श्रुती कदम

लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण अगदी आतुरतेने प्रतीक्षेत असलेल्या या मान्सूनची फॅशनही तितकीच ट्रेण्डी आणि कूल पाहिजे म्हणूनच ‘मान्सून’ची चाहूल लागली की, तरुणाई धडाक्यात शॉपिंगला सुरुवात करते. एकटयादुकट्याची नव्हे, तर सगळा ग्रुपच किंवा कुटुंब फॅशनेबल लूक मिळवण्यासाठी शॉपिंगपासून तयारीला सुरुवात करतो. आणि मग अगदी पावसाळ्यात हव्याच असणाऱ्या छत्र्यांपासून ते अगदी पायातील चपलांपर्यंत. एवढंच काय तर अगदी आपल्या मोबाइल कव्हरचीही वेगळी शॉपिंग केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची शॉपिंग म्हणजे कपड्यांची!

वातावरणातील ताजेपणा नव्याने अनुभवण्याचा ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे कपडेसुद्धा या ऋतूला साजेसे असे फ्रेश आणि कम्फर्टेबल हवेत. जीन्स, मॅक्सी स्कर्ट, घोळदार पायजमे, प्लाझो, ट्राऊझर्स यांना आता कपाटात ठेवून देण्याची आणि आपल्या खास मान्सून कलेक्शनमध्ये वन पीस, शॉर्ट पॅण्ट, मिनी ड्रेस, डंगरी, स्कर्ट अशा प्रकारच्या कपडयांना अधिक पसंती देण्याची हीच ती वेळ आहे.

मान्सूनमध्ये हटके दिसायचे असेल तर इंद्रधनुष्याच्या रंगांप्रमाणे कपड्यांची निवड केली पाहिजे. कलरफुल आणि आरामदायी असे कपडे घालावेत, परंतु पावसाळ्यात सफेद रंगाचे वा अगदी पेस्टल रंगाचे प्लेन कपडे घालणे टाळावे, कारण पावसात चिखलामुळे कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता अधिक असते आणि डाग जर गेला नाही तर पूर्ण कपडे खराब होतात. आणखी महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात जीन्स घालणे टाळले पाहिजे. जीन्स तुम्हाला जरी कम्फर्टेबल वाटत असली तरीही तुम्ही भिजल्यानंतर जीन्स जड होते. त्यामुळे अनकम्फर्टेबल वाटू शकते.

हेही वाचा >>> कानची दुनिया झगमगती

पावसाळ्यात अधिकतर तरुणी छानसा वन पीस घालण्यास प्राधान्य देतात. फ्लोरल प्रिंट असलेला गुडघ्यापर्यंत येणारा वन पीस घालायलादेखील कम्फर्टेबल असतो आणि बघायलादेखील सुंदर वाटतो. शिफॉन, जॉर्जेट किंवा कॉटनच्या वन पीसना तरुणींकडून अधिक पसंती मिळते आहे. महाविद्यालयात किंवा बाहेर फिरायला जाताना लाईट रंगाचे वन पीस अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात.

शॉर्ट स्कर्ट्सची फॅशन मध्यंतरी गायब झाली होती; परंतु यंदा अनेक सेलेब्रिटींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांत असे स्कर्ट्स घातल्यामुळे ही फॅशन पुन्हा आल्याचे दिसून येते आहे. पावसासाठी शॉर्ट स्कर्ट हा सर्वात चांगला पर्याय आहे. शिवाय, ज्यांची शरीररचना बांधेसूद आहे, अशा मुलींना क्रॉप टॉप हा मान्सून फॅशनसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. क्रॉप टॉप हा शॉर्ट्सवर, स्कर्ट्सवर, थ्री-फोर्थ डेनिमवर कशावरही घातला तरी ट्रेण्डी लुक देतो.

पावसाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे याची रोज शोधाशोध करावी लागते. फॅशनेबल आणि कम्फर्ट असणारे कपडे ऑफिसमध्ये घालून जाण्यावर अधिक भर असतो. यासाठी आपण वर्षभर परिधान करता तीच पायघोळ पॅन्ट यासाठी उत्तम आहे, पण ही पॅन्ट घोट्यापर्यंतच लांब असली पाहिजे आणि त्यावर साध्या रंगाच्या टॉपसह फॉर्मल सिल्क शर्ट हा पर्याय आकर्षक ठरतो. सिल्क शर्ट – पॅन्ट आणि जर हातात टोट बॅग असेल तर उत्तम ऑफिस लुक साधता येतो.

पावसाळ्यात शक्यतो लांबलचक कुर्ता वापरणे टाळावे, त्याऐवजी हलकीफुलकी शॉर्ट कुर्ती किंवा ट्युनिक टॉपचा पर्याय निवडता येईल. जर शॉर्ट कुर्ती किंवा ट्युनिक्स आवडत नसतील किंवा ऑफिसला घालण्यासाठी योग्य वाटत नसतील, तर हल्ली कॉटन, लिनन, व्हिस्कोस रेयॉन आणि प्युअर पॉलिस्टरचे ‘शर्ट स्टाइल’ किंवा ‘मँडरिन कॉलर’ कुर्ते मोठ्या प्रमाणावर मिळू लागले आहेत. असे ‘नी लेंग्थ’ किंवा ‘अबॉव्ह नी लेंग्थ’ कुर्ते या दिवसांत ऑफिसला घालण्यासाठी सुटसुटीत ठरू शकतात.

पर्याय म्हणून सोबत स्कार्फ कॅरी करता येऊ शकतो. स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीने बांधून मस्त लुक मिळतो. स्कार्फ गळ्यात टाकून त्याची दोन्ही टोके बेल्टमध्ये टक इन करू शकता. प्लेन ड्रेसेस, टॉप्स, जम्प सूट्स यावर अशा पद्धतीने स्कार्फ घेतल्यास खूप छान दिसेल आणि युनिक लुक मिळेल. किंवा स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून त्याचा एक छान लुक तयार होऊ शकतो. सिम्पल नॉटेड स्कार्फ किंवा टायसारखा स्कार्फसुद्धा छान लुक मिळवून देतात. पावसाळ्यात फॅशनेबल राहताना ट्रेण्ड बरोबर आपल्याला एलिगंट लुक आणि कम्फर्टेबल वाटणेदेखील अत्यंत गरजेचे असते त्यामुळे इतर ऋतूंमध्ये असणारी फॅशन आणि पावसाळ्यातली फॅशन यात बऱ्यापैकी फरक आहे. रंगसंगती आणि टिकाऊ अशीच मान्सून फॅशन तरुणाईला जवळची वाटते, त्यामुळे या फॅशनमध्ये कितीही बदल झाला तरी तरुणाई आपल्याला कम्फर्टेबल असलेल्याच गोष्टी स्वीकारते यात शंका नाही.