आजच्या धावपळीच्या आणि टोकाच्या स्पर्धात्मक युगात जेन झी आणि मिलेनियल्स या पिढ्यांच्या जगण्याच्या स्टाइलमध्ये आणि कामाच्या पद्धतीत कमालीचा बदल झाला आहे. सोशल मीडियामध्ये सतत ऑनलाइन असणं, करिअरमध्ये सतत काम करत राहण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. त्यातही भविष्याची अनिश्चितता यामुळे या तरुणांना ‘बर्नआउट’ अर्थातच अचानक अंगावर येणार्या मानसिक थकव्याचा सामना करावा लागतो आहे.
मानसिक आरोग्यासाठी घेतले जाणारे विश्रांतीचे क्षण म्हणजेच ‘मेंटल हेल्थ वेलनेस ब्रेक्स’ ही आजच्या काळाची अनिवार्य गरज बनली आहे. हे ब्रेक्स म्हणजे कामातून पळ काढणे नव्हे, तर स्वत:च्या थकलेल्या – भागलेल्या मनाला पुन्हा एकदा रिचार्ज करण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेली सुट्टी आहे.
बर्नआऊट झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा आधीच तो होऊ नये म्हणून प्रयत्न करणारी ही पिढी आहे. या प्रक्रियेत निसर्गाचा सहवास हा एक महत्त्वाचा दुवा ठरतो. डोंगरदर्यांत फिरणे, समुद्रकिनारी शांत बसून राहणे किंवा जंगलातील शांतता अनुभवणे यामुळे मेंदूतील ताण देणारे हार्मोन्स कमी होतात आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स वाढू लागतात. हे छोटे छोटे प्रवास त्यांना केवळ शारीरिक थकवा दूर करण्यास मदत करत नाहीत, तर त्यांच्या विचार करण्याची पद्धतही बदलून टाकतात.
विसावा घेतल्यामुळे मनाला मिळणारी ही उभारी त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमाने आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करते. अशा ब्रेकमध्ये कामाशी संबंधित कोणत्याही फोनला उत्तर द्यायचं नाही, मेल्स चेक करायचे नाहीत, स्लॅक बघायचं नाही, टीम्सची नोटिफिकेशन्स बंद ठेवायची अशी अनेक पथ्यं पाळून हा ब्रेक घेतला जातो.
महत्त्वाची गोष्ट अशी की, आजचा तरुण या मानसिक विश्रांतीला चैनीची गोष्ट न मानता ती जगण्यासाठीची एक मूलभूत गरज मानतो. जुन्या पिढीमध्ये काम सोडून विश्रांती घेण्याला अनेकदा आळशीपणा समजले जाई, मात्र आजच्या पिढीने हा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांना हे जाणवलं आहे की, जर मन शांत नसेल तर कितीही काम केलं तरी त्यात क्वॉलिटी राहणार नाही.
प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि कामात क्रिएटिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी हे वेलनेस ब्रेक्स अत्यंत प्रभावी ठरतात. या विश्रांतीमुळे मिळणारी मेंटल स्टेबिलिटी त्यांना वैयक्तिक आणि प्रोफेशनल दोन्ही बाजूंमध्ये बॅलन्स ठेवायला मदत करते.
या ब्रेकमध्ये ‘नाही’ म्हणायला शिकणं हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. कामाच्या जादा वेळा, सततचे कॉल्स आणि ईमेल यांच्या कचाट्यातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवून वेळीच ‘नाही’ म्हणणं ही गोष्ट तर रोजच्या आयुष्यातही मेंटल वेलनेस ब्रेक देऊ शकते. या वेलनेस ब्रेकमुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक आरोग्यावरही कमालीचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. निद्रानाश, डोकेदुखी आणि चिडचिड यांसारख्या समस्या केवळ थोडा वेळ स्वत:साठी काढल्यामुळे कमी होऊ शकतात. स्वत:च्या आरोग्यासाठी असलेली ही सजगता आजच्या तरुणांना लवचीक आणि सहनशील बनवते आहे.
थोडक्यात सांगायचं तर, मेंटल हेल्थ वेलनेस ब्रेक्स हे आजच्या तरुणांसाठी एक ‘रिसेट बटण’ आहे. आयुष्याची शर्यत जिंकण्याच्या नादात स्वत:चं मानसिक आरोग्य गमावून चालणार नाही, याची जाणीव त्यांना झाली आहे. मनाला थोडा विसावा देणं, छंदांना वेळ देणं आणि स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेणं ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे.
हे ब्रेक्स आपल्याला केवळ शारीरिक विश्रांतीच देत नाहीत, तर जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक आणि संतुलित दृष्टिकोनही देतात. सुदृढ मन हेच खर्या यशाचे गमक आहे, हे या पिढीला पूर्णपणे समजलेलं आहे.
viva@expressindia.com
