अश्विनी खांडेकर
नवीन फोन घेतला की आपण जुन्या फोनमधले कॉन्टॅक्ट्स सहज ट्रान्सफर करतो. हजारो नंबर असतात. त्यातले अनेक वर्षानुवर्षे वापरात नसतात. कधीकधी वाटतं, ‘हे सगळे डिलीट करूया’… पण, खरंच ते फक्त नंबर असतात का?
आपल्या करिअरमध्ये आपण अनुभव कमावतो, कौशल्यं कमावतो, पगार मिळवतो, पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट नकळत कमावत असतो ती म्हणजे माणसं. ही माणसं म्हणजेच आपलं नेटवर्क. ‘नेटवर्किंग’ हा शब्द सध्या प्रचलित आहे. काहीजणांच्या मते नेटवर्किंग म्हणजे व्हिजिटिंग कार्ड्स गोळा करणं, LinkedIn वर हजारो कनेक्शन्स असणं किंवा प्रत्येक कार्यक्रमात जाऊन ओळखी वाढवणं, पण खरं नेटवर्किंग यापेक्षा वेगळं असतं.
माझ्या करिअरमध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले आहेत, जेव्हा एखाद्या समस्येचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. अशा वेळी मी माझ्या जुन्या बॉसशी, एखाद्या माजी सहकाऱ्याशी बोलले किंवा अनेक वर्षांपूर्वी एखाद्या परिषदेत भेटलेल्या व्यक्तीची मदत घेतली. प्रत्येक वेळी उत्तर मिळालंच असं नाही, पण योग्य दिशा, योग्य व्यक्ती किंवा योग्य सल्ला नक्की मिळाला. त्यामुळे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आपण जपलेले संबंध भविष्यातही उपयोगी पडतात.
आजच्या काळात नोकऱ्या बदलणं सामान्य झालं आहे. अनेक जण बिझनेस-इंडस्ट्री बदलतात, त्यांचे रोल्स बदलतात, अगदी देशही बदलतात. प्रत्येक वेळी नव्याने सुरुवात करावी लागते. नवीन लोक, नवीन क्षेत्रं, नवीन आव्हानं… अशा वेळी अनेकदा आपल्याकडे असलेली माणसंच आपली सर्वात मोठी ताकद ठरते. पण, मग ही माणसं जोडायची कशी? आणि जोडली, तरी कोणाला कधी फोन करायचा, हे समजायचं कसं? याचं एकच एक उत्तर नाही. मात्र, काही गोष्टी कायम लक्षात ठेवल्या, तर नेटवर्क तयार होतं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते टिकूनही राहतं.
माझ्या अनुभवातून आलेल्या या गोष्टी म्हणजे नियम नव्हेत, पण वर्षानुवर्षे माणसं जोडताना आणि जपताना त्या मला उपयुक्त ठरल्या.
– लोकांना भेटा, पण त्यांच्याकडून काही मिळवण्यासाठी नाही; त्यांना समजून घेण्यासाठी. ते काय काम करतात, त्यांचा व्यवसाय कसा आहे, त्यांची ताकद काय आहे, हे समजून घ्या. त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून कधी मदत घ्यायची आणि त्यांना कधी मदत करता येईल, याचीही जाणीव होते.
– स्वतःपेक्षा समोरच्या व्यक्तीचं जास्त ऐका. प्रत्येक भेटीत स्वतःची ओळख सांगण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घ्या. चांगला श्रोता असाल तर नातं आपोआप तयार होतं.
– संपर्क तोडू नका. वाढदिवस, नवीन नोकरी, प्रमोशन किंवा एखादं यश, मनापासून केलेलं अभिनंदन नेहमी लक्षात राहतं. तसंच, कठीण प्रसंगी केलेली साधी विचारपूसही नातं अधिक घट्ट करते.
– नातं एकतर्फी असू नये. फक्त मदत मागणारा बनू नका; शक्य असेल तेव्हा मदतीचा हातही पुढे करा. चांगलं नेटवर्क हे नेहमी परस्पर विश्वासावर उभं राहतं.
– प्रत्येक ओळखीतून काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा ठेवू नका. काही माणसं तुम्हाला संधी देतील, काही दिशा दाखवतील, तर काही फक्त आयुष्यभर सोबत राहतील.
नेटवर्किंग म्हणजे फक्त मोठ्या पदावरील लोकांशी ओळख वाढवणं नाही. तुमच्याबरोबर काम करणारा इंटर्न, सहकारी, एखादा फ्रीलान्सर, क्लाएंट किंवा एखाद्या कार्यक्रमात भेटलेली व्यक्ती यापैकी कोण भविष्यात कुठल्या भूमिकेत असेल, हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक भेट ही फक्त ओळख म्हणून न पाहता, एक नातं म्हणून जपणं महत्त्वाचं.
आपण अनेकदा गुंतवणूक, मालमत्ता आणि संपत्ती याबद्दल बोलतो. पण करिअरमधली सर्वात मौल्यवान गुंतवणूक कोणती, असा प्रश्न विचारला तर माणसांमधली गुंतवणूक हेच माझं उत्तर असेल. कारण, पगार वाढतो, पद बदलतं, कंपनी बदलते; पण विश्वासाने जोडलेली माणसं अनेक वर्षं तुमची साथ करतात. नेटवर्क आणि कॉन्टॅक्ट्स म्हणजे वेगळं काही नाही. तुमचे जुने मित्र, जुने सहकारी, जुने बॉस, क्लाएंट्स, एजन्सीतील लोक किंवा आयुष्याच्या प्रवासात भेटलेली माणसं. या नेटवर्कचा उपयोग फक्त नोकरी किंवा व्यवसायापुरता मर्यादित नसतो. कधी एखाद्या विषयावर मार्गदर्शन हवं असतं, कधी वैद्यकीय आणीबाणीत मदत लागते, कधी एखाद्या शहरात ओळखीची व्यक्ती हवी असते, तर कधी एखादी संधी तुमच्यापर्यंत याच माणसांमुळे पोहोचते. म्हणून कॉन्टॅक्ट्स म्हणजे फक्त फोन नंबर किंवा ई-मेल आयडी नसतात. ती खऱ्या अर्थाने माणसं असतात. कधी तुमच्या पाठीशी उभी राहणारी, कधी योग्य व्यक्तीशी तुमची ओळख करून देणारी, तर कधी तुम्हाला योग्य दिशा दाखवणारी. खरं नेटवर्क हे व्यवहारावर उभं राहात नाही; ते विश्वासावरच उभं राहतं!
