मितेश रतिश जोशी

महाराष्ट्रात होणारी वारी ही अद्भुत परंपरा जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय आहे. भावभक्तीच्या या झऱ्यात हजारो वारकरी दरवर्षी न्हाऊन निघतात. महाराष्ट्रात अबालवृद्ध दरवर्षी आपापल्या पद्धतीने या वारीत सहभागी होत असतात, काही तरुण मात्र ही वारी अनोख्या पद्धतीने करत आहेत. भक्तीच्या या परंपरेला शक्तीची जोड देत आधुनिक विचार जोडत ही वारी अधिक अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातो आहे.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार

आठशे वर्षांहून अधिक काळापासून लाखोंच्या संख्येने हजारो किलोमीटर अंतर ठरावीक अवधीत पार करण्याची ‘वारी’ ही अद्भुत परंपरा जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय आहे. या वारीने महाराष्ट्राचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या याच असामान्य परंपरेला आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने कृती आणि विचारांची जोड देत अनोखी वारी साजरी करण्याचा प्रयत्न काही तरुणांकडून केला जातो आहे.    

 ४२ किलोमीटरची मॅरेथॉन तर जगप्रसिद्धच आहे. दक्षिण आफ्रिकेत घेतली जाणारी ९० किलोमीटर अंतराची ‘कॉम्रेड’ ही स्पर्धाही तेवढीच आव्हानात्मक असते. भारतातही विविध उद्देशाने धावण्याचे विशेष उपक्रम हाती घेतले जातात. तसाच ‘रनवारी’ हा नवीन उपक्रम भूषण तारक या तरुणाने हाती घेतला आहे. ‘रनवारी’ म्हणजे नेमके काय? तर ‘देहू ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर हे सुमारे दोनशेसाठ किलोमीटरचे अंतर पळत पूर्ण करण्याचा हा संकल्प आहे,’ असे तो सांगतो. रनवारीची संकल्पना ही भूषणच्याच मनात आली. लहानपणापासून पुण्यात राहात असल्याने त्याने वारी जवळून पाहिली होती, पण २१ दिवस सुट्टी काढून सहभाग कधी घेता आला नव्हता. २०१७ पासून भूषणने रिनगला सुरुवात केली. ‘कॉम्रेड’सारखी अवघड स्पर्धा त्याने पूर्ण केली आहे. देशात आणि परदेशात त्याने धावण्याच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. याच अनुभवांची शिदोरी बरोबर घेऊन त्याने गेल्याच वर्षी ‘रनवारी’ हा उपक्रम सुरू केला. गेल्या वर्षी केवळ सात जणांपासून सुरू झालेल्या या संकल्पनेत या वर्षी सतरा जणांनी सहभाग घेतला. भूषण सांगतो, ‘रनवारी ही काही धावण्याची स्पर्धा नाही. ‘रनवारी’ हे महाराष्ट्राच्या वारीच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन स्वत:च स्वत:च्या शारीरिक क्षमतांना आव्हान देणारी संकल्पना आहे. हे धावणं वारीएवढंच स्वांतसुखाय आहे. वारीच्याच मार्गावर आम्ही ही रनवारी करतो. गेल्या वर्षी आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर आम्ही सात जण धावलो होतो. या वर्षी आम्ही सतरा जणांनी देहू ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर अशी रनवारी केली,’ असे तो सांगतो. या रनवारीमध्ये केवळ पुण्यातूनच नाही तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून तरुण सहभागी झाले होते.

या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने रनवारी करणाऱ्यांसमोर सगळय़ात मोठं आव्हान हे उन्हाचं होतं. ४० डिग्री तापमानात सतत पळताना पावसाची आठवण येत होती. पूर्ण वारीत पावसाच्या एका थेंबानेसुद्धा आम्हाला दिलासा दिला नाही. उन्हाळय़ात वारी करतोय की काय? असा अनुभव आला. पाऊसच नसल्याने नीरा स्नानाला आम्ही मुकलो, पण इतक्या कडक उन्हातसुद्धा आम्ही आमची वारी पूर्ण केली. शेवटच्या १३ किलोमीटरच्या प्रवासात आमचे अनेक मित्र, नातेवाईक आमच्याबरोबर रनवारीत सहभागी झाले, असे तो सांगतो. या वर्षी रनवारी करताना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. याविषयी सांगताना भूषण म्हणाला, ‘पहिल्या १०० किलोमीटरचा प्रवास अतिउत्साहात होतो. नंतरचा प्रवास त्याच उत्साहात करणे हेच खूप मोठं आव्हान असतं. पळताना आलेली सर्वात मोठी अडचण वर नमूद केल्याप्रमाणे उन्हाचीच होती. सतत पळल्याने पायाला फोड येतात. काहीवेळेस ते फोड फुटतात. मग त्याला योग्य तो प्रथमोपचार करावा लागतो. यासाठी आमच्या १७ मित्रांची वेगळी टीम सज्ज होती. जी गाडीत बसून वारी करत होती आणि सेवा देत होती. थकव्याने व अपुऱ्या झोपेने डोके जड होते. जेवण जात नाही. तहान लागते पण पाणी एकदम पिऊन चालत नाही, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.’ भूषणच्या या उपक्रमाला त्याच्या रनर, गिर्यारोहक मित्रांनी चांगली साथ दिली. पुढच्या वर्षीची रनवारी ही या वर्षीच्या वारीपेक्षा अधिक सुसज्ज व शिस्तबद्ध कशी होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत, असेही भूषण म्हणाला.    

धावण्याबरोबरच सायकल हाही अनेक तरुणांच्या जिव्हाळय़ाचा विषय आहे. देशभरच काय अगदी जगभर सायकल भ्रमंती करणारे तरुण आपण पाहिले आहेत. मग याच सायकलीच्या साथीने वारी केली तर? हा विचार मनात आला आणि त्यावर पुण्यातील काही तरुणांनी धडक कृतीही केली. गजानन खैरे, गणेश भुजबळ आणि अजित पाटील या पुण्यातल्या तरुणांनी २०१६ पासून सायकल वारीला सुरुवात केली आहे. वेळेअभावी वारीत सहभाग घेऊ न शकणाऱ्या तरुणांसाठीचा हा उत्तम पर्याय त्यांनी सर्वासाठी खुला केला आहे. ‘आयएएस’ म्हणजेच ‘इंडो अ‍ॅथलेटिक सोसायटी’ या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी सायकल वारीचे आयोजन केले जाते. या वर्षी या सायकलवारीचे सातवे वर्ष पार पडले. या वर्षी या वारीत एकूण ११०० वारकऱ्यांनी सहभाग घेतला. याविषयीची माहिती सांगताना याच संस्थेसाठी काम करणारा व या वारीचा भाग असणारा अजित म्हणतो, ‘पायी वारी करण्याला पर्याय म्हणून २०१६ साली आम्ही सात जणांनी मिळून सायकल वारी करायची ठरवली आणि यशस्वीपणे सायकलवारी पूर्ण केली. यात जो आनंद आम्हाला मिळाला तोच इतरही नोकरदार लोकांना घेता यावा यासाठी आम्ही दरवर्षी सायकलवारी आयोजित करतो. यंदा आम्ही १८ व १९ जूनला ही सायकल वारी पूर्ण केली. वारीमध्ये आम्हा तरुणांबरोबर अकराशे लहानमोठय़ा लोकांनी सहभाग घेतला होता. यात अकरा वर्षांच्या मुग्धा साळुंखेपासून ते अगदी ७५ वर्षांच्या गौतम भिंगानियांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला होता. बाकी तरुण तुर्क होतेच.’ या सायकल वारीच्या प्रवासाचा सविस्तर अनुभवही त्याने सांगितला. ‘१८ जूनला पहाटे साडेतीन वाजता देहूला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेऊन आम्ही प्रस्थान केले. मजल दरमजल करत आम्ही वारी पूर्ण केली, काहींना बारा तर काहींना सोळा तास ही सायकल वारी पूर्ण करायला लागले. पंढरपूर येथे संध्याकाळी साडेसहा वाजता एकत्र जमलो. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता पंढरपूरहून परतवारीला सुरुवात केली. त्याच दिवशी रात्री नऊ वाजता आम्ही आळंदीला आमच्या सायकलवारीची सांगता केली,’ असे अजितने सांगितले. 

 गेल्या सात वर्षांपासून यशस्वीरीत्या सायकलवारी करणाऱ्या या वारकऱ्यांनासुद्धा बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या सायकल स्वारांकडून एका दिवसामध्ये अडीचशे किमी अंतर पूर्ण करून घेणे, त्यांना चहा नाश्तापासून जेवण उपलब्ध करून देणे. त्याचसोबत हायड्रेशन पॉइंट, टेक्निकल सपोर्ट, अ‍ॅम्ब्युलन्स सपोर्ट अशा अनेक गोष्टींचे नियोजन करणे ही फार मोठी जबाबदारी आयएसए टीमवर असते. त्यासाठी दोन ते तीन महिन्यांपासून पूर्वतयारी करावी लागते, असेही त्याने सांगितले.     

रनवारी किंवा सायकलवारी ही कोणत्याही प्रकारची शर्यत नसून एक उत्सव आहे. एक उत्साह आहे. भक्ती आणि शक्ती यांचा मिलाफ आहे. या हजारो तरुण वारकऱ्यांनी सायकलने किंवा धावत देहू- पंढरपूर- आळंदी- हा मोठा प्रवास एकमेकांच्या साह्याने पूर्ण केला. वारी हे साध्य नसून एक साधना आहे. वरवर दिसतो तसा हा प्रवास आळंदी ते पंढरपूर नसून ज्ञानोबा ते विठोबा, आळंदीच्या आत्मरूपापासून पंढरीच्या परमात्म्यापर्यंतचा आहे, अशी भावना वारीत अनोख्या पद्धतीने सहभाग घेणारी ही तरुणाई व्यक्त करताना दिसते. अंतरंगाचा हा भव्य सुंदर असा प्रवास आहे. त्याच्याशी एकरूप होऊन या सर्व तरुण वारकऱ्यांनी प्रवासातला प्रत्येक क्षण वेचला, त्याचा अनोख्या पद्धतीने आनंद घेतला व आधुनिक विचार प्रयत्नपूर्वक रुजवला. त्यामुळेच तरुणाईची ही वारी अनेकार्थाने उल्लेखनीय ठरते.