नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

माझ्या बाबांचा सर्वात आवडता संगीतकार – सलील चौधरी. माझे बाबा सलील चौधरींचे फॅन असल्यामुळे लहानपणापासून दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सलीलदांच्या गाण्यांची पारायणे असायची. आजही असतात. आपोआप मीसुद्धा फॅन झालोच झालो. आमच्याकडे सर्वात जास्त वाजणारा अल्बम म्हणजे ‘मधुमती’. सगळीच गाणी परत परत, लूपवर ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’.. दीदी..आणि बासरी. ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ मुकेशदांचा निरागस आवाज, ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि माझे सर्वात आवडते ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ काय कमाल गाणे केले आहे! प्रत्येक ओळीच्या शेवटी गिरक्या घेणारा, मुरक्या घेणारा लता दीदींचा कातील आवाज, मधूनच मन्नादांची एंट्री, कोरस, लोकगीताचा बाज आणि भन्नाट संगीत संयोजन.
मला या गोष्टीचे खरेच कुतूहल वाटते, की आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत नेहमीच काळाच्या बरोबर किंबहुना काळाच्या पुढे राहणे सलीलदांना कसे काय जमले असेल? उदाहरणार्थ दीदींनी गायलेली ही कृष्ण-धवल काळातली अजून काही गाणी- ‘जागते रहो’मधले ‘जागो मोहन प्यारे’ हे भरव रागातल्या बंदिशीवर आधारलेले गाणे, ज्यात कोरसचा मस्त वापर केला आहे. सदाबहार ‘ओ सजना बारखा बहार आई..’, माया चित्रपटातले वेड लावणारे ‘जा रे उड जा रे पंछी..’ किंवा रफी साहेबांबरोबरचे ‘तस्वीर तेरी दिल मे’ हे सुंदर युगल-गीत आणि मग थोडय़ा पुढच्या काळातली- ‘आनंद’मधले अंगावर काटा आणणारे ‘ना जिया लागे ना..’, ‘अन्नदाता’मधले ‘रातोंके साए घने’ याची चाल एकदमच वेगळी अशी, नेहमीच्या वृत्तांमध्ये न बसणारी, अज्जिबात ठोकळेबाज नसलेली अशी, आणि अजून पुढे म्हणजे ‘छोटीसी बात’मधले ‘न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ..’ हेसुद्धा असेच, ठोकळ्यात न बसणारे, वेगळ्या वृत्ताचे, पण अजूनच मॉडर्न असे गाणे. यात मागे सतत चालू असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा आलाप लाजवाब. तसेच ‘रजनीगंधा’मधले ‘रजनीगंधा फूल तुम्हारे’ हे गाणे. वेगळीच चाल. एकटय़ा लता दीदींचा आवाज वापरताना एवढे वैविध्य आणि नेहमी असा त्या त्या काळाच्या पुढच्या चाली देण्याचा अट्टहास, हे कसे जमले असेल सलीलदांना? केवळ लता दीदीच नाही तर जुन्या काळातली तलत मेहमूद यांची ‘इतना ना मुझसे यू प्यार बढा’ किंवा ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये..’ असो, ‘माया’मधले द्विजेन मुखर्जी यांच्या आवाजातले ‘ऐ दिल कहा तेरी मंजील..’ असो (त्या मागे टिपिकल सलीलदा स्टाइल लता दीदींचा वेस्टर्न पद्धातीचा आलाप!) किंवा नव्या काळातले येसुदास यांच्या आवाजातले ‘जानेमन जानेमन’ असो, सगळ्या गायकांना सलीलदांनी नावीन्यपूर्ण पद्धतीनेच हाताळले आहे.
‘दिल तडप..’मधले मुकेशदासुद्धा ‘आनंद’मधल्या ‘कही दूर’, ‘मने तेरे लिये’च्या वाटेने ‘रजनीगंधा’मधल्या ‘कई बार यू भी होता है’ गाण्यापर्यंत पोहोचता पोहोचता स्वत: मॉडर्न, आधुनिक होत जाताना दिसतात. मन्ना डे यांच्या तयारीच्या आवाजाचासुद्धा किती वेगवेगळ्या पद्धतीने वापर केलाय! ‘ऐ मेरे प्यारे वतन’- अतिशय आर्त असे देशभक्तिपर गीत.. पण फील अरेबियन! आणि त्यात ‘माँ का दिल बनके कभी..’ची अरेबियन स्टाइलची जागा. वाहवा! ‘दो बीघा जमीन’मधले ‘मौसम बीता जाए’ आणि ‘आनंद’मधले ‘जिंदगी..कैसी ए पहेली हाये’ नक्कीच काळाच्या खूप खूप पुढचे गाणे, ज्यात सिंफनीसारख्या कोरसचा सुंदर वापर आहे. वेगळ्या छंदांमध्ये चाली बांधण्याची खोड मात्र सलीलदांनी अगदी जुन्या काळापासून जपली आहे. ‘माया’ चित्रपटातले रफी साहेबांनी गायलेले ‘सनम तू चल दिया रस्ता..’ हे उडत्या चाल्ीचे गाणे याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच किशोरदांचे ‘कोई होता जिसको अपना’ हेसुद्धा असेच, पहिल्या आणि दुसऱ्या ओळींमध्ये समामिती (सिमेट्री) नसलेले तरीही सुश्राव्य गाणे. चालींमध्ये हे असे प्रयोग आणि संगीत संयोजनात सिंफनीचा सुयोग्य वापर यामुळे सलीलदा हे नेहमीच मॉडर्न राहिले. त्यांचा हा मॉडर्नपणा मला सर्वाधिक भावतो. उद्याच्या ५ तारखेला त्यांचा विसावा स्मृतिदिन होता. सलीलदांच्या आधुनिकतेला सलाम!

हे ऐकाच..

बंगाली मातीची जादू

बंगालच्या मातीमध्ये काय जादू आहे काय माहीत? रवींद्रसंगीत, किशोरदा, सचिनदा, राहुलदा, हेमंत कुमारपासून ते बप्पी लाहिरी, कुमार शानू, श्रेया घोशाल, प्रीतमदा आणि अरिजितपर्यंत या मातीने संगीतातले एक से एक हिरे आपल्याला दिले आहेत. अशा समृद्ध बंगालची गाणी मी असेच उगाच कधी कधी ऐकत असतो. त्यातून ती सलीलदांची असतील तर मजाच और. विशेष म्हणजे सलीलदांच्या काही बंगाली गीतांमध्ये िहदी गाण्यांची झलक दिसते खरी, (जसे आमाय प्रश्न करे- कही दूर जब; ओगो और किछू तो नाय- तस्वीर तेरी दिल मे) पण खूपशा चाली अशा आहेत की, िहदीत त्या ऐकू आल्या नाहीत. सलीलदांनी संगीतबद्ध केलेली अनेक मल्याळी भाषेतील गाणीसुद्धा आहेत. त्या चाली ऐकल्यावर तर मला वाटले हे कोणी तरी दुसरेच सलील चौधरी आहेत. पण नंतर कळले की हे तेच! केवढे हे वैविध्य! ही गाणी नक्की मिळवून ऐका.
viva.loksatta@gmail.com