‘‘अरे, आज ऑफिसमध्ये काय झालं माहिती आहे?’’, ‘‘कसली खडूस आहे ही सीनियर!’’, ‘‘माझं डोकंच फिरलंय आज!’’, ‘‘मी काय चोवीस तास कामच करू अशी अपेक्षा आहे का’’ अशा वाक्यांनी सुरू होणार्या गप्पा आपल्या रोजच्या आयुष्याचा अगदी सहज भाग आहेत. विशेषत: जेन झी आणि मिलेनियल्सच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींशी तासन्नतास बोलणं, एखाद्या प्रसंगाचा राग व्यक्त करणं, कुणाबद्दल चर्चा करणं किंवा दिवसभरात घडलेल्या गोष्टींचं विश्लेषण करणं हे केवळ वेळ घालवणं नाही. तर अनेकदा हा मनावरचा ताण हलका करण्याचा एक साधा सोपा मार्ग असतो, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे.
आजच्या पिढीचं आयुष्य सततच्या धावपळीने भरलेलं आहे. काम, अभ्यास, रिलेशनशिप्स, सोशल मीडियाचा दबाव, भविष्याची चिंता आणि स्वत:कडून असलेल्या अपेक्षा, अशा अनेक गोष्टींमुळे डोक्यात विचारांची गर्दी असते. अशा वेळी एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन करून ‘‘आज काय झालं सांगू?’’ असं म्हणणं खूप साधं वाटतं; पण त्यामागे मनाला मोकळं करण्याची गरज असते. प्रत्येक वेळी प्रॉब्लेमचं उत्तर हवं असतंच असं नाही. कधी कधी फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घेणं पुरेसं असतं. प्रत्येक वेळी बडबड करताना हे कारण जाणवत असतंच असं नाही. मात्र, अनेकदा सगळं मनातलं बोलून झाल्यावर वाटतं की बोललो ते बरं झालं किंवा बोलून बरं वाटलं!
या नुसत्या गप्पा मारून मन मोकळं करण्याच्या कृतीलाच ‘‘व्हेंटिंग’’ म्हणतात. हा शब्द आजच्या पिढीच्या संवादात सवयीचा भाग म्हणून सहज आला आहे. ‘‘मला फक्त व्हेंट करायचं आहे, सोल्यूशन नको’’ असं म्हणणं हे अगदी कॉमन आहे. यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे समोरची व्यक्ती प्रत्येक वेळी सल्ला देण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी नसते.
अनेकदा तर जाणूनबुजून गॉसिपिंग स्लीपओव्हर्स प्लॅन केले जातात. यात फक्त मुलीच असतात असं नाही, तर मुलंही त्यात ‘समानतेच्या’ संख्येने सहभागी असतात. अशा प्लॅन्समध्ये कोणाकोणाबद्दलचे राग व्यक्त केले जातात, कोणत्याही व्यक्तीचं न पटलेलं वागणं शेअर केलं जातं, मग ती तिसरी व्यक्ती आपल्या मित्र-मैत्रिणींना माहीत असो किंवा नसो! कितीही वेळ बोललं तरी कमीच पडेल अशा मनात साचलेल्या गोष्टी, मनाला लागलेल्या गोष्टी, राग, चिडचिड, टेन्शन, त्रास, दु:ख तर काही वेळा नवीन काही केल्याचा आनंद, उत्साह, आपल्या मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यात काय चाललं आहे याचं कुतूहल अशा अनेक भावनांची सरमिसळ या गप्पांमध्ये असते.
स्वत:च्या भावना ओळखणं आणि त्यांना शब्दात उतरवणं, ही प्रक्रिया यात महत्त्वाची आहे. मनात एखादी भावना अस्पष्ट स्वरूपात असताना ती अधिक त्रासदायक वाटू शकते. पण, ती बोलून दाखवल्यावर आपण नेमकं काय अनुभवतोय हे स्पष्ट होतं. दुसर्याशी बोलल्याने एखाद्या प्रसंगाकडे दुसर्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधीही मिळते.
मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्यामागे काही ठोस प्रक्रिया काम करत असतात. एखादी त्रासदायक घटना आपण मनातच ठेवली तर तिच्याशी संबंधित विचार पुन्हा पुन्हा डोक्यात येत राहू शकतात. त्याला ‘रुमिनेशन’ म्हणजेच त्याच विचारांच्या चक्रात अडकून राहणं, असं म्हणतात. त्याऐवजी भावना शब्दांत व्यक्त केल्यामुळे त्या अनुभवाला शब्दांचा आधार मिळतो आणि मनावरचा मानसिक भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
आपल्या भावना बोलताना ओळखण्याची प्रक्रिया मेंदूला त्या भावनांवर प्रक्रिया करायला मदत करते. भावनिक अनुभवाला शब्द देण्याच्या प्रक्रियेला ‘अफेक्ट लेबलिंग’ असं म्हणतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की भावनेला नाव देणं तिची तीव्रता कंट्रोल करण्यात मदत करू शकतं. त्याचबरोबर जवळच्या व्यक्तीशी बोलताना मिळणारा आधार हा ताणाशी संबंधित रिॲक्शन कमी करायला आणि सुरक्षिततेची भावना वाढवायला मदत करतो. त्यामुळे मित्र-मैत्रिणींसोबतच्या साध्या गप्पा, थोडं व्हेंटिंग आणि त्यानंतर येणारं हसू हा केवळ टाइमपास नसून मनाला ताणातून बाहेर पडण्यासाठी मिळणारी एक भावनिक जागा असू शकते.
यात आणखी एक इंटरेस्टिंग भाग आहे. काही वेळा आपण ज्या गोष्टीवर दिवसभर चिडलेलो असतो, तीच गोष्ट नंतर मित्रांसोबत बोलताना विनोदाचा विषय बनते. प्रसंग बदललेला नसतो, पण त्याच्याकडे पाहण्याची आपली नजर बदलते, राग तोपर्यंत मावळलेला असतो, लक्ष थोडं डायव्हर्ट झालेलं असतं. ‘‘आपल्याच बाबतीत असं का होतं?’’ म्हणत सुरू झालेली चर्चा शेवटी हसत संपते. निगेटिव्ह इमोशनपासून लाफ्टरपर्यंतचा हा प्रवास छोटा वाटला तरी मानसिक ताणासाठी तो महत्त्वाचा असतो.
म्हणूनच गॉसिप, गप्पा किंवा व्हेंटिंग यांना सरसकट ‘वाईट सवय’ म्हणून पाहणं बंद करून, नवीन पिढीने त्याची युटिलिटी समजून घेतली आहे. आताची ही पिढी मानसिक आरोग्याबद्दल जास्त मोकळेपणाने बोलते आणि ‘‘मला आज डाउन वाटतंय’’ हे सांगायला आढेवेढे घेत नाही. मित्रांसोबत मन मोकळं करणं, एखाद्या गोष्टीवर भरभरून बोलणं किंवा थोडं गॉसिप करून हसणं हा त्याच मोकळेपणाचा भाग आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हेंटिंगनंतर आपल्याला हलकं वाटलं पाहिजे. त्याउलट सतत त्याच नकारात्मक विषयावर बोलत राहणं काही वेळा फायदेशीर ठरण्याऐवजी जास्त त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे आपल्या भावना काय पद्धतीने पुढे जातायत हे समजून घेत राहून आपली बडबड कुठे थांबवायची हे ठरवलं पाहिजे.
‘बोलणं’ यासारखी सोपी गोष्ट दुसरी नाही. तीच अवघड करून ठेवली की स्ट्रेस प्रॉब्लेम्स वाढतात. त्याऐवजी सगळ्या प्राण्यांमध्ये केवळ माणसाकडेच असलेल्या या युनिक कलेचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदा करून घेणं जास्त चांगलं!
viva@expressindia.com
