मन:स्पंदने: ब्रेकअप के बाद

मिहिर, हे काय ऐकतेय मी? तू आणि मनालीने ब्रेकअप केलंस? अरे, आता परवापर्यंत तर चांगलं चाललं होतं की तुमचं! मग, अचानक काय झालं? आजकालची मुलं कसला मागचा-पुढचा विचारच करत नाहीत.

मृण्मयी पाथरे
‘मिहिर, हे काय ऐकतेय मी? तू आणि मनालीने ब्रेकअप केलंस? अरे, आता परवापर्यंत तर चांगलं चाललं होतं की तुमचं! मग, अचानक काय झालं? आजकालची मुलं कसला मागचा-पुढचा विचारच करत नाहीत. बाबा आणि माझ्यात भांडणं होत नाहीत का? प्रेम म्हणजे निव्वळ पोरखेळ वाटतो तुम्हाला. बरं, ब्रेकअप केलं तर केलंस, पण मला सांगायचं तरी होतंस. मला मनालीच्या आईने सांगितलं आज सकाळी. गेली तीन-चार र्वष दिला ना आम्ही तुमच्या नात्याला पाठिंबा? मनालीच्या कुटुंबाशी पण आपले चांगले संबंध होते. आपल्या नातेवाईकांनाही तुम्हा दोघांबद्दल माहिती होतं. या नात्यात केवळ तुम्ही दोघंच इन्व्हॉल्व नव्हतात, आम्हीही होतोच की!’, आईने मिहिरला चांगलंच सुनावलं. मिहिर मात्र शांत बसून सगळं ऐकत होता. आता आई चिडली आहे, त्यामुळे मी काही समजावून सांगायला गेलो, तर परत मलाच ओरडा पडेल. त्यापेक्षा काहीच न बोललेलं बरं, असा मिहिरने विचार केला.
मिहिर आणि मनाली एकाच कॉलनीमध्ये राहात असल्यामुळे तसे बालपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. या मैत्रीचं रूपांतर पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर प्रेमात झालं. रिलेशनशिपमध्ये आल्यावरसुद्धा त्यांनी आपल्या करिअरवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. दोघंही जितक्या वेळा डेटवर जायचे, त्याहून दुपटी-तिपटीने अभ्यास करायचे. त्यामुळे प्रेमात पडले आणि अभ्यासात लक्ष नाही, असं त्यांचं मुळीच नव्हतं. त्यांच्या घरच्यांनाही कुरबुर करायला काही कारण नव्हतं. एकमेकांच्या आवडी-निवडी लक्षात ठेवणं, एकमेकांसाठी स्वत: कस्टमाईझ्ड गिफ्ट्स बनवणं, वाढदिवसाला सरप्राईज देणं, एकमेकांच्या कुटुंबाला वेगवेगळय़ा सणोत्सवात सामावून घेणं, अशा कित्येक गोष्टी ते दोघंही मनापासून करत होते. मग नक्की कुठे बिनसलं याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता.
मनालीला पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि जॉब शोधण्यासाठी भारताबाहेर जायचं होतं, तर मिहिरला भारतातच शिक्षण घेऊन इथेच स्वत:चा बिझनेस उभा करायचा होता. त्यांच्या फॅमिली प्लानिंगच्या कल्पनासुद्धा वेगवेगळय़ा होत्या – मनालीला भविष्यात मूल हवं होतं, तर मिहिरला नको होतं. मनालीचे आणि मिहिरचे आईबाबा तिला परदेशी जाऊन शिक्षण घेण्यासाठी कायम प्रोत्साहन देत होते, पण मिहिरला मात्र ‘तू का जात नाहीस बाहेरगावी? तुलाही चांगला जॉब मिळेल. मनाली आणि तू पुढे एकत्र राहू शकता. बिझनेस उभा करणं, म्हणजे आयुष्यात अनिश्चिततेला (uncertainty) स्वत:हून आमंत्रण देण्यासारखं आहे,’ हे ऐकायला मिळत होतं. दोघांचेही पालक मनाली आणि मिहिरने आयुष्यात चांगली प्रगती करावी आणि त्यांचं नातं असंच बहरत राहावं म्हणून प्रयत्न करत होते. मनाली काही वर्षांनी भारतात स्थायिक होण्यासाठी परत येईल का, असंही विचारून झालं. पण मनाली आणि मिहिर मात्र आपापल्या करिअर आणि फॅमिली गोल्सवर ठाम होते. त्या दोघांनाही एकमेकांच्या निर्णयांवर कोणताच आक्षेप नव्हता. पण दिवसेंदिवस घरच्या मंडळींच्या बोलण्याचं प्रेशर ते दोघंही अनुभवत होते.
इतरांच्या सल्ल्यांमुळे मनाली आणि मिहिर यांनीही एकदा निवांतपणे बसून सगळय़ा गोष्टींचा विचार केला – त्यांचं करिअर, नात्याचं भविष्य, त्यांची जीवनस्वप्नं, दोघांचंही मानसिक आरोग्य, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या नात्यात आलेला दुरावा.. इतकं सगळं असूनही त्यांनी नातं टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले – एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं, एकमेकांच्या इन्सिक्युरिटीज (insecurities) जाणून घेणं, भावनिक आधार देणं, कपल थेरपिस्टकडे नियमितपणे थेरपीसाठी जाणं.. ते दोघंही त्यांच्या नात्यामध्ये खूश होते. पण त्यांच्या पालकांना हे भविष्यात वेगवेगळय़ा देशांत राहिले, तर यांचं पुढे कसं होणार याची रुखरुख लागून राहिली होती. काही महिन्यांनी मनाली परदेशी शिकायला गेली आणि भारतात मिहिर बिझनेस उभारण्यासाठी मेहनत करू लागला. मनालीला परदेशात तिथल्या संस्कृतीशी, नवीन माणसांशी आणि अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यात थोडा वेळ लागला. तर इथे मिहिरसुद्धा बिझनेस चालवण्यासाठी दिवसरात्र अखंड मेहनत करत होता. हळूहळू दिवसातून दोनदा केले जाणारे कॉल्स आठवडय़ातून, कधीकधी पंधरवडय़ातून एकदा व्हायला लागले. मिहिर आणि मनालीचा संपर्क कालांतराने कमी होत गेला, पण त्यांना त्यांच्या आयुष्याच्या या नव्या टप्प्यात एकमेकांची तितकीशी कमी जाणवली नाही.
काही महिन्यांनी मिहिर आणि मनालीने एकमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांच्या मनात् एकमेकांबद्दल राग, द्वेष किंवा मत्सर अजिबात नव्हता. उलट, आपण आपल्या नात्याला आऊटग्रो (outgrow) करू शकतो, एकमेकांचा आणि आपल्या स्वप्नांचा आदर करू शकतो आणि ब्रेकअपनंतरही, एकमेकांशी मैत्री टिकवून ठेवू शकतो, याचा त्या दोघांनाच अचंबा वाटला. ते दोघंही आता एकमेकांना करायचे म्हणून दिवसभर कॉल्स किंवा मेसेज करत नव्हते. मनापासून एखादी गोष्ट शेअर करावीशी वाटली, तर एकमेकांना आवर्जून कॉल करून सांगायचे, पण हे सगळं त्यांच्या पालकांना पचवणं अवघड जात होतं. आणि साहजिकच होतं ते! एखाद्या नात्यातून बाहेर पडल्यावर फक्त मित्रमैत्रीण म्हणून कोण कसं राहू शकतं, हे त्यांच्या आकलनापलीकडे होतं. ‘तरी आम्ही आधीच सांगत होतो तुम्हाला, सगळय़ाचा सारासारविचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या,’ असं दोघांनाही कित्येकदा ऐकायला मिळालं. ब्रेकअपसाठी नक्की कोण कारणीभूत होतं आणि कोण तडजोड करायला तयार नव्हतं, हे चारही पालकांनी त्यांना विचारून झालं. पण मिहीर आणि मनालीला कोणालाच दोष द्यायचा नव्हता. मिहिर आणि मनालीचं नातं परत जुळवण्यासाठी त्यांच्या पालकांनी खूप प्रयत्न केले, पण त्या दोघांनाही त्यांच्या नात्याला पुन्हा रोमँटिक दृष्टिकोनातून पाहायचं नव्हतं आणि हळूहळू त्यांच्या आईबाबांनासुद्धा ही गोष्ट अॅयक्सेप्ट करावी लागली.
असं असलं तरी इतर नातेवाईकांना काय सांगणार आणि त्यांना बाहेरून कळलं तर ते काय म्हणतील, या चिंतेने पालकांना ग्रासलं होतं. पण इतरांना या नात्याबद्दल माहिती होतं म्हणून जबरदस्तीने मिहिर आणि मनालीने त्यांचं नातं टिकवून ठेवणं हे आईबाबांनाही पटत नव्हतं. मग त्यांनीही विचार केला – लोक फारफार तर काय दोन-चार दिवस बोलतील आणि नंतर विसरून जातील. परंतु मिहिर आणि मनालीला इतरांना बरं वाटावं म्हणून किती दिवस किंवा र्वष असं नात्याचं सोंग करता येईल? आणि त्यांना सोंग केलंच, तरी त्यांना त्यांचं आयुष्य मनासारखं जगता येणार नाही आणि इतरांसाठी सतत तडजोड करून आपण आपली आयुष्यं जगलो की! पण आता असं वाटतंय की काही निर्णय आपण स्वत:साठी घ्यायला हवे होते. आपलेही काही निर्णय चुकले, तर काही बरोबर होते. आपलीही सगळीच नाती परफेक्ट होती, असं नाही. कदाचित आपल्या वेळेस, ब्रेकअप किंवा डिव्होर्स म्हणजे काहीतरी महाभयंकर प्रकरण आहे असं आपल्यावर बिंबवलं गेलं आणि त्यामुळे आपण त्याचा केवळ भीतीयुक्तच विचार केला. पण विभक्त होण्याच्या सामंजस्याने घेतलेल्या निर्णयामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहणार असेल, तर त्यात वावगं काय आहे, नाही का?
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mind vibrations after breakup relationship relationships family relation customized gifts surprise job amy

Next Story
क्लिक पॉईंट: महाराष्ट्राचा सुपरस्टार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी