेत. इंटरनेट आणि मोबाइलशिवाय काही मिनिटंही राहणं कठीण वाटू लागतं. झोपेतून उठवणं, औषधांची आठवण करून देणं अशा अगदी किरकोळ गोष्टींसाठीही तंत्रज्ञानावरची वाढती निर्भरता अधोरेखित होते आहे. नात्यांमध्ये टेक्नोफेरन्सचं सावट गडद होतंय. आपल्यावर सततच्या माहितीच्या भडिमारामुळे गोंधळ वाढतो आहे. तसंच ओव्हरशेअरिंगमुळे गोपनीयतेची जोखीम निर्माण झाली आहे. काय पाहावं, काय ऐकावं, काय खरेदी करावं, याचे निर्णय हळूहळू आपण नव्हे तर अल्गोरिदम्स घेऊ लागले आहेत. स्मृती बाहेरच्या साधनांवर सोपवल्यामुळे ‘डिजिटल अम्नेशिया’चा धोका वाढतो आहे. डिजिटल कृतीतून मिळणाऱ्या झटपट उत्तेजनांच्या मोहात वाचन, लेखन, गप्पा अशा संथ आणि सखोल कृती कंटाळवाण्या ठरू पाहत आहेत. आणि या सगळय़ातून ‘ब्रेन रॉट’ होत मानसिक आणि बौद्धिक स्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम होतो आहे. समाजमाध्यमांवर ट्रोलिंग, सायबर बुलिंग, सायबर फसवणूक यांचेही प्रमाण वाढताना दिसते आहे.
डिजिटल युगातील ही नवी आव्हानं नक्कीच गंभीर आहेत; पण यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानापासून पळ काढणं योग्यही नाही आणि शक्यही नाही. कारण आज शिक्षण, कामं, संवाद, नाती, व्यवहार आणि मनोरंजन आपल्या जीवनातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानाशी घट्ट जोडलेलं आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाशी संघर्ष करणं किंवा त्याला पूर्णपणे शरण जाणं या दोन टोकांच्या मार्गाऐवजी, त्यासोबत संतुलित पद्धतीने कसं जगायचं हे शिकणं अधिक महत्त्वाचं ठरतं. डिजिटल तंत्रज्ञानाचा सजग, मर्यादित आणि जबाबदार वापर करण्याची शहाणीव विकसित करणं हाच आपल्याला खऱ्या अर्थाने स्मार्ट ‘होमो डिजिटॅलिस’ बनवणारा मार्ग आहे.
यासाठी अगदी लहान सवयी बदलल्या तरीही मोठा फरक पडू शकतो. मोबाइलवरील अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणं, एका वेळी फक्त एकच काम करण्याची सवय लावणं, सोशल मीडिया अॅप्सचे ऑटो-लॉग-इन बंद ठेवणं, दिवसातील ठरावीक वेळ ‘फोन-फ्री टाइम’ म्हणून राखून ठेवणं आणि घरातील एखादा कोपरा ‘नो फोन झोन’ म्हणून निश्चित करणं, अशा छोटय़ा-छोटय़ा कृतींतून मदत होऊ शकते. याचबरोबर डिजिटल जगात वावरताना काही शिष्टाचार आणि नियम पाळले तर आपलं आणि इतरांचंही डिजिटल आयुष्य अधिक निरोगी, सुरक्षित, सौहार्दपूर्ण बनू शकतं. डिजिटल जीवनातले हे शिष्टाचाराचे नियम म्हणजेच ‘नेटिकेट’(Netiquette).
इंटरनेटवर संवाद साधताना स्क्रीनपलीकडेही आपल्यासारखीच भावना असलेली व्यक्ती आहे हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं. म्हणूनच ऑफलाइन आयुष्यात ज्या शिष्टाचार आणि जबाबदारीने आपण बोलतो-वागतो, तेच नियम ऑनलाइन जगातही तितक्याच संवेदनशीलतेने पाळले पाहिजेत, हाच नेटिकेटचा मूलभूत नियम आहे.
व्हॉट्सअॅपसारख्या इन्स्टंट मेसेजिंग माध्यमावर संवाद जलद आणि सातत्याने घडत असल्यामुळे इथे नेटिकेट्स पाळणं महत्त्वाचं ठरतं. इतरांना सतत मेसेज पाठवणं, अनावश्यक फॉरवर्ड्स, शुभेच्छापर संदेश किंवा भल्या मोठय़ा व्हॉइस नोट्स पाठवणं शक्यतो टाळलं पाहिजे. एखाद्याची फेसबुक पोस्ट किंवा वेबसाइटवरील मोठा मजकूर कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्याची लिंक पाठवणं अधिक योग्य ठरतं. चॅट करताना पलीकडची व्यक्ती इतर कामात गुंतलेली असू शकते, त्यामुळे ‘रीड रिसीट्स’ किंवा ‘ऑनलाइन’ स्टेटस पाहून तात्काळ उत्तराची अपेक्षा ठेवणं टाळावं. इथंही द्वेषपूर्ण भाषा, वैयक्तिक शेरेबाजी, टोमणे आणि ट्रोलिंग टाळलंच गेलं पाहिजे.
डिजिटल संवादात आपल्यासमोर फक्त शब्द असतात; समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढउतार दिसत नाहीत. त्यामुळे एखादं वाक्य सहज चुकीच्या अर्थाने घेतलं जाऊ शकतं. म्हणूनच शक्य तितकं स्पष्ट, सरळ आणि सुस्पष्ट लिहिणं महत्त्वाचं असतं. भावना व्यक्त करण्यासाठी इमोटिकॉन्स उपयोगी पडतात, पण त्यांचा अतिरेकी किंवा संदिग्ध वापर गैरसमज निर्माण करू शकतो. म्हणून इमोटिकॉन्सचा सुज्ञ आणि मर्यादित वापर करायला हवा. विशेषत: व्यावसायिक संवादात किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलताना त्यांचा वापर शक्यतो टाळावा. नेमकं आणि मोजकं लिहिणं, टाइिपग मिस्टेक्स टाळणं, भाषा त्यांच्या निर्धारित लिपीत टाइप करणं यातून संवाद अधिक स्पष्ट आणि वाचनीय राहतो. बऱ्याचदा इंटरनेटवर काही लिहिलं किंवा शेअर केलं की ते क्षणिक आहे, त्याची जबाबदारी आपल्यावर नाही असं वाटू शकतं, पण तसं नसतं. प्रत्येक पोस्ट, कमेंट किंवा फॉरवर्ड ही आपली कायमची डिजिटल फूटिपट्र बनते. आपण डिलीट केलेला कन्टेन्टसुद्धा कुठे तरी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जतन केलेला असतो. त्यामुळे ऑनलाइन काहीही टाकण्यापूर्वी ‘वन्स ऑन द इंटरनेट, ऑल्वेज ऑन द इंटरनेट’ हे लक्षात ठेवणं गरजेचं.
सोशल मीडियावर प्रायव्हसी सेटिंग्ज समजून घेणं आणि वापरणं ही आजची डिजिटल गरज आहे. उत्साहाच्या भरात ओव्हरशेअरिंग होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. स्वत:ची वैयक्तिक माहिती शेअर करताना गोपनीयता किंवा सुरक्षिततेचा विचार करण्याबरोबरच दुसऱ्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं तितकंच महत्त्वाचं. एखाद्याचा फोटो शेअर करणं, त्याला टॅग करणं, त्याच्यासोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट पुढे पाठवणं, असं काही करण्याआधी त्या व्यक्तीची परवानगी आहे का, याचा विचार करावा.
डिजिटल क्रांतीने आता प्रत्येकाला आपलं मत, कला, अनुभव आणि कल्पना जगासमोर मांडणं शक्य झालं आहे. रील्स, व्हिडीओ, पॉडकास्ट्स, ब्लॉग्स अशा कंटेन्टच्या माध्यमातून व्यक्त होतानादेखील संवेदनशीलता आणि विवेक आवश्यक ठरतात. खोटी माहिती, अफवा किंवा दिशाभूल करणारा कंटेन्ट टाळायला हवा. आपल्या कंटेन्टमध्ये दुसऱ्यांचं लेखन, फोटो किंवा कल्पना परवानगीशिवाय वापरणं म्हणजे साहित्यचौर्य ठरतं. एआय-निर्मित कंटेन्ट वापरताना तो एआयद्वारे तयार झाल्याची स्पष्ट नोंद करणं आणि दिशाभूल टाळणं ही नैतिक जबाबदारी ठरते.
प्रत्येक डिजिटल कंटेन्टच्या मूळ निर्मात्याला योग्य श्रेय देणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कोणाची तरी फेसबुकवरील पोस्ट आपण व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करत असू, तर त्या पोस्टसोबत त्या लेखकाचं नाव नमूद करणं योग्य ठरतं. अगदी लेखकाची माहिती नसेल तरीही ‘लेखक अज्ञात’ अशी नोंद तरी करावी. फोटो शेअर करताना मूळ छायाचित्रकार किंवा स्रोत यांना Photo Courtesy म्हणून श्रेय देणंदेखील तितकंच आवश्यक आहे.
ऑनलाइन मीटिंग्स, लेक्चर्स किंवा वेबिनारमध्ये सहभागी होताना आपले युजरनेम, डिस्प्ले फोटो यथायोग्य ठेवणं, वेळेवर लॉग-इन होणं, कॅमेरा-माइकचा योग्य वापर करणं आणि अनावश्यक आवाज टाळणं ही मूलभूत शिष्टाचाराची तत्त्वं आहेत. डिजिटल जगात व्हॉट्सअॅप, फेसबुक, लिंक्डइन, झूम मीटिंग किंवा ऑफिस ईमेल अशा विविध प्लॅटफॉर्ममागची व्यक्ती म्हणून आपण एकच असलो, तरी या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा उद्देश, स्वरूप, प्रेक्षक आणि संवादशैलीही वेगळी असते. व्यक्तिगत व्हॉट्सअॅपवर चालणारी कॅज्युअल भाषा लिंक्डइनसारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर योग्य ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येक प्लॅटफॉर्मचा हेतू आणि संदर्भ ओळखून त्यानुसार वागणं हा डिजिटल शहाणपणा आहे. असे काही नेटिकेट्स पाळले आणि टेक्नॉलॉजीचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव बाळगली, तर अनेक नव्या डिजिटल समस्या दूर करण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर आपलं डिजिटल जग अधिक सुरक्षित, सजग, परस्परांसाठी सन्मानजनक बनू शकेल आणि ‘होमो डिजिटॅलिस’ म्हणून आपली वाटचालही खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.
‘डिजिटल जिंदगी’ या सदरातून गेले वर्षभर आपण हीच शहाणीव एकत्र उलगडली. वर्ष संपत आलं आहे आणि त्यासोबत हे सदरही सुसंवादात पूर्ण होत आहे. डिजिटल जीवनात सर्वानी सुखी, निरोगी आणि विवेकी राहावं, डिजिटल माध्यमांवर सर्वानी चांगलं पाहावं, ऐकावं, चांगलं व्यक्त व्हावं या शुभेच्छा मात्र कायम राहतील. आपल्या शहाण्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी मागितलेल्या मागण्यात म्हटलं आहे तसं ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:।’
vinayjoshi23@gmail.com
