वेदवती चिपळूणकर परांजपे
अनेक गोष्टी लहानपणापासून अनेकांनी आपल्याला शिकवलेल्या असतात, कधी नकळतपणे तर कधी जाणूनबुजून. समाजाच्या दृष्टीने काही ठोकताळे कसे असायला हवेत आणि त्यात आपण कसं बसायला हवं याचा सतत विचार करणं हा त्यातला मोठा भाग! या समजुती मनात इतक्या घट्ट रुतून बसतात की तीच आपली विचार करण्याची पद्धत बनते. तीच पद्धत पुढे जाऊन आपल्यालाच त्रासदायक ठरायला लागते. कोणाचं तरी यश पाहून कॉम्प्लेक्स येणं, इतरांच्या आयुष्याशी तुलना करत राहणं आणि स्वत:मधल्या नसलेल्या चुका शोधत राहणं, या भावना खूप सहजपणे यायला लागतात ज्यांचा परिणाम म्हणजे स्ट्रेस! पण, आजची जेन झी आणि मिलेनियल्सची पिढी स्वत:च्याच या अनावश्यक समजुतींना प्रश्न विचारते आहे. इतका काळ नकळतपणे अंगी भिनलेल्या समजुती दूर करण्यासाठी ‘अनलर्निंग’चा प्रयोग स्वत:वर करते आहे.

अनलर्निंग म्हणजे शिकलेलं विसरणं नव्हे. तर जे विचार, सवयी किंवा समजुती आज आपल्या मानसिक आरोग्यासाठी अडथळा ठरत आहेत, त्या ओळखून त्यांच्यापासून हळूहळू मुक्त होण्याचा प्रयत्न करणे. म्हणजेच स्वत:ला नव्याने घडवण्याची प्रक्रिया. आज सोशल मीडियामुळे प्रत्येक क्षणी कुणाचं तरी यश, प्रवास, फिटनेस, रिलेशनशिप्स किंवा करिअर आपल्या स्क्रीनवर दिसत असतं. नकळत आपल्या मनात ‘आय ॲम नॉट गुड इनफ’, ‘माझं आयुष्य मागे पडलंय’, ‘मला अजून जास्त मेहनत करायला हवी’ अशा भावना वाढायला लागतात. अशा वेळी आजची तरुणाई स्वत:लाच विचारते आहे की हे विचार खरंच माझे आहेत, की ही केवळ मला लागलेली एक सवय आहे? याच प्रश्नातून अनलर्निंगची सुरुवात होते.

आपल्या मनात असलेल्या अनेक समजुती खरंच गरजेच्या आहेत का, त्याच आदर्श मानून चालणं योग्य आहे का, प्रत्येक क्षणी आपलं आयुष्य आदर्शच असायला हवं का, प्रत्येकासाठी आयडियल परिस्थिती वेगळी असू शकत नाही का, असे अनेक प्रश्न स्वत:लाच विचारून इतका काळ मनामध्ये पक्क्या झालेल्या समजुतींना चॅलेंज करत त्या समजुती ‘अनलर्न’ करण्याचा प्रयत्न ही पिढी करते आहे. अनलर्निंगचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वत:बद्दलची टीका कमी करणं. प्रत्येक वेळी परिपूर्ण असण्याचा हट्ट, प्रत्येक चूक ही अपयश समजणं किंवा प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करणं, या सवयी अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे आता अनेक जण स्वत:ला थोडी मोकळीक देत आहेत. ‘चूक झाली तरी चालेल’, ‘नाही म्हणणं चुकीचं नाही’, ‘माझी किंमत फक्त माझ्या कामावर ठरत नाही’ अशा नव्या विचारांना स्वीकारलं जातं आहे.

मानसशास्त्रात ‘अनलर्निंग’ हा अधिकृत उपचारप्रकार नसला तरी त्यामागील कल्पना नवीन नाही. मानसशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ‘अनलर्निंग’ ही केवळ सोशल मीडियावरची संकल्पना नाही. तिच्यामागे अनेक मानसशास्त्रीय तत्त्वांचा आधार आहे. आपल्या विचारांची, भावनांची आणि वागण्याची पद्धत ही आयुष्यभर आलेल्या अनुभवांमधून आणि शिकलेल्या समजुतींमधून तयार होत असते. या समजुतींपैकी काही उपयुक्त असतात, तर काही कालांतराने ताण, चिंता, अपराधीपणा किंवा कमी आत्मविश्वासाला कारणीभूत ठरू शकतात. मानसोपचारांमध्ये, असे नकारात्मक किंवा अनरिअलिस्टिक विचार ओळखून त्याऐवजी अधिक वास्तववादी, लवचीक आणि उपयोगी विचारसरणी विकसित करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे ‘अनलर्निंग’ म्हणजे सर्व काही विसरणं नव्हे, तर स्वत:च्या विचारसरणीकडे चिकित्सक नजरेने पाहून स्वत:च्याच मानसिक आरोग्याला पोषक अशा नव्या दृष्टिकोनाचा स्वीकार करणं!

हा खरं तर केवळ ट्रेण्ड नाही. नवीन तरुण पिढीने अनेक नवीन आव्हानांना सामोरं जात असताना स्वत:वरचा अनावश्यक स्ट्रेस कमी करण्यासाठी शोधलेला उपाय आहे. अनलर्निंग आपल्याला स्वत:कडे नव्या नजरेने पाहायला शिकवतं. अनलर्निंगची ही पद्धत आपण कोण आहोत यापेक्षा, आपण कोणत्या समजुतींचं ओझं वाहत आहोत, का वाहत आहोत, ते खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्न विचारायला भाग पाडते. कदाचित, म्हणूनच आजची पिढी स्वत:ला बदलण्यापेक्षा, आधी स्वत:ला समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे.

कधी कधी पुढे जाण्यासाठी नवीन काही शिकण्यापेक्षा, जुनं ओझं हलकं करणं अधिक गरजेचं असतं. आणि कदाचित हेच ‘अनलर्निंग’चं खरं सार आहे.