पावसाळा जितका घरातून सुंदर, मनाला सुखावणारा वाटतो ना तेवढंच बाहेर पडलो की कंटाळवाणा, थकवणारा आणि वैतागवाणा वाटतो. याचं कारण म्हणजे रोजचा न चुकवता येणारा ऑफिस, कॉलेज आणि इतर कामाच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास. ट्रॅफिक, पाण्याने, चिखलाने भरलेले रस्ते याने अगदी जीव नकोसा होतो. कुठल्याही वाहनाने फिरलं तरी कपडे, केस, अंग भिजायचं ते भिजतंच आणि चिडचिड होतेच! रेनकोटचे वेगवेगळे स्टायलिश प्रकार आलेत, पण फॉर्मल कपड्यांवर रेनकोट म्हणजे अजून अस्वस्थता येते. या सगळ्या चलबिचलीमुळे पावसाचे हे चार महिने रोज पडणारा प्रश्न म्हणजे, ‘धुवांधार पावसात नक्की घालायचं काय?’

फॅशन विश्वात आता अगदी क्रांती वगैरे घडत असली तरी काही गोष्टी ज्या पूर्वापार चालत आल्यात त्या तशाच राहणार आहेत…. लवकर सुकणारे कपडे, अंगाला न चिकटणारे, हलके, आरामदायी आणि सततच्या ओलाव्यात टिकून राहतील असे आणि तरीही स्टायलिश वाटतील, असे कपडे पावसाळ्यासाठी निवडणं फार अवघड आहे. म्हणूनच तर आता ‘स्मार्ट ड्रेसिंग’ ही कल्पना ट्रेंड झाली आहे.

आपण कितीही कपडे घेतले तरी आपल्याला हव्या त्या वेळी हवे ते कपडे आपल्याकडे नसतात. म्हणून कपडे घेताना आपण काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे फॅब्रिक. डेनिम म्हणजेच जीन्सचं कापड, पॉलिस्टर, स्पाँडॅक्स हे फॅब्रिक्स जड आणि अंगाला चिकटणारे असतात. या फॅब्रिकचे कपडे बाहेर घालून गेलात तर तुम्ही फसलात. त्याऐवजी हल्ली व्हिस्कॉस रेयॉन फॅब्रिक खूप प्रचलित आहे. हे रेशमी कापडासारखं सुळसुळीत असतं, पाणी कमी शोषून घेतं, अंगाला थोडं सैलसर बसतं. या फॅब्रिकमधले खूप ट्रेंडी कपडे सध्या बाजारात, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर दिसतायेत.

शॉर्ट पलाझो आणि कुर्ता

रेयॉनच्या कपड्यांचे इतके ट्रेंडी प्रकार सध्या बाजारात आहेत की यातले कपडे तुमच्या कपाटात यंदाच्या पावसाळ्यात असायलाच हवेत. पलाझो आणि कुर्ता हा प्रकार अधिकृतरीत्या ऑफिसच्या कपड्यांमध्ये समाविष्ट झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. मग थोडा बर्मुडा उंचीचा पलाझो आणि त्यावर ए- लाइन कुर्ता हा पेहराव तुमची शरीरयष्टी कशीही असली तर अगदी उठून दिसेल. हल्ली ए – लाइन, ॲबस्ट्रॅक्ट कटचे कुर्ते, शॉर्ट कुर्ते लोकप्रिय झाले आहेत. भारतीय पेहराव म्हणजेच ट्रॅडिशनल कपडे गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात जास्त वापरात आले आहेत. याचे कारण त्यात इंडो-वेस्टर्न प्रकार प्रचलित झाले. यावरच्या प्रट्सिं, रंग, हलकं कॉटन, वेगवेगळ्या बॉटम्सवर घालता येण्याची स्टाइल यामुळे नेहमीच्याच कुत्र्याबरोबर काही वेगळं पेअरिंग केलं तरी ते ट्रेंडी आणि क्लासी दिसतं.

फिट अँड फ्लेअर वन पीस

कमरेपर्यंत फिट आणि खाली गुडघ्यापर्यंत अगदी सुळसुळीत, सैल आणि घेरदार असा फिट अँड फ्लेअर वन पीस सध्या ट्रेंडिंग आहे. घरात, पावसाळी ट्रिपसाठी, साध्या आउटिंगसाठी, भाजी आणायलासुद्धा हा फिट अँड फ्लेअर वनपीस उत्तम पर्याय आहे. कॉटन, रेयॉन या क्विक ड्राय कपड्यांमध्ये हा वन पीस असेल तर ते अधिक सोयीचं ठरतं.

कॉटन ट्राउझर आणि शर्ट

फॉर्मल कपडे पावसाळ्यात घालायचेच नाहीत, असं वाटण्याचं काहीच कारण नाही. कॉटन ट्राउझर हा सध्या खूप ट्रेंडी आणि फॅशनेबल प्रकार आहे. इतकी वर्षं आपल्याकडे हे का नव्हतं? असं वाटेल असा क्लासी प्रकार आहे. अगदी २४ तास अंगावर घालायचं म्हटलं तरी सहजशक्य होईल असं हलकं फॅब्रिक असतं, लूक एकदम फॉर्मल वेलवेट ट्राऊझरसारखा असतो. या ट्राऊझर्स न्यूड, ब्लॅक, ब्लू अशा फॉर्मल रंगांमध्ये सहज मिळतात. हायवेस्ट पँट्सही मिळतात. सांगितल्याशिवाय फॉर्मल आणि कॉटन पँट यातला फरकच कळणार नाही इतकी ही ट्राऊझर परफेक्ट दिसते. मुलं-मुली दोघांच्याही कपड्यांमध्ये डिसेन्ट कॉटन प्रट्सिंचे इतके सुरेख शर्ट्स आले आहेत की पावसाळा सोडून इतर दिवशीसुद्धा आता हेच शर्ट वापरले जातात. पेस्टल, इंग्लिश कलर्स यात ट्रेंडी आहेत जे पावसाळ्यात फ्रेश आणि ऑफिस लुकसाठी परफेक्ट दिसतात.

स्कर्ट्स

हा एकमेव असा प्रकार आहे जो आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीतून येऊनही आपल्या फॅशन विश्वाने फार मनावर घेतलेला नाही. हल्ली आपण करू ती फॅशन असते, त्यामुळे स्कर्ट म्हणजे तो घेरेदारच छान दिसतो किंवा फॉर्मल मिडीसारखाच चांगला दिसतो, असं अजिबात नाही. फिटेड टीशर्टच्या खाली नेमकं काय घालायचं, जीन्स आणि ट्राऊझरचा खरंच कधी कधी कंटाळा येतो, पाय मोकळे ठेवावेसे वाटतात. वन पीसमध्येही तोच तोचपणा वाटायला लागतो. मग अशा वेळी क्युट असा कॉटनचा स्कर्ट असेल तर तो स्कर्ट आणि परफेक्ट फिटिंगचा टीशर्ट स्टाइल करून बघा, तुमचा पावसाळ्यातला युनिक आणि अतिशय कम्फर्टेबल असा पेहराव तयार होईल. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर इतके सुंदर नाजूक डिझाइनचे कॉटनचे स्कर्ट आले आहेत, तेही गुडघ्यापर्यंतच्या उंचीचे असल्याने भिजायचा प्रश्नच नाही. स्कर्टला आतून भरपूर लेयर असल्याने ते घेरदार असले तरी फार वर उडत नाहीत. आतमध्ये सायकलिंग शॉर्ट्स घालून तुम्ही अजून बिन्धास वावरू शकता.

डेनिम बर्मुडा

जेन झींच्या विश्वात वावरताना त्यांच्या पेटंट फॅशनबद्दल न बोलून कसं चालेल? काही लोकांचा डेनिम प्रकार आवडीचा असतो. कितीही वातावरणातले बदल झाले तरी त्यांना डेनिम सोडवत नाही. विशेषत: जेन झी पिढीसाठी डेनिम ही त्यांची ओळख आहे. मग फुल लेन्थ जीन्स किंवा बॅगी जीन्स न घालता ते बर्मुडा जीन्स घालतात जी गुडघ्यापर्यंत असते. यालाही भारतीय टच देण्यासाठी ते शॉर्ट कुर्ती त्यावर स्टाइल करतात. या स्टायलिंगमुळे इंडो-वेस्टर्न लुक मिळतो, व्यक्तिमत्त्वामधलं सामान्यपण निघून एक क्लासिक लुक येतो आणि ट्रेंडी स्टायलिंग करता येते. हा असा लुक कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्हीसाठी परफेक्ट आहे. हल्लीच्या जीन्स आणि बर्मुडासुद्धा कॉटन, इलॅस्टिकमध्ये मिळतात जेणेकरून कॅरी करायला सोपं जातं. बर्मुडा जीन्स आणि शॉर्ट कुर्ता हा पण २ ङ फॅशनचाच भाग आहे. याची आणखी एक गंमत म्हणजे हा चक्क युनिसेक्स लुक आहे, कोणीही घातला तरी अगदी कूल दिसतो.
पावसाळ्यात पूर्वी फक्त मोठाले ढगळे रेनकोट माहिती होते. त्यातही लहान मुलांसाठीच्या रेनकोटमध्ये वेगळे प्रकार आणि रंग असायचे, मोठ्यांसाठी फक्त काळे किंवा फारतर राखाडी रंग असायचे. गेल्या काही वर्षांत फॅशन ब्रँड्स, सोशल मीडिया आणि बदलत्या लाइफस्टाइलमुळे आता पावसाळी फॅशन हा स्वतंत्र ट्रेंड म्हणून विकसित होतो आहे. ढगाळ वातावरणात उठून दिसणारे मस्टर्ड, हळदी यलो, कोरल, फ्युशिया, ब्लू, लाइम ग्रीन, लॅव्हेंडर आणि टर्कॉईज यांसारखे ब्राइट रंग मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहेत. हे रंग केवळ लुक आकर्षक बनवत नाहीत, तर पावसाळ्यातील उदास वातावरणातही सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

पावसाळ्यातील या फॅशनवर सोशल मीडियाचा प्रभाव अधिक जाणवतो. इन्स्टाग्राम, पिंटरेस्ट आणि फॅशन इन्फ्लुएन्सर्समुळे ‘ टःल्ल२ःःल्ल डडळऊ’ आणि ‘ ॅफश्ट’ सारखे ट्रेंड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे पावसाळाही फॅशन एक्सपेरिमेंट्स करण्याचा ऋतू झाला आहे. पावसाळा असला तरी आपण बुजगावण्यासारखे दिसू नये, कायम नीटनेटके आणि डिसेंट दिसायला हवं, हा विचार आता रुजलेला आहे. रंग, आराम, बजेट, हवामान आणि दैनंदिन गरजा यांचा समतोल साधणारी ही फॅशन अधिक व्यावहारिक आणि सर्वसमावेशक बनत असल्याने तिची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे.

viva@expressindia.com