सध्या यंगिस्तानला सर्वात जास्त आकर्षित करून घेणारं माध्यम म्हणजे वेबसीरिजचं. गेल्या दशकात व्हिडीओ अपलोडिंगला सुरुवात झाल्यानंतर बघता बघता या माध्यमाचा पसारा आणि व्याप्ती प्रचंड वाढली आहे. खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि खऱ्या अर्थाने जागतिक असं हे माध्यम असलं, तरी मराठी वेबसीरिजचा बोलबाला गेल्या दोन वर्षांतच वाढलेला दिसतो. अजूनही अगदी मोजक्या मराठी वेबसीरिज लोकप्रियता टिकवण्यात यशस्वी ठरतात.

मराठी वेबसीरिजचा प्रेक्षकवर्ग वाढलेला असला, तरी या वेबसीरिजचं स्वरूप आता तेच तेच वाटू लागलंय. याचं कारण कॉमेडी या लोकप्रिय प्रकाराचाच मोठय़ा प्रमाणावर कण्टेण्ट इथे दिसतो. गाणी, गॉसिप याबाबतचे काही वेब शोदेखील लोकप्रिय होताहेत. तरीही बहुतेकदा मराठी वेबसीरिज तारेतारकांच्या भोवती फिरणाऱ्या असतात. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मराठी वेबसीरिजच्या जगामध्ये जरा वेगळा प्रयत्न होतोय अ६ी२ेी ळ६२ेी या ट्रॅव्हल शोमुळे. व्हायरस मराठी या वेब चॅनेलने हा शो सुरू केलाय. पहिला मराठी वेब ट्रॅव्हल शो असल्याचा व्हायरस मराठीचा दावा आहे.

तरुणाईला साद घालणाऱ्या भटकंती या विषयावरची ही मालिका असल्याने याच्या क्रिएटर्सना शोकडून बरीच आशा आहे. त्यातच या शोमध्ये सहसा न दिसणारा महाराष्ट्र दिसणार आहे, हे विशेष. नेहमी काय होतं.. भटकंती म्हटलं की, आपण बॅग भरतो आणि एखाद्या किल्ल्यावर किंवा हिल स्टेशनच्या दिशेने निघतो. अनेकांसाठी एवढाच काय तो ट्रेकचा अनुभव आणि महाराष्ट्रातली भटकंती म्हटलं की एवढंच डोळ्यापुढे येतं. पण ‘ऑसम टूसम’ या शोमधून अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री या जोडीने फारसे पर्यटक जाणार नाहीत, अशा ठिकाणांना भेट द्यायचं ठरवलं आहे. ‘आम्ही काही मिस्टेरिअस आणि रम्य जागा एक्स्प्लोअर करणार आहोत’ असं या दोघी सांगतात.

या शोचा पहिला भाग गुढीपाडव्याला अपलोड झाला. या भागात या दोघी कोकणातील अरवली गावातील ‘वेतोबा’ नावाच्या ठिकाणी गेल्या आहेत. या पहिल्या भागाबद्दल सांगताना निर्माते आणि दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणाले, ‘मुळात भुतांचाही देव असतो ही कल्पनाच खूप वेगळी वाटत होती. वेतोबा म्हणजे वेताळाच्या गोष्टी. हा वेतोबा रात्री गावात फिरतो आणि गावाचं रक्षण करतो असं म्हटलं जातं. वेतोबाचं गावात देऊळ आहे. या देवाला फुलं वाहत नाहीत, फुलांऐवजी चप्पल वाहिली जाते, जी हरणाच्या कातडय़ापासून बनवलेली असते. आता ही चप्पल वाहण्याची प्रथा बंद झाली आहे. त्याऐवजी लोक देणगी देतात. अर्थात या सगळ्या गोष्टी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पलीकडच्या आहेत.’ हा सगळा अनुभव प्रत्यक्षात घेणारी नृत्यांगना रिचा अग्निहोत्री म्हणते, ‘मी पहिल्यांदा अशा प्रकारचा शो करते आहे. मी आणि गौरी नेहमीच्या रुटीनला एवढे कंटाळलो होतो की, सगळ्यामधून एक ब्रेक हवा होता. मला भुताच्या गोष्टी ऐकायला आवडतात, त्यामुळे ‘वेतोबा’ला जाण्यात खूप उत्साह होता.’

एकूणच एका वेगळ्या प्रकारचा ट्रॅव्हल शो बघायला मिळणार अशी आशा ठेवायला हरकत नाही.

‘फाइव्ह मिनिट्स ब्रेक’चा सामाजिक प्रयोग

अनुराधा राज्याध्यक्ष हे नाव आणि हा चेहरा मराठी- हिंदूी मालिका आणि चित्रपटांतून घराघरात पोचलेला. अभिनेत्री- लेखिका अनुराधा राज्याध्यक्ष यांनी वेब सीरीज या नवमाध्यमाचा वापर करत चार चांगल्या गोष्टी शेअर करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. फाइव्ह मिनिट्स ब्रेक नावाच्या त्यांच्या नव्या वेबसीरीजमध्ये त्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. आपल्या आसपास घडणाऱ्या, आपल्याला परिचित असलेल्या तरीही दुर्लक्षित असलेल्या या पाच मिनिटांच्या गोष्टी चटकन भिडतात कारण त्या वास्तवातील असतात. समाजाचं आपणंही काही देणं लागतो, आपणही समाजाचा भाग आहोत आणि आपलंही काही कर्तव्य आहे, हे सुचवून जातात. ‘गेली अनेक र्वष असं काही करावं मनात होतं. आसपासच्या अनेक घटना ऐकून, पाहून व्यक्त व्हावसं वाटतं, काहीतरी करावं असं वाटतं. त्यातूनच या नव्या माध्यमाचा वापर करत फाइव्ह मिनिट्स ब्रेक सुरू केली. पहिल्या काही भागांना इतका चांगला प्रतिसाद मिळालाय की, त्यातून लोक आपापल्या आयुष्यातील घटना, गोष्टी सांगू लागले आहेत. या उपक्रमाचं यश यातच आहे.’

ट्रेनमध्ये फराळ विकणाऱ्या आजीबाईंपासून, शेजारणीच्या आत्महत्येपर्यंत आणि १०३ या हेल्पलाइनच्या वापरापर्यंत विविध विषय आत्तापर्यंत यामधून आले आहेत.

मराठी वेबसीरिज सुरू झाल्यापासून साधारण एका पठडीतले विषय येत आहेत. यापलिकडचा प्रयोग करायचा होता. टीव्हीवरच्या ‘भटकंती’चा अनुभव गाठीला होताच. ती कल्पना घेऊन वेब प्रेक्षकांसाठी ऑसम टूसम हा ट्रॅव्हल शो करत आहोत.   
– संतोष कोल्हे,                 निर्माता- दिग्दर्शक

श्रुती जोशी  -viva@expressindia.com