स्नेह एरंडे
आजचे शब्द आहेत, लो कॉर्टिसॉल (Low cortisol) आणि हाय कॉर्टिसॉल high cortisol). पहिल्यांदा ऐकल्यावर हे शब्द कुठल्यातरी मेडिकल रिपोर्टमधले वाटतात. पण, सध्या इंटरनेटवर हे शब्द इतक्या सहजपणे फिरत आहेत की ते फक्त हॉर्मोनबद्दलचे मर्यादित शब्द राहिलेले नाहीत. तर ते आता आपला मूड, स्ट्रेस आणि डेली केऑस मोजायचे जेन झी मीटर झाले आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं तर कॉर्टिसॉल हा आपल्या शरीरातला एक हॉर्मोन आहे, ज्याला बर्याचदा स्ट्रेस हॉर्मोन म्हणतात. आपल्या शरीरातली एनर्जी, स्ट्रेस, ब्लड प्रेशर अशा अनेक गोष्टी सांभाळण्यात कॉर्टिसॉल महत्त्वाची भूमिका बजावतो. पण, तो खूप जास्त झाला किंवा खूप कमी झाला, तर दोन्ही शरीरासाठी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. हाय कॉर्टिसॉल जास्त काळ राहिलं तर वेट गेन, हाय ब्लड प्रेशर, ॲन्क्झायटीसारख्या समस्या त्रास देऊ शकतात. तर लो कॉर्टिसॉलमध्ये फटीग, वीकनेस, वेट लॉस, लो ब्लड प्रेशरसारख्या समस्या त्रास देतात.

म्हणजे वैद्यकीय दृष्टीने पाहिलं, तर हाय कॉर्टिसॉल चांगलं नाही आणि लो कॉर्टिसॉल सुद्धा चांगलं नाही. दोन्हींचा समतोल महत्वाचा आहे. शरीराला कॉर्टिसॉलची गरज लागते, पण योग्य प्रमाणात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही टोकाच्या अवस्था वाईट आहेत.

पण, जेन झीने या दोन्ही शब्दांना वेगळ्याच प्रकारे स्वीकारलं आहे. आता हाय कॉर्टिसॉल म्हणजे फक्त मेडिकल कंडिशन नाही. ते एक प्रकारचं स्ट्रेस लेबल झालं आहे. जेव्हा एखादी परिस्थिती खूप गोंधळाची, ताण देणारी, अवघडल्यासारखी किंवा उगाचच जास्त तीव्र वाटते. तेव्हा आपण म्हणू शकतो, ‘हे खूप हाय कॉर्टिसॉल आहे.’ जसं की सकाळी उशीर झाला आहे, उबर कॅन्सल झाली आहे, फोनची बॅटरी ३ टक्के आहे आणि बॉसचा ‘‘व्हेअर आर यू?’’ मेसेज आला आहे. हे झालं हाय कॉर्टिसॉलचं एक उदाहरण. परीक्षा हॉलमध्ये बसल्यावर अचानक कळतं की जो धडा वगळला होता, त्यावरच १५ गुणांचा प्रश्न आहे, हेही हाय कॉर्टिसॉलचंच उदाहरण.

याच्या उलट लो कॉर्टिसॉल म्हणजे शांत, चिल, सॉफ्ट आणि आरामदायक व्हाईब. पावसात खिडकीजवळ बसून कॉफी पिणं, रविवारी सकाळी काहीच प्लॅन नसणं, रात्री चालायला जाणं आणि कुणी फोन न करणं किंवा ग्रुपमध्ये सगळे गोंधळ करत असताना एक माणूस अगदी शांत बसून स्नॅक्स खात असतो. ही सगळी लो कॉर्टिसॉलची उदाहरणं म्हणता येतील.

मला यातली गंमत जाणवते ते म्हणजे ॲक्च्युअल मेडिकल टर्म्स आपण रोजच्या बोलण्यात आणल्या आहेत. आधी स्ट्रेस म्हणायचो, आता हाय कॉर्टिसॉल म्हणतो. आधी चिल म्हणायचो, आता लो कॉर्टिसॉल म्हणतो. शब्द वेगळे आहेत, पण फीलिंग अधिक स्पेसिफिक झाली आहे. हे जवळजवळ आपल्या जनरेशनचं स्ट्रेस मीटर झालं आहे. प्रत्येक गोष्ट आपण नकळत मेजर करतो. ही सिच्युएशन माझं कॉर्टिसॉल वाढवतेय का? हा पर्सन लो कॉर्टिसॉल आहे की हाय कॉर्टिसॉल? ही जागा, हा प्लॅन, हा ग्रुप, हे रुटीन मला ग्रीन साईडवर नेतं आहे की रेड साईडवर? आणि खरं सांगायचं तर, जेन झीला शक्यतो ग्रीन साईडवर राहायला आवडतं.

कारण, आपल्याभोवती अनिश्चितता खूप आहे. करिअरबद्दल अनिश्चितता, पैशांबद्दल, नात्यांबद्दल अनिश्चितता, भविष्याबद्दल अनिश्चितता. सगळं आपल्या हातात नसतं, पण झोप, खाणं, शरीराची हालचाल, ताण, मोबाइलवर घालवलेला वेळ, स्वत:च्या मर्यादा आणि स्वत:ची काळजी या गोष्टी थोड्याफार आपल्या हातात असतात. म्हणून जेन झी कदाचित याच गोष्टींवर जास्त लक्ष देतात.

मला वाटतं त्यांचा एक मोठा परपज इथे दिसतो. आम्ही फक्त मीम्स बनवत नाही. आम्ही मीम्समधून हेल्थ, स्ट्रेस, मेंटल पीस आणि बॉडी अवेअरनेस याबद्दल बोलायला सुरुवात करतो. कधी विनोदी पद्धतीने, कधी अतिशयोक्त पद्धतीने, पण बोलतो. म्हणून लो कॉर्टिसॉल आणि हाय कॉर्टिसॉल हे फक्त इंटरनेट ट्रेंड्स नाहीत. ते आपल्या जनरेशनचं एक छोटंसं रिमाईंडर आहे की आयुष्यात गोंधळ असणारच, पण शक्य असेल तिथे आपण शांतता निवडू शकतो.

मग, तुमचं आयुष्य सध्या लो कॉर्टिसॉल आहे की हाय कॉर्टिसॉल आहे?

viva@expressindia.com