किरण बेदी यांच्यापासून स्फूर्ती घेऊन पोलिस अधिकारी बनलेल्या मीरा बोरवणकर या आता इतर अनेक तरुणींचे प्रेरणास्थान बनल्या आहेत. गेल्या बुधवारी झालेल्या व्हिवा लाउंजमध्ये त्यांची एक झलक पाहण्यासाठी उसळलेली गर्दी, हेच सांगत होती. लाऊंज प्रथमच पुण्यात झाला. कारागृह विभागाच्या प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याशी संवाद साधायला तरुणाईने अक्षरश: तुडुंब गर्दी केली होती. ‘लोकसत्ता’च्या अरुंधती जोशी आणि रसिका मुळ्ये यांनी मीरा बोरवणकर यांना बोलतं केलं. पंजाबमधल्या फजिल्का गावापासूनचा मीरा चढ्ढा-बोरवणकर यांचा प्रवास त्यांच्याच तोंडून ऐकताना या तडफदार व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी ओळख झाली.

स्वत:ला कमजोर समजू नका
मुलींनी स्वत:कडे पाहण्याचा, स्वत:ला कमजोर समजण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. शहरातल्या मुलींवर होणारे अत्याचार उघड होतात. पण ग्रामीण भागातही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, खरं आहे. ते थांबवण्यासाठी सर्वानीच एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्र पोलीसही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेकडे गांभीर्याने बघतात आणि हे प्रकार थांबण्यासाठी सर्व थरांतून प्रयत्न सुरू आहेत. मुलींना अधिक चांगले शिक्षण मिळेल, याकडेही अधिक जागरूकतेने लक्ष देण्याची गरज आहे.

‘जेंडर इज नॉट मटेरिअल, लिडरशिप मॅटर्स’
मला सर्व अधिकारी हे खूप चांगले भेटले. मात्र, तरीही ‘स्त्री’ म्हणून काही वेगळे अनुभव मलाही आले. मी नाशिकला असताना अधिकारी रात्री जुगार अड्डय़ांवर धाड टाकायला जायचे. मात्र, त्यावेळी मला बरोबर नेलं जायचं नाही. मी विचारल्यावर ‘महिला अधिकाऱ्याला जुगार अड्डय़ावर कसं न्यायचं?’ असा प्रश्न विचारला गेला. मी मुंबईत झोन ४ मध्ये पोस्टिंगवर असताना कामाठीपुऱ्यात दंगल झाली होती. खूप तणावाची परिस्थिती होती. सर्व विभागांच्या पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत संदेश गेला. मी दंगलीच्या ठिकाणी पोचले तेव्हा ‘एवढे पुरुष अधिकारी असून तुला पाठवलं?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यामध्ये अर्थात कमी लेखण्याची भावना नव्हती, काळजीची होती. त्यानंतर त्या परिमंडळाच्या उपायुक्तांना याबाबत विचारलं गेलं. पण तिथवर पोचण्यासाठी जागाच सापडली नाही, असं त्या सहा फूट उंच, धिप्पाड अशा अधिकाऱ्याचं उत्तर होतं. एक स्त्री पोचू शकते आणि तो अधिकारी नाही, असं शक्यच नव्हतं. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. या सगळ्या अनुभवांमधून एक विचार पक्का झाला – ‘जेंडर इज नॉट मटेरिअल, लिडरशिप मॅटर्स!’

मीरा तू परत जा!
लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी कधी माझ्याबद्दल नकारात्मक भूमिका ठेवली नव्हती. ‘तू मुलगी आहेस’, असं म्हणून सतत जाणवून दिल्या जाणाऱ्या मर्यादा त्यांनी मला सांगितल्या नाहीत. असं असूनही माझ्या पोलीस दलात जाण्याला वडिलांचा विरोध होता. साधारणपणे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या मुलींना घरून जो दबाव असतो तो मला आणि माझ्या बहिणीलाही होता. पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास झाली नाहीस तर लग्न करून टाकू, असा हा दबाव होता. सुदैवानं माझी बहीण आणि मीदेखील पहिल्याच फटक्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास झालो. माझी बहीण आयकर खात्यात आयुक्त पदावर आहे. १९८१च्या बॅचमध्ये मी आयपीएस सेवेत निवडली गेले. ‘इंडियन ऑडिट अँड अकाऊंटस्’ खात्यातली तुलनेने ‘सेफ’ समजली जाणारी नोकरी सोडून मी आयपीएस सेवेत दाखल झाले होते. माझ्याबरोबर तब्बल ६८ मुलं निवडली गेली होती, आणि मी एकटी मुलगी. या सगळ्या मुलांचा एकच धोशा असायचा- ‘मीरा तू परत जा’ असा सल्ला देत राहणं! पण मी परत गेले नाही.

शारीरिक, मानसिक फिटनेस आणि..
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पाश्र्वभूमीवर मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, अशी संकल्पना रुजते आहे. ती योग्यही आहे. अनेकदा मला असा प्रश्न विचारला जातो की, एकटय़ा मुलीने जरी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतलं तरी प्रत्यक्ष तसा प्रसंग आल्यावर चार- पाच मुलांपुढे तिचा काय निभाव लागणार? प्रश्न गंभीर आहे. एकटय़ा मुलाचा तरी चार- पाच जणांसामोर कसा निभाव लागू शकतो? दिल्लीतल्या घटनेतही त्या मुलीचा मित्र होताच की तिच्यासोबत. पण म्हणून स्वसंरक्षणाचे धडे घेण्याचा काहीच फायदा नाही असं मात्र मला मुळीच वाटत नाही. येणाऱ्या प्रसंगाला शारीरिक आणि मानसिकदृष्टीनं खंबीरपणे तोंड देण्यासाठी प्रत्येकाची तयारी हवी. ही तयारी तीन गोष्टींवर अवलंबून असते. शारीरिक ‘फिटनेस’, मानसिकदृष्टय़ा कायम सतर्क असणं, आणि घडणाऱ्या गोष्टीला क्षणात प्रतिसाद देऊ शकणं. एकटी मुलगी काय करेल, या एकाच प्रश्नाचा विचार करत न बसता आपली ही तयारी कशी होईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आम्ही कुणी वेगळ्या नसतो!..
महिला पोलीस म्हणजे ती बाकीच्या महिलांपेक्षा कुणी वेगळीच असणार असा समज असतो. आम्हाला असं वेगळं समजू नका. आम्ही इतर महिलांसारख्याच असतो. मी सुरुवातीपासूनच धाडसी होते असं नाही. पण लहानपणी मी घोडेस्वारी करायचे. रायफल चालवायला शिकले होते. आमच्याकडे व्हेस्पा आणि लँब्रेटा गाडय़ा होत्या. त्या मी चालवायचे. पण बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा खेळही मी पुष्कळदा खेळले आहे. मलादेखील चित्रपट पाहायला आवडतात. पण चित्रपट पाहायचा की नाही, हे मी रेटिंगवरून ठरवते. वर्तमानपत्रात एखाद्या चित्रपटाला तीनपेक्षा जास्त ‘स्टार्स’ दिले असतील तरच मी तो पाहते! आयुष्य एंजॉय केलंच पाहिजे. चित्रपटांमधील पोलिसांच्या प्रतिमेबद्दल विचारलं जातं. पण एकच सांगेन ‘सिंघम’ डोक्यात गेला, तर त्यातला ‘माणूस’ चुकतो!

देअर इज नो रिअ‍ॅलिटी ओन्ली परसेप्शन
माझं एक आवडतं वाक्य आहे. ‘देअर इझ नो रिअ‍ॅलिटी, देअर इझ ओन्ली परसेप्शन’. एकच गोष्ट मला जशी दिसते तशीच ती तुम्हाला दिसेल असं नाही. तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून ती बघताय यावर ते अवलंबून आहे. तुम्हाला ती माझ्यापेक्षा वेगळी दिसू शकेल आणि आपण सगळे बरोबर असू शकतो. हे लक्षात घ्यायला हवं. पण अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार या गोष्टी असह्य़ म्हणूनच गणल्या जाव्यात. मात्र व्यक्ती म्हणून एकमेकांच्या मताबद्दल आणि विचारांबद्दल सहनशक्ती हवीच.

टीका करणं सोपं, पण..
माझ्या तरुण मुलाचा आवडता छंद म्हणजे शासनावर टीका करत राहणं! आजच्या बहुतेक तरुण मुलांचा हाच छंद असतो! ‘पोलीस काहीच काम करत नाहीत,’ असं म्हणणं खूप सोपं आहे. पोलीसांनी काम करूनही त्यांच्या कामाचं कधीच चीज होत नाही. मात्र पोलीसातही चांगले लोक आहेत आणि ते कामही करत आहेत. पोलीसांबद्दलचा जनतेचा हा सरळधोपट समज बदलावा, पोलीस नक्की काय काय करतात याची माहिती मुलांना मिळावी यासाठी ‘पुणे पोलीस विद्यार्थी अभियाना’ला सुरुवात केली. पोलीस शिपायाचं जगणं या मुलांनी जवळून बघावं ही माझी इच्छा होती. पोलिसांची संख्या, त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांमध्ये वाढ व्हायला हवी, असं मला मनापासून वाटतं. मात्र त्यासाठी आपल्यालाच जास्त कर द्यावा लागेल, त्यासाठी आपली तयारी आहे का?

नोकरी आणि घर दोन्ही सांभाळणं शक्य
पोलीस सेवेतली नोकरी आणि घर या दोन्ही गोष्टी एकदम सांभाळणं शक्य आहे. अर्थात या सगळ्यात थोडी तडजोड करावीच लागते. माझे यजमानही प्रशासकीय सेवेत होते. त्यामुळे अनेकदा त्यांचं पोस्टिंग पुण्याला तर माझं पोस्टिंग साताऱ्याला अशा पद्धतीनं आमची कामाची ठिकाणं वेगवेगळी असायची. पण मुलांना योग्य शिक्षण मिळावं असा प्रत्येक जोडप्याचा दृष्टिकोन असल्यामुळे त्यासाठी तडजोडही शक्य होते. पण माझ्या यजमानांनी आणि घरातल्या इतर मंडळींनीही मुलांना वाढवताना मला खूप मदत केली.

मुलींचा हात स्टेडी
ट्रेनिंगच्या काळात मी रायफल शूटिंगमध्ये नेहमी सगळ्यांच्या पुढे असे. मला रायफल शूटिंगमध्ये विसाहून जास्त मार्क मिळालेले पाहून एकदा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या उस्तादांना माझी पुन्हा परीक्षा घ्यायला सांगितलं होतं. उस्तादांनी पुन्हा परीक्षा घ्यायला नकार तर दिलाच पण ते म्हणाले, ‘‘लेडीज का हाथ नॅचरली स्ट्राँग और स्टेडी होता हैं’’ ते उत्तर प्रेरणादायी होतं. समाज नेहमी महिलांच्या शारीरिक कमजोरीबद्दल बोलतो, पण महिलांना खरोखरच बळकट आणि स्थिर हातांची नैसर्गिक देणगी असते. या देणगीबाबत मुलांनी आकस बाळगू नये.

कुटुंबात संवाद हवा
जळगावचं वासनाकांड खूप गाजलं. अनेकांना त्या प्रकाराने धक्का बसला. जळगावच्या एका महाविद्यालयामध्ये राजकीय प्राबल्य असणारी काही मुलं होती. चुकीचा उद्देश ठेवूनच त्यांनी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. मुलींवर अत्याचार होत होते, तेव्हा सुरुवातीला मुली बोलण्यासाठी पुढेच आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतच राहिले. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की, त्याच्या तपासासाठी विशेष पथक, स्वतंत्र कोर्ट नेमण्यात आले. हे प्रकरण अंतिम टप्प्यामध्ये नेण्यापर्यंत सगळ्या टीमचं यश आहे, माझ्या एकटीचं नाही. मात्र या प्रकरणामुळे दोन गोष्टी लक्षात आल्या. अत्याचार होत असेल, तरी मुली तो घाबरून सहन करतात. अशा प्रकरणांमध्ये मुलींनी पुढाकार घेतल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही. मुलींनी पुढे येऊन बोलायला हवं. मात्र मुलींना घरून त्यासाठी पूरक वातावरण मिळत नाही. मुलं आणि पालकांमध्ये तितका निकोप संवाद नाही. हा संवाद कमी होण्यामागे नेमकं काय कारण आहे, हा सामाजिक बदलांचा परिणाम आहे का, हे नक्की सांगता येणार नाही. प्रत्येक कुटुंबागणिक परिस्थिती वेगळी असू शकेल. मात्र, संवाद वाढायला हवा हे नक्की. संवाद कमी झाला आहे, या प्रश्नावर माझा मुलगा असता, तर त्याने मलाच दोष दिला असता.. हेही खरं. मात्र, मुलींच्या अंगी धैर्य येण्यामध्ये कुटुंबाचा मोठा वाटा आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’साठी विश्लेषणाची सवय करा
राज्यसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी विश्लेषणाची सवय करायला हवी. तारखा, सनावळ्या पाठ करून, मजकुराचे रट्टे मारून हे होणारे नाही. समस्येवर, प्रश्नावर किंवा परिस्थितीवर स्वत:चा विचार करता आला पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे. त्यासाठी आपापसात चर्चा करा. वर्तमानपत्रं वाचताना बातम्या वाचाच, पण प्रामुख्याने संपादकीय वाचा, त्याची सवय लावा. कोणत्याही स्पर्धेत किंवा परीक्षेत प्रत्येकजण पहिलाच येणार नाही. मात्र पहिलं येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि जे कराल, ते उत्तम करा. काही ठरावीक कालावधीमध्ये परीक्षा पास करण्याचा दबाव असल्याचे उमेदवारांकडून सांगितलं जातं. मात्र, आपली मुलं काय करू शकतात, हे सगळ्या आई-वडिलांना कळत असतं. त्यामुळे अभ्यासाच्या नावाखाली दुसरं काही सुरू असेल, तर विरोध होणारच. प्रामाणिकपणे मेहनत कराल, तर यश कसं मिळवायचं, असा प्रश्नच पडणार नाही.

तरुणांचा दबावगट असावा
समाजाची सहनशक्ती कमी होते आहे का, असा प्रश्न विचारला जातो. पण माझ्या मते ही सहनशक्ती कमीच व्हायला हवी. आपण भारतीय फार सहन करतो; आणि गप्पही राहतो. आपल्याला ती सवयच लागली आहे. टीका जरूर करा, पण नुसतीच टीका नको, ‘कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम’ हवं. मी पोलीस अधिकारी म्हणून एखाद्या गोष्टीत कमी पडले तर मला त्याबद्दल विचारलं गेलंच पाहिजे. माझ्याकडे त्या गोष्टीचं उत्तरदायित्व असलंच पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये फक्त चांगले लोकच असतात असं नाही, नागरिक जसे चांगले, वाईट, बरे असतात, तसंच अधिकाऱ्यांचंही आहे. मात्र, यंत्रणेला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आपला दबाव गट असला पाहिजे. विशेषत: तरुणांचा दबाव गट असावा.

राजकीय दबाव
आमदार-खासदाराचा फोन आल्यावर पोलीस अधिकारीही फिरतात, नमतं घेतात असा आरोप होतो. एखादी गोष्ट करताना अशा प्रकारची दुविधा असेल तर आयत्या वेळी कोणती भूमिका घेतली जाईल हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. राजकारण्यांचा दबाव मानणारे काहीजण असतीलही. पण राजकारणीही हुशार असतात. प्रशासनातल्या कोणत्या व्यक्तीवर दबाव टाकून चालेल हे तेदेखील चांगले ओळखून असतात. आम्हा पोलीस अधिकाऱ्यांनाही असा दबावांचा सामना कसा करायचा हे प्रशिक्षणादरम्यान शिकवलं जातं. पण महिला अधिकारी असल्याचा एक फायदा असा की, महिला अधिकाऱ्यांपासून राजकारणी शक्यतो दूरच राहतात, असा माझा अनुभव आहे.

टेक्नॉलॉजी फ्रेंडली व्हायला हवं
एक वर्ष मला अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीमध्ये इंटरपोलबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तिकडचे पोलीस प्रचंड काम करतात असा आपल्याकडे समज असतो. ते आठवडय़ाचे मोजून चाळीस तास काम करतात. कष्ट करण्यात आपले पोलीस मुळीच मागे नाहीत. पण तंत्रज्ञानात ते आपल्या फारच पुढे आहेत. तेव्हाही त्यांच्या प्रत्येक गस्ती वाहनात लॅपटॉप होता. गस्त घालत असताना एखादा संशयित नागरिक आढळला, तर त्याला थांबवून त्याचे नाव आणि जन्मदिनांक विचारला जायचा. त्यावरून त्या माणसाची सर्व महिती अवघ्या मिनिटामध्ये पोलिसांच्या हाती येत होती. सगळे काम इंटरनेट आणि संज्ञापनाच्या इतर प्रगत माध्यमांद्वारे चालत असे. आपल्याकडे आज २०१३ मध्येही ही परिस्थिती नाही. शासनानं ‘टेक्नॉलॉजी फ्रेंडली’ व्हायला हवं हे खरं आहे. आपल्याकडे नवी पिढी तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे आहे. त्यासाठी त्यांची मदत घ्यायला हरकत नाही. आम्ही महाविद्यालयांच्या मुलांची मदत घेतोही यानिमित्ताने पोलीस आणि नागरिक एकत्रही येऊ शकतात. वेबसाइटच्या कामात आम्हाला पुण्याच्या महाविद्यालयीन मुलांनी खूप मदत केली आहे.

प्रशासन-नागरिक संवाद वाढायला हवा
प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद वाढला पहिजे. मी जेव्हा साताऱ्याला पोलीस अधीक्षक होते तेव्हा महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी पोलिसांनी आपापल्या भागातील महिलांना चहासाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलवायचं ठरलं. त्या वेळी फौजदाराने पोलीस ठाण्यात का बोलावलं, असे विचारणारे खूप फोन आले. त्या वेळी फक्त चहासाठी बोलावलं आहे हे सांगूनही अनेकींना पटलं नाही. आम्ही संवाद वाढवण्यासाठी पुढाकार घेत होतो. पण त्याला नागरिकांकडून, विशेषत: महिलांकडून प्रतिसाद आला नाही. पोलीस घरी आले तर ते युनिफॉर्ममध्ये नकोत असं नागरिकांच म्हणणं असतं. हे टॅबू जाण्यासाठी पोलीस आणि नागरिकांना एकत्र आणणारे उपक्रम जाणीवपूर्वक झाले पाहिजेत. सध्या कारागृह विभागातही आम्ही असे उपक्रम करत आहोत.

दाभोलकर हत्येच्या तपासात पोलीस कमी पडले नाहीत
पुण्यात झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन महिने झाले. या हत्येच्या तपासाबद्दल पोलीस काय करत आहेत, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण विश्वास ठेवा, पोलीस या हत्येच्या तपासात कुठेही कमी पडत नाहीयेत. या हत्येच्या तपासात पोलीस अधिकारी, कर्मचारी अक्षरश: न जेवता, न झोपता काम करत आहेत. ही हत्या खूप योजनाबद्ध पद्धतीनं घडवून आणली आहे. अशा प्रकरणांच्या तपासाला वेळ लागतो. पुण्याचं गुन्हे खातं देशातील सर्वोत्तम गुन्हे खात्यांपैकी आहे. त्यांना वेळ द्या.

कसाबची फाशी आणि गुप्ततेची शपथ
कसाबला पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देणार असल्याबद्दल प्रयत्नपूर्वक कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अर्थात या विषयाशी थेट संबंध असणाऱ्या शासकीय कार्यालयांनाच त्याची माहिती होती. येरवडा कारागृहातले अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गृहखाते, परराष्ट्र विभाग, पाकिस्तानातील भारतीय दूतावास या कार्यालयांना ही गोष्ट आधी माहीत असणं प्राप्तच होतं. पण हा विषय खूपच संवेदनशील होता. पुण्यात असं काही केलं जाणार आहे याबद्दल आम्ही आमच्या घरच्यांनाही कळू देणार नाही, अशी शपथ आम्ही घेतली होती.

मी अधिकारी आहे, मला सेलेब्रिटी करू नका
त्यांची एक झलक मिळावी.. नुसतं बघता यावं, यासाठी श्वास रोखून असलेली तरुणाई.. हे वर्णन एखाद्या सिनेतारकेला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या तरुणाईचं नाही. एका पोलीस अधिकाऱ्यासाठी जमलेल्या गर्दीचं आहे. पुण्याच्या माजी आयुक्त, धडाडीच्या पोलीस अधिकारी म्हणून ज्ञात असणाऱ्या राज्याच्या कारागृह विभागाच्या प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी पुण्यातील तरुणाईने गर्दी केली होती. ‘व्हिवा लाऊंज’मध्ये संवाद साधण्यासाठी बोरवणकर यांनी सभागृहात प्रवेश केला अन् टाळय़ा आणि आरोळय़ांच्या गजरात सभागृह अक्षरश: दुमदुमून गेलं. बोरवणकर यांनी बोलायला सुरुवात केली आणि मोबाईल फोनच्या फ्लॅशचा चकमकाट सुरू झाला. मोबाईलवर ते प्रेरणादायी शब्द रेकॉर्ड करण्यासाठी सगळे सरसावले. गर्दीमुळे अनेकांना बसायला जागाही मिळाली नाही. काहीजणांना व्यासपीठावर, खुच्र्याच्या मधल्या मोकळ्या जागेत तर काही जणांना उभ्यानेच कार्यक्रम पाहावा लागला. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबरोबरच त्यांच्यातली एक सक्षम स्त्री जाणून घेण्याची सर्वाच्यात उत्सुकता दिसली. कार्यक्रमानंतरही स्वाक्षरी मागण्यासाठी धावलेल्या तरुणींना शांत करत ‘मी अधिकारी आहे. मला सेलेब्रिटी करू नका,’ असं उत्तर बोरवणकर यांनी दिलं. वाक्यावाक्याला वाढत गेलेल्या टाळ्यांनी प्रत्येकाच्या मनातला बोरवणकर मॅडमबद्दलचा आदर दुणावल्याचीच साक्ष दिली.