आषाढाचा पहिला दिवस म्हणजे महाकवी ‘कालिदास दिन’. मेघदूतात पर्वत, नद्या, वने, वृक्ष, फुले, पक्षी, प्राणी हे भावभावना आणि व्यक्तिमत्त्व असलेली पात्रं बनतात. म्हणूनच मेघदूतचा खरा नायक यक्ष नाही, यक्षिणीही नाही तर संपूर्ण सजीव निसर्ग ठरतो.

पावसाळा सुरू झाला की पाय आपोआप डोंगरवाटांकडे वळतात. पावसाची रिपरिप, धुक्याने वेढलेल्या वाटा, हिरवागार भवताल… या सगळ्यात आपण काही क्षण हरवून जातो. पण, तेवढ्यातच मोबाइल हातात येतो. पन्नास- शंभर फोटो, काही स्नॅप्स, फेसबुक-इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज… पाऊस आपण मोबाइलमध्ये साठवत जातो; मन मात्र कदाचित कोरडेच राहते. पुढच्या पावसाळ्यात पुन्हा नवे फोटो, नव्या स्टोरीज आणि तोच क्रम…

कोणे एके काळी एक पाऊसवेडा कवी होऊन गेला. मध्य भारतापासून हिमालयापर्यंत तो निसर्गात भटकला. दरवर्षी पावसात मनसोक्त भिजला. प्रत्येक प्रदेशातील पावसाचा वेगळा नाद, पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगरांवर रेंगाळणारे ढग, ओसंडून वाहणार्‍या नद्या, पहिल्या सरींनी फुलून आलेली वनराई हे सारे त्याने डोळ्यांनी पाहिलेच नाही, तर मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवले.

पहिल्या पावसाने झाडांत, वेलींमध्ये, प्राण्यांमध्ये आणि पक्ष्यांमध्ये होणारे सूक्ष्म बदल त्याने निरखले. ओल्या मातीचा मृद्गंध, फुललेल्या कदंबाचा दरवळ, मोराच्या नृत्यातील उन्मेष, चातकाची आतुरता, धुक्याच्या पडद्याआड लपलेले डोंगर… निसर्गाचा प्रत्येक रंग, प्रत्येक गंध, प्रत्येक स्वर त्याच्या स्मरणात साठत गेला. आणि मग, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर… कदाचित उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत, तो एखाद्या टेकडीवर बसला असेल. क्षितिजावर अचानक ढग दाटून आले असतील. थंड वार्‍याची एक झुळूक त्याच्या अंगावरून गेली असेल. टपटप पडणार्‍या पहिल्या सरींची लय जणू मंदाक्रांता वृत्तात त्याच्या कानात गुंजू लागली असेल. आजवर अनुभवलेले पावसाचे सारे रंग, सारे गंध, सारे स्वर त्या एका क्षणी एकवटले असतील. आणि त्याच्या ओठांवर सहज उमटले असेल…

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं

वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श॥

त्या एका श्लोकाबरोबर जणू निसर्गच शब्दरूपाने वाहू लागला. ढग, पर्वत, नद्या, वने, पक्षी, फुले, ऋतू, सुगंध आणि मानवी भावना यांचा अद्वितीय संगम असलेले एक अमर काव्य जन्माला आले. तो निसर्गवेडा कवी म्हणजे महाकवी कालिदास. आणि ते अमर काव्य म्हणजे ‘मेघदूत’. अवघ्या १२१ श्लोकांचे ‘मेघदूत’ हे खंडकाव्य कालिदासाच्या इतर कलाकृतींच्या मानाने आकाराने लहान असले, तरी आशयाच्या दृष्टीने ते संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ काव्यरत्नांपैकी एक मानले जाते.

एका यक्षाला कुबेराच्या शापामुळे वर्षभरासाठी पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. या विरहाने व्याकूळ झालेला यक्ष आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशात दाटून आलेल्या मेघाला पाहतो आणि त्यालाच आपला दूत बनवून अलका नगरीतील आपल्या पत्नीकडे संदेश पाठवतो. एवढीच या काव्याची साधी कथा. वरवर पाहता ही प्रेम आणि विरहाची कथा वाटते. परंतु मेघदूतचे वैशिष्ट्य या कथानकात नाही, तर त्या निमित्ताने उलगडणार्‍या निसर्गविश्वात आहे. यक्ष मेघाला रामटेकपासून हिमालयापर्यंतच्या प्रवासातील निसर्गाचे तपशीलवार वर्णन करून सांगतो. या  प्रवासात भेटणारे पर्वत, नद्या, वने, वृक्ष, फुले, पक्षी, प्राणी हे भावभावना, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व असलेली पात्रे बनतात. म्हणूनच मेघदूतचा खरा नायक यक्ष नाही, यक्षिणीही नाही, तर संपूर्ण सजीव निसर्ग ठरतो.

या वाटेवर भेटणारे पर्वत हे मेघाचे जिगरी मित्र आहेत, अशी कालिदासाची कल्पना आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघालो असलो, तरी वाटेत एखादा जिवलग मित्र भेटला की दोन शब्द बोलल्याशिवाय, थोडा वेळ थांबल्याशिवाय पाय पुढे पडत नाहीत. मेघाचीही अवस्था तशीच. प्रत्येक पर्वतावर तो क्षणभर विसावतो, त्याच्याशी जणू हितगुज करतो आणि मगच मोठ्या कष्टाने पुढच्या प्रवासाला निघतो. या प्रत्येक पर्वतावर पहिल्या पावसाने घडणारे सूक्ष्म बदल कालिदास विलक्षण बारकाईने टिपतो. रामगिरी म्हणजे आजच्या विदर्भातील रामटेक. हा या प्रवासातील मेघाचा पहिला मित्र. आता मेघ त्याला सोडून दूर जाणार, याचे दु:ख जणू त्यालाही झाले आहे. उन्हाळ्याने तापलेल्या पर्वतावर पहिल्या पावसाच्या सरी बरसताच जमिनीतून वाफा उसळू लागतात. या वाफा म्हणजे कालिदासाच्या कल्पनेत रामगिरीचे विरहाने तापलेले उष्ण अश्रूच.

पुढे येतो आम्रकूट. आजचा अमरकंटक. नावातच त्याचे स्वरूप दडलेले आहे. आंब्यांच्या दाट वनांनी नटलेला हा पर्वत. आज आपण कलमी आंब्यांना सरावलो आहोत; उन्हाळ्याच्या मध्यावरच त्यांचा हंगाम संपतो. पण, जंगलातील देशी आंबे ग्रीष्माच्या अखेरीस, पहिल्या पावसाच्या स्वागतासाठीच पिकून तयार होतात. म्हणूनच कालिदासाच्या कल्पनेत आम्रकूट पर्वत कृतज्ञ यजमानाप्रमाणे मेघाला आपल्या शिखरावर विसावण्याचे निमंत्रण देतो. ज्या मेघाने त्याच्या वनराईला जीवन दिले, त्याला तो प्रेमाने आपल्या मस्तकावर धारण करतो. अशा अनेक पर्वतमित्रांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधत मेघ अखेर पर्वतराज हिमालयापाशी येतो. मित्र एकमेकांना मदत करतात, मेघ  तिथल्या देवदारांच्या जंगलाला लागलेले वणवे विझवतो. हिमालय मित्रमेघाला जादू की झप्पी देतो.

पर्वत जर मेघाचे जिवलग मित्र असतील, तर मार्गात भेटणार्‍या नद्या त्याच्या लाजर्‍या-गोजिर्‍या प्रेयसीच आहेत. आकाशातून जाणार्‍या मेघाला त्या आपल्या हावभावांतून खुणावतात. कालिदासाच्या नजरेत प्रत्येक नदी एक स्वतंत्र नायिका आहे आणि प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आहे. वेत्रवतीच्या अवखळ लाटा म्हणजे जणू मेघाला भुवया उंचावून दिलेला खट्याळ संकेत. निर्विन्ध्ये तील भोवरा म्हणजे लाजत-लाजत किंचित सरकलेल्या वस्त्रातून क्षणभर दिसलेली नाभी. तर गंभीरा नदीच्या प्रवाहात शफरी माशांमुळे उठणारे तरंग म्हणजे तिचे लाजरे कटाक्ष. मात्र, सर्व नद्या मेघासाठी प्रेयसी नाहीत. सरस्वती, गंगा यांसारख्या काही नद्या पूजनीय आहेत, तीर्थस्वरूप आहेत याचे भान कालिदास पाळतो. त्यांच्या जलाचा स्पर्श करून मेघच जणू अधिक पवित्र  होईल, असं तो म्हणतो.

या दोन प्रकारच्या वर्णनामागे कालिदासाचे निसर्ग निरीक्षणही दडलेले आहे. मध्य भारतातील बहुतांश नद्या उन्हाळ्याच्या अखेरीस आटतात. वर्षावच त्यांना पुन्हा जीवन देणार असतो. त्यामुळे त्या मेघाची आतुरतेने वाट पाहणार्‍या विरहिणीसारख्या भासतात. पण, हिमालयात उगम पावणार्‍या नद्या वेगळ्या आहेत. उन्हाळ्यातही वितळणार्‍या बर्फामुळे त्यांच्यात जलसमृद्धी असते. त्यांना मेघाच्या पावसाची तितकी आस नसते. काव्यकल्पना आणि भूगोलाचे वास्तव यांचा असा सुंदर संगम मेघदूतमध्ये पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळतो.

पाऊस पडतो तेव्हा बदल फक्त पर्वतांवर किंवा नद्यांवरच होत नाहीत; संपूर्ण वनराई नवजीवनाने बहरून जाते. अमरकंटकाचे उतार आमरायानी झाकून गेले आहेत तर पुढे दशार्ण देशात आजच्या छत्तीसगडच्या परिसरात पिकलेल्या जांभळांच्या गर्द निळसर-काळ्या रंगाने संपूर्ण वनराईच सावळी भासू लागते. नीचै टेकड्यांवर पावसाच्या पहिल्या सरींनी कदंबाला बहर आला आहे. तर दुसरीकडे केवड्या बनात शुभ्र-सोनेरी बहर दरवळतो आहे. माळव्यात चर्मण्वती म्हणजे चंबळ नदीजवळील देवगिरी परिसरात उंबराची जंगले पावसाच्या दिवसांत फळांनी लगडलेली असतात. पिकलेल्या उंबरांचा घमघमाट सगळीकडे पसरलेला असतो.

पावसाच्या आगमनाबरोबर निसर्गात केवळ झाडे-फुलेच नव्हे, तर प्राणी पक्ष्यांच्या वागणुकीतही बदल घडतात. कालिदास त्यांचीही  नोंद घेतो. मेघाच्या प्रवासात चातक पक्षी त्याला डाव्या बाजूने साथ देईल, असे कालिदास सांगतो. चातक म्हणजे पाईड क्रेस्टेड कुकू हा स्थलांतरित पक्षी पावसाळ्याच्या प्रारंभी आफ्रिकेतून भारतात येतो. मेघाचा प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असताना या पक्ष्याच्या स्थलांतराचा मार्ग आणि मेघाची दिशा यांचा विचार केला, तर कालिदासाचे हे वर्णन केवळ काव्यकल्पना नसून सूक्ष्म निसर्ग निरीक्षण असल्याचे जाणवते.

त्याच वेळी राजहंस हिमालयातील मानसरोवराच्या दिशेने प्रस्थान करतात. पावसाच्या लयीबरोबर पक्ष्यांच्याही प्रवासाला नवी दिशा मिळते. दुसरीकडे हा बगळ्यांच्या विणीचा काळ असतो. शुभ्र बगळ्यांच्या माळा मेघाच्या सोबतीने आकाशात तरंगताना दिसतात. कावळे घरटी बांधण्यात मग्न असतात. क्षिप्रा नदीकाठावर सारस पक्ष्यांचे कूजन पहाटकाली ऐकू येते. मेघांचा पहिला गडगडाट ऐकताच मोर आनंदाने केकारव करत पिसारा फुलवून नृत्य करू लागतात.

मेघदूत वाचताना एक गोष्ट सतत जाणवते. कालिदास केवळ कल्पनाविलास करत नाही; त्याचे निसर्गाचे निरीक्षण अत्यंत सूक्ष्म आहे. कोणत्या प्रदेशात कोणते वृक्ष उगवतात, कोणती फळे कोणत्या ऋतूत पिकतात, कोणते पक्षी कधी स्थलांतर करतात, कोणत्या नदीचे स्वरूप ऋतूनुसार कसे बदलते, हे सारे तो बारकाईने पाहतो. पाऊस आणि निसर्ग यांचा परस्परसंबंध तो  चांगलाच जाणतो. त्या वास्तव निरीक्षणांनाच तो आपल्या काव्यप्रतिभेचा स्पर्श देतो. म्हणूनच मेघदूत हे  भारताच्या भूगोल, जैवविविधता, ऋतुचक्र आणि निसर्गसंस्कृतीचे काव्यमय दस्तऐवज बनते.

आणि म्हणूनच मेघदूत समजून घेण्यासाठी आपल्याला निसर्ग वाचता आला पाहिजे. एक साधे उदाहरण. विंध्य पर्वत ओलांडल्यानंतर मेघ विशाल माळरानात येतो. आता त्याला दिशा दाखवण्यासाठी पर्वत नाहीत, नद्या नाहीत. तेव्हा कालिदास लिहितो, ‘सारङ्गास्ते सूचयिष्यन्ति मार्गम्’.

या वाक्याचे भाषांतर वाचले, तर ‘सारंग म्हणजे हरीण तुला मार्ग दाखवतील’ एवढाच अर्थ समजतो. थोडंफार संस्कृत माहीत असेल, तर सारंग या शब्दाचे हरीण, भुंगा आणि हत्ती असे तीन अर्थही कळतील. पण, एवढ्याने कालिदासाचे निसर्गचित्र पूर्ण उलगडत नाही. त्यासाठी माळरानावर मुक्तपणे धावणार्‍या हरिणांचे कळप पाहिलेले हवेत, फुलांभोवती गुंजारव करणारे भ्रमर अनुभवलेले हवेत, वनात वावरणार्‍या हत्तींची चाल बघितली असायला हवी. तेव्हा लक्षात येते की कालिदास एका श्लोकात तीन निसर्गदृश्य उभे करतो. पहिलं दृश्य भुंग्याचं. भ्रमर हा रसप्रेमी. अर्धवट उमललेल्या कदंबफुलात मधुसेवनात मग्न असलेला भ्रमर. इतक्यात पावसाचा एक थेंब त्या फुलात पडतो. फुल हलतं. मधाची चव बदलते. बावरलेला भ्रमर गुंजारव करत उडतो आणि त्याचे उड्डाण जणू मेघालाच पुढचा मार्ग दाखवते. दुसरं चित्र हरिणाचं. खाली मान घालून हरीण रानकर्दळीच्या कोवळ्या कळ्या खाण्यात दंग आहे. अचानक मेघगर्जना कानावर पडते. क्षणात त्याचे कान टवकारतात, मान वर उचलली जाते आणि दूरवर रोखलेली त्याची नजर जणू मेघासाठी दिशादर्शक ठरते. हत्ती हा गंधप्रिय. मदमस्त हत्ती सोंड जमिनीवर टेकवून  हत्तीणीचा गंध शोधत चालला आहे. तेवढ्यात हलकी सर येते. हत्तीणीचा गंध धुऊन जातो आणि मातीचा नवा सुगंध दरवळतो. गोंधळलेला हत्ती सोंड उंचावून हवेत मृद्गंध शोधू लागतो. त्याची उंचावलेली सोंड जणू मेघालाच त्याचा मार्ग दाखवते. मेघदूत इतकं अलवार आहे, म्हणून ते वाचायला आपण आधी निसर्गाची अक्षरे गिरवलेली हवीत. 

आजही आपण पावसात भिजतो. त्या भटकंतीच्या स्टोरीज अवघ्या चोवीस तासांत आपोआप नाहीशा होतात. काढलेले शेकडो फोटो मोबाइलच्या गॅलरीत हरवून जातात. काही दिवसांनी स्टोरेज कमी पडले की डिलीटही होतात. पण, कालिदासाने पाहिलेला, अनुभवलेला पाऊस आज पंधराशे-सोळाशे वर्षांनंतरही मेघदूतच्या रूपाने तितक्याच ताजेपणाने आपल्या समोर आहे. पाऊस मोबाइलमध्ये साठवला की तो ‘कंटेन्ट’ बनतो; पण तो मनात साठवला, मनात झिरपवला, तर ‘मेघदूत’ जन्माला येते. कालिदासाच्या नजरेतून निसर्गाकडे पाहण्याची अशी सुरुवात करायची असेल, तर त्यासाठीचा शुभमुहूर्तही दारात उभा आहे, ‘आषाढाचा पहिला दिवस’.