राधिका कुंटे

छायाचित्रणकला, इतिहास आणि मन हे तिच्या आवडीचे विषय. त्यांची यथायोग्य सांगड घालत तिची अविरत धडपड आणि अभ्यास करणं सुरू आहे. सानिका देवडीकरला पडणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा आतापर्यंतचा अँगल कसा आहे, ते जाणून घेऊ या.

सानिका देवडीकर टिपिकल मध्यमवर्गीय घरातली. रात्री झोपायच्या आधी तिला आणि तिच्या लहान बहिणीला छत्रपती शिवाजी महाराजांची किमान एक तरी गोष्ट ऐकायचीच असायची. मग वाढत्या वयानुसार मराठय़ांचा इतिहास, मुघल वगैरे एकेकाची भर पडली. सातवीत तिने दुसऱ्या महायुद्धाबद्दल ‘एस्केप फ्रॉम सॉबीबोर’ हा माहितीपट पाहिला. ‘सॉबीबोर’ म्हणजे जर्मनीतील छळछावणी. ते तिच्यासाठी वेगळं आणि धक्कादायक होतं. त्यानंतर दोन रात्री ती झोपूच शकली नव्हती. तिच्या आई-वडिलांचा इतिहासाचा खूप अभ्यास असून शिवाजी महाराज आणि पेशवे हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. सानिकाला दहावीपर्यंत इतिहास आवडायचाच. त्याउलट गणित आणि विज्ञान नावडीचे. चित्रकलेकडे असणारा तिचा कल पाहता ती अ‍ॅनिमेशन किंवा कमर्शिअल आर्ट करेल असं वाटत होतं. तिने दादरच्या ‘मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूट’मधून एक वर्षांचा डिप्लोमा केला. नंतर कमर्शिअल आर्टला सोफियाला प्रवेशही मिळाला होता. तेव्हा तिला जाणवलं की इतिहास आणि फोटोग्राफी (छायाचित्रण) इतकं आवडतं आहे की ते दोन्ही साध्य करता येईल. मग छायाचित्र काढताना इतिहास अभ्यासत ती कलिनाच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमातून बी. ए. (इतिहास) झाली. आई-बाबा आणि बहिणीचा खंबीर पाठिंबा तिला कायमच मिळाला आहे.

सानिका सांगते की, ‘सातवीत तो माहितीपट बघून दुसऱ्या महायुद्धाविषयी कुतूहल वाटलं होतं. नंतर अ‍ॅन फँ्रक आणि हॅनाज सुटकेस ही पुस्तकं वाचली. ती जरूर वाचाच, हे मी मित्रमंडळींनाही आवर्जून सांगायला लागले. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी एक दिवस माझ्या यूटय़ूबवर ‘टेस्टीमोनी ऑफ होलोकास्ट सव्‍‌र्हायवर – इव्हा मोझेस कॉर’ हा सर्च पुढे आला, तो पाहिला आणि जुना दुवा नव्याने जुळला. मग गूगलचा सदुपयोग केल्यावर जेरूसलेममधील ‘यद वशेम’ या ‘इंटरनॅशनल स्कूल फॉर होलोकॉस्ट स्टडीज’विषयी कळलं. त्यांचा सहा महिन्यांचा ऑनलाइन संशोधन अभ्यासक्रम मी २०१८ मध्ये पूर्ण केला. त्यासाठी माझे मार्गदर्शक जॅकी मेटजर यांची खूपच मदत झाली. तेव्हा मला नक्की कोणत्या मुद्दय़ांत रस वाटतो आहे, हे चित्र अगदी अस्पष्ट होतं. छळछावणी हा खूप मोठा आवाका असणारा विषय आहे. हिटरलने जे काही केलं ते फक्त ज्यूंच्याच बाबतीत नव्हतं, हे मला कळायला वर्ष लागलं. छळछावण्यांतून सुटका होऊन बचावलेल्यांपैकी काहीजणांच्या टेस्टिमोनीज (मनोगतं) पाहिल्यावर जाणवलं की केवळ हिटलरला छळछावणीची कल्पना सांगणारे, त्या बांधणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे अनेकजण समान विचारसरणीचे होते. त्यांनी हिटलरला पुढे जायला मदत केली. त्या छळछावण्यांमध्ये अ‍ॅन फ्रँकसारख्या काहीजणी मृत्युमुखी पडल्या तर काहीजणी वाचल्या. वाचलेल्यांपैकी एक होत्या इव्हा मोझेस कॉर. पुढल्या काळात इव्हा यांनी नाझी अधिकाऱ्यांना माफ केलं. डॉ. जोसेफ मेंगल याने त्या काळात ज्यू जुळ्यांवर अनेक प्रयोग केले होते. त्यांचे शारीरिक, मानसिक हालहाल केले गेले. त्या सगळ्या घटना इव्हा यांच्या मनोगतात ऐकता येतात. पुढे इव्हा यांनी ‘कॅण्डल्स’ (चिल्ड्रेन ऑफ ऑशविट्झ नाझी डेडली लॅब एक्सपरिमेंट सव्‍‌र्हायवल्स) हे संग्रहालय उभारलं. गेल्या वर्षी इव्हा यांचं निधन झालं. सध्या इव्हा माझ्यासाठी प्रेरक व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत. ‘क्षमाशीलता हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, ते जरूर वापरावं’, असं इव्हा यांचं मत होतं. काही वाचलेल्यांना त्यांचं हे म्हणणं पटलेलं नाही, हेही इव्हांनी नमूद केलं आहे.

या अभ्यासक्रमात डेथ कॅ म्प, होलोकास्ट सव्‍‌र्हायवरच्या टेस्टिमोनीज आणि द फायनल सोल्यूशन हे विषय होते. सानिकाने द फायनल सोल्यूशन हा विषय अभ्यासासाठी घेतला. सहा महिन्यांत तिला हिटलर आणि त्याच्या साथीदारांविषयी, छळछावण्यांच्या विदारक कथा, त्यातल्या अमानवी गोष्टींविषयी माहिती मिळाली. अभ्यासासाठी ऑनलाइन पोर्टल होतं. बारा असाइन्मेंटसाठी ठरावीक कालावधी दिला जायचा. त्यात जमेल तेवढा, तितका अभ्यास करून आपली फाइल अपलोड करायची ही पद्धत होती. एका विषयाचं छायाचित्र आणि जुजबी वर्णन असायचं. बाकी माहिती विद्यार्थ्यांनी शोधणं अपेक्षित असायचं. ती सांगते, ‘दिलेल्या विषयाची थेट माहिती मिळाली नाही तर वाचलेल्यांची मनोगतं ऐकल्यावर त्यातून काही मुद्दे गवसत गेले. शिवाय काही माहितीपट आणि काही मूळ व्हिडीओही पाहिले. त्यानंतर खूपच मानसिक त्रास झाला. सुन्न व्हायला झालं. अनेकजण त्यातून बाहेर पडले, पुढचं आयुष्य जगले पण ती गेलेली वर्ष परतून येत नाहीत हेही तितकंच सत्य आहे. या वर्षभरात करोनाच्या निमित्ताने अनेकांनी काही ना काही तक्रारी, दु:ख मांडायला सुरुवात केल्यावर मी अनेकांना छळछावण्या किंवा याआधीच्या जीवघेण्या साथीच्या आजारांविषयी सांगितलं. अजून साथ संपली नसली तरी तुलनेने आपलं जीवन कित्येक पटीने सुस होतं आणि अधिक सुस झालं आहे. छळछावण्यांतल्या लोकांना तो पर्यायच नव्हता. या गोष्टी अभ्यासताना मला हे जाणवलं की काही इव्हासारखे क्षमाशील होऊन आयुष्यात पुढं जात राहिले, तर काही त्या खोल जखमा उराशी कवटाळून बसले. काही चिडचिडे तर काही उद्ध्वस्त झाले. अनेकांचा समोरच्यावरचा विश्वासच उडाला कायमचा’.

या संशोधनादरम्यान नेथन स्टीव्हन मॉण्ट्रोस या होलोकॉस्ट सव्‍‌र्हायवरशी २०१९ मध्ये व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधायची संधी तिला मिळाली. ‘फेसबुकवरचे होलोकॉस्ट सव्‍‌र्हायवर्सचे ग्रुप्स मी जॉइन केले. त्यातल्या एका पोस्टवर स्टीव्हन यांची कमेंट होती. मी त्यांना मेसेज केल्यावर त्यांनी तीन महिन्यांनी प्रतिसाद दिला. मला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. माझा विश्वासच बसेना. त्यांच्याशी बोलताना आजोबांशी गप्पा मारते आहे, असं वाटलं. त्यांची दोन छळछावण्यांतून सुटका झाली तेव्हा ते सहा वर्षांचे होते. त्यांच्या काकांनी लहानग्या स्टीव्हनना शोधून बाहेर काढलं. त्या सगळ्या अमानुषाची छाया त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या अनेकांच्या आयुष्यावर कमी-अधिक प्रमाणात पडली, असं त्यांनी बोलताना सांगितलं. सुदैवाने ते त्यातून निकराने बाहेर पडून चांगलं आयुष्य जगत आहेत. अजूनही आम्ही संपर्कात आहोत. या संशोधनामुळे पुढे कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, हे ठरवण्यासाठी मला खूपच मदत झाली. कधीतरी हॅना ब्रेडी आणि अ‍ॅन फ्रँक यांचं घर प्रत्यक्षात बघायची, तिथल्या लोकांशी संवाद साधायची इच्छा आहे’, असं सानिका सांगते.

आपल्याकडे अजूनही औदासीन्य-नैराश्याला फार गंभीरपणे घेतलं जात नाही. त्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात घेणं केव्हाही चांगलं. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या ग्रुपमध्ये यावर चर्चा होऊन ‘हदयांतर’ या उपक्रमाचं बीज रुजलं. करोनाकाळात सुरुवातीच्या महिनाभरातच जाणवलं की लोकांमध्ये विविध प्रकारच्या ताणतणावाची पातळी झपाटय़ाने वाढते आहे. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून अनेकांना मदत करता आली. तिची टीम ती व्यक्ती आणि  मानसोपचारतज्ज्ञ यांच्यातील दुवा झाली आहे. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी किंवा मानसिक आधार मिळणं हे किती आवश्यक आहे, हे सांगत मानसोपचारांचं महत्त्व ही टीम अधोरेखित करते. या वर्षभरात ‘हृदयांतर’च्या माध्यमातून जवळपास साठजणांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला असून अजूनही हा उपक्रम सुरू आहे.

सानिका फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. ‘डव्ह’, ‘गर्लगेझ’, ‘वन प्लस ६ टी’ आदी उत्पादनांसाठी तिने काम केलं आहे. त्यासाठी वेळेच्या गणिताबद्दल बोलताना ‘हदयांतर’ असो, संशोधन असो त्यासाठी वेळ काढता येतो. वेळ काढावा लागतो आणि काढता येतोच, असं तिला मनापासून वाटतं. दरम्यान ती ‘इंडिया लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात सिनिअर फोटो एडिटर म्हणून सहभागी झाली आहे. ऐतिहासिक पुरातन वारसा असलेल्या अनेक दुर्लक्षित वास्तू आपल्याला आपल्या भोवताली आढळतात. लोकांना त्याबद्दल माहितीच नसते. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प सुरू आहे. अशी एखाद्या ठिकाणाची माहिती नसण्याचे काही किस्से तिच्याबाबतीही घडले. एकदा ती गोव्याला वेडिंग फोटोशूटसाठी गेली होती. जागेचा शोध घेता घेता जवळपास ४०० वर्ष जुनं पोर्तुगीज मेन्शन आढळलं. लौतुलिमममधील या फिग्वेरेदो मेन्शनमध्ये चौदाव्या-पंधराव्या शतकातील अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. गोव्यातली ठरावीक ठिकाणंच पर्यटक बघतात, पण अशा प्रकारच्या जागा माहिती नसतात. तसंच झालं पुण्याच्या जाधवगडाचं. स्थानिकांशी बोलताना अनेक ऐतिहासिक संदर्भ तिला कळले. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

‘मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूट’मधल्या प्राध्यापक माणिक वालावलकर यांनी विद्यार्थ्यांची रजपूत आणि मुघल मिनिएचर पेंटिंगशी तोंडओळख करून दिली होती. तेव्हा विद्यार्थ्यांची अभ्याससहल आग्रा, फतेहपूर सिक्रीला गेल्यावर थोडय़ा आणखी गोष्टी कळल्या. त्यामुळे मुघल कला, कलाकारी आणि त्या काळातील स्त्रियांविषयी सानिकाला कुतूहल वाटू लागलं. मग त्या अनुषंगाने वाचायला सुरुवात केली. इरा मुखोती यांच्या ‘डॉटर्स ऑफ द सन’ या पुस्तकामुळे तिला या विषयात अधिक रस वाटायला लागला. ती सांगते की, ‘अकबरनामा’, ‘बाबरनामा’, ‘हुमायूननामा’ पुरुषांबद्दल आहेत. यापैकी ‘हुमायूननामा’ हा त्याची बहीण गुलबदन बेगम हिने लिहिला आहे. जहाँआरा ही सुफी कवयित्री, लेखिका होती. तिच्याखेरीज त्या काळातल्या काहीजणींना काही प्रशासकीय अधिकार होते. त्यात इतर कुणी ढवळाढवळ करायचं नाही. अकबरच्या दूधआईचा प्रभाव त्याच्यावर खूप होता, असं दिसतं. त्यांना त्या काळाच्या मानाने खूप स्वातंत्र्य होतं. याविषयी माझं अधिक वाचन-संशोधन सुरू आहे, असं सानिका सांगते.

फोटोग्राफी हा तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये काळाघोडा येथील ‘आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी’मध्ये तिने काढलेल्या छायाचित्रांचं ‘स्त्री’ हे शीर्षक असलेलं प्रदर्शन भरलं होतं. ती सांगते की, ‘मला प्रेरणादायी ठरलेल्या स्त्रियांच्या छायाचित्रांचा त्यात समावेश होता. त्यात खजुराहोतील काही शिल्पांचाही समावेश होता. इतर सगळ्या छायाचित्रांसारखी कलेच्या दृष्टिकोनातून त्यांचीही माहिती दिली होती. पण बऱ्याच जणांना ते पचलं आणि रुचलं नाही. भारतामध्ये खूप संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, पण भारताबाहेरच्या जाणकारांनी एकूणच प्रदर्शनाला चांगली दाद दिली’.  इतिहासाचा सखोल अभ्यास करणं असो, छायाचित्रांतून वर्तमानाचे क्षण टिपणं असो किंवा त्या दोन्हींची सांगड भविष्याशी घालून मनाचा केलेला उपक्रमशील विचार असो, सानिकाच्या पुढच्या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा.

viva@expressindia.com