स्नेह एरंडे
एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने ऑस्कर जिंकला आहे, जगभर त्याचे चित्रपट गाजले आहेत आणि अभिनयात मिळवण्यासारखं जवळजवळ सगळं त्याने मिळवलं आहे. तरीही तो अधूनमधून आपल्या जुन्या शहरातल्या छोट्या नाट्यगृहात जातो आणि कोणतंही मानधन न घेता पन्नास लोकांसमोर नाटक करतो. तिथे मोठे कॅमेरे नसतात, पत्रकार नसतात आणि त्याच्या नावाचे मोठे फलकही नसतात. त्याला फक्त पुन्हा एकदा रंगमंचावर उभं राहायचं असतं. हे आहे लव्ह ऑफ द गेम (Love of the game) ‘लव्ह ऑफ द गेम’ म्हणजे एखादी गोष्ट पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार किंवा लोकांचं कौतुक मिळवण्यासाठी न करता, ती मनापासून आवडते म्हणून करणं. एखाद्या क्षेत्रात सगळं मिळवल्यानंतरही त्या गोष्टीकडे पुन्हा पुन्हा ओढलं जाणं.
एखादा जगप्रसिद्ध गायक हजारो लोकांसमोर कार्यक्रम करतो, पण आपल्या जुन्या शाळेच्या छोट्या स्नेहसंमेलनात जाऊन मुलांसोबत गातो. एखादा मोठा आचारी अनेक उपाहारगृहांचा मालक असतो, पण गावच्या जत्रेत स्वत: पोहे बनवत उभा राहतो. एखादा निवृत्त क्रिकेटपटू मोठ्या सामन्यांवर बोलण्याऐवजी गल्लीतल्या मुलांच्या सामन्यात धावा मोजतो आणि बॉल शोधायला मदत करतो. कारण, त्या कामातून आता काही मिळवायचं नसतं. ते करण्याचा आनंदच पुरेसा असतो.
याच गेम (game)शब्दातून आणखी एक वाक्य येतं ते म्हणजे… गॉट गेम ( Got game). खेळामध्ये एखाद्या व्यक्तीकडे उत्तम कौशल्य, खेळाची समज आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल, तर म्हटलं जातं, ‘He’s got game’किंवा ‘She’s got game’म्हणजे ती व्यक्ती फक्त खेळत नाही, तर तिला खेळ खरोखर समजतो, हा त्यामागचा अर्थ आहे. पण, गॉट गेम हा शब्द फक्त मैदानापुरता मर्यादित नाही. एखादी व्यक्ती फारसा दिखावा न करता लोकांचं लक्ष वेधून घेते, आत्मविश्वासाने बोलते, योग्य वेळी विनोद करत आपल्यातल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवते आणि स्वत:ची छाप सोडते, तेव्हाही तिच्याकडे ‘गेम’ आहे असं म्हणता येतं. यात आकर्षक व्यक्तिमत्त्व, सहज आत्मविश्वास आणि लोकांशी वागण्याची कला अशा विविध घटकांचा समावेश असतो.
आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे ‘गेम रेकगनाइझेस गेम’ (Game recognizes game).याचा अर्थ, एक गेम असलेला माणूस दुसर्या गेम असलेल्या माणसाला उत्तम ओळखतो. एका उत्तम लेखकाला दुसर्या लेखकाच्या साध्या वाटणार्या वाक्यामागची ताकद कळते. एका चांगल्या खेळाडूला प्रतिस्पध्र्याने केलेली कठीण चाल समजते. बाकीच्यांना ती साधी वाटली, तरी जाणकाराला तिची किंमत लगेच कळते. याच्या अगदी उलट अर्थाचा शब्द आहे तो म्हणजे ‘झीरो गेम’ (Zero game) म्हणजे आत्मविश्वास, सहजपणा किंवा योग्य वेळ साधण्याची कला अजिबात नसणं. एखाद्याने प्रभाव पाडण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक गोष्ट आणखी विचित्र झाली, तर मित्र सहज म्हणतात, ‘तुझ्याकडे झीरो गेम आहे.’
मग तुमचं काय?
तुम्हीही एखादी गोष्ट फक्त लव्ह ऑफ द गेमसाठी करता का?
