फेब्रुवारी महिना संपला की परीक्षांचे वेध लागतात आणि विद्यार्थी उजळणी, अभ्यास आणि त्यांचे भविष्य ज्यावर अवलंबून आहे ते टक्के या बाबींविषयी खूप चिंताक्रांत असतात आणि तणावाखाली वावरत असतात.  
परीक्षा जवळ येत चालल्या आहेत तशी मला खात्री आहे की तुम्ही अतिशय ताणाखाली असाल. या कालावधीमध्ये अभ्यासाचे नियोजन, अधिक लक्ष आणि एकाग्रता यासाठी शांत राहणे गरजेचे आहे. या कालावधीमध्ये आपल्यावर येणाऱ्या ताणामुळे खाण्याच्या अनियमित वेळा, आरोग्यास अपायकारक असे पदार्थ सतत खात राहणे आणि उत्तम अभ्यास आणि एकाग्रता यासाठी जेवणाप्रमाणेच अतिशय गरजेच्या असलेल्या व्यायामाकडे दुर्लक्ष होते. पालक आणि शिक्षकांनीदेखील या महिन्यामध्ये येणारा ताण कमी करण्याकरिता मुलांना आरोग्यदायी जेवण घेण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
तुमचे अभ्यासावरील लक्ष आणि एकाग्रता यात सुधारणा घडवून आणण्याकरिता आणि तुमच्या ताणाशी दोन हात करण्यास मदत करण्याकरिता या काही टिप्स :
आहार : ताणाशी लढण्यात आणि एकाग्रता वाढवण्यात हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो मेंदूकरिता मुख्य इंधनाचे काम करतो. संतुलित आहारामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते आणि पोषणात्मक अभाव आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने सामोरे जावे लागणाऱ्या परिणामांना टाळण्यास मदत करते.
 मुलांनी त्यांचा दिवस मूठभर बदाम, अक्रोड, पिस्ते, खजूर आणि अंजीर खाऊन करावी. या सुक्या मेव्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स असतात ज्यामुळे स्मरणशक्ती आणि ग्रहणक्षमता वाढण्यास मदत होते. न्याहारीत तृणधान्यांनी बनवलेले वाटीभर खाद्यान्न आणि पेलाभर दूध घ्यावे व त्याबरोबर एक फळ खावे. त्यामुळे तुमच्या शरीरात महत्त्वपूर्ण पोषणमूल्यांचे संतुलित प्रमाण राखले जाते. बहुविध धान्यांपासून बनलेल्या दोन पोळ्या किंवा बाजरीच्या भाकऱ्या आणि एखादी पालेभाजी, एक वाटी डाळ, थोडा भात आणि सॅलड यांचा समावेश असलेला आरोग्यदायी आहार घेतल्याने अभ्यास करण्याकरिता आणि सक्रिय राहण्याकरिता आवश्यक असलेली ऊर्जा तुम्हाला मिळते. बराच वेळ अभ्यास करून झाल्यावर पोटभर न्याहारी घेतल्याने बरे वाटते. या न्याहारीमध्ये मध्यम प्रमाणात कॅलरी असलेल्या थालिपीठ, टोस्ट केलेले व्हेजिटेबल चीज सँडविच, अनेक भाज्यांचे पराठे, मेथीचे ठेपले, टोमॅटो ऑम्लेट अशा खाद्यान्नाचा समावेश असावा आणि दिवसाच्या शेवटी केलेले जेवण भूक भागण्याइतपत करावे. जे रात्रीचा अभ्यास करणे पसंत करतात त्यांनी झोप येऊ नये आणि पेंगुळल्यासारखे वाटू नये म्हणून आपले रात्रीचे जेवण हलकेच घ्यावे. झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतल्याने तुमचे डोके शांत होण्यास, दिवसभरात केलेला अभ्यास डोक्यात पक्का होण्यास मदत होईल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
झोप : पुरेशी झोप घेण्याला तेव्हढेच महत्त्व दिले पाहिजे. यामुळे मन आणि शरीर यांना पुरेशी विश्रांती मिळून तरतरी येते आणि बुद्धीला चालना मिळते. तुम्ही रात्री किमान ७-८ तास झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि अनावश्यक विचारांना दूर ठेवले जाते. दिवसाची सुरुवात ताजेतवानेपणे करण्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे आहे.
वेळ : अभ्यास करण्याकरिता पहाटेची वेळ अतिशय उत्तम मानली जाते. तुमचा मेंदू तरतरीत असतो आणि त्यामुळे तुम्हाला अतिशय शांततेत आणि कोणताही गोंगाट नसलेल्या वातावरणात केलेला अभ्यास लक्षात ठेवणे सोपे जाते. पुरेशी झोप मिळाली नाही तर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि एकाग्रता कमी होते.
विरंगुळा : अभ्यासाच्या पूर्ण वेळामध्ये अधूनमधून विश्राम घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याच त्याच विषयावरून तुमच्या मेंदूचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात यश येते. चालणे, पोहणे, योगा, जॉिगग, दोरीवरच्या उडय़ा इत्यादींसाठी काही मिनिटे राखून ठेवा किंवा मित्रांना भेटा, कुटुंबीयांशी गप्पा मारा आणि अभ्यास आणि उजळणी करून आलेला ताण हलका करा.
परीक्षा हा तुमच्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्या अतिशय महत्त्वाच्या असल्या तरी त्यापायी स्वत:वर अतिताण येऊ न देणे आणि अतिश्रम न करणे अतिशय महत्त्वाचे आहे. शेवटच्या क्षणी येणाऱ्या ताणाला टाळण्याकरिता तुमचा अभ्यास, उजळणी आणि सराव यांचे नियोजन आधीच करून ठेवा. निष्क्रियता आणि आरोग्यास हानिकारक राहणीमान यांमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात आणि अकाली स्थुलत्व येते. जबाबदारीने वागा, सक्रिय आणि सकारात्मक राहा, ध्येयावर लक्ष ठेवा आणि प्रेरित व्हा.
तुमच्या क्षमता आणि समजुतींवर विश्वास ठेवा. मी तुम्हाला सुयश चिंतितो. तुम्ही सर्वजण उत्तम गुण मिळवून यशस्वी व्हाल याची मला खात्री वाटते.