नकाशा म्हटलं की रंगीबेरंगी रंगातील एक कागद डोळ्यासमोर येतो. त्यामध्ये छोट्या अक्षरात गावांची नावं लिहिलेली असतात. कुतूहलाने त्यामध्ये आपलं गाव शोधण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. आपल्या गावातून वाहणारी नदी, आजूबाजूला लागून असलेली गावं बघून मन प्रसन्न होऊन जातं. असा हा नकाशा पर्यटनामधला एक महत्त्वाचा भाग आहे. या नकाशाने सुद्धा अत्याधुनिक जगाची कास धरली आहे. पारंपरिक ते अत्याधुनिक पद्धतीने माहिती देणाऱ्या या नकाशाच्या साथीने सफरनामा कसा घडतो हे जाणून घेणं तितकंच रंजक आहे.

नकाशा पाहिला की सर्वात पहिल्यांदा त्याचं महत्त्वपूर्ण अंग म्हणजे अक्षांश-रेखांश डोळ्यासमोर येतात. अक्षांश – रेखांशचा नक्की अर्थ होतो तरी काय आणि नकाशावाचनात त्यांचा उपयोग कसा करायचा? याविषयी माहिती देताना बदलापूर येथील ट्रेकर व नकाशा वाचक मनजीत माळवी सांगतो, ‘अक्षांश ज्याला इंग्रजीमध्ये लॅटीट्यूड असं म्हणतात. ही (काल्पनिक) आडवी रेषा पृथ्वीच्या मध्यभागी असून भूमध्य रेषेमुळे पृथ्वी दोन भागात विभागली जाते. वरचा भाग उत्तर आणि खालचा भाग दक्षिण म्हणून ओळखला जातो. रेखांशला इंग्रजीत लॉंगीट्यूड असं म्हणतात. ही (काल्पनिक) उभी रेषा पृथ्वीच्या मध्यभागी उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव मध्ये जोडते. आपण त्याला रेखावृत्त (प्राईम मेरिडियन) असं म्हणतो. यामुळे पृथ्वी दोन भागात विभागली जाते. डावा भाग पश्चिम आणि उजवा भाग पूर्व म्हणून ओळखला जातो. आपण जर भारतातील मध्यभागी (नागपूर) या शहरात असू तर कलकत्ता पूर्व दिशा, मुंबई पश्चिम दिशा, दिल्ली उत्तर तसंच कन्याकुमारी दक्षिण दिशेकडे येते’.

अशा या नकाशाचे खूप प्रकार आहेत. मनजीतने दिलेल्या माहितीनुसार, आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी नकाशा वापरला जातो. तालुका, जिल्हा, राज्य, देश, जनसंख्या, रस्ता, सैन्य आणि असं बरंच काही जाणण्यासाठी नकाशाचा उपयोग होतो. यावरून आपल्याला त्या त्या भागाची अचूक माहिती मिळते. उदा. जनसंख्या नकाशावरून कुठल्या भागात किती जनसंख्या आहे याचं सर्वेक्षण केलं जातं. यावरून त्या भागात लोकसंख्येबरोबरच शाळा, जमीन, घरं याची माहिती सहज मिळविता येते. खरंतर पूर्वीच्या काळी हे सर्व नकाशे हाताने बनवले जायचे. त्यालाच कागदी नकाशे म्हणतात. हे नकाशे बनवण्यास, वापरण्यास व जतन करून ठेवण्यास कठीण होते. हल्ली सर्व डिजिटल आणि संगणक तंत्रज्ञान युग असल्यामुळे एका क्लिकवर सेकंदात सगळी माहिती मिळते.

भटकंतीसाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशामध्ये सध्या सर्वात लोकप्रिय म्हणजे गूगल मॅप. याच्या साहाय्याने आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी सहजपणे जाऊ शकतो. मनजीत सांगतो, ‘गूगल मॅपमध्ये पायी, चारचाकी, दुचाकीने जाण्यासाठीच्या मार्गांचे पर्याय निवडता येतात. यासारखेच अॅपल मॅप, वेझ, हियर मॅप, बिंग, मायक्रोसॉफ्ट मॅप असे अन्य मॅपही आहेत. याद्वारे आपण फक्त रस्ताच नव्हे, तर हॉटेल, पेट्रोल पंप, शाळा, घर आणि लाईव्ह ट्रॅफिकही बघू शकतो. बहुतांश ट्रेकर विकिलॉक, रंबलर, ओपन स्ट्रीट मॅप OSMAnd अशा मॅपचा उपयोग करताना दिसतात. नकाशावाचनासाठी आपल्याला आठही दिशेचं ज्ञान असणं आवश्यक असतं. कुठल्याही नकाशावर उत्तर दिशा दर्शवलेली असते. याचाच अर्थ त्याच्या विरुद्ध (खालची) बाजू म्हणजे दक्षिण दिशा. उजवीकडची पूर्व आणि डावीकडची पश्चिम दिशा. दिशा ओळखण्यासाठी होकायंत्राचा वापर केला जातो. ज्याचं एक टोक नेहमी उत्तरेकडे असतं. यावरून बाकी दिशांचा अंदाज लावता येतो. दिशा ओळखण्याची आणखी एक पद्धत म्हणजे उत्तर दिशेकडे दिसणारा ध्रुव तारा (इंग्रजीमध्ये पोल स्टार). दुसरी पद्धत म्हणजे उन्हातून जात असाल तर तुमची सावली दिशादर्शक ठरते. सूर्य पूर्व आणि पश्चिम प्रवास करतो, यावरून त्या व्यक्तीची सावली बदलत जाते. या काही दिशा ओळखण्याच्या पद्धती आधीपासून प्रचलित असल्यामुळे कधीही नकाशात मुख्यत्वे उत्तर दिशा दर्शवतात. या दिशेची माहिती मिळवायची सोपी पद्धत आता डिजिटल मॅपने घेतली आहे, असं मनजीत सांगतो.

नकाशामधील सॅटेलाइट म्हणजे नक्की काय? याविषयीची माहिती देताना नकाशावाचनाची आवड असणारा पुण्यातील निनाद बारटक्के सांगतो, ‘सॅटेलाइटचं अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर चंद्र. चंद्राचं पृथ्वीभोवती एका कक्षेत परिभ्रमण चालू असतं. ज्यामुळे आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या कला दिसतात. अर्थात चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह म्हणजेच सॅटेलाइट आहे. विज्ञान जसं प्रगत होत गेलं, तसं मानवाने उपग्रह निर्माण करून ते पृथ्वीच्या कक्षेत सोडायला सुरुवात केली. ही मानव निर्मित उपग्रह विविध प्रकारची माहिती पृथ्वीकडे पाठवतात. ज्याचा उपयोग संशोधनासाठी, एखाद्या घटनेवर पाळत ठेवण्यासाठी, हवामानाचा अंदाज, टेलिव्हिजन, रेडिओ, जीपीएस तसंच ई-कामांसाठी केला जातो’.

यापुढे जाऊन मोबाईलमधील मॅप सॅटेलाईटद्वारे कसं काम करतात? याविषयी निनाद सविस्तर माहिती देतो. ‘सॅटेलाइटकडून पृथ्वीची एका विशिष्ठ प्रकारची प्रतिमा मिळते, ज्याचा वापर करून संगणकावर पृथ्वीचे डिजिटल मॉडेल्स तयार केले जातात. वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्या अॅप्समार्फत ही मॉडेल्स तुम्हाला उपलब्ध करून देतात. उदा. गुगल मॅप्स, अॅपल मॅप्स इत्यादी. गूगल मॅप्सवर तुम्ही एखादा परिसर ब्राउज करत जाता तसं गुगलच्या सर्व्हर वरून तुमच्या मोबाईलमधे विविध मॅप्स लोड व्हायला लागतात. गूगल कंपनीने हे नकाशाचे स्तर सॅटेलाइटकडून मिळालेल्या प्रतिमेपासून निर्माण केलेले असतात. प्रत्येक मोबाईलमध्ये असलेला जीपीएस सतत सॅटेलाईटबरोबर संपर्कात असतो. या जीपीएसचा जेव्हा तीन किंवा चार सॅटेलाईटसशी संपर्क होतो, तेव्हा हा जीपीएस तुमचं लोकेशन लॉक करतो आणि ते लोकेशन गूगल मॅप्सवर दिसू लागतं’ असं निनादने स्पष्ट केलं.

गूगल मॅप्स, विकिमॅपिया आणि अन्य अॅप्सचा प्रभावी वापर भटकंती दरम्यान कसा करायचा? याबद्दलही निनादने माहिती दिली. जीपीएस संबंधित अॅप्समध्ये विविध प्रकारचे मॅप लेयर असतात, जसं सॅटेलाईट व्ह्यू, टेरेन व्ह्यू वगैरे. यातल्या प्रत्येक लेयरचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. सॅटेलाईट व्ह्यू हा ड्रोन मधून काढलेल्या एरियल फोटो प्रमाणेच दिसतो. यातून एखाद्या परिसरातील नदी, ओढे, डोंगर, जंगल, माळरान अशा विविध भौगोलिक पैलूंचा चांगल्या प्रकारे अंदाज बांधता येतो. टेरेन व्ह्यू मधून एखाद्या परिसरात असलेल्या चढउतारांचा अंदाज घेता येतो. तर गूगल मॅप्ससारख्या अॅप्समधून प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेचा देखील अचूक अंदाज बांधता येतो. हवामानाचा अंदाज देणारे काही अॅप्स भटकंतीदरम्यान फार उपयुक्त ठरतात. हवामानाचा अंदाज घेऊन आपण प्लॅनमध्ये फेरफार करू शकतो, असं त्याने सांगितलं.

प्रवासा दरम्यान हे जीपीएस अॅप्स चांगल्या रस्त्यांचा, ट्रॅफिकचा, रस्त्याच्या वेग मर्यादेचा योग्य अंदाज देतात. असं असलं तरी ती एक टेक्नॉलॉजी असल्याने त्यात कधी चूकही होऊ शकते, त्यामुळे जीपीएस असलं तरी स्थानिक वाटाड्यांबरोबर संवाद असलाच पाहिजे. एखाद्या रिमोट ठिकाणी रस्ता बंद असला, तर बऱ्याच वेळेला गुगल मॅप्स मध्ये ती माहिती उपलब्ध नसल्याने आपली फजिती होते. स्थानिक मंडळींना मात्र त्याची अचूक माहिती असते. अडीअडचणीच्या प्रसंगी रेस्क्यू टीमला तुमचं लाईव्ह लोकेशन पाठवल्यावर तुमचा शोध घेणं अधिक सोपं होतं. जीपीएस अॅपमध्ये नकाशा डाउनलोड करायची सोय असल्याने आपण जिथे फिरायला जात आहोत त्याचा नकाशा आधीच डाऊनलोड केला तर मोबाइलला रेंज नसल्यावरही आपल्याला जीपीएस आणि मॅप्सचा योग्य तो वापर करता येतो. अशा प्रसंगी खरंतर जीपीएस हा एका अर्थाने आपला सारथीच ठरतो, असं निनाद म्हणतो.

नकाशा वापरायच्या आधी त्याचा थोडा अभ्यास करणं अधिक उपयुक्त ठरतं. डिजिटल नकाशा कधीतरी धोक्याची घंटा वाजवतोच. त्यामुळे तंत्रज्ञानावर अवलंबून राहतानाही पारंपरिक नकाशा, वाटाडे यांची मदत घेतली तर आपला सफरनामा अधिक सुखकर होईल.

viva@expressindia.com