कपड्यांपासून पानमसाल्यापर्यंत अशी एकही गोष्ट नाही ज्याची जाहिरात हिंदी चित्रपटसृष्टीतील तारेतारकांशिवाय शक्य आहे. त्यामुळे देशभरातील सगळ्या महत्त्वाच्या ब्रॅण्डचे चेहरे म्हणून कोणा ना कोणा कलाकाराची वर्णी लागलेली असतेच, मात्र सध्या हे देशी तारे विदेशी ब्रॅण्ड्सनाही आपल्याकडे खेचून घेत आहेत. फॅशन आयकॉन म्हणून सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या आणि लंडनमध्ये राहूनच कार्यभार सांभाळणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरची नुकतीच डिऑर या प्रसिद्ध फ्रेंच ब्रॅण्डची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डशी जोडली गेलेली सोनम ही पहिलीच भारतीय अभिनेत्री नाही. मात्र सध्या अनेक विदेशी ब्रॅण्ड्स बॉलीवूडच्या तारेतारकांना आपला चेहरा बनवण्यासाठी उत्सूक दिसतात हे जितकं खरं तितकंच आपले कलाकारही या ब्रॅण्ड्सना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात.

इंटरनेट आणि सोशल मीडियाने जग अगदी छोटं करून टाकलं आहे म्हटलं जातं ते उगाच नाही. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सना जगभरात आपल्या उत्पादनांचं जाळं विणण्यासाठी या डिजिटल खिडकीची खूपच मदत झाली आहे. बॉलीवूड कलाकारांची लोकप्रियता, त्यांच्या कपड्यांपासून, खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सगळ्याचा भारतीय जनमानसावर पडणारा प्रभाव हे समीकरण आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स आणि कलाकारांच्याही पथ्यावर पडलं आहे. त्यामुळे सोनमप्रमाणेच प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, हृतिक रोशन यांच्यासारख्या प्रथितयश कलाकारांबरोबरच कार्तिक आर्यन, अनन्या पांडे अशा नव्या पिढीतलेही चेहरे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या उत्पादनांवर झळकत आहेत. गेली अनेक वर्षं आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड म्हणून लॉरिएल पॅरिस आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे एक नाव सुपरिचित राहिलं आहे. मात्र आता याच लॉरिएल पॅरिसची नवी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून आलिया भट्टने नुकतंच रॅम्प वॉक केलं आहे. गेल्याच वर्षी आलियाला प्रसिद्ध इटालियन ब्रॅण्ड ‘गुची’ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. ‘गुची’ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून मिरवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे. मात्र, ऐश्वर्यानंतर खरं तर प्रियांका चोप्रा आणि तिच्यापाठोपाठ दीपिका पदुकोण या दोन अभिनेत्रींनी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डशी करार करत लोकप्रिय होण्याचं समीकरण साधलं.

indians want to move abroad indians want opportunity to leave India
भारतीयांना भारत सोडण्याची संधी का हवी असते?
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रियांका चोप्रा सध्या ‘बुल्गारी’ या लक्झरी ब्रॅण्डबरोबरच ‘टिफनी अँड कंपनी’, ‘मॅक्स फॅक्टर’सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचं प्रतिनिधित्व करते आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ‘लुई व्हुताँ’ या प्रसिद्ध ब्रॅण्डचं प्रतिनिधित्व करते. तिनेही ‘लुई व्हुताँ’ची पहिली भारतीय ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याचा मान मिळवला आहे. अभिनेता रणवीर सिंगसुद्धा ‘अदिदास’, ‘टिफनी अँड कंपनी’सारख्या ब्रॅण्डचा प्रतिनिधी आहे. थोडक्यात, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आणि भारतीय कलाकार हे समीकरण नवं राहिलेलं नाही. मात्र ते जमवून आणण्यासाठी दोन्हीकडून विशेष प्रयत्न केले जातात आणि त्यात सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे हेही तितकंच खरं…

बॉलीवूड तारेतारकांचे विशेष प्रयत्न

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करणं हे प्रत्येक बॉलीवूड कलाकारासाठी मोठं आव्हान आहे. त्यांच्याकडे हे लोकप्रिय ब्रॅण्ड्स सहजासहजी आलेले नाहीत. त्यासाठी गेली काही वर्षं या कलाकारांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण दोघींनीही हॉलीवूडपटांमध्ये काम करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली. हॉलीवूडपटांबरोबरच प्रियांकाने मेट गालासारख्या इव्हेंट्समध्ये लावलेली हजेरी, ऑस्कर सोहळ्यातील तिची उपस्थिती अशा अनेक गोष्टींचा प्रभाव पडत गेला. दीपिकानेही कॅन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची परीक्षक म्हणून भूमिका बजावली. या महोत्सवांच्या आणि आंतरराष्ट्रीय इव्हेंट्सला लागणारी त्यांची उपस्थिती आणि त्यानिमित्ताने त्यांच्या सोशल मीडियावरून होणारी प्रसिद्धी या दोन्ही गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांची प्रतिमा हळूहळू रुजायला मदत होते. आणि म्हणूनच एखाद्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचा चेहरा म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर मायदेशी त्यांची कोण चर्चा होऊ लागते. सोनम कपूरची ‘डिऑर’ची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून झालेली निवडही त्या अर्थानेच महत्त्वाची ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सवर कसला प्रभाव?

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स या बॉलीवूड कलाकारांकडे का आकर्षित होतात? त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या कलाकारांची वाढती लोकप्रियता. प्रियांका असो वा दीपिका वा रणवीर, या प्रत्येकाचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर ९ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्यापाठोपाठ आलिया भट्टचे ८ कोटींहून अधिक तर दीपिका पदुकोणचे ७ कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. या कलाकारांच्या माध्यमातून जगभरातील त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणं सहज शक्य असल्याने खासकरून आंतरराष्ट्रीय फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रॅण्ड्स प्राधान्याने बॉलीवूड कलाकारांची निवड करताना दिसतात.

अर्थात, बॉलीवूड तारेतारकांना आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सना आपल्यापर्यंत खेचून आणण्यात यश मिळालं आहे हे खरं असलं तरी त्याचं प्रमाण अजून म्हणावं तसं मोठं नाही. त्याचं कारण प्रत्येक लोकप्रिय कलाकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली प्रतिमा आणि लौकिक निर्माण करणं शक्य होतंच असं नाही. आणि दुसरं प्रत्येक ब्रॅण्ड्चेही आपले काही निकष असतात. त्यात फार निवडक जण फिट बसतात. म्हणूनच ज्या निवडक तारेतारकांना हे यश साध्य होतं ते कौतुकाचा विषय ठरतात. भविष्यात ही देवाणघेवाण अधिकाधिक वृद्धिंगत होईल यात शंका नाही.

viva@expressindia.com