|| सचिन जोशी

अंगाची काहिली करणाऱ्या या वैशाखी उन्हांत मी माझ्या सदरात काय बरे लिहावे? याचा विचार करत होतो. मी खूप विचार केला. अनेक प्रकारच्या पदार्थाची नावेदेखील आठवत होतो. मग मी म्हटलं सलाडबद्दल लिहावे का? किंवा मस्तपैकी थंड पेयांविषयी? परंतु यापैकी कोणताच पदार्थ मला तितकासा भावत नव्हता. आणखी थोडा वेळ विचार करत बसलो तेव्हा एकदम लक्षात आलं की, अरे या ऋतूमधल्या सेलेब्रिटी फळाबद्दल लिहायला हवंच. आता कोण हे विचारू नका! अर्थातच सगळ्या फळांचा राजा ‘आंबा’.

दर वर्षी मी उन्हाळ्याची फार आतुरतेने वाट पाहात असतो, कारण हा मधुर आणि नेहमीच दिलखूश करणारा फळांचा राजा म्हणजेच हापूस आंबा मला मनसोक्त चाखायला मिळतो. माझ्या लहानपणापासूनच आंबा हे माझे आवडते फळ आहे आणि मला खात्री आहे की अनेक भारतीयांना देखील आंबा सर्वाधिक आवडत असेल. आंबा हा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो. कधी जेवणात, लोणच्यात, थंड पेयात किंवा गोड पदार्थ बनवताना देखील वापरतात. अधिक विचार करताना असंही लक्षात येतं की, आंबा हा आपल्या संपूर्ण जेवणात कुठे ना कुठे समाविष्ट होतोच. आणि फक्त आपल्याकडेच नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी आंबा प्रसिद्ध आहे.

साऊथ एशियामधील प्रसिद्ध मँगो लस्सीमध्ये देखील आंबा वापरला जातो. आणखी एक आंब्याचा प्रसिद्ध गोड पदार्थ म्हणजे आमरस. आमरस हा पोळी किंवा पुरीबरोबर खाल्ला जातो. आंब्याचा गर हा त्याचा जॅम बनवण्यासाठी वापरतात. हा जॅम लहान आणि मोठय़ा माणसांना देखील आवडतो. आंब्याचा वापर आईस्क्रीम, ज्यूस, स्मूदी बनवण्यासाठी देखील केला जातो. पण मला मात्र आंबा हा नुसताच खायला आवडतो.

आश्चर्याची बाब म्हणजे आंबा हा फक्त भारतातच प्रिय नसून सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशात देखील तितकाच प्रिय आहे. उदा. हवाई, फिलिपिन्स, कॅलिफोर्निया अशा अनेक ठिकाणी आंबा चवीने खाल्ला जातो. ‘रसपादोस’ हा गोळ्याचा प्रकार हवाईमध्ये प्रसिद्ध आहे. हवाईमध्ये ते आंब्याचे सिरप वापरून गोळ्याला आंब्याची चव देतात. मेक्सिकोमध्ये दुकानात, रेस्टॉरंट्समध्ये किंवा अगदी छोटय़ाशा ठेल्यावर देखील ‘अगुआ फ्रेसकास’ नावाचे दारूविरहित थंड पेय विकतात. जे अनेक फळांपासून बनवतात. त्यातील एक फळ आंबादेखील आहे. बारीक चिरलेला आंबा हा आईस्क्रीमवर टाकून खायला छान लागतो किंवा दुधाबरोबर घुसळून त्याचा मिल्कशेकदेखील बनवता येतो. बऱ्याच दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये गोड चवीसाठी भात हा नारळाच्या फ्लेवरमध्ये शिजवतात आणि मग डेजर्ट म्हणून चिरलेला आंबा खाल्ला जातो. उत्तर आशियातील काही भागांत आंब्याचे लोणचे हे माशाचा सॉस आणि राईस व्हिनेगारसह बनवतात.

आंब्याबद्दल बोलत असताना आपण आंबट चव असलेल्या कैरीला विसरूच शकत नाही. कैरीला ही आंब्याइतकंच महत्त्व आहे. कैरीचा मोसम आंब्याच्या मोसमाआधी सुरू होत असल्याने कच्ची आणि आंबट कैरी ही चटणी, लोणचं किंवा तोंडी लावणं म्हणून वेगवेगळ्या रूपात पहिल्यांदा समोर येते. अनेकांना कैरी तिखटमीठ लावून खायला आवडते, तर काही जणांना सोयासॉस लावून खायलाही आवडते.

उन्हाळ्यातील एक पेय म्हणजे कैरीचं पन्हं. हे पन्हं कैरीपासून बनवलं जातं. ‘अधार अवकाया’ हे लोणचं आंबट कैरीपासून बनवलं जातं. त्यात तिखट, मेथी, मोहरी, मीठ आणि शेंगदाण्याचं तेल असतं. आंबा हा आंध्र प्रदेशात डाळ तयार करण्यासाठी वापरला जातो. गुजराती लोक आंब्यापासून छुन्ना बनवतात.

फिलिपाइन्समध्ये कैरीचं बगोंग फिलिपाइन्स लोणचं बनवतात. यात आंबवलेले मासे आणि फिश सॉस व्हिनेगर, मिरे, तिखट-मीठ टाकलेलं असतं. कैरी ही मुळातच आंबट असल्याने तिचे उभे काप तिखटमीठ लावून खायला छान लागतात. सेंट्रल अमेरिकेत आंबा हा मीठ-मिरपूड किंवा व्हिनेगर – तिखट सॉस लावून खाल्ला जातो. आंबा खाण्याच्या अन्यही पद्धती तिथे आहेत. जास्तकरून दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये कैरी ही आंब्याच्या सलाडमध्ये फिश सॉस टाकून आणि सुकलेला झिंगा टाकून खातात.

भारतात उन्हाळ्यात अजून एक फळ मोठय़ा प्रमाणात वापरले जाते ते म्हणजे कोकम. हिमँगोस्टीन कुटुंबातील ही एक वनस्पती आहे. कोकम हे भारताच्या पश्चिम घाटातील फळ आहे. हे महाराष्ट्रातील कोकण, गोवा, कर्नाटक-केरळ भागांत वाढते. भारताच्या दक्षिणेकडील कोकण आणि मलबार भागात याचा वापर करीमध्ये केला जातो. तसेच चिंचेऐवजी देखील याचा वापर केला जातो. उत्तर पूर्व भारतामध्ये याचा वापर पाककृती आणि औषधासाठी केला जातो. गार्सिनिया किंवा जी इंडिका नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फळाचे बियाणे मौल्यवान असते. त्यापासून ‘कोकम लोणी’ मिळते. कोकमाचे फळ हे अनेक प्राण्यांसाठी अन्नाचा स्रोत आहेत. या प्रजातीतील फळांमध्ये अधिकतम लाल रंगद्रव्यांचे स्रोत आहेत. कोकमाचे हे फळ आणि सिरप कोकण प्रदेशात खूप लोकप्रिय आहे. आणि ते अँटीऑसिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल आहेत. ताजे फळ संरक्षित करून भडक लाल रंगाचा स्क्वॉश तयार केला जातो, जो नंतर वाफवून पातळ केला जातो आणि विकला जातो. तसेच ते पिताही येते.

या फळाचा बाह्य़ भाग सुकवूनच आमसूल किंवा कोकम मिळते. याचे गोवा, महाराष्ट्रातील काही भागांत किंवा कर्नाटकातील खाद्यसंस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. कोकम हे चिंचेऐवजी वापरले जाते. तसेच गुजरातमध्ये पदार्थाला चव आणण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आसामी खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थात कोकमाचा वापर खूप केला जातो. मसूर तेंगा (माशाची आंबट करी) आणि तेंगा दाली (आंबट डाळ) अशा पदार्थामध्ये कोकमाचा वापर जास्त होतो. या फळाच्या अर्काला कोकणी किंवा मराठी भाषेत आगळ असं म्हणतात. सोलकढी बनवताना हा आगळ वापरला जातो. त्यात नारळाचं दूध, कोथिंबीर आणि आलंदेखील वापरतात. जरी कोकम बाहेरील देशांमध्ये वापरले जात नसले, तरी याच्या परिवाराचा दक्षिण पूर्व आशियाई भागातील उष्णकटिबंधीय प्रदेशात वापर केला जातो. यात सर्वात प्रसिद्ध प्रजात ही मंगोस्टीं आहे जिची आता संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया आणि इतर उष्णकटिबंधीय देशांमध्ये लागवड केली जाते.

समर टाइम अगुअस फ्रेशकास प्रत्येकी एका सव्‍‌र्हसाठी

साहित्य : १ कप चिरलेला आंबा, १ कप पाणी,

१ मध्यम आकारातील लिंबाचा रस आणि १ चमचा साखर.

कृती : आपल्या ब्लेंडरच्या भांडय़ात आंबा, पाणी, लिंबाचा रस आणि साखर एकत्र करा आणि जाड प्युरी होईपर्यंत ब्लेंडर फिरवा. चव घेऊन आवश्यक असल्यास त्यात आंबट किंवा गोड सामग्री टाकून पुन्हा एकदा ब्लेंडर फिरवून लगेचच बर्फ घालून सव्‍‌र्ह करा.

viva@expressindia.com