शब्दांकन: श्रुती कदम
क्यों भला रोशनी की भीख मांगू जुगनुओं से
अपने हिस्से का नया सूरज उगाना जानता हूं मैं
पॉडकास्ट हा शब्द हल्ली जळी—स्थळी ऐकू येतो. आतापावेतो वाचनाची आवड असलेले, एकेका बैठकीत पुस्तकंच्या पुस्तकं रिचवणारे वाचनवेडे आपण पाहिले आहेत. मात्र आता वाचण्याबरोबरच ऐकण्याचा फंडा तरुण पिढीत रुळतो आहे. ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट्स, स्टोरीटेलसारखे अॅप्स कितीतरी माध्यमातून आता कथा—विचार ऐकले जातात. ऐकता ऐकता आवडलेला विचार वाचकांबरोबर शेअर करणारं ‘ऐकू आनंदे’ हे नवं सदर..
‘लफ्जों के मोती’ हा आर जे वशिष्ठचा ‘स्पॉटिफाय’ या अॅपवर प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. त्यामधल्या एका भागात तो राघवेंद्र द्विवेदी यांनी लिहिलेली ‘क्यों भला रोशनी की भीख मांगू जुगनुओं से.. अपने हिस्से का नया सूरज उगाना जानता हूं मैं’ ही शायरी आपल्याला ऐकवतो. आणि नंतर तो त्याच्या आधारे आपण स्वत:ला कधीच कमी लेखू नये हे समजावून सांगतो. खूप साधा संदेश आहे त्यात खरंतर.. आपली मेहनत करायची तयारी असेल, क्षमता असेल तर आपण आयुष्यात आपले जे ध्येय आहे ते नक्की गाठू शकतो, हा विचार त्याने या शायरीच्या आधारे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आर जे वशिष्ठच्या ‘लफ्जों के मोती’ या पॉडकास्टचा मला खूप फायदा होतो. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि माझ्या व्यावसायिक आयुष्यातही त्याने या पॉडकास्टमधून मांडलेल्या विचारांचा माझ्यावर चांगला परिणाम झाला. कधी असा क्षण आला आणि वाटलं की बस आता माझ्याने होत नाही आहे हे.. तेव्हा तेव्हा मी हा ‘लफ्जों के मोती’ पॉडकास्ट पुन:पुन्हा ऐकते.
तसं मी एफएम लहानपणापासून ऐकत आले आहे, पण मी मानसशास्त्रज्ञ झाल्यापासून पॉडकास्ट जास्त ऐकायला लागले. आर जे वशिष्ठचं वैशिष्टय़ हे आहे की, तो त्याच्या आवाजाने आपला अर्धा तणाव दूर करतो. त्यात वेगवेगळे शायर आणि त्यांच्या शायरीचा आधार घेऊन तो आपल्या आयुष्यात प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी खूप सहजपणे सांगतो. त्यामुळे त्याचे पॉडकास्ट आवडतात. काही वेळा आपल्याला दृष्यांपेक्षा आवाज जास्त आकर्षित करतो आणि बांधून ठेवतो तसंच माझं पॉडकास्टच्या बाबतीत होतं. म्हणून मी प्रवास करताना किंवा मग मोकळा वेळ मिळेल तसं पॉडकास्ट ऐकत असते. पॉडकास्ट ऐकणं हे अधिक आरामदायी वाटतं.
– पल्लवी देशमुख (मानसशास्त्रज्ञ)