scorecardresearch

सेलोत्सव

मान्सून आणि सेल यांचं नातं आता चांगलंच घट्ट झालंय. मान्सून सेलनं भारतीयांना खऱ्या अर्थाने सवलतीचा बाजार दाखवला. आपल्याकडचा हा आद्य सेलोत्सव. यंदाच्या मान्सून सेलचं वैशिष्टय़ काय, त्यामधून काय घेणं फायदेशीर आणि काय टाळायला हवं?

सेलोत्सव

मान्सून आणि सेल यांचं नातं आता चांगलंच घट्ट झालंय. मान्सून सेलनं भारतीयांना खऱ्या अर्थाने सवलतीचा बाजार दाखवला. आपल्याकडचा हा आद्य सेलोत्सव. यंदाच्या मान्सून सेलचं वैशिष्टय़ काय, त्यामधून काय घेणं फायदेशीर आणि काय टाळायला हवं?
पाऊस आणि वाफाळती कॉफी यांचं नातं जेवढं घट्ट, तेवढं पावसाळा आणि त्यादरम्यान लागणारे सेल यांचंसुद्धा आहे. मान्सून सेल हा भारतातील आद्य सेल म्हणावा लागेल. अशा प्रकारे सवलतीच्या दरात विक्रीची संकल्पना अर्थात सेल कनसेप्ट आपल्याला या मान्सून सेलमुळेच समजली. मुळात हा मान्सून सेल म्हणजे आपल्याकडचा स्टॉक क्लिअरन्स सेल. हल्ली लागतात तसे दुकानांमधून ऊठसूट सेल लावलेले नसायचे तेव्हा. मान्सून सेल हाच खरा सवलतीचा बाजार. पावसाळ्यानंतर सुरू होणाऱ्या दसरा- दिवाळीच्या आणि त्यानंतर येणाऱ्या लग्नसराईच्या हंगामासाठी दुकान नव्या कपडय़ांनी भरून ठेवायचं असतं. म्हणून मग उरलेल्या मालावर सवलती जाहीर करून तो संपवला जातो. गार्डन, विमल या त्या काळातल्या बडय़ा ब्रँड्सची प्रदर्शनं पावसाळ्यात लागायची. यातला माल कधी कधी थोडा डिफेक्टिव्ह असायचा. ‘एकच पीस’ असं दुकानदार हटकून सांगायचा. हवा तो रंग, पॅटर्न मिळवताना मग तारांबळ उडायची.

बाय नाऊ पे लेटर
आता ‘सेल’चं एवढं अप्रूप राहिलेलं नाही. परदेशात जसे प्रत्येक ऋतूच्या आधी सेल लागतो, तसा आपल्याकडेही लागायला लागलाय. पण तरीही पावसाळी सेलचं महत्त्व कमी झालेलं नाही. यंदाचा मान्सून सेल धमाका मागच्या आठवडय़ातच सुरू झालाय.
मोठय़ा ब्रँड्सपासून ते लोकल दुकानदारापर्यंत सगळीकडे सेलचे बोर्ड लागलेत. कपडेच नाही तर दागिने, बॅगा, फुटवेअर सगळ्यांवर सवलतींचा वर्षांव होतोय. मोठय़ा ब्रँड्सनी यंदा ‘बाय नाऊ पे लेटर’ या तत्त्वावर ग्राहकांना आकर्षित करणारे सेल्स लावले आहेत. ठाण्याच्या एका मोठय़ा शॉपिंग मॉलच्या ब्रँडेड शोरूममधील विक्रेत्या पूजा दुबळे म्हणाल्या, ‘‘समर सीझनमधील काही माल पावसाळ्यातही उपयोगी येऊ शकतो. अशा वस्तूंवर आम्ही सेल जाहीर करतो. मोठमोठय़ा सणांसाठी आम्हाला नवीन माल भरून ठेवावा लागतो. त्यामुळे आम्ही लावलेला सेल हा प्रामुख्याने स्टॉक क्लिअरन्ससाठी असतो.’

सवलत कशावर?
सेलमध्ये खरेदी करताना स्वस्तात आहे म्हणून खरेदी करण्यापेक्षा दूरदृष्टी बाळगणं चांगलं. सध्या चालत असलेली फॅशन आणि पावसाळ्याबरोबरचं त्याचं कॉम्बिनेशन याचा विचार करून खरेदी करणं सोयीस्कर ठरेल. सध्या स्पोर्ट्स वेअर, स्पोर्ट्स शूज, बॅग यावर चांगली सवलत आहे आणि तो माल सीझनल नाही. रिबॉक, पूमा, नायकी या ब्रँड्सनी ऑनलाइन खरेदीत मोठी सवलत देऊ केली आहे. मिन्त्रा, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन अशा साईट्सवर किमान ४० टक्के सवलत मिळते आहे. याशिवाय ब्रँडेड स्टोअर्समध्ये टॉमी हिलफिगर, रिलायन्स ट्रेंड्स, वेरोमोडा आदी ब्रँड्सवरसुद्धा बाय १ गेट १ फ्री, ३०-५० टक्के कमी अशा ऑफर्स लागलेल्या दिसताहेत.

काय घ्यावं?
पावसाळी अ‍ॅक्सेसरीज किंवा नवीन डिझाइन्सचा स्टॉक या सेलमध्ये कधीच मिळणार नाही. आधीच्या स्टॉकमधले क्रॉप टॉप्स , हॉट शॉर्ट्स, वेगवेगळे स्काफ्र्स, ट्राउजर्स, थ्री-फोर्थ पँट्स, प्रिंटेड लाइट वेट कॉटन सिल्क पँट्स इत्यादी पावसाळ्यासाठी उपयोगी आऊटफिट्स सेलमधून खरेदी करणं उपयोगी ठरेल. आवडलेली वस्तू खरेदी करताना आपल्या साइझशी मात्र कॉम्प्रमाइज करू नये. सध्या लाइट कलर्स असलेल्या कपडय़ांची खरेदी टाळणं योग्य ठरेल. तसंच वॉटरप्रूफ काजळ, आय लायनर, लिपस्टिक, कन्सिलर, फाऊंडेशन आदी कॉस्मेटिक्स नक्कीच सेलमधून घ्याव्यात. पण एक्सपायरी डेट पाहायला विसरू नये. हॅप्पी शॉपिंग!

प्राची परांजपे – viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या