नोव्हेंबर, डिसेंबर महिना म्हणजे उबदार गुलाबी थंडीचे दिवस. यंदाच्या वर्षात थंडी हळूहळू जाणवतेय. मंद ऊन, गार वाऱ्याची झुळूक, हातात वाफाळता चहा, उबदार स्वेटर या सगळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पण या थंड हवेच्या गारव्याबरोबरच त्वचेच्या काही न बोलता येणाऱ्या समस्याही सुरू होतात. कोरडेपणा, निस्तेजपणा आणि खवलेयुक्त त्वचा अशा समस्या वाढीस लागतात. तापमान कमी होत जातं, तसं त्वचेला जास्त प्रेम आणि काळजीची गरज भासते. या ऋतूत फक्त शरीर नव्हे, तर त्वचेच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक असते. तुमची त्वचा कशीही असली तरी थंडीत थोडातरी कोरडेपणा येतोच आणि त्वचा योग्य पद्धतीने हाताळली गेली नाही तर त्वचेवर दीर्घकाळासाठी परिणाम होऊ शकतो.
हिवाळ्यात त्वचेवर कसा परिणाम होतो?
सगळ्यात आधी तुम्ही तुमचा स्किनटाइप ओळखणे गरजेचे आहे. चेहरा धुतल्यानंतर थोड्या वेळाने तुमची त्वचा कोरडी झाली, तर तुमची स्किन ड्राय आहे. त्वचेवरचं तेल परत आलं असेल, तर त्वचा ऑइली आहे आणि फक्त चेहऱ्यावर कपाळ, नाकाच्या ठिकाणी तेलकट असेल तर त्याला कॉम्बिनेशन स्किनटाइप म्हणतात. हे समजून घेतले की थंडीत आपल्या त्वचेच्या बाबतीत काय समस्या उद्भवू शकते आणि त्याची काळजी कशी घेता येईल हे समजणे सोपे जाते.
त्वचेचा कोरडेपणा
हिवाळ्यात हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा पटकन निघून जातो. परिणामी त्वचा कोरडी, ताणलेली आणि निस्तेज वाटू लागते. विशेषतः गाल, हात आणि पाय या भागांवर हा कोरडेपणा जास्त जाणवतो.
खवलेली आणि निस्तेज त्वचा
थंड हवेमुळे मृत पेशी त्वचेच्या वरच्या थरावर जमा होतात. त्यामुळे त्वचा खवलेली दिसते आणि तिचे नैसर्गिक तेज कमी होते. योग्य एक्सफोलिएशन न केल्यास त्वचा निस्तेज व थकलेली वाटते.
फुटलेले ओठ
थंड वारे आणि कमी पाण्याचे सेवन यामुळे ओठ पटकन फुटतात. काही वेळा ते इतके कोरडे होतात की दुखणे व रक्तस्रावसुद्धा होतो. त्यामुळे लिप बामचा वापर हा हिवाळ्यात अत्यावश्यक ठरतो.
खाज व लालसरपणा
कोरड्या हवेमुळे त्वचेच्या वरच्या थरात सूज व खाज निर्माण होते. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींना हा त्रास अधिक होतो. थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करणे आणि हायड्रेटिंग मॉइश्चरायझर लावणे याने हा त्रास कमी होतो.
ताण जाणवणे आणि त्वचा तडकणे
हिवाळ्यात त्वचेमधील तेल कमी झाल्याने त्वचा ताणलेली वाटते. कोरड्या पायांच्या टाचा, कोपर आणि गुडघ्यांवर चरे पडणे ही सर्वात सामान्य समस्या असते. नियमित मॉइश्चरायझिंग आणि ओलावा टिकवणारे क्रीम वापरणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावर लालसर डाग
थंडी आणि वाऱ्यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह बदलतो, त्यामुळे काही भाग लालसर दिसतो. हे विशेषतः सेंसिटिव्ह किंवा ड्राय स्किन असणाऱ्यांमध्ये आढळते. या अवस्थेत ‘सुदिंग क्रीम’ किंवा ‘अलोव्हेरा जेल’ उपयुक्त ठरू शकतं.
जास्त गरम पाण्याची अंघोळ
थंडीत गरम पाण्याची अंघोळ सुखावह वाटते, पण त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी व खाजरी होते. कोमट पाण्याने अंघोळ करून लगेच मॉइश्चरायझर लावणे हे योग्य आहे.
सूर्यप्रकाशाचा अभाव
हिवाळ्यात अर्थातच सूर्यप्रकाश कमी असतो आणि आपल्या राहणीमानामुळेही सूर्यप्रकाश आपल्याला कमीच मिळतो. ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासते. यामुळेही त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. म्हणूनच थंडीतही सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण सल्फर फ्री मॉइश्चुरायझर, सनस्क्रीन, गरजेचे असेल तेव्हा टोनर, रात्री झोपताना हॅन्ड आणि फूट क्रीम अशा गोष्टी रोजचे स्किन रुटीन म्हणून करतात, पण स्किन केअर ही फक्त क्रीम्स पुरती मर्यादित राहात नाही. तुमची त्वचा जर आतून संतुलित असेल तर बाहेरून तुम्ही थोडे कमी जास्त केले तरी फारसा फरक पडत नाही.
आहारातून मिळणारे सौंदर्य
त्वचेची खरी चमक ही बाहेरून नाही, तर आतून येते. हिवाळ्यात गाजर, बीटरूट, पपई, बदाम, अक्रोड, जवस आणि हळद यांसारखे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. हे सर्व त्वचेला ‘ग्लो’ देणारे नैसर्गिक घटक आहेत. ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असलेले अन्नपदार्थ त्वचेला आतून ओलावा देतात. पुरेसे पाणी पिणे हेही कटाक्षाने पाळायला हवे. थंडी असली तरी शरीरातील हायड्रेशन टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आहारात फळांचे रस आणि भाज्यांचा समावेश करा. जंक फूड, साखर आणि जास्त तेलकट पदार्थ टाळल्यास पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ राहते.
झोप आणि विश्रांती : त्वचेसाठी सर्वात चांगले टॉनिक
अनेकदा आपण त्वचेसाठी महागडी उत्पादने वापरतो, पण पुरेशी झोप घेत नाही. हिवाळ्यात झोपेचा दर्जा वाढवणे महत्त्वाचे आहे, कारण याच काळात शरीर आपोआप रिपेअर होतं. सात-आठ तासांची गाढ झोप त्वचेला नैसर्गिक विश्रांती आणि ताजेपणा देते.
मानसिक शांतता आणि तणावमुक्ती
ताणाचा त्वचेवर थेट परिणाम होतो. हिवाळा हा ऋतू स्वतःशी जोडून घेण्याचा, मन शांत करण्याचा असतो. ध्यान, पुस्तकवाचन, संगीत यांसारख्या गोष्टींमुळे चेहऱ्यावर एक वेगळीच शांत चमक दिसू लागते.
व्यायाम आणि रक्ताभिसरण
थंड हवेमुळे रक्तप्रवाह मंदावतो, त्यामुळे त्वचेचा रंग निस्तेज होतो. योग, चालणं, प्राणायाम असे सौम्य व्यायाम हे फक्त शरीरासाठीच नव्हे तर त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयोगी आहे. व्यायामामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्वचेला नवी झळाळी मिळते.
थंडीत सुस्ती येते. भूकही जास्त लागते, पण यानेच शरीर आखडते, हाडे दुखतात आणि मग शरीरातील शुगर लेव्हल वाढून त्याचे परिणाम दिसायला लागतात. अगदीच व्यायाम जमला नाही तरी रोज निदान अर्धा तास चालणे, श्वासाचे व्यायाम करणे, थोडे स्ट्रेचिंग करणे हे प्रकार तुम्ही करू शकता. हे केल्याने थंडीमुळे शरीर थोडे लवचीक व्हायला मदत होते. थोडी हालचाल केल्याने थंडीतला आहारही नियंत्रित राहतो.
नैसर्गिक घटकांची शक्ती
घरात उपलब्ध असलेले काही सोपे घटक हिवाळ्यातील सर्वोत्तम स्किनकेअर ठरू शकतात. उदाहरणार्थ, दह्यात थोडा मध मिसळून फेसमास्क बनवा किंवा गुलाबपाण्याने चेहरा पुसा. याने त्वचा मऊ, ओलसर आणि स्वच्छ राहते. केमिकल्सऐवजी हे नैसर्गिक उपाय शरीरासाठी योग्य ठरू शकतात.
हायड्रेशन अतिशय महत्त्वाचे
फक्त स्किनच नाही तर संपूर्ण शरीराचे हायड्रेशन हा मूलत: अत्यंत गरजेचा भाग असतो आणि हिवाळ्यात तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. थंडीत आपोआपच पाणी कमी प्यायले जाते, त्यामुळे गरम पाणी, वेगवेगळे सूप्स असे पर्याय निवडून तुम्ही हायड्रेशन वाढवू शकता. आंघोळ झाल्यावर, दिवसभर, रात्री झोपताना मॉइश्चुरायझर, हॅन्ड आणि फूट क्रीम खूप महत्त्वाचे आहे. त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. नैसर्गिक ॲलोव्हेरा जेल थंडीत खूप फायदेशीर ठरू शकते.
मॉइश्चरायझर लावा
अंघोळीनंतर शरीर कोरडे केल्यावर लगेच मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेमध्ये ओलावा जास्त काळ टिकतो. ‘शिया बटर’, ‘कोको बटर’ किंवा ‘ॲलोव्हेरा’ असलेले बॉडी लोशन्स हिवाळ्यात विशेष उपयोगी असतात. हात आणि पाय हिवाळ्यात सर्वाधिक कोरडे पडतात. रात्री झोपण्यापूर्वी हातावर क्रीम आणि पायांवर ग्लिसरीन किंवा पायांसाठी खास फुट क्रीम लावणे उपयुक्त ठरेल. कॉटनचे ग्लोव्ह्ज आणि मोजे वापरल्यास क्रीम जास्त शोषले जाते. थंडीत फेसवॉस आणि साबण दोन्ही सौम्य स्वरूपाचे असले पाहिजेत. ‘माइल्ड’, ‘सल्फेट-फ्री’ फेसवॉश वापरण्याबरोबरच थंडीत स्क्रबिंग करणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे त्वचेवर ओरखडे निर्माण होऊ शकतात. याशिवाय, थंडीच्या जाड कपड्यांखाली कॉटनचे कपडे वापरणे उपयोगी ठरू शकते. ऊन, सिंथेटिक किंवा ॲक्रेलिक कपडे थेट त्वचेला लागल्याने खाज किंवा ॲलर्जी निर्माण होऊ शकते, म्हणून जाड स्वेटर्सखाली कॉटनचा हलका लेयर घालणे फायदेशीर ठरते.
भारतात विविध प्रांतांमध्ये थंडीचे प्रमाण कमी जास्त असते. त्या त्या भागातील लोकांना आपल्या प्रांतातल्या थंडीची सवय असते, पण आता बदलत्या राहणीमानांमुळे ऋतूंप्रमाणे आपल्या आहारात, सवयींमध्ये थोडे फार बदल करणे गरजेचे झाले आहे. तसेच, हवामानही आधीसारखे संतुलित राहिलेले नसल्याने योग्य कॉस्मेटिक्सबरोबरच आहार, व्यायाम, राहणीमान संतुलित असले पाहिजे. बाहेरच्या कॉस्मेटिक्सवर पूर्ण अवलंबून न राहता घरातल्या घरात दही, मध, ड्रायफ्रुटस, हळद, गुलाबपाणी, कोरफड, नारळाचे दूध, नारळाचे तेल हे घटक आपल्या रोजच्या आहारात, वापरात आणले गेले तर वेगळे स्किन केअर करावे लागणार नाही.
