scorecardresearch

मन:स्पंदने : थेरपी आणि बरंच काही

आजही समुपदेशन किंवा थेरपी यांबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात अनेक शंका आणि स्टीरीओटाइप्स आहेत.

– मृण्मयी पाथरे viva@expressindia.com

‘ही आजकालची पिढी खूपच सेन्सिटिव्ह आहे, नाही का? आमच्या वेळेस नव्हता का आम्हाला मानसिक त्रास? उगाच आपला लहानसहान गोष्टींचा बागुलबुवा करायचा. आम्हालाही ताणतणाव होतेच की! पण आम्ही नाही गेलो कधी कोणत्या मानसशास्त्रज्ञाकडे.’ आजकाल असे संवाद काही घरांत अजूनही ऐकू येतात. आजही समुपदेशन किंवा थेरपी यांबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात अनेक शंका आणि स्टीरीओटाइप्स आहेत. मानसशास्त्रज्ञाकडे केवळ ‘वेडे’ लोकच जातात का? थेरपीला जाणारे लोक मानसिकरीत्या कमकुवत असतात का? एकदा थेरपीला गेल्यावर आम्ही लगेचच बरे होऊ का? एकदा थेरपी सुरू केली की सतत थेरपीला जावंच लागेल का?

या सगळय़ा शंकांचं निरसन करण्यापूर्वी आपण मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलताना दैनंदिन जीवनात कोणते शब्द वापरतो यावर नजर टाकणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ‘ही गेलेली केस आहे’, ‘तू वेडा/ रिटार्डेड आहेस का?’, ‘तू अलिबागवरून आला/ आली आहेस का?’ अशा वाक्यप्रयोगांतून आपण जाणते-अजाणतेपणी हा गैरसमज अधोरेखित करतो की समुपदेशनाची गरज फक्त काही विशिष्ट लोकांनाच असते. या अशा शब्दप्रयोगांमुळे थेरपीसभोवताली असलेल्या ‘स्टिग्मा’मध्ये आपण अजून भर घालतो. खरं सांगायचं झालं तर थेरपीला जाण्यासाठी कोणालाही मानसिक आजार असण्याची किंवा एखाद्या मानसिक आजाराचं डायग्नोसिस असण्याची नेहमीच गरज नसते. रोजच्या ताणतणावाव्यतिरिक्त स्वत:च्या मानसिक आणि सर्वागीण विकासासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्वत:च्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू जाणून घेण्यासाठी लहानांपासून मोठय़ांपर्यंत कित्येक जण थेरपी घेतात.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कित्येक चढउतार येत असतात, ज्याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आपण जसं आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी डॉक्टरकडे जातो, तसंच आपल्या मनाची काळजी घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडे जायला काहीच हरकत नसावी; पण मानसिक आरोग्याच्या या प्रवासात कित्येक जण समाजाने निर्माण केलेल्या निरनिराळय़ा अडथळय़ांना सामोरे जातात. थेरपी घेणारी माणसं ही ‘अबनॉर्मल’ असतात हा त्यापैकीच एक मोठा गैरसमज! मुळात नॉर्मल आणि अबनॉर्मल काय याच्या व्याख्या कोण ठरवतं? प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृती आणि चालीरीतीनुसार या व्याख्या बदलत जातात. आपल्याकडे ग्रामीण भागांत ज्या व्यक्तीच्या ‘अंगात देव येतो/ देवी येते’, त्यांना बराच सन्मान दिला जातो; पण इतर प्रदेशात अशा वागणुकीला ‘भुताटकी’सुद्धा समजलं जाऊ शकतं. या वागणुकीमागे डिसोसिएशन किंवा हॅल्युसिनेशन (आभास/ भ्रम) यांसारखी गंभीर मानसिक कारणंही असू शकतात. त्यामुळे ‘नॉर्मल’ आणि ‘अबनॉर्मल’ म्हणजे नेमकं काय याचा ऊहापोह करून ‘थेरपी शेमिंग’ करण्यापेक्षा आपण समोरच्या व्यक्तीला कसा आधार देऊ याबद्दल जर विचार केला तर?

आपल्या समाजात प्रचलित असलेल्या अशा अनेक गैरसमजांमुळे कित्येक जण गरज असूनही मानसिक आधार मागण्यासाठी आढेवेढे घेतात. थेरपी सुरू केली याचा अर्थ मी माझ्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यायला किती कमकुवत आणि असक्षम (inadequate) आहे, असा मुळीच होत नाही. उलट नैराश्य, भीती, चिंता आणि दु:खाने घेरलेलं असताना त्यातून बाहेर पडण्यासाठी पावलं उचलायलाही मोठं धैर्य, चिकाटी आणि अनेक श्रम लागतात.

आपल्या ओळखीतील एखादी व्यक्ती थेरपीसाठी जात असेल तर तिला ‘तुला थेरपीची काय गरज? या जगात कित्येक जणांना तुझ्यापेक्षाही गंभीर परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल. ते सगळे थेरपीवर अवलंबून असतात का?’ अशा कित्येक प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागतो. इतरांचे प्रॉब्लेम्स आपल्यापेक्षा जास्त गंभीर असले म्हणून आपलं दु:ख कमी असावं, ही अपेक्षा मनाचं समाधान करण्यापेक्षा आपल्याला गिल्टी फील करण्यावर जास्त भर देते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात; पण आपल्या अडचणींची तुलना करून त्यांना स्पर्धात्मक रूप देण्यापेक्षा एकमेकांना साहाय्य करून या अडचणींवर एकत्र मात कशी करता येईल याकडे आपण सगळय़ांनीच लक्ष दिलं तर?  

माणसाचा एक गमतीदार स्वभाव आहे. प्रत्येक नव्या गोष्टीला आपण सहजतेने स्वीकारत नाही. थेरपीचीही तीच कथा आहे. थेरपीचा उगम गेल्या शतकात झाला असला, तरी अजूनही आपण या उपचार पद्धतीला भीतीदायक नजरेने पाहतो. आणि आपल्याला भले थेरपीचं महत्त्व पटलं असलं, तरीही इतर लोकांना कळलं तर ते काय म्हणतील या दडपणाखाली कित्येक जण जगत राहतात. या अशा विचारधारणेमुळे एकाच घरात राहूनही कित्येक तरुण मंडळी आपण थेरपीला जात आहोत हे आपल्या कुटुंबीयांना सांगत नाहीत. खरं तर, घरच्यांचा आणि आपल्या प्रियजनांचा पाठिंबा असेल, तर आपल्याला किती तरी अडचणींना खंबीरपणे सामोरं जाता येतं; पण त्यासाठी ‘लोकं काय म्हणतील?’ या विचाराच्या विळख्यातून आपल्याला बाहेर यायला हवं.   

बरं, एवढय़ा सगळय़ा अडचणी पार करून थेरपीला गेलो, तर एक प्रश्न कित्येक जण हमखास विचारतात – ‘एका सेशनमध्ये सगळं नीट होईल का?’ अनेकदा थेरपीमध्ये जे प्रॉब्लेम्स शेअर केले जातात, ते भले वरवरचे वाटले तरी कधीकधी ते वर्षांनुर्वष आकार घेत असतात आणि आपली पाळंमुळं जीवनाच्या वेगवेगळय़ा टप्प्यांत रुजवत असतात. आपल्याला पहिल्या काही सेशन्समध्ये जरी क्षणिक विसावा मिळाला, तरी काही कालांतराने मूळ प्रॉब्लेम पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे आपण ज्या मानसशास्त्रज्ञांकडे जात आहोत त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून ‘फॉलो अप’ सेशनची विचारपूस नक्की करा आणि थेरपीमधील प्रगती हीसुद्धा स्पर्धा नव्हे, नाही का? आपण थेरपीला जात असताना बऱ्याच वेळा आपल्यासोबत आपल्या सभोवतालची परिस्थिती, आपल्या समस्येचे पैलू आणि माणसंही बदलत जातात. त्यामुळे आपल्याला अंतरंग समजून घ्यायला कधी जास्त, तर कधी कमी वेळ लागू शकतो. राहता राहिला प्रश्न आजकालची पिढी जास्त ‘सेन्सिटिव्ह’ असण्याचा – कदाचित या आधीच्या पिढय़ांनी खूप गोष्टी सहन केल्या असतील, बऱ्याच वेळेस आपल्या स्वप्नांशी तडजोड केली असेल, इतरांना वाईट वाटू नये म्हणून आणि नाती जपण्यासाठी मनाला पटत नसतानाही अनेक गोष्टी केल्या असतील; पण आधीची पिढी आणि आताची पिढी यात नेहमीच थोडं वेगळेपण असतं, नाही का? प्रत्येक पिढीची खास वैशिष्टयं असतात. खरं तर, आताची पिढी ही जास्त सेन्सिटिव्ह नसून, आपल्या भावना आतल्या आत दाबून न टाकता, त्यांना व्यक्त होण्यासाठी ‘सेफ स्पेस’ कशी निर्माण करता येईल याकडे लक्ष देत आहे. पिढय़ान् पिढय़ा चालत आलेल्या ‘टॉक्सिक पॅटर्न्‍स’ना जाणीवपूर्वक भेद देण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सगळं करायला खरंच खूप हिंमत, जिद्द आणि चिकाटी लागते. त्यामुळे यू नो व्हॉट? इतरांना काहीही म्हणू देत, थेरपी इज रिअली कूल!  

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mental health therapy and much more zws

ताज्या बातम्या