marathi tv actress shreya bugde talk about her food habits zws 70 | Loksatta

फुडी आत्मा : कनेक्शन महत्त्वाचं!

चहा असो किंवा गरमागरम कॉफी, कप हातात आल्यावर तो कप पहिल्यांदा डोळय़ांना लावण्याची सवय श्रेयाला आहे.

marathi tv actress shreya bugde
अभिनेत्री श्रेया बुगडे

मितेश जोशी

छोटय़ा पडद्यावर आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणे हे खचितच सोपं काम नाही. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री श्रेया बुगडे खाण्याच्या बाबतीतही तितकीच दर्दी आहे..

‘फुडी’ या शब्दाची व्याख्या करायची झाली तर अशी एक व्यक्ती जिला खाण्याची भरपूर आवड आहे, जी सतत खाण्याविषयी बोलत असते, वेगवेगळय़ा ठिकाणी जाऊन, वेगवेगळय़ा तऱ्हेचं खाणं खायला तिला आवडतं. आणि असं खाणं जे स्थळ – काळ – वेळेच्या बंधना पलीकडे गेलेलं असतं. अशा व्यक्तीला सर्वसाधारपणे आपण फुडी म्हणून संबोधतो. श्रेयासुद्धा अगदी याच प्रकारातली फुडी आहे, पण तिला एकटय़ाने खाण्यापेक्षा सगळय़ांबरोबर खायला आवडतं हे विशेष आहे ! श्रेयाच्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन होते. त्यानंतर दिवस रेटायला किक बसते ती तजेलदार चहाने.. सगळय़ांबरोबर खायला आवडत असलं तरी सकाळचा चहा मात्र श्रेयाला एकटीने प्यायला आवडतो. सकाळच्या वाफाळत्या चहाबरोबरच तिला तिची स्पेस मिळते. ‘जगाच्या पाठीवर मी कुठेही असले तरी सकाळी चहा हा हवाच. मग तो गरम पाण्यातला डीप डीप मधला असू दे किंवा कोल्हापूरला मिळणारा बासुंदी चहा असू दे किंवा नाशिक भागात मिळणारा कडक फक्कड चहा असू दे.. सकाळी चहा हवाच हाच माझा आग्रह असतो, असं श्रेया सांगते.

तिला कॉफीही आवडते, पण चहा आणि कॉफी या दोघांनाही समान पातळीवर न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचं ती सांगते.  चहा असो किंवा गरमागरम कॉफी, कप हातात आल्यावर तो कप पहिल्यांदा डोळय़ांना लावण्याची सवय श्रेयाला आहे. मग तो कितीही मोठा – छोटा असला आणि कोणीही बरोबर असलं तरीही कसलाही विचार न करता त्याचा स्पर्श हा डोळय़ांना झालाच पाहिजे या मानसिकतेची मी आहे, असं ती सांगते. यातही एक विशेष सुख असल्याचं मत ती मांडते. सकाळच्या न्याहारीमध्ये श्रेया फळ किंवा अंड खाते. तुझा जेवणातला सगळय़ात आवडता पदार्थ कोणता? हा प्रश्न श्रेयाला विचारला असता ती म्हणाली, ‘मला भात प्रचंड आवडतो. मला सकाळी फोडणीचा भात, दुपारी सार भात, रात्री पुलाव किंवा बिर्याणी जरी दिली तरीही मी मुकाटय़ाने आवडीने खाईन. इतका मला भात व त्याचे वेगवेगळे प्रकार आवडतात. भाताबरोबरच मला मासेदेखील आवडतात. माझ्या घरी दर बुधवार व शुक्रवार हा मासेवार असतो. वेगवेगळे ताजे मासे खाण्याची आवड असल्याने मी व माझा नवरा निखिल आम्ही आवडीने मासे खातो. दर शनिवारी चिकन व दर रविवारी घरी मटण शिजतं. माझी आई उत्तम मासे बनवते, त्यामुळे बऱ्याचदा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर आईच्या हातच्या माशांचा बेत झाला आहे. तिच्या हातचे मासे म्हणजे माझ्यासाठी स्वर्गसुख आहे’, असं सांगणारी श्रेया गोड पदार्थाच्या बाबतीत मात्र फारशी आग्रही नाही.  इंग्लंडमधील क्रेमब्रूले हे डेझर्ट मला खूप आवडतं. मला मोजकंच गोड खायला आवडतं. मी मांडी घालून बसली आहे आणि पुरणपोळय़ांवर ताव मारते आहे, असं चित्र माझ्या बाबतीत तरी घडताना दिसणार नाही, असं ती म्हणते. म्हणजे हे कोणत्याच पदार्थाच्या बाबतीत घडणार नाही. मला मोजकंच पण चवीने खायला आवडतं, असंही तिने आवर्जून सांगितलं. 

श्रेया चायनीज कुझिनची चाहती आहे. जर मी कोणत्या कारणाने अस्वस्थ असेन किंवा काम करून दमली असेन तर एनर्जी म्हणून मी चायनीज पदार्थ खाते. भारतात मिळणाऱ्या चायनीजला तोड नाही असं म्हणणारी श्रेया पुढे सांगते, ‘मी मिठीबाई कॉलेजला होते. नाटकाची तालीम संपल्यावर आम्ही हातगाडीवरच चायनीज खायचो. त्यावरूनच मला असं वाटतं की, भारतात मिळणाऱ्या चायनीजला तोड नाही. जर एखादा अस्सल चिनी माणूस भारत दर्शनाला आला आणि त्याने हातगाडीवरचं चायनीज बघितलं तर तो अक्षरश: भोवळ येऊन पडेल. आपल्याकडे मिळणारे कोबी मंच्युरियन हा चायनीज कुझिनचा भाग नाही, पण तरीही ते चायनीजच्या नावाखाली विकण्याचा व खाण्याचा आपल्याकडे ट्रेण्ड़ मात्र आहे’, असं ती गमतीने सांगते. मिठीबाईला असताना लाल – काळय़ा तेलकट प्लॅस्टिकच्या बाउलमध्ये मंच्युरियन सूप मित्रांबरोबर पिण्यात मजाच काही और होती. काळ बदलला, नवीन मित्र जोडले गेले आता फॅन्सी हॉटेलमध्ये जाऊनही चायनीज खायला आवडतं, अस श्रेया सांगते.

चायनीज कुझिनच्या श्रेयाच्या आठवणी इथेच संपल्या नाहीत. ‘चला हवा येऊ द्या’चा विश्व दौरा सुरू असताना सगळी टीम इंडोनेशियाला गेली होती. तिथे श्रेयाने इंडोनेशियन कुझिनमधला पदार्थ ऑर्डर केला.  तो कुशल बद्रिकेला काही आवडला नाही. तिथे कुशलला ट्रिपल शेझवान राईस खाण्याची हुक्की आली. इथे तुला इंडोनेशियामध्ये कोणीच आपल्या स्टाईलचा ट्रिपल शेजवान राईस बनवून देणार नाही, असं श्रेयाने कुशलला सांगूनही पाहिलं. तरीही स्वत:च्या मतावर ठाम असलेल्या कुशलने अखेर ऑर्डर दिलीच. शेफच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून श्रेयाने त्याला ट्रिपल शेझवान राईसची रेसिपी तिथल्या सांगितली. अखेर त्या शेफने अंडी, भाज्या, भात व नूडल्स एका बाऊलमध्ये कोंबून कुशलच्या पुढय़ात तो मुळमुळीत राईस पेश केला. किचनमध्ये फारशी रमत नसली तरीही खाण्यावर विशेष प्रेम असलेल्या श्रेयाने कुशलचा फुडी आत्मा इंडोनेशियात ट्रिपल शेझवान राईस खायला घालून शांत केला, खाण्याचे असे अनेक किस्से श्रेयाच्या पोतडीत आहेत.

इतरांना कायम हसवण्यात व्यग्र असलेल्या या मंडळींची ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरची खाबूगिरीही तशीच विशेष असते. याविषयी श्रेया सांगते, ‘आश्चर्य वाटेल पण भारत दादा, भाऊ, अंकुर, स्नेहल, योगेश हे जेवायला वर बसत नाहीत. ते खाली जमिनीवर बसून मांडी घालून जेवतात. आमच्या ताटात वेगवेगळय़ा घरातले, वेगवेगळय़ा चवीचे, वेगवेगळय़ा खाद्यसंस्कृतीतले किमान सात ते आठ पदार्थ असतात. भाऊच्या डब्यात सुका खाऊ खूप असतो. भारत दादा व तुषार दोघेही उत्तम जेवण बनवतात, त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडून सेटवर लाईव्ह किचन रंगतं’. गरमागरम भजीचा बेत भारत दादाकडून आयोजित केला जातो. योगेशच्या घरून जेव्हा वरणबट्टीचा डबा येणार असतो तेव्हा माझ्याकडून माझ्या आईच्या हातचे मासे डब्ब्यातून सेटवर पोहोचतात. मग अशावेळी सेटवर बाकीचे कोणी डबे आणत नाहीत. सगळे जण एकत्र येऊन खाबूगिरी करण्यात मजाच काही और असते, असं श्रेया सांगते.

‘काही माणसं एका विशिष्ट खाद्यपदार्थामुळे लक्षात राहतात’, असं ती म्हणते. ‘चला हवा येऊ द्या’चा विश्वदौरा करत असताना मी पॅरिसला गेले होते. मला माझ्या मैत्रिणीने फ्रेंच डेझर्ट  पान ओ शोकोला खाण्याचा सल्ला दिला. फ्रेंच भाषेमध्ये पान म्हणजे ब्रेड व शोकोला म्हणजे चॉकलेट. हे डेझर्ट नेमकं काय असतं याची विचारणा आमच्या ड्रायव्हरला केली. तेव्हा त्याने त्याची व्यवस्थित माहिती आम्हाला सांगितली. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. बॅग पॅक करून आम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी गाडीत बसलो. तेव्हा त्या ड्रायव्हरने आम्हाला हे डेझर्ट त्याच्याकडून खाऊ घातलं. एक अनोळखी देश, तिथली अनोळखी भाषा, त्यातला हा एक अनोळखी माणूस केवळ एका खाद्यपदार्थामुळे माझ्या कायमचा लक्षात राहिला, अशी आठवणही तिने सांगितली. 

श्रेयाच्या मते खाणं माणसांना एकत्र आणतं, एकमेकांना एकमेकांशी जोडण्याचा दुवा म्हणजे  हे खाणं. जेव्हा आपली आई आपल्याला साधा गोड वरणभात जेवायला देते, तेव्हा ती आपलेपणानं त्यावर लिंबू पिळते, तुपाची धार सोडते. त्या अन्नपदार्थात तिचं प्रेम, तिची माया उतरलेली असते. त्यामुळे जेवण बनवणाऱ्या व्यक्तीशी भले ती तुमची आई असो, बायको असो किंवा जेवण बनवणारी मावशी असो.. तिच्याशी नीट वागा. जेवण बनवताना, जेवण वाढताना आणि प्रत्यक्ष जेवताना हे कनेक्शन खूप महत्त्वाचं असतं, असं श्रेया म्हणते. ते कनेक्शन नसेल तर त्या अन्नाला, चवीला काही अर्थ नाही. तुम्ही मित्रांसोबत बाहेर जेवायला जरी गेलात तरीही त्यांच्यासोबत जेवत असलेल्या अन्नाशी कनेक्ट व्हा. तरच तुमचं जेवण मेमोरेबल होईल, हेही ती आवर्जून सांगते.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 05:54 IST
Next Story
मराठमोळी ऐट!