काही वर्षांपूर्वी ‘मी थेरपी घेतो’ हे वाक्य लोक सहजपणे बोलत नसत. काऊन्सेलरकडे जावं लागतंय म्हणजे काहीतरी गंभीर बिघडलं आहे, व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे किंवा त्याला त्याच्या समस्या स्वत: सोडवता येत नाहीत, अशा पद्धतीने इतर लोक बघायचे. विशेषत: आपल्या घरांमध्ये मानसिक ताण, भीती, भावनिक थकवा किंवा नातेसंबंधांतील अडचणी यांविषयी कोणी फारसं बोलत नसत. ‘‘इतकं काय मनाला लावून घ्यायचं?’’, ‘‘सगळं ठीक होईल’’ अशा प्रतिक्रिया अनेकांना ऐकायला मिळत. त्यामुळे थेरपीविषयी एक प्रकारचा संकोच, भीती आणि लाज निर्माण झाली होती.

मात्र, गेल्या काही वर्षांत या वातावरणात हळूहळू बदल दिसू लागला आहे. विशेषत: तरुण पिढी मानसिक आरोग्याकडे अधिक मोकळेपणाने पाहताना दिसते. आज ‘थेरपी’ हा शब्द केवळ ‘मानसिक आजारा’शी जोडलेला राहिलेला नाही; उलट स्वत:ला समजून घेणं, मनातील गोंधळ स्पष्ट करणं, भावनांचं व्यवस्थापन शिकणं किंवा आयुष्यातील ताण हलका करणं अशा अनेक गोष्टींशी तो जोडला जातो आहे. जसं लोक शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करतात, तसंच, मन निरोगी ठेवण्यासाठी काऊन्सेलिंग घेणंही स्वाभाविक असू शकतं, ही कल्पना आता अधिक स्वीकारली जाते आहे. या बदलामागे सोशल मीडियाचा मोठा हात आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब, पॉडकास्ट किंवा वेब सिरिजमधून मानसिक आरोग्याविषयी अधिक संवेदनशील आणि सहज चर्चा होऊ लागली आहे. अनेक कलाकार, खेळाडू आणि प्रभावशाली व्यक्तींनी स्वत:च्या मानसिक संघर्षांविषयी खुलेपणाने बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे ‘मदत घेणं’ ही कमजोरी नसून स्वत:ची काळजी घेण्याची पद्धत आहे, अशी भावना समाजमानसात तयार होऊ लागली आहे. पूर्वी ज्या गोष्टी बंद दाराआड ठेवल्या जात होत्या, त्या आता मैत्रीच्या गप्पांमध्ये, कॅफे चर्चांमध्ये आणि ऑनलाइन चॅटरूम्समध्ये सहजपणे दिसू लागल्या आहेत.

आजच्या तरुणांमध्ये ‘मी ठीक नाही’ हे मान्य करण्याची तयारी वाढताना दिसते आहे. सतत आनंदी आणि परिपूर्ण दिसण्याचा दबाव कमी करून स्वत:च्या भावनांना जागा देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे थेरपीकडे पाहण्याची भाषा देखील बदलली आहे. पूर्वी ‘उपचार’ असा शब्द वापरला जात असे; आता ‘सेल्फ-केअर’, ‘हीलिंग’, ‘इमोशनल वेलनेस’ किंवा ‘माइंड केअर’ अशा अधिक हलक्या आणि स्वीकारार्ह संकल्पना पुढे येत आहेत. तरीही समाजातील जुना संकोच पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. अजूनही अनेकांना ‘‘लोक काय म्हणतील?’’ याची भीती वाटते. फरक इतकाच आहे की आता या विरोधाबरोबरच स्वीकाराचाही आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येतो आहे. विशेषत: शहरांमध्ये तरुण पिढी मानसिक आरोग्याविषयी अधिक संवेदनशील आणि खुली होते आहे. ऑनलाइन काऊन्सेलिंगमुळेही हा बदल अधिक सहज झाला आहे. घरबसल्या मोबाईलवरून संवाद साधण्याची सुविधा मिळाल्याने मदत घेण्याचा संकोच कमी झाला आहे. पूर्वी थेरपिस्टच्या दवाखान्यात जाणं हे मोठं पाऊल वाटत असे; आता मात्र ते अनेकांसाठी दैनंदिन जीवनाचा सहज भाग बनतं आहे.

काही जण मित्रांसोबत जसे योग वर्ग किंवा फिटनेस दिनक्रमाविषयी बोलतात, तसंच काऊन्सेलिंगविषयीही मोकळेपणाने बोलताना दिसतात. मानसिक आरोग्याकडे पाहण्याच्या या बदलत्या दृष्टिकोनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जाणवते, ती म्हणजे आजची पिढी परिपूर्ण दिसण्यापेक्षा खरं आणि प्रामाणिक राहण्याला अधिक महत्त्व देते आहे.

भावना दडपून ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेणं, मदत मागणं आणि स्वत:ची मानसिक काळजी घेणं हे आता हळूहळू सामान्य होत आहे. आणि कदाचित याच बदलामुळे थेरपीभोवतीची भीती, गिल्ट, संकोच पुढील काही वर्षांत आणखी कमी होताना दिसेल.

viva@expressindia.com