सुट्टी मिळाली की फिरायला कोणाला नाही आवडत? मग ते कोणत्याही पिढीतले असोत वा कोणत्याही वयाचे… भटकंती हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय. त्यांची आवडती डेस्टिनेशन्स बदलत जातात, प्राधान्यक्रम बदलत जातात, भटकंती मात्र सुरूच राहते. पूर्वी ठरलेली काही ठिकाणं ही सगळ्यांना आवडणारी असायची. ठरावीक टुरिस्ट स्पॉट्सपर्यंत पोहोचता यायचं, ठरावीक ठिकाणी राहायची सोय व्हायची आणि त्यामुळे सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेल्याच ठिकाणी खासकरून लोक जायचे. मात्र, जसजशी ऑफबीट डेस्टिनेशन्स लोकांनी शोधून काढायला आणि एक्सप्लोर करायला सुरुवात केली, तशी त्या डेस्टिनेशन्समधली शांतता, सौंदर्य आणि वेगळेपण लोकांच्या लक्षात यायला लागलं. मग ही ऑफबीट डेस्टिनेशन्स शांत असतील, ॲडव्हेंचर देणारी असतील किंवा निसर्गाच्या जवळ नेणारी असतील.

मिलेनियल्स आणि जेन झीने अशी हटके डेस्टिनेशन्स शोधण्याचा जणू सपाटाच लावला आहे. सगळ्याच बाबतीत सरधोपट मार्गाला चॅलेंज करणार्‍या या पिढ्या ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत तरी मागे कशा राहतील! प्रत्येक ट्रिपला काही तरी अर्थ असला पाहिजे, उगीच सुट्टी घ्यायची म्हणून कुठे तरी जायचं नाही तर आपल्याला तिथं का जावंसं वाटतंय हे पाहून मग डेस्टिनेशन ठरवायचं अशा विचारांनी ही मुलं ट्रिप प्लॅन करतात. आपल्या आवडीनिवडी सगळ्यात महत्त्वाच्या ठेवून बाकी कम्फर्ट, कन्विनियन्स, अशा सगळ्या गोष्टींना दुय्यम महत्त्व देतात.

प्रत्येक ट्रिप ही एक्सपिरिएन्शिअल असावी अर्थातच काही तरी वेगळा अनुभव देणारी असावी, असं त्यांना वाटतं. ‘स्कायस्कॅनर’च्या सर्व्हेनुसार ९३ टक्के जेन झी ट्रॅव्हलर्स हे मेंटल वेल-बीइंगसाठी भटकंती करतात, प्रवास करतात. सतत फास्ट होत जाणार्‍या जगात, रोजच्या नवनवीन प्रोफेशनल आणि पर्सनल अडचणींना तोंड देताना निदान ट्रिपमध्ये तरी कोणतीही घाई नको, अनेक टुरिस्ट स्पॉट्स बघून पूर्ण करायचं प्रेशर नको, उगीच धावपळ नको म्हणून ही तरुणाई स्वत:च्या ‘पेस’ने ट्रिप प्लॅन करते. ज्या गोष्टींचा अनुभव मनापासून घ्यायचा आहे, अशा ॲक्टिव्हिटीज, असे टुरिस्ट स्पॉट्स, अशी ठिकाणं निवडते. यालाच ‘माइंडफुल ट्रॅव्हलिंग’ म्हणतात.

या माइंडफुल ट्रॅव्हलिंगमध्ये शक्यतो टुरिस्ट कंपन्यांकडून टूर बुक करणं टाळलं जातं. पर्सनलाइज्ड ट्रॅव्हल प्लॅन्स बनवले जातात. अनेकदा तर ट्रिप्स स्वत:च प्लॅन केल्या जातात. कपल टुर्स किंवा अगदी छोट्या ग्रुप्समध्ये प्लॅनिंग करतानाही प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा शक्य तितका विचार केला जातो. योग टुरिझम ही या दोन्ही जनरेशन्समध्ये खूप लोकप्रिय असलेली संकल्पना आहे. काही दिवसांची योगा रीट्रीट किंवा वीकएंड योगा रीट्रीट यालाही तरुणाईची पसंती मिळते.

सगळेच एक्स्पर्ट नसले तरी योग केल्याने मनाला शांतता मिळते हे त्यांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घालवण्यासाठी योगा रीट्रीट हा अनेकांना उत्तम पर्याय वाटतो. शारीरिक योगपेक्षा प्राणायाम, एकाग्रता आणि त्यातून मन:शांती अशा उद्देशाला अधिक प्राधान्य दिलं जातं. मन:शांतीसाठी निसर्गाच्या जवळ जाणार्‍या ट्रिप्स यासुद्धा तरुणाईला आवडतात. पाण्याचा खळखळता आवाज, चांदण्यांची शांतता, झाडांची हिरवाई या सगळ्या रॉ वाटणार्‍या अनुभवाला आपल्या मनात जमा करून ठेवायला या जनरेशनला आवडतं. त्यातून मिळणारा फ्रेशनेस त्यांना पुढचा खूप काळ पुरतो.

याच माइंडफुल ट्रॅव्हलिंगचं असंच एक अजून आकर्षण म्हणजे तीर्थस्थानं! ऐकायला खोटं वाटेल, पण मिलेनियल्स आणि जेन झीचं आवर्जून तीर्थक्षेत्र, नवी-जुनी देवळं अशा ठिकाणांना भेट देण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. गेल्याच वर्षीच्या महाकुंभमध्ये पूर्ण पन्नास टक्के ट्रॅव्हलर्स हे वयाच्या तिशीच्या आतले होते. त्यातलेसुद्धा २६ टक्के जेन झी होते. उज्जैन, केदारनाथ, काशी, वाराणसी, अयोध्या, हृषीकेश, हरिद्वार अशा ठिकाणी तरुणाईने जाण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

अगदी अवघड असणारे तुंगनाथ, केदारकंठ असे ट्रेकसुद्धा तरुणाई उत्साहाने आणि केवळ स्पिरिच्युअल अनुभवासाठी करते आहे. या सगळ्या ठिकाणी केवळ तरुणाई फिरायलाच जात नाही तर तिथल्या प्रथाही पाळते, परंपराही जपते आणि तिथल्या नियमांचा आदरही करते. नवी-जुनी अनेक देवळं आणि मंदिरं, अनेक ऐतिहासिक वारसा जपणार्‍या ठिकाणांमध्ये अगदी मनापासून रस घेणारी ही पिढी आहे.

या मिलेनियल्स आणि जेन झीच्या हटके आणि माइंडफुल ट्रॅव्हलिंगमुळे त्यांच्या मनातली विचारांची गर्दी मोकळी व्हायला, नव्याने कामाचा उत्साह यायला आणि आपल्याला मनापासून हवे असलेले अनुभव साठवायला मदत होते, हे नक्की!

viva@expressindia.com