भारतीय उपखंडात ऋतुचक्र हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येकी दोन दोन महिन्यांचे एकूण सहा ऋतू आहेत. त्यात वर्षभरात दोन वेळा उष्म्याची लाट उपखंडात येत असते. एप्रिल ते जून असा वसंत व ग्रीष्माला व्यापून असलेला उन्हाळा आणि सप्टेंबर अंतिम भाग ते दीपावली दरम्यानचा शरद ऋतूचा काळ. या उष्माप्रधान शरद ऋतूलाच सध्या व्यवहारात ‘ऑक्टोबर हीट’ असे संबोधले जाते

ऑक्टोबर हीटच्या हवामानाबद्दल माहिती देताना पुणे नारायण पेठ येथील ख्यातनाम वैद्या प्रणव खासगीवाले सांगतात, ‘दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. पावसाळा संपून हिवाळयाला सुरुवात होत असते. हा बदल होत असतांना जो संक्रमणाचा काळ असतो तो ऑक्टोबर महिन्यात येत असतो. या दिवसांत पाऊस थांबलेला असतो. अशा वेळी आकाशातून सूर्याची किरणे सरळ धरणीला स्पर्श करत असतात. या अतिनील किरणांमुळे जी उष्णता या महिन्यात वाढते, या उष्णतेलाच ऑक्टोबर हीट संबोधले जाते. यावेळी जमिनीत मुरलेले पाणी वाफ होऊन वर जात असते. वरून सूर्याची उष्णता आणि जमीन तापून ओल्या जमिनीतील गरम वाफ होऊन वर उडणारे पाणी म्हणजेच त्याची वाफ यामुळे दुहेरी उष्णतेचा अनुभव ऑक्टोबर महिन्यात घेतला जातो’. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान सूर्याच्या दक्षिणेकडे हालचाली झाल्याने मान्सूनचा किंवा उत्तर-मैदानावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो. आणि तो हळूहळू उच्च-दाब प्रणालीद्वारे बदलला जातो. दक्षिण-पश्चिम मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि हळूहळू माघार घेऊ लागतात. जमीन अद्याप ओलसर असते आणि दिवसा हवामान जास्त दमदार बनते, यामुळे सामान्यत: ‘ऑक्टोबर हीट’ अनेकांना सहन होत नाही, असे सविस्तरपणे सांगतानाच वातावरणीय बदल झाल्यांनतर अनेकांना दवाखान्याची पायरी चढावी लागते, असेही प्रणव यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
तांदळाचे बोर
दिवाळी स्पेशल फराळ! ‘या’ दिवाळीत बनवा हटके पदार्थ, जाणून घ्या कसे बनवावे तांदळाचे बोर
diwali Bhau beej 2024 google trending news
Bhau Beej 2024 : ‘भाऊबीज’ सण महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये ‘या’ नावांनी केला जातो साजरा
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
India cancel intra-squad match With Team India A team to focus on net practice before Border-Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल, ‘हा’ सामना केला रद्द, काय आहे कारण?

ऑक्टोबर हीटमुळे डोळ्यांच्या संसर्गापासून ते संसर्गजन्य ताप तसेच शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यामुळे थकवा जाणवू लागतो. उन्हात फिरल्यावर डोळे लाल होऊन त्यांतून पाणी येणे व चुरचुरण्याच्या तक्रारी वाढतात. याविषयीची माहिती देताना डॉ. प्रणव म्हणाले, ‘उन्हाळ्यात जशी दिवसातून दोन वेळा आंघोळ केली जाते तशीच ऑक्टोबर महिन्यातही दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. अंग कोरडे ठेवावे. शक्यतो सैलसर आणि सुती कपडे घालावेत. बुरशीजन्य संसर्ग झाल्यास थेट औषधांच्या दुकानातून मलम घेऊन न लावता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत’. याशिवाय, बाहेर उन्हात फिरताना डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल घालावा. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी घालावी. शक्य असल्यास उन्हात फिरण्याचे टाळावे, तसेच डोळ्यांतून पाणी आल्यास ते जोरात चोळू नयेत. संसर्ग झाल्यास हात स्वच्छ धुवून घ्यावेत मगच डोळ्याला हात लावावा. या दिवसांत दूषित पाणी प्यायल्यास पोटाचे विकार जडण्याची शक्यता आहे. तहान लागल्यावर रस्त्यावरचे सरबत, बर्फाचा गोळा खाण्याचा मोह टाळावा, कारण यात दूषित पाणी वापरले असण्याची शक्यता असते, असे आवाहनही त्यांनी केले.

ऑक्टोबर हीटचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, याविषयी नाशिकचे वैद्या अभिजित सराफ यांनीही सविस्तर माहिती दिली. ‘पावसाळा संपून म्हणजे साधारणत: भाद्रपद महिन्याच्या शेवटी निसर्गात परत उष्मा वाढायला लागतो. त्याआधी दोन-तीन महिने चांगला पाऊस झाल्याने निसर्गात थंडपणा व आल्हाददायक वातावरण असते. आयुर्वेदानुसार या वर्षाकाळात शरीर व सृष्टीमध्ये वाताचे प्राबल्य असते. यानंतर १५ दिवसांचा ऋतुसंधी काळ होतो. त्यात हळूहळू पुन्हा सृष्टीत उष्णता उच्चांक गाठला जातो. अधूनमधून हलका वा मध्यम असा पाऊस ही पडतो, पण त्यासोबत उष्मा व आर्द्रताही वाढते. एकूणच सगळीकडे ‘उनसाळा’ म्हणजे उन्हाळा व पावसाळा हे दोन्ही ऋतू एकाच वेळी अनुभवायला मिळतात. यामुळे मागच्या वर्षा ऋतुत कोंडलेला उष्मा या निसर्गातल्या बदलामुळे वृद्धिंगत व्हायला लागतो. शरीरातही उष्मा वाढू लागतो व पित्तदोष वृद्धीची लक्षणे दिसायला लागतात. जळजळ होणे, डोके दुखणे, तळपाय व डोळ्यांची आग होणे, लघवीला जळजळ होणे, उलट्या वा जुलाब होणे, आम्लपित्ताचा त्रास होणे अशी विविध लक्षणे उत्पन्न होऊ लागतात. जुने पित्ताचे आजारही पुन्हा बळावू लागतात’ असे वैद्या सराफ यांनी सांगितले.

ऑक्टोबर हीटमध्ये काय टाळावे? याविषयी माहिती देताना वैद्या अभिजित सराफ सांगतात, ‘उन्हामुळे आपला घसा सतत कोरडा पडतो. सारखे पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. अशा वेळी मग थंड पाणी किंवा सरबते प्यायल्याने तहान भागते, हा गैरसमज आहे. हे पदार्थ तात्पुरता थंडावा देणारे असून त्यांच्या सेवनाने घशाचा शोष अधिकच वाढत जातो. अशा वेळी उलट करावे. गरम पाणी प्यावे किंवा गरम करून गार झालेले पाणी प्यावे. गरम पाण्याने तहान कमी होते. हे पटण्यासारखे नसले तरी हा प्रयोग नक्की करून पाहावा. खडीसाखर, वेलची, जेष्ठमध चघळल्याने देखील घशाचा शोष कमी होण्यास मदत होते. ताक प्यायल्यानेही घशाचा शोष कमी होतो. तसेच ते पाचक असल्याने पचनक्रियेसाठी देखील फायदेशीर असते. त्याचबरोबर उष:कालात सूर्योदयापूर्वी एक तास उठून अर्धा पेला गरम पाणी पिणे म्हणेज उष:पान होय. सकाळी ८ वाजता उठून तांब्याभरून पाणी पिणे हे उष:पान नव्हे. त्याने शरीरात द्रवधातूंची व पित्ताची विकृती होते. आंबट, खारट, तिखट पदार्थ या दिवसांत टाळावेत. रात्री जागरण व दुपारी झोपणेदेखील टाळावे. वातूळ व पित्तवर्धक पदार्थ, दही, तेलकट पदार्थ, क्षारीय पदार्थ व तीक्ष्ण मद्याचे सेवन या दिवसात टाळावे’.

ऑक्टोबर हीटमध्ये आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन करताना, भूक लागल्यावर योग्य मात्रेतच जेवावे. स्निग्ध मधुर असे दूध प्यावे किंवा साखर घातलेले दूध प्यावे. योग्य मात्रेत रोज तुपाचे सेवन करावे. ७ ते ८ तासाची शांत झोप घ्यावी. गोड, तुरट, कडू रसाचे व थंड गुणाचे पदार्थ खावेत, असे वैद्या सराफ यांनी सांगितले. या काळात तांदूळ, मूग, गहू, साखर, बार्ली, जवस, गूळ यांनी युक्त पदार्थ योग्य मात्रेत खावेत. ऋतूत उत्पन्न होणारी ताजी फळे व पालेभाज्या खाव्यात. वैद्यांच्या सल्ल्याने विरेचन व रक्तमोक्षण ही शोधनकर्मे करवून घ्यावीत. याच ऋतूत कोजागरी पौर्णिमा येते, त्यामुळे शक्य असल्यास संपूर्ण ऋतूत रात्री थंड हवेत गच्चीवर बसून गरम दूध प्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ऑक्टोबर महिन्यात योग्य आहारविहाराचे पालन केले, तर या काळात होणाऱ्या विविध आजारांपासून रक्षण होते. तसेच पुढे येणाऱ्या थंडीच्या काळातही स्वास्थ्य टिकवायला मदत होते. त्यामुळे नवरात्रीचे नवरंग आणि त्यानुसार आपल्या दैनंदिन फॅशनची तयारी करताना मुळात वातावरणातील बदल लक्षात घेत आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने नियोजन करणे अधिक गरजेचे आहे.

ऑक्टोबर महिन्यात साथीचे आजार, डोळे येणे, त्वचेचे विकार बळावतात. अशा वेळी हवामानाबद्दलची सखोल माहिती घेऊन आतापासूनच योग्य आहारविहाराचे पालन केले तर शरद ऋतूतल्या वणव्यापासून शरीराचे रक्षण होईल.

viva@expressindia.com