डोंगर, जंगल आणि निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची ओढ वाढत असताना गिर्यारोहणाकडे (ट्रेकिंग) तरुणांचा कल झपाट्याने वाढतो आहे, मात्र उत्साहाच्या भरात अनेकदा आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. पावसाळ्यात किंवा जंगल परिसरात ट्रेकिंग करताना अपघात, मधमाश्यांचा दंश होणं आदी अनेक बाबतीत काळजी घ्यावी लागते. छोट्याशा निष्काळजीपणामुळे जिवावर बेतू शकणाऱ्या घटना घडू शकतात. अशा घटना टाळण्यासाठी ट्रेकिंग करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत अनुभवी ट्रेकर्स काय सांगतात, हे समजून घेणं गरजेचं आहे.

ट्रेकला निघण्यापूर्वी जो गड निवडला आहे त्याची रेकी करणं गरजेचं असतं. रेकी म्हणजे काय, तर त्या गडाबद्दल संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. तो गड कोणत्या श्रेणीमध्ये येतो, जसं की सोप्या श्रेणीत, मध्यम श्रेणीत किंवा कठीण श्रेणीत हे एकदा माहिती झालं की तो गड चढायला किती वेळ लागतो याचं प्लॅनिंग करता येतं आणि बाकीचं नियोजनही करणं यामुळे सोपं होतं, असं ‘दुर्गमित्र ट्रेकर्स’चा अजित सुनील देशमुख सांगतो. ट्रेक कुठला आहे, त्याची अवघड पातळी काय आहे, हवामान कसं असणार आहे, हे सगळं आधी जाणून घेणं आवश्यक आहे. माहिती न घेता किंवा केवळ सोशल मीडियावर पाहून ट्रेकला जाणं धोकादायक ठरू शकतं, असंही तो सांगतो. याचबरोबर नवख्या ट्रेकर्सकडून होणाऱ्या चुकांबाबतही त्याने सविस्तर माहिती दिली. ‘पहिल्यांदा ट्रेकिंग करणाऱ्यांनी एकटं जाणं टाळावं. अनुभवी ट्रेक लीडरसोबत जाणं, कुठलीही घाई न करणं, मस्ती किंवा रिस्क घेणं टाळणं हे फार गरजेचं आहे. रात्री अंधारात ट्रेक करणंदेखील अतिशय धोकादायक ठरू शकतं. विश्रांतीसाठी बसतानाही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं तो सांगतो. दगडावर किंवा गवतावर बसण्याआधी तो भाग नीट तपासावा. हाताने दगड, लाकूड किंवा पानं उचलताना सावधगिरी बाळगावी’, असा सल्ला अजित देतो. अनेक ट्रेकिंग मार्गांवर स्थानिक प्रशासन किंवा वन विभागाने धोक्याच्या सूचना, बंदी असलेले मार्ग किंवा वेळेची मर्यादा दिलेली असते. मात्र, अनेक ट्रेकर्स या नियमांकडे दुर्लक्ष करतात. नियम तोडल्यास केवळ दंडच नव्हे, तर जीवितहानीचीही शक्यता वाढते.

ट्रेकिंग हा निसर्गाशी नातं जोडणारा अनुभव असला तरी त्यात सुरक्षिततेला प्राधान्य दिलं तरच तो आनंददायी ठरतो. ‘निसर्गाचा आदर ठेवून, त्याचे नियम पाळून ट्रेकिंग केलं तर अपघात टाळता येऊ शकतात. छोट्या निष्काळजीपणामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे प्रत्येक ट्रेकरने लक्षात ठेवायला हवं. त्याचबरोबर तरुणाईची ‘काही होत नाही’ ही मानसिकता अत्यंत चुकीची आहे’ अशी माहिती अजितने दिली. मी हे करू शकतो, मला काही होत नाही, या मानसिकतेमुळेही अनेक अपघात झाले आहेत. तसंच, सध्याची पिढी ही सोशल मीडियासाठी नको ते धोके पत्करायच्या तयारीत असते. याला खरं तर रिस्क घेणं म्हणण्यापेक्षा दिखाऊपणा करतात असं म्हणणं योग्य ठरेल. यामुळेच नको ते जीवघेणे स्टंट केले जातात.

अलीकडच्या काळात लाइक्स, रील्स आणि व्ह्यूजसाठी अनेक तरुण ट्रेकिंगदरम्यान धोकादायक स्टंट करताना दिसतात. कड्याच्या टोकावर उभं राहणं, निसरड्या दगडांवर उड्या मारणं, हातात मोबाइल धरून व्हिडीओ शूट करणं किंवा चेतावणी फलकांकडे दुर्लक्ष करणं हे प्रकार जिवावर बेतू शकतात. त्याचबरोबर अशा स्टंटमुळे केवळ संबंधित व्यक्तीच नाही तर त्याला वाचवण्यासाठी धावणाऱ्या इतर ट्रेकर्सच्याही जिवाला धोका निर्माण होतो. अनेक वेळा रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतं, ज्यात वेळ, संसाधनं आणि मानवी जीव धोक्यात येतात, असंही अनुभवी ट्रेकर्सचं म्हणणं आहे. विशेषतः नवख्या ट्रेकर्सनी सोशल मीडियावर दिसणाऱ्या व्हिडीओंवरून ट्रेकिंगचं अनुकरण करणं टाळावं, असा सल्ला देतानाच त्यामागचं कारणही अजितने सांगितलं. ‘प्रत्येक ट्रेक, प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. अनुभवी लोक काय टाळतात, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे काही लोक अनुभव नसतानाही ट्रेक आयोजक बनतात. योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि आपत्कालीन तयारी नसल्याने सहभागी ट्रेकर्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नोंदणीकृत, अनुभवी आणि स्थानिक माहिती असलेल्या गटांसोबतच ट्रेक करणं आवश्यक आहे’ असं तो सांगतो.

ट्रेकिंगचा दीर्घ अनुभव असणारी श्रीमाधवी सांगते, ‘आपण ज्या गडावर ट्रेकिंगसाठी जातो त्या गडाची माहिती आपण स्वतः करून घेतली पाहिजे. तिथं जाताना काय टाळावं, काय गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या शरीराच्या मर्यादेप्रमाणे आपण हे करू शकतो का, याचा अभ्यास करून मगच ट्रेकची निवड करावी. याचबरोबर ट्रेकिंगला जाताना पूर्वतयारी व्यवस्थित करावी. ऋतुमानानुसार पूर्वतयारी करावी, असंही ती सांगते. ट्रेक करत असताना आपल्या ट्रेक लीडरच्या सूचनांचं पालन केलंच पाहिजे. नेहमी ट्रेकच्या ग्रुपबरोबरच राहावं. ट्रेक करत असताना वैयक्तिक पातळीवर कोणताही निर्णय घेऊ नये, असंदेखील श्रीमाधवी सांगते.

अनुभवी ट्रेकर्सचा सल्ला ऐकून, नवख्या तरुणांनी घाईगडबड न करता आणि रिस्क घेण्याऐवजी स्वतःची व सोबतच्या सहकाऱ्यांची सुरक्षितता प्राधान्याने पाहणं गरजेचं आहे. निसर्गाचा आदर ठेवून, त्याचे नियम पाळून आणि सुरक्षिततेची शिस्त अंगीकारली तरच ट्रेकिंग हा अनुभव खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि आनंददायी ठरेल.