scorecardresearch

विष्णूज् मेन्यू कार्ड : तांदुळाचे पदार्थ

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.

विष्णूज् मेन्यू कार्ड : तांदुळाचे पदार्थ

रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
मागील भागात आपण तांदळाचे महत्त्व जाणून घेतले होते. त्याचबरोबर तांदळाबाबतचे काही गैरसमज आपल्या लक्षात आले. या भागातही आपण तांदळाचे काही पदार्थ बघणार आहोत. तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो.
काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर काहींना मात्र नवीनच तांदूळ लागतो. भंडारा, गडचिरोली या भागात फिरत असताना मला भर उन्हाळ्यात एक दृश्य दिसले, ते म्हणजे भर उन्हात रोडचे काम सुरू असताना तिथले मजूर बाटलीतले एक पेय पीत होते, चौकशी केल्यावर ते तांदळाच्या पिठापासून आंबवून तयार केलेले द्रव्य होते की ज्याने भुकेपाठोपाठ उन्हाचाही त्रास कमी व्हायचा. याही भागात काही तांदळाचे पदार्थ बघूया..

ब्राउन राइस
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, साखर अर्धी वाटी, स्टार फुले २-३, लवंग ५-६, व्हिनेगार १ चमचा, लिंबाचा रस १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल ४ चमचे, साखर अर्धा चमचा, कोथिंबीर
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यात साखर घाला.  साखर ब्राऊन झाल्यावर त्यात २-३ स्टार फुले, लवंग व पाणी घालून उकळी आणा. नंतर त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, मीठ, थोडी साखर व २ वाटय़ा तांदूळ घालून भात शिजवा. वरून कोथिंबीर घालून रायत्याबरोबर सव्‍‌र्ह करा.

भाताचे सीख कबाब
भातापासून तयार होणारा एक वेगळा प्रकार. हे कोळशाच्या शेगडीवर तयार केले की चवदार लागतात.
साहित्य : शिजवलेला भात २ वाटय़ा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे, आमचूर पावडर १ चमचा, चाटमसाला २ चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च २ ते ३ चमचे, उकडलेला बटाटा १ नग, तेल २ ते ३ चमचे.
कृती : भात बटाटे व उर्वरित सगळे मसाले (चाट मसाला व कॉर्नस्टार्च सोडून) एकत्र मिसळून घ्यावे. एकजीव करताना २ चमचे तेल घालावे. हे तयार झालेले मिश्रण  एका सळईला लावावे. हा थर जास्त जाड असू नये. या वेळी हाताला कॉर्नस्टार्च लावून थर द्यावा. यानंतर या तयार झालेल्या सळया मंद कोळशाच्या शेगडीवर अर्धवट भाजून घ्याव्यात. सव्‍‌र्ह करते वेळी वरून पुन्हा तेलाचे ब्रशिंग करून शेगडीवर भाजून घ्यावे. वरून चाट मसाला चटणी व कचुंबरबरोबर सव्‍‌र्ह करावे.
प्रकार दुसरा : हेच मिश्रण सूप स्टिक्सला लावून कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने लांबट पसरवून घ्या. नंतर गरम तेलात तळून त्यावर चाट मसाला घालून सव्‍‌र्ह करा.

ब्लॅक राइस
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून घ्या. तो जळायला नको, नंतर गरम पाण्यात टाकून त्याला अर्धा तास भिजवत ठेवा. एका पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये  काळीमिरी, लवंग, बारीक चिरलेली लसूण परतून घ्या. नंतर यात अध्र्या लिंबाचा रस, मीठ, साखर घालून  ३ कप पाणी घालून उकळा. पाणी उकळल्यावर भिजवलेला तांदूळ घालून शिजवा व रायत्याबरोबर किंवा तसाही खायला छान लागतो.

भंडारी भातोडे
हा प्रकार विदर्भातल्या भंडारा जिल्ह्य़ात पाहायला मिळतो. इथे भातशेती बऱ्याच प्रमाणात होते. त्यामुळे भाताचे बरेचसे प्रकार होतात. धानापासून निघणारं तेल, तांदळापासून तयार होणारं एक उत्तेजक पेय इथल्या भागात चाखायला मिळतं. पण सध्या  इथे आपण भातापासून तयार होणारे वडे कसे असतात ते पाहूया.
साहित्य : तयार भात ४ वाटय़ा, भरडलेले धणे २ चमचे, जिरे पावडर १ चमचा, जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या ४ ते ५, लसूण-आलं २ चमचे, जाडसर कुटलेली सोप २ चमचे, बारीक चिरलेले कांदे ३ वाटय़ा, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल तळायला, हळद छोटा अर्धा चमचा,
कृती : तांदळाचे पीठ सोडून सर्व जिन्नस एकत्र करा. यानंतर हलक्या हाताने तांदळाच्या पिठीच्या साहाय्याने वडे थापून मंद आचेवर डीप फ्राय करा व दहय़ाच्या चटणीबरोबर खायला द्या.
टीप : वडे तळताना दोनदा तळले तर जास्त खुसखुशीत होतात. जसे वडे झाल्यावर तेलातून अर्धकच्चे काढून घ्या, सव्‍‌र्ह करतेवेळी ओल्या हाताने हलकेच दाबून परत तळा.
आमचूर घरात नसेल तर त्यात दही, लिंबू, सायट्रिक अ‍ॅसिड घातलं तरी चालू शकेल.

भात कसा शिजवावा?
कुकरमध्ये एकाच भांडय़ात मऊ आणि फडफडीत भात शिजवायचा असेल तर कुकरमध्ये भांडय़ाच्या खाली एक चमचा ठेवा, जेणेकरून ते भांडे कलते होऊन व ज्या भागात पाणी जास्त आहे तो भात मऊ होईल. आणि ज्या भागात पाणी कमी आहे, तो भात फडफडीत होईल.

तांदळाचे सूप
हे सूप आपण भात शिजवताना जे वरचे पाणी निघते त्यापासून तयार करणार आहोत. पारंपरिक पद्धतीनुसार या भातावरच्या पाण्याला पेज असेसुद्धा म्हणतात.
साहित्य : भात शिजवताना थोडे जास्त पाणी घालून त्यावरचे पाणी काढून घ्यावे. (पाणी घट्टसर असावे)
तांदळाचं पाणी ५ वाटय़ा, मीठ, साखर चवीनुसार, दही २ चमचे, कोथिंबीर पाव वाटी, फ्रेश क्रीम ४ चमचे, भिजवून तळलेले तांदूळ २ चमचे.
कृती : भातावरचे पाणी उकळायला ठेवून त्यात दही, चवीनुसार मीठ, साखर घालणे, सव्‍‌र्ह करते वेळी त्यात वरून फ्रेश क्रीम, तळलेले तांदूळ, कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करावे.
टीप : दही घालण्याआधी घुसळून घ्यावे. तांदूळ तळल्यानंतर त्याला टीपकागदावर टिपून घ्यावे. त्यामुळे सुपावर तेलाचा तवंग दिसणार.

कचुंबर साहित्य : (बारीक लांब कापलेल्या भाज्या ज्यात गाजर, पत्ताकोबी, कांदे, शिमला मिरची, कोथिंबीर) २ वाटय़ा, लिंबाचा रस १ नग, मीठ चवीला, चाट मसाला १ चमचा, हळद पाव चमचा, व्हिनेगार १ चमचा.
कृती : प्रथम सर्व भाज्या कापून थंड पाण्यात घालून ठेवाव्यात. कचुंबर बनवताना आयत्या वेळी पाण्यातून काढून त्यात वरील जिन्नस मिसळावे.
हिरवी चटणी साहित्य : ताजा पुदिना १०० ग्रॅम, कोथिंबीर ५० ग्रॅम, हिरवी मिरची ५० ग्रॅम, आलं-लसणीचे वाटण अर्धी वाटी, आंबट व घट्ट घोटलेले दही १ वाटी, मीठ चवीनुसार.
कृती : दही वगळून सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावेत. वेळेवर दही व मीठ घालून खायला द्यावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-07-2013 at 01:02 IST
Next Story
क्लिक

संबंधित बातम्या