ट्रगिंगगगग… अलार्म वाजतो. कसेबसे डोळे उघडले जातात. खरंतर झोपेतून उठल्यावर मन शांत असावं, पण आदल्या रात्री बिंज वॉचिंग किंवा प्रोजेक्टच्या डेडलाइनमुळे जागरण झालेलं असतं. हातात पहिल्यांदा काय घेतो? अर्थात – मोबाइल. आपण इन्स्टाग्राम उघडतो. कुणीतरी मनालीत, कुणी केरळच्या बॅकवॉटरमध्ये. क्षणात FOMO मनात धडकून जातो. विचारांच्या लहरी उठतात, मन अस्वस्थ होतं. चहा घेताना फेसबुक स्क्रोल करताना कुणीतरी आपल्या राजकीय मताविरुद्ध काहीतरी पोस्ट केलेलं दिसतं. आपणही लगेच तिथे जाऊन यथेच्छ ट्रोलिंग करतो. वाटतं, आपण काहीतरी ‘उत्तर’ दिलंय… पण खरंतर आपल्याच मनाच्या पृष्ठभागावर अजून विचारांचे तरंग उमटलेले असतात.
अस्वस्थ मनाने आपण ऑफिसला जातो किंवा कॉलेजमध्ये लायब्ररीत बसून असाइनमेंट लिहू लागतो, पण हे करत असतानाही, कानात हेडसेट, मोबाइलवर रील्स, व्हॉट्सअॅपवर गप्पा… एकाच वेळी अनेक फ्रंटवर आपलं लक्ष विखुरलेलं. मनाचे तरंग आता जास्तच गतिमान होतात. अभ्यासाचा किंवा कामाचा फोकस हरवतो. मग ‘रिलॅक्स’ व्हायचं म्हणून पुन्हा मोबाइल हातात घेतो. गंभीर, विनोदी, भयप्रद, भावनिक, हिंसक… एकामागून एक रील्स. मन आता भावनांच्या त्सुनामीत सापडलंय. हे सगळं रोजचं झालं आहे. परिणाम – चिडचिड, भीती, एकाग्रता हरवणं… आणि कधी कधी नकळत नैराश्याचंही सावट. क्षणभर थांबून विचार करावासा वाटतो. मनकल्लोळावर काही उपाय आहे का? आहे – ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात पतंजलींनी सूत्रबद्ध केलेलं हे योगसूत्र सांगतं, ‘मनात सतत उठणाऱ्या विचारांच्या, भावनांच्या तरंगांना थांबवणं म्हणजे योग.’
भारताची अमूल्य देणगी

‘योग’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे, पण योग म्हणजे केवळ शरीर वाकवणं, आसनं करणं, एवढंच नाही. योग हा फक्त फिटनेससाठीचा पर्यायही नाही. योग म्हणजे मनाचा व्यायाम आहे, विचारांचं शुद्धीकरण आहे आणि स्वत:ला स्वत:शी जोडणारी एक जीवनपद्धती आहे. योगात केवळ शारीरिक आरोग्य नाही, तर मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुरेख समन्वय आहे. म्हणूनच योग कुठल्याही एका काळापुरता मर्यादित नाही. तो कालातीत आहे. सर्वकाळासाठी उपयुक्त. आजच्या डिजिटल युगात मानसिक हलकल्लोळ वाढतच चालला आहे, तिथे योगाची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. पण इथे एक प्रश्न पडू शकतो. सकाळी चांगला तासभर ‘योगा’ केला, प्राणायाम वगैरे केलं, मन शांत झालं… पुढे काय? दिवसभर पुन्हा तेच… डोळ्यांपुढे लॅपटॉप, हातात मोबाइल, सतत नोटिफिकेशन्स, ट्रोलिंग, बातम्यांचा भडिमार, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. मनावर तरंग उमटतच राहणार… पतंजलींनी दिलेल्या अष्टांग योगात याचं उत्तर आहे. आसन आणि प्राणायाम यांच्या आधी येतात योगातले महत्त्वपूर्ण घटक – यम आणि नियम. अहिंसा-सत्य-अस्तेय-ब्रह्मचर्य-अपरिग्रह यमा: हे पाच यम म्हणजे आपण इतरांशी कसे वागावे याची आचारसंहिता आहेत. शौच-संतोष-तप-स्वाध्याय-ईश्वरप्रणिधानानि नियमा:। हे पाच नियम आपल्याला स्वत: नैतिकतेची पथ्ये पाळायला शिकवतात.

सोशल मीडियामुळे आज प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ मिळालं आहे, पण कधी कधी इथे व्यक्त होताना रागातून, द्वेषातून तोल ढळतो. एखाद्याला मतावरून, दिसण्यावरून, पेहरावावरून ट्रोल केलं जातं. कधी कधी ही टीका बुलिंगमध्ये रूपांतरित होते. अशा वेळी योगातील ‘अहिंसा’ (non- violence) हे तत्त्व फार मोलाचं ठरतं. फक्त शरीरानेच नाही तर शब्दाने आणि अगदी विचारांनी देखील कोणालाही विनाकारण न दुखावणे ही अहिंसा. कोणाचं मत पटत नसलं, तरी शब्दांत संयम, टीकेत मर्यादा आणि पोस्ट करताना कोणी दुखावलं जाणार नाही याची जाणीव ठेवणं हा सगळा ‘अहिंसे’चाच भाग आहे.

आपल्या मोबाइलवर दररोज काही ना काही पोस्ट्स येतात. कधी व. पु. काळे , डॉ. प्रकाश आमटे यांचं नाव लावून काहीतरी विचारप्रवण विधान, कधी सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत घरगुती उपाय, तर कधी आपल्या धार्मिक किंवा राजकीय विचारांना अनुकूल वाटणारी एखादी बातमी. आपण ती वाचतो आणि बऱ्याचदा कुठलीही शहानिशा न करता पुढे फॉरवर्ड करतो. ‘इंटरनेटवर आलंय म्हणजे खरंच असणार’ असं एक गृहीतक नकळत मनात रुजलेलं असतं. याच वेळी सोशल मीडियावर ‘परफेक्ट’ आयुष्य दाखवण्याची वेगळीच शर्यत सुरू असते. तिथे वास्तव झाकून, इमेज जपणं, ‘लाइक्स’ मिळवण्यासाठी आपल्यालाही न पटणाऱ्या गोष्टी लिहिणं हे नकळत घडत राहतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योगातील दुसरं यम ‘सत्य’ (Truthfulness) फार उपयोगी ठरतं. सत्य म्हणजे केवळ खोटं न बोलणं नाही, तर विचार, शब्द आणि कृती या तिघांमधला प्रामाणिकपणा जपणं. स्वत:शी आणि समाजाशी सत्यनिष्ठ असणं. आपण जे शेअर करतो, बोलतो, लिहितो ते स्वत:च्या मूल्यांशी प्रामाणिक आहे का याचं भान ठेवणं हे खऱ्या अर्थानं सत्याचं पालन आहे.

जे आपलं नाही, ते न घेणं म्हणजेच ‘अस्तेय’ (Non- Stealing). आपण म्हणू, ‘आम्ही कुठे चोरी करतो?’. पण आपण सोशल मीडियावर सहजपणे इतरांचं लिखाण, फोटो, व्हिडीओ, मिम्स, रील्स शेअर करतो, त्यांना श्रेय देणं मात्र अनेकदा विसरतो. याला डिजिटल चोरी म्हणता येईल. इतरांच्या कामाचं, कल्पनांचं श्रेय त्यांना द्यायला ‘अस्तेय’ आपल्याला शिकवतं. स्वत:ची मानसिक, शारीरिक व भावनिक ऊर्जा व्यर्थ न गमावता, ती विशिष्ट उद्दिष्टांसाठी वापरणं हे ‘ब्रह्मचर्य’ (Moderation) या नियमात अपेक्षित आहे. निरर्थक स्क्रोलिंग, उगाच बिंज वॉचिंग, सतत कोण काय पोस्ट करतोय याचा मागोवा घेणं, कधी खोटं दाखवण्याची धडपड – आजच्या काळात ऊर्जा आणि वेळ वाया घालवायला अनेक वाटा आहेत. डिजिट्ल प्लॅटफॉर्मवर आपली ऊर्जा कुठे, किती आणि कशासाठी खर्च होते याचं सतत भान ब्रह्मचर्य आपल्याला देऊ शकतं. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं, आठवड्यातून एकदा डिजिटल डिटॉक्स अशा अनेक उपायातून हे साधता येऊ शकतं.

बऱ्याचदा आपण एखादी पोस्ट टाकतो आणि मग सतत लक्ष लागून राहतं, ‘किती लाइक्स आलेत?’ ‘कमेंट्स आल्या का?’ फॉलोअर्स असोत की व्ह्यूज, जितकं मिळतं तितकं कमीच वाटतं. यातून अधिकाधिक मिळवायची शर्यत सुरू होते. अशा वेळी गोष्टींत न अडकता त्यातला खराखुरा अनुभव घेत जगणं, संग्रह न करता समाधान शोधणं हे आपल्याला अपरिग्रह (Non- Possessiveness) हे योगतत्त्व शिकवतं. ‘शौच’(cleanliness) हा नियम आपल्या डिजिटल स्वच्छतेविषयी देखील आग्रही ठरतो. मोबाइलमधले हजारो फोटो, वापरात नसलेले अॅप्स, इनबॉक्समधले जुने मेल्स, फ्रेंडलिस्टमधले ओळखीचे चेहरे यांची वेळोवेळी साफसफाई केली तर मोबाइल मधला आणि मनातला पसारा आटोक्यात येईल. डिजिटल डिक्लटर हे आजचं आधुनिक ‘शौच’ म्हणता येईल.

आपली मन:स्थिती बिघडवायला आजकाल FOMO हे एक नेहमीचं कारण झालं आहे. सोशल मीडियावर स्क्रोल करताना दिसतं. कोणी नवीन गाडी घेतलीये, कुणी परदेशात गेलंय, कुणाचं नवं घर… आणि आपण ? ‘आपणच मागे पडलो आहोत का? आपल्या जीवनात काही हॅपनिंगच नाही का?’ अशा अस्वस्थ क्षणी योगातील नियम ‘संतोष’ (Contentment) आपल्याला सांगतो – प्राप्त ही पर्याप्त है. जे नाही ते मोबाइलवर बघत रडण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद जास्त महत्त्वाचा.

आजच्या डिजिटल युगात ‘तप’चा अर्थ बदललाय, पण त्याची गरज मात्र अधिकच तीव्र झाली आहे. डिजिटल दिनचर्येत शिस्त आवश्यक ठरते आहे. ती तपाद्वारे (Discipline) मिळू शकते. झोपण्याआधी किंवा जेवताना ‘नो स्क्रीन’ ठेवणं, सोशल मीडियासाठी एक ठरावीक वेळ ठरवणं, रिकाम्या वेळात नुसतं स्क्रोल करत न बसता, नक्की काय बघतोय, का बघतोय, याचं भान ठेवणं अशा उपायांनी हे साधू शकेल.

आज एआयमुळे (कृत्रिम बुद्धिमत्ता) कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, चिंतन, मनन हे शब्द हळूहळू कालबाह्य होत चाललेत. एखादी प्रेमकविता हवी आहे? संशोधन प्रबंध पाहिजे? बस फक्त एक ‘प्रॉम्प्ट’ द्या आणि एआय तुमच्यासाठी सर्व काही लिहून देतो. वाचायची गरज नाही, विचार करायची गरज नाही. यातून येणारं बौद्धिक पंगुत्व टाळायचं असेल तर ‘स्वाध्याय’ (Self- Study) हवा. ‘स्वाध्याय’ हा योगनियम आपल्याला आठवण करून देतो की ज्ञान मिळवणं ही सोपी गोष्ट झालीय, पण ते रुजवणं, त्यावर मनन करणं, त्याचा अनुभव घेणं हे अजूनही तुमचंच काम आहे. रोज थोडा वेळ स्वत:साठी ठेवणं, कोणतं तरी स्किल शिकणं, पुस्तक वाचणं, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुद्धा यासाठी करणं हे सगळं स्वाध्यायाचं आधुनिक रूप आहे. सोशल मीडियावर अभिव्यक्तीपेक्षा दिखावा महत्त्वाचा वाटू लागला की ‘डिजिटल नार्सिसिझम’चं सावट गडद होऊ लागतं. आपण जे काही दाखवतो, ते परफेक्ट असलं पाहिजे, सगळ्यांना ते आवडलं पाहिजे, अशी सततची धडपड मनात सुरू राहते. या ताणातून बाहेर पडण्यासाठी ‘ईश्वरप्रणिधान’ (Self- surrender to the Universe) महत्त्वाचं ठरतं. जे मिळालं आहे आणि जे निसटून गेलं आहे दोघांचा सारखाच स्वीकार करण्याची वृत्ती ऑनलाइन जगण्यातही उतरू लागली की बरेच तणाव दूर होतात.

ऑनलाइन जगण्यात योगसूत्रातले हे यम-नियम पाळले की मनावर येणारे अनावश्यक तरंग नक्कीच कमी होऊ लागतील. आणि मग रोज प्राणायाम आणि योगासने करताना मन हळूहळू शरीराशी जोडलं जाऊ लागेल. योग या शब्दाचा अर्थच होतो – जोडणे. मल्टिटास्किंग, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, डोपामाइन लूप्स यामुळे सतत भिरभिरत्या मनाला जेव्हा पुन:पुन्हा शरीराशी, श्वासाशी, वर्तमान क्षणाशी जोडलं जाण्याची सवय लागते, तेव्हाच खऱ्या अर्थानं योग घडतो.

अर्थातच, हे सगळं एखाद्या जादूची कांडी फिरवावी तसं एका दिवसात साध्य होणार नाही. यासाठी योग जीवनाचा भाग व्हायला हवा. जीवनशैलीत योगाचं तत्त्वज्ञान मुरायला हवं आणि या प्रवासाची सुरुवात कुठून तरी करायचीच असेल तर २१ जून – जागतिक योग दिन हा उत्तम मुहूर्त ठरायला हरकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com