छत्री किंवा रेनकोट ही खरंतर एक व्यावहारिक गरज, पावसात भिजायला लागू नये हा त्यामागचा साधासोपा उद्देश. त्याचा आपल्या रोजच्या फॅशनेबल कपड्यांशी ताळमेळ जुळवायला हवा, असं काही आपल्या मनातही यायचं नाही. आता मात्र रेनवेअर्स किंवा छत्रीसुद्धा कूल, क्लासी दिसायला हवेत, त्यामध्येही विविध स्टाइल असाव्यात, अशी जेनझींची मागणी आहे. त्यामुळे बाजारात सध्या नावीन्यपूर्ण, फॅशनेबल रेनवेअर्स आणि छत्र्यांची व्हरायटी दिसते. तसंच, हवामानातील बदल, वाढतं शहरीकरण आणि ‘स्टाइलसोबत कम्फर्ट’ या नव्या तरुण ग्राहकवर्गाच्या अपेक्षांमुळे रेनवेअर उद्योगात मोठी क्रांती झाली आहे. डिझायनर ट्रान्सपरंट छत्र्यांपासून ते यूव्ही संरक्षण देणार्‍या ‘ऑल-सीझन’ छत्र्यांपर्यंत आणि रिसायकल प्लास्टिकपासून तयार होणार्‍या रेनजॅकेट्सपर्यंत, मान्सून फॅशन आता केवळ पावसापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती स्वतंत्र फॅशन कॅटेगरी म्हणून उदयास आली आहे.

‘ऑल-सीझन’ छत्र्यांची वाढती लोकप्रियता

२०२६ मधील सर्वात महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे वर्षभर वापरता येणार्‍या छत्र्या. आजच्या छत्र्यांमध्ये पावसापासून संरक्षणासोबतच सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे विशेष कोटिंग असते. त्यामुळे उन्हाळ्यात कडक उन्हापासून बचाव आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण हे दोन्ही एकाच छत्रीत मिळतं. युरोपमधील अनेक फॅशन वीकमध्ये ‘सनब्रेला’ (Sunbrella) हा ट्रेंड विशेष चर्चेत आहे. वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे छत्री ही आता फक्त पावसाची नाही, तर उन्हाचीही साथीदार बनली आहे.

ट्रान्सपरंट छत्र्यांचे आकर्षण कायम

गेल्या काही वर्षांपासून ट्रान्सपरंट छत्र्या लोकप्रिय आहेत आणि २०२६ मध्येही त्यांचा ट्रेंड कायम आहे. विशेषत: बबल-शेप ट्रान्सपरंट छत्र्या तरुणांमध्ये अधिक पसंत केल्या जात आहेत. या छत्र्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपला चेहरा आणि हेअरस्टाइल व्यवस्थित दिसते. चालताना आपल्याला समोरचा रस्ता स्पष्ट दिसतो. कोणत्याही रंगाच्या पोशाखासोबत सहज जुळून येतात आणि फोटोग्राफीसाठी आकर्षक दिसतात. जपानमधून लोकप्रिय झालेला हा ट्रेंड आता भारतातील मेट्रो शहरांमध्येही सहज दिसू लागला आहे.

रेनवेअर किंवा रेनगिअर ट्रेंड्स

पूर्वी रेनकोट म्हणजे जाड, वजनदार आणि शरीर पूर्णपणे झाकणारा प्लास्टिकचा पोशाख अशी प्रतिमा होती. मात्र, २०२६ मध्ये रेनवेअर अधिक आकर्षक, हलके आणि स्टायलिश झाले आहेत. फॅशन डिझायनर्स आता रेनवेअरला दैनंदिन पोशाखाचा भाग मानून त्याची रचना करत आहेत. ऑफिस, प्रवास किंवा वीकेंड आउटिंग… प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रेनगिअर उपलब्ध आहेत.

मिनिमल डिझाइन्स

पूर्वी फुलांच्या प्रींट्स किंवा रंगीबेरंगी डिझाइन्स लोकप्रिय होत्या, मात्र आता ग्राहकांचा कल साध्या, एलिगंट आणि मिनिमल डिझाइनकडे वाढतो आहे. यंदा छत्र्यांमध्ये बटर यलो, सेज ग्रीन, मोका ब्राउन, चारकोल ग्रे, नेव्ही ब्ल्यू, बरगंडी, ऑफ-व्हाइट या रंगांना पसंती मिळते आहे. तसंच, मॅट फिनिश असलेल्या छत्र्या आणि सॉलिड रंगांनाही विशेष पसंती मिळते आहे.

कस्टम आणि पर्सनलाइज्ड छत्री

नाव, आद्याक्षरे, मोनोग्राम किंवा खास डिझाइन असलेल्या कस्टम छत्र्यांची लोकप्रियता वाढते आहे. अशा छत्र्या कॉर्पोरेट गिफ्ट, लग्नसमारंभ किंवा विशेष भेटवस्तू म्हणूनही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत.

ट्रेंच-स्टाइल रेनकोटची वाढती लोकप्रियता

यंदाच्या वर्षी सर्वाधिक चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे ट्रेंच-स्टाइल रेनकोट. पारंपरिक ट्रेंच कोटच्या प्रेरणेवर आधारित हे रेनकोट कमरेला बेल्ट, आकर्षक कॉलर आणि स्वच्छ कट्ससह उपलब्ध आहेत. हे रेनकोट फॉर्मल कपड्यांवरही सहज घालता येतात, त्यामुळे ऑफिसला जाणार्‍या तरुण व्यावसायिकांमध्ये त्यांना विशेष पसंती आहे.

पॉन्चोचे पुनरागमन

काही वर्षांपूर्वी फक्त ट्रेकिंग किंवा दुचाकीस्वारांपुरते मर्यादित असलेले पॉन्चो पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आले आहेत. हलके, सहज फोल्ड होणारे आणि बॅगेत मावणारे पॉन्चो अचानक सुरू झालेल्या पावसासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. सायकलस्वार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रवासी यांच्याकडून पॉन्चोला अधिक मागणी आहे.

ट्रान्सपरंट आणि सेमी-ट्रान्सपरंट रेनवेअर

फॅशनच्या जगात ट्रान्सपरन्सीचा प्रभाव रेनवेअरमध्येही दिसून येत आहे. ट्रान्सपरंट किंवा सेमी-ट्रान्सपरंट रेनकोटमुळे आत घातलेला पोशाख दिसून येतो आणि पावसातही स्टाइल कायम राहते. विशेषत: रंगीबेरंगी कपड्यांवर असे रेनवेअर अधिक आकर्षक दिसतात.

ओव्हरसाइज सिट आणि युनिसेक्स डिझाइन

या वर्षी रेनवेअरमध्ये ओव्हरसाइज फिट आणि युनिसेक्स डिझाइन्सना मोठी पसंती मिळते आहे. सैलसर फिटमुळे आरामदायी हालचाल करता
येते, तसेच हे रेनवेअर विविध प्रकारच्या पोशाखांवर सहज परिधान करता येतात. एकाच डिझाइनचा वापर स्त्री-पुरुष दोघेही करू शकतील, अशा संकल्पनेवर अनेक ब्रँड्सचा जोर आहे.

पर्यावरणपूरक छत्री

पर्यावरणपूरक उत्पादनांकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याने छत्री उत्पादकही नव्या पर्यायांकडे वळले आहेत. रिसायकल ढएळ प्लास्टिकपासून तयार केलेले कापड, बांबू किंवा लाकडी हँडल, ढाअर-मुक्त वॉटर-रिपेलंट कोटिंग, रिसायकल करता येणारे पॅकेजिंग छत्र्यांमध्ये वापरले जाते. केळीच्या किंवा नारळाच्या झाडांपासून बनवण्यात येणारे काही फॅब्रिक्स किंवा मटेरियल अशा नैसर्गिक प्रकारांवरही सध्या संशोधन सुरू आहे.

स्मार्ट वैशिष्ट्यांची भर

नव्या पिढीतील रेनगिअरमध्ये अनेक उपयुक्त सुविधा दिल्या जात आहेत. जलरोधक झिपर्स, ॲडजस्टेबल हूड मोबाइलसाठी वॉटरप्रूफ खिसे, रिफ्लेक्टिव्ह स्ट्रिप्स, सहज फोल्ड करून पाऊचमध्ये ठेवण्याची सुविधा, हलके पण मजबूत साहित्य अशी स्मार्ट वैशिष्ट्ये रेनगिअरमध्ये आहेत. विशेषत: रात्री प्रवास करणार्‍या आणि दुचाकीस्वारांसाठी रिफ्लेक्टिव्ह डिटेलिंग सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं आहे. ‘रेनवेअर’ ही संकल्पना फक्त रेनकोटपुरती मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण रेनगिअरमध्ये आता वॉटरप्रूफ जॅकेट्स, रेन पॉन्चो, रेन पॅन्ट्स, गेटर्स, वॉटरप्रूफ ग्लोव्हज, रेन कॅप्स आणि शू कव्हर्स यांचा समावेश होतो. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या उत्पादनांची मागणीही वाढते आहे. हवामानात सातत्याने होणारे बदल लक्षात घेता पुढील काही वर्षांत रेनवेअर अधिक हलके, अधिक टिकाऊ आणि अधिक स्मार्ट होण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया, उच्च कार्यक्षम फॅब्रिक्स आणि बहुउपयोगी डिझाइन यांवर अधिक भर दिला जाईल. यंदाच्या पावसाळ्यात आपली फॅशनही जपायची असेल तर हलके कपडे, स्मार्ट लेयरिंग, पटकन सुकणारे फॅब्रिक्स आणि पोशाखाला पूरक रेनगिअर या गोष्टी लक्षात ठेवा.