ग्रीक पुराणातली एक गोष्ट. देवराज झ्यूस याला मानवाचं जीवन अधिक समृद्ध, अभिरुचीसंपन्न करावंसं वाटलं. त्यासाठी विद्या, कला, ज्ञान हवं, पण मानव पडले विसरभोळे. त्यांच्या डोक्यात काही राहीना. म्हणून झ्यूस स्मृतीची देवी ‘नेमोसिन’ हिच्याकडे गेला. मानवाला ‘स्मृती’ मिळाली. पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचं वरदान मिळालं. पुढे झ्यूस आणि नेमोसिन यांच्या नऊ मुलींनी मानवाला संगीत, विनोद, काव्य, इतिहास, नृत्य, दिशांचं आणि वेळेचं ज्ञान करून देणारं खगोलशास्त्र अशा कलेच्या व ज्ञानाच्या देणग्या दिल्या. स्मृतीतून जन्मलेली प्रेरणा आणि त्यातून प्रसवलेल्या कला, विकसित झालेलं ज्ञान यांच्यामुळे मानवाचं जीवन अधिक अर्थपूर्ण झालं हे या कथेचं तात्पर्य म्हणता येईल.
माणसाची स्मरणशक्ती आणि त्यावर आधारित कल्पनाशक्ती, निर्णयक्षमता, अनुभव यांच्या आधारावर मानवाने असाध्य ते साध्य करून दाखवलं. मग आलं डिजिटल युग. सगळ्यांच्या हातात सुपरफास्ट इंटरनेट असणारा मोबाइल आणि इथून गडबड सुरू झाली, कारण आता काही लक्षात ठेवायची गरजच उरली नाही. साठवून ठेवायला मोबाइल है ना! मोबाइल नंबर पाठ कुठे करायचा, मोबाइलमध्ये सेव्ह करा. नवीन पत्ता शोधायचा आहे? कशाला डोकं लावा, गूगल मॅप आहे ना. महत्त्वाची माहिती लिहून ठेवायची काय गरज? स्क्रीनशॉट घेतला की झालं. डेंटिस्टच्या अपॉइंटमेंटची वेळ, कार सर्व्हिसिंगची तारीख सगळ्याची आठवण मोबाइलच करून देतो.
सोय म्हणून आलेल्या या गोष्टींनी मोबाइलची मेमरी भरत चालली आहे, आपली मात्र कमी होते आहे. तंत्रज्ञानावरच्या अवलंबित्वामुळे स्मृतीत ठेवणं विस्मृतीत जाऊ लागतंय अशी स्थिती येऊ घातली आहे. आणि यातून ‘डिजिटल स्मृतीलोप’ (Digital amnesia) ही नवी समस्या जोर धरू लागली आहे.
एक प्रयोग करून बघता येईल. आपल्या कुटुंबातल्या कितीजणांचे मोबाइल नंबर आपल्याला तोंडपाठ सांगता येतील? परिचयातल्या कितीजणांचे वाढदिवस फेसबुकने न सांगता आपल्याला माहिती असतील? एखादी महत्त्वाची मीटिंग, डॉक्टरांची अपॉइंटमेंट यासाठी रिमांइंडर लावावे लागतात का? नवा पदार्थ बनवताना दर स्टेपला यूट्यूब रेसिपी पॉज करत पाहावी लागते? आपल्याच शहरात जरा नवीन ठिकाणी जाण्यासाठी घरापासूनच गूगल मॅप लावावा लागतो का? एखाद्या गाण्याचा गायक किंवा चित्रपट आठवायचं म्हटलं की गूगल सर्च केला जातो का? मागच्या महिन्यातल्या ट्रिपमधली ठिकाणं, भेटलेल्या व्यक्ती आठवण्यासाठी फोटो स्क्रोल करणं, एखादा लॉगिन पासवर्ड विसरलो तर त्याचा अंदाज बांधून आठवण्यापेक्षा लगेच रिसेट पासवर्ड करणं… यातल्या बहुतांश गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर आपला काहीसा डिजिटल गझनी होऊ लागला आहे, असं समजावं.
स्मरणाची जबाबदारी मोबाइलवर टाकली की विसरणं ही सवय बनते. ‘डिजिटल ॲम्नेशिया’ हा कोणताही वैद्यकीय विकार नाही, तर आपल्या वर्तणूक आणि विचारप्रक्रियेशी निगडित एक मानसशास्त्रीय घटना आहे. डिजिटल साधनांवरच्या अति अवलंबनामुळे स्मृती क्षमता कमी होणं, अशी याची सोपी व्याख्या सांगता येईल. गेल्या दशकभरात डिजिटल क्रांतीचा मानवी स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक क्षमतांवर होणारा परिणाम हा मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा विषय ठरला आहे. २०११ मध्ये बेट्सी स्पॅरो (कोलंबिया विद्यापीठ), जेनी लिऊ (विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठ) आणि डॅनियल एम. वेगनर (हार्वर्ड विद्यापीठ) यांनी ‘सायन्स’ या विख्यात जर्नलमध्ये मांडलेल्या आपल्या शोधनिबंधात ‘गूगल इफेक्ट’ ही संकल्पना मांडली. ‘डिजिटल अम्नेशिया’ हा शब्द २०१५ मध्ये ‘कॅस्परस्काय लॅब’ या संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणानंतर विशेष चर्चेत आला. या अभ्यासात दिसून आलं की बहुतेक लोकांना महत्त्वाचे फोन क्रमांक, पत्ते किंवा इतर माहिती स्मार्टफोनमध्ये सुरक्षित साठवलेली असल्याने ती लक्षात ठेवण्याची गरजच वाटत नाही, पण फक्त माहिती लक्षात न ठेवणं इतकंच याचं स्वरूप नाही. जर्मनीचे न्युरो-मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मॅनफ्रेड स्पिट्झर यांनी २०१६ मध्ये आपल्या ‘डिजिटल डिमेन्शिया’ या पुस्तकातून डिजिटल साधनांवरच्या अति-निर्भरतेबाबत तीव्र इशारा दिला. सतत स्क्रीनसमोर राहिल्यामुळे मेंदूच्या स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचारक्षमतेशी संबंधित काही भागांची कार्यक्षमता कमी होऊ लागते, असं त्यांनी संशोधनातून मांडलं.
प्रसिद्ध जागतिक शैक्षणिक प्रकाशन स्प्रिंगरमध्ये या वर्षी प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात या विषयावर गेल्या काही वर्षांत जगभरात झालेल्या सुमारे ३,००० शोधनिबंधांचं विश्लेषण मांडण्यात आलं आहे. यावरून ‘डिजिटल अम्नेशिया’ हा विषय आता शिक्षण, मानसशास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील एक गंभीर संशोधनविषय ठरत असल्याचं दिसतं. हे डिजिटल विस्मरण समजून घेण्यासाठी आधी मेंदूचं स्मरण समजावून घ्यावं लागेल. आपल्या मानवी मेंदूची माहिती साठवण्याची आणि आठवण्याची प्रक्रिया जितकी व्यामिश्र आहे, तितकीच ती भन्नाटही आहे. विविध संवेदनांमधून आलेली माहिती सर्वप्रथम प्रीफ्रंटल कॉर्टेक्स या भागाद्वारे शॉर्ट टर्म मेमरीमध्ये साठवली जाते. जर ती माहिती महत्त्वाची वाटली, तर मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग तिला ‘महत्त्वाचे’ म्हणून टॅग करतो आणि गाढ झोपेच्या काळात ती माहिती लाँग टर्म मेमरीमध्ये रूपांतरित होते.
लाँग टर्म मेमरी म्हणजे आपलं ज्ञान, कौशल्यं आणि अनुभव यांचा प्रचंड साठा. आपण एखादं गाणं ऐकून लगेच ओळखतो, ओळखीचा चेहरा पाहून आठवतो हे सर्व त्या साठवलेल्या माहितीमुळेच शक्य होतं. एकंदरीत, मेंदू सतत माहिती घेतो, छाटतो, साठवतो आणि योग्य क्षणी पुन्हा आठवतो. संकेतन (Encoding), साठवण(Storage ) आणि आठवण(Retrieval) या स्मृती प्रक्रियेच्या तिन्ही टप्प्यांत मेंदूत अनेक न्युरॉन्स एकमेकांशी जोडले जातात आणि न्युरल नेटवर्क्स तयार होतात. जितकं रिपीटेशन आणि अटेंशन जास्त, तितका हा मार्ग पक्का. स्मृती सशक्त राहण्यासाठी पुनरावृत्ती, एकाग्रता आणि भावनिक जोड आवश्यक असते. पण सगळंच महत्त्वाचं एकट्या मेंदूने लक्षात ठेवावं अशी सक्तीही नाही. मानवी मेंदू नेहमीच कमी श्रमात जास्त परिणाम मिळवण्याच्या दिशेने काम करतो. त्यामुळे जर कोणती गोष्ट बाह्य साधनांच्या मदतीने सोप्या पद्धतीने करता येत असेल, तर मेंदू ती स्वतः लक्षात ठेवण्याचे कष्ट टाळतो. त्यालाच संज्ञानात्मक भारमुक्ती (Cognitive Offloading) म्हणतात. उदाहरणार्थ, गॅसचा नवीन सिलिंडर कधी लावला किंवा दूधवाल्याचे खाडे हे आपण कॅलेंडरवर लिहून ठेवले की विसरून जातो. एखादी रेसिपी पुस्तकात आहे म्हटल्यावर तिची प्रत्येक स्टेप आणि प्रमाण लक्षात ठेवण्याची गरजच राहत नाही. अगदी दुकानात जाताना वस्तूंची यादी लिहून घेणं, मुलांना वेळापत्रक वहीत नोंदवायला सांगणं ही सगळी कॉग्निटिव्ह ऑफलोडिंगची साधी उदाहरणं आहेत.
डॅनिएल वेगनर या मानसशास्त्रज्ञाने सुचवल्याप्रमाणे मेंदूची अजून एक चलाखी म्हणजे ‘सामायिक स्मृती’ (Transactive Memory). या सिद्धांतानुसार, एखाद्या गटात किंवा नात्यात सगळ्यांना सगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते. गटातील सदस्य माहिती लक्षात ठेवण्याचं काम आपापसात विभागून घेतात. घरात आईला नातेवाईकांचे वाढदिवस, वाढदिवसाच्या भेटी लक्षात असतात, वडिलांना बँकेची कामं, बिलांच्या तारखा माहिती असतात, तर मुलांना घरातल्या वायफायचा पासवर्ड् लक्षात असतो. सगळ्यांच्या या सामायिक स्मृतीमुळे घर व्यवस्थित चालतं. ह्या गोष्टी मेंदूच्या ऊर्जा बचतीचा सोपा मार्ग आहे, पण जेव्हा या नैसर्गिक स्मरणप्रक्रियेमध्ये डिजिटल साधनं येतात, तेव्हा चित्र बदलतं. पूर्वी काही आठवलं नाही तर आपण इतरांना विचारायचो, आता गूगल करतो; कॅलेंडरवर लिहून ठेवायचो, आता मोबाइलमध्ये रिमाइंडर लावतो. प्रथमदर्शनी दोन्ही सारखंच वाटलं तरी प्रत्यक्षात त्यात बराच फरक आहे.
एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणं, वाचणं किंवा पाहणं ही स्मरणप्रक्रियेची पहिली पायरी असते. आज मोबाइलवरील सततच्या नोटिफिकेशन्स, मेसेजेस आणि मल्टिटास्किंगमुळे आपलं लक्ष काही सेकंदांपेक्षा जास्त एका गोष्टीवर टिकत नाही. अभ्यास करताना कानात हेडसेटवर गाणे, व्हॉट्सॲपवर चॅट, इन्स्टावर रील्स स्क्रोल करणं, अशा मल्टिटास्किंगची भारी हौस. त्यात माहितीचा महापूर. सतत येणारे मेसेजेस, न्यूज, पोस्ट्स आणि रील्समुळे मेंदूला कोणती माहिती महत्त्वाची आणि कोणती टाकाऊ, हे ठरवणंच अवघड होतं. परिणामी, बरंच काही पाहूनही काहीच लक्षात राहात नाही.
स्मरणशक्ती टिकवण्यासाठी माहितीची पुनरावृत्ती आवश्यक असते. जुन्या काळी सुभाषितं, पाढे किंवा श्लोक परत परत म्हणणं म्हणजेच मेंदूत त्या माहितीचे न्युरल पाथवे मजबूत करणं होतं. आज मात्र ‘गूगलवर आहेच’ म्हणत मेंदूत काही न साठवता पुढे जातो. स्मृती प्रक्रियेत झोप ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. गाढ झोपेच्या अवस्थेतच मेंदू शॉर्ट टर्म मेमरीचं लाँग टर्म मेमरीत रूपांतर करतो. पण, बिंज वॉचिंग, लेट-नाइट चॅटिंग किंवा गेमिंगमुळे झोपेची वेळ आणि गुणवत्ता दोन्ही बिघडतात. झोप नियंत्रित करणारा मेलॅटोनिन हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो, त्यामुळे गाढ झोप होत नाही. याचा नकारात्मक परिणाम स्मृतीवर होतो.
भावनिक जोड स्मृतींना अधिक सक्षम करत असते. मेंदूतील अमिग्डाला हा भाग या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, डिजिटल कृतीत बऱ्याचदा भावनिक खोली कमी असल्याने अमिग्डालाला त्या अनुभवाला ‘महत्त्वाचं’ म्हणून चिन्हांकित करण्यासाठी पुरेसा भावनिक संकेत मिळत नाही, आणि अशा डिजिटल आठवणी लवकर फिकट होतात. उदाहरणार्थ, मित्राच्या वाढदिवसाला त्याचा फोटो स्टेटस म्हणून ठेवणं काही काळात विस्मृतीत जाईल; पण त्याला भेटून किंवा कॉल करून शुभेच्छा देणं, स्वतः काहीतरी बनवून भेट देणं, या कृती दीर्घकालीन स्मृतीत कोरल्या जातील.
थोडक्यात सांगायचं तर हॅरी पॉटर सिनेमातल्या हरमायनीसारखं मोबाइल आपल्यावर ‘स्मृती-विरूपम’ मंत्र टाकत आपल्या आठवणी हळूहळू पुसून टाकतो आहे. त्यामुळे विचारप्रक्रियेवर, भावनांवर आणि शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम दिसू लागले आहेत. फोन सगळं लक्षात ठेवेल, ही सवय हळूहळू आपल्या विचारशक्तीला बोथट करते. का?, कसं? असले प्रश्न न पडता गूगलचं पहिलं उत्तर अंतिम सत्य वाटू लागतं. आणि दोन दिवसांनी पुन्हा त्याच गोष्टी गूगल कराव्या लागतात. डिजिटल अम्नेशियाचा आपली कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांवरही परिणाम दिसू लागला आहे. स्मृती ही फक्त माहिती साठवण्याची प्रक्रिया नाही, तर आपल्या अस्तित्वाचा, भावनिकतेचा अविभाज्य भाग आहे. प्रिय व्यक्तीच्या लहानसहन बाबी आवर्जून लक्षात ठेवल्याने नात्यांची वीण जपण्यास मदत होते. यात मेमरी आउटसोर्स करणं बाधक ठरू शकतं, त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं ठरतं.
डिजिटल स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी उपायही तसे सोपे आहेत. जिथे शक्य असेल, तिथे हे मेमरी आउटसोर्सिंग थांबवणं, लहानलहान गोष्टी स्वतः लक्षात ठेवायचा सराव वाढवता येईल. काही नवीन गाणी, श्लोक किंवा कविता मुद्दाम पाठ करून दररोज म्हणण्याची सवय लावता येईल. दररोज ठरावीक वेळ नो-स्क्रीन टाइम म्हणून जाहीर करून वाचन, लेखन किंवा कुटुंबीयांशी संवाद अशा कृतींसाठी देता येईल. शरीराप्रमाणे मेंदूसाठीही मानसिक कसरत आवश्यक असते. मेमरी गेम्स, सुडोकू, शब्दकोडी अशा गोष्टींनी स्मरणशक्ती, तर्कशक्ती दोन्ही तल्लख राहतात. तसंच, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि काही वेळ ध्यान हे सगळं मेंदूला माहिती साठवण्याची ताकद देतात, त्यामुळे दिनचर्येत यांना प्राधान्य द्यायला हवं.
गीतेतील ‘क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।’ हा श्लोक खरंतर क्रोधाचा परिणाम सांगणारा, पण मोहाने स्मृती कमकुवत होऊ लागते आणि अशा स्मृतिभ्रंशाने बुद्धीवर परिणाम होतो, हा अर्थही महत्त्वाचा. बुद्धिनाशात् प्रणश्यति टाळायचं असेल तर डिजिटल माध्यमांवर अति अवलंबनाचा मोह टाळायला हवा!
