रसिका शिंदे
सध्या मराठमोळय़ा पेहरावाला प्रचंड पसंती मिळताना दिसते आहे. मराठमोळय़ा साडय़ा, साडय़ांचा वापर करून कुर्ते, क्रॉप टॉपसारखा केलेला नवा अवतार आणि त्यावर पुन्हा मराठमोळे दागिने अशी एक वेगळीच मराठमोळी ऐट सध्या तरुणाईच्या फॅशन डायरीत पाहायला मिळते आहे.
प्रत्येक स्त्री ही सुंदर असतेच, पण तिचं सौंदर्य आणखी खुलवतात ते दागिने. पूर्वीच्या काळी स्त्रिया दैनंदिन जीवनातही विविध प्रकारचे दागिने घालत असत. अगदी इतिहास काळात डोकावून पाहिलं तर असं लक्षात येईल की अगदी राजे देखील विविध प्रकारचे अलंकार परिधान करत होते. आपल्या मराठी संस्कृतीत देखील असे अनेक पारंपरिक अलंकार आहेत जे प्रत्येक वयोगटातील स्त्रीच्या सौंदर्यात भर घालतात. सहसा फॅशन म्हटल्यावर पाश्चिमात्य कपडे आणि दागिने आपल्या डोळय़ांसमोर येतात आणि जे कपडे किंवा दागिने घातल्यावर आपण सुंदर दिसणारच अशी धारणा मुलींमध्ये असते. पण सध्या हा पाश्चिमात्य दागिने आणि कपडे परिधान करण्याचा ट्रेण्ड हळूहळू बदलताना दिसतो आहे. त्याऐवजी मराठमोळय़ा पेहरावाला प्रचंड पसंती मिळताना दिसते आहे. मराठमोळय़ा साडय़ा, साडय़ांचा वापर करून कुर्ते, क्रॉप टॉपसारखा केलेला नवा अवतार आणि त्यावर पुन्हा मराठमोळे दागिने अशी एक वेगळीच मराठमोळी ऐट सध्या तरुणाईच्या फॅशन डायरीत पाहायला मिळते आहे.
विशीपासून तिशीपर्यंतच्या मुलींना आता या मराठमोळय़ा पारंपरिक पेहराव आणि दागिन्यांनी वेड लावलेलं दिसून येतं. सणासमारंभाला नऊवारी साडी, एखादी खास पैठणी, नथ वा ठुशी असा मराठमोळा श्रुंगाराचा प्रकार तसा आबालवृध्द स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र आता यामागचं पारंपरिक वा सणासमारंभाचं वलय मोडून कधीही, कोणत्याही आवडीच्या प्रसंगी मराठी पारंपरिक पेहराव आणि दागिन्यांना पसंती दिली जाते आहे. अगदी मुलंही सध्या सहज कुर्त्यांवर पैठणीचं जॅकेट चढवून ऐटीत फिरताना दिसतात. मराठमोळे दागिने आणि कपडय़ांना अशी अचानक मागणी वाढण्यामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचं फॅशन क्षेत्रातील जाणकार सांगतात. जसं दागिन्यांमध्येही सध्या नथीचा नखरा अधिक आहे. मुलींना नथ घालायला खूप आवडू लागलं आहे. नऊवारी, सहावारी साडी नेसणं असो वा इंडो वेस्टर्न कपडे घालणं असो हल्ली मुली त्यावर नाकात नथ घालून मिरवताना दिसतात. याबद्दल अधिक माहिती देताना ‘नथीचा नखरा’ या ब्रॅण्डच्या मालक नीता कुदळे म्हणतात, ‘ खरंतर ‘नथीचा नखरा’ या ब्रॅण्डअंतर्गत आम्ही सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी विविध दागिने बनवतो. मात्र, नथ ही प्रत्येक स्त्रीला नाकात घातल्यानंतर एक वेगळाच आत्मविश्वास देते. हा नथीचा नखरा तरुण मुलीच काय वयोवृद्ध स्त्रियांनाही मानवणारा असल्यानेच बहुधा नथीला पसंती अधिक मिळत असावी. आम्ही ब्राह्मणी, मोत्याच्या अशा विविध प्रकारच्या नथी बनवतो. या व्यतिरिक्त कान आणि हातफूल देखील बनवले जातात. मात्र, सध्या शाळकरी मुलींपासून ते कॉलेजच्या मुलींपर्यंत सगळय़ांची पसंती नथीला आहे’. त्यामुळे सध्या तरुण मुलींची पहिली पसंती ही पारंपरिक नथीला आहे असं दिसून येतं. नथीचा हा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, त्यामुळे मध्यंतरी भाडिपा फेम अभिनेता सारंग साठय़े याने नाकात नथ घालून पोस्ट केलेला फोटोही ट्रेिण्डग ठरला होता.
लग्नसराई असली की सोन्याचे दागिने, त्यातही पारंपरिक दागिनेच हमखास घातले जातात. नऊवारी साडीवर गळय़ात कोल्हापुरी साज, चिंचपेटी, बोरमाळ हातात तोडे किंवा पाटल्या असा साज चढवलेल्या स्त्रियांचं सुंदर रूप लग्नसराईत दिसून येतं. पण सध्याची महागाई पाहता आणि सोन्याचे गगनाला भिडलेले भाव पाहता प्रत्येकालाच सोन्याचे दागिने खरेदी करणं परवडत नाही. अशावेळी ‘हाऊस ऑफ आद्या’ यांनी सर्व मराठमोळे दागिने चांदीत घडवले आहेत. तरुणींचा कल सध्या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा ऑक्सिडाईज्ड किंवा चांदीच्या दागिन्यांकडे अधिक दिसून येतो. कानात घालायला बुगडय़ा, कुडय़ा, गळय़ात चिंचपेटी, साज, वजट्रीक. याशिवाय हातात शिंदेशाही तोडे, गहू तोडे हे सर्व दागिने घालण्याचा आणि कोणत्याही कार्यक्रमाला पारंपरिक लूक करण्याचा ट्रेण्ड सध्या तरुणाईत दिसून येतो. अशावेळी सोन्याशिवाय चांदीत मराठमोळे दागिने घडवावे असा विचार आला आणि आम्ही सर्व मराठमोळे दागिने चांदीत घडवले, असं या ब्रॅण्डची फाऊंडर सायली मराठे सांगते. सध्या चांदीत घडवलेली नथ आणि कानातल्यांना तरुण मुलींकडून प्रचंड मागणी असल्याचं तिने सांगितलं. फॅशन जगतातही आपले असे मराठमोळे दागिने आहेत आणि त्यांचा ट्रेण्ड लोकप्रिय करण्याचं काम मालिका आणि लग्नसमारंभातूनच होत असल्याचं कित्येकांशी बोलल्यावर लक्षात येतं. सध्या बकुळी हार, बोरमाळ, मोहन माळ, पोहे हार, जडाव, ठुशी, बेलपान, तन्मणी या अलंकारांना सर्वाधिक पसंती मिळते आहे, याशिवाय हातात घालायला तोडे, गोठ, पिचौडी याचीही मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्याचे सांगितले जाते.
गेल्या दोन – तीन वर्षांत ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट आणि मालिका मोठय़ा संख्येने प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. हल्ली सहसा कोणतीही कपडय़ांची किंवा दागिन्यांची फॅशन ही समाज माध्यमावर ट्रेण्ड होत असते. याशिवाय, चित्रपट किंवा मालिकांमध्ये आपले आवडते कलाकार काय फॅशन करतात याकडेही आजच्या तरुण पिढीचं बारीक लक्ष असतं. सध्या अचानक आलेल्या या मराठी पारंपरिक लूकच्या ट्रेण्डला ऐतिहासिक आणि पौराणिक मालिका जास्त कारणीभूत असल्याचे कॉश्च्युम डिझायनर रोहिणी साळेकर-तांडेल सांगते. काठापदराच्या कॉटनच्या किंवा खणाच्या साडय़ा नेसून त्यावर तीन – चार पदराच्या काळय़ा पोतीचे मंगळसूत्र आणि त्यात वाटीमणी, बोरमाळ, मंगळसूत्र असा लूक ट्रेण्डमध्ये आहे. याशिवाय, अहिल्या मंगळसूत्र हे देखील बाजारात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून त्याची मागणीही प्रचंड आहे. आपली संस्कृती आणि परंपरा ही आपणच जपली पाहिजे आणि मराठमोळय़ा वस्त्रांमधून आणि दागिन्यांमधून ती संस्कृती आपण जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचवू शकतो हे गमक अलीकडच्या तरुणाईला उलगडलं आहे.
घरात कोणताही समारंभ असला की अलीकडे वेगवेगळय़ा कपडय़ांच्या थीम करण्याचा नवा ट्रेण्ड आला आहे. त्यात मराठमोळे पारंपरिक कपडे आणि त्यावर दागिने सर्रास घातले जातात. लग्नात नऊवारी साडीवर दागिने काय घालायचे हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं. अशावेळी आपण कित्येकदा पाश्चिमात्य धाटणीचे दागिने नऊवारीवर घालतो. आपले दागिने आपल्यालाच माहिती नाही ही खंत मनात असल्याने अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘प्राजक्तराज’ हा नवा पारंपरिक दागिन्यांचा ब्रॅण्ड सुरू केला आहे. ‘आपणच जुन्या पिढीची परंपरा आणि संस्कृती दागिन्यांच्या किंवा वस्त्रांच्या मार्फत जपली नाही तर ती काळाआड निघून जाईल. आणि ते जपण्यासाठीच ‘प्राजक्तराज’ हा ब्रॅण्ड कायम कार्यरत असणार आहे’, असं प्राजक्ताने सांगितलं. ‘प्राजक्तराज’ या ब्रॅण्ड अंतर्गत उपलब्ध झालेल्या दागिन्यांमध्ये सोनसळा, म्हाळसा आणि तुळजा हे तीन मुख्य प्रकार पाहायला मिळतात. यात जोंधळे मणी गुंड, छोटा पुतळा हार, बंद घसाची वजट्रीक, नक्षीमणी कुड़ी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांचा समावेश असून हे सर्व तरुणाईच्या पसंतीस पडते आहे. फॅशन जगतात प्रत्येक कपडय़ांच्या, दागिन्यांच्या लोकप्रियतेचा एक काळ असतो तसा सध्या मराठमोळय़ा पारंपरिक दागिन्यांचा ट्रेण्ड आला आहे. आणि तो मोठय़ा मानाने मिरवला जातो आहे हेही विशेष !
viva@expressindia.com