संशोधनमात्रे : रानवेडी

शेवटच्या वर्षांला असताना तिने एक व्याख्यान ऐकलं आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएस्सी करायचा तिचा विचार बदलला

राधिका कुंटे viva@expressindia.comमृणाली राऊतला परिसरातील पक्षी तसंच जैवविविधतेचा अभ्यास आणि नोंदणी करण्यात अत्यंत रस आहे. भोवतालच्या परिसरातील अनेक पक्षी व फुलपाखरांची नोंद तिने घेतली असून निसर्गाबाबत जागृती होऊन निसर्गसंवर्धनासाठी तिची धडपड सुरू आहे.   

ती मूळची साकोलीची. नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी साकोलीतून प्रवेश होतो, अशी साकोलीची ओळख. एम.बी. पटेल महाविद्यालयात तिचं शिक्षण झालं. तिने बीएस्सीला सूक्ष्मजीवशास्त्रासाठी प्रवेश घेतला तेव्हा पुढे काय करायचं ते ठरवलं नव्हतं. ती खूप हुशार नसली तरी मेहनती होती. महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये आवडीने भाग घ्यायची.  रांगोळी स्पेशालिस्ट म्हणून तिची ओळख होती. महाविद्यालयातल्या ‘एव्होकेअर नेचर क्लब’मधल्या उपक्रमांत स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायची. प्राध्यापक डॉ. एल. पी. नागपूरकर यांचं विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन लाभलं. साकोली गावात त्यांनी अनेक अ‍ॅक्टिव्हिटीज राबवल्या. क्लबतर्फे पक्षीनिरीक्षणाच्या उपक्रमांतील सहभागामुळे मृणालीला नेहमीच्या पक्षांखेरीज आणखी कितीतरी पक्ष्यांची माहिती समजली. दुसऱ्या वर्षांच्या अभ्यासाला असणाऱ्या पर्यावरण विज्ञान विषयाची तिला गोडी लागली. तेव्हा ‘सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट’ प्रकल्प करताना गावातलं पर्यावरण कळलं. त्या प्रकल्पासाठी प्रा. नागपूरकर यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. मृणाली सांगते की, ‘गावातील दोन ठिकाणच्या कचऱ्यामुळे सकाळी चालायला जाणाऱ्या वृद्धांना किंवा बालकांना श्वसनविकार होऊ शकतो. पक्षी, प्राण्यांनी त्या कचऱ्यातले काही खाल्लय़ास समस्या उद्भवू शकते, अशा गोष्टी कळल्या. या कचऱ्याचे मूळ शोधून काढून संबंधित लोकांशी संवाद साधला. नंतर नगर परिषदेत जाऊन ही परिस्थिती कथन केली. त्यांनी ओला – सुका कचरा वर्गीकरण होत असल्याचं सांगितलं. कचऱ्याचं नीट वर्गीकरण करणाऱ्यांना काही बक्षीस द्यावं असं मी सुचवलं. त्यावर विचार होऊन त्याची अंमलबजावणी झाली. आता कटाक्षाने कचऱ्याचं योग्य वर्गीकरण करण्यावर भर दिला जातो’.

शेवटच्या वर्षांला असताना तिने एक व्याख्यान ऐकलं आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएस्सी करायचा तिचा विचार बदलला. ‘वाइल्ड लाइफ ट्रस्ट इन इंडिया’ या संस्थेतील डॉ. दिशा शर्मा, महेंद्र राऊत, निखिल दांडेकर या व्याख्यात्यांनी या क्षेत्राविषयी भरभरून माहिती दिली. त्यातील जवळपास सगळी माहिती तिच्यासाठी नवीन होती. मग मृणालीने ठरवलं की, या क्षेत्रात काम करण्यासाठी शक्य तितकी धडपड करायची आणि बीएस्सीचे दोन राहिलेले पेपरही द्यायचे. जमेल तितकं या क्षेत्राविषयी शिकायचं, समजून घ्यायचं. तरीही तिच्या प्राध्यापकांनी मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएस्सी करून स्थिरावण्याचा सल्ला दिला. तर यूपीएससी, एमपीएससी वगैरे करून अधिकारी होता येईल, असा सल्ला फॉरेस्ट ऑफिसमधून मिळाला. पण निसर्गाविषयीच काहीतरी करायचं आहे या मतावर ती ठाम होती. या काळात तिला पुस्तकांची लाखमोलाची साथसोबत मिळाली. ‘महाराष्ट्रातील वन्यजीवन’, ‘पक्षीकोश’, ‘रातवा’, ‘नागझिरा’, ‘माणदेशी माणसे’, ‘पाणथळीतील पक्षी’, ‘महाराष्ट्रातील फुलपाखरे’, ‘जिम कॉर्बेट’, ‘एका रानवेडय़ाची शोधयात्रा’, ‘भारतीय पक्षी’ अशा अनेक पुस्तकांतून वन्यजीवनाविषयी खूप माहिती मिळत गेली. समाजमाध्यमांचा सदुपयोग करून अनेक पेजेस, ग्रुप्स जॉइन करून त्यांना ती फॉलो करू लागली. तिने तेव्हा ‘वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’मध्ये जायचं असं मनाशी ठरवलं होतं. या क्षेत्रात जाण्यासाठी सुरुवातीच्या काळात घरच्यांचा पाठिंबा नव्हता. फील्डवर जायला तिच्या काळजीपोटी चटकन परवानगीही मिळत नसे.

दरम्यान, महाविद्यालयातील प्राध्यापकांनी तिचा कल लक्षात घेऊन ‘पीपल बायोडायव्हर्सिटी रजिस्टर्ड इन इंडिया’ या प्रकल्पात काम करण्याविषयी विचारणा केली आणि तिने होकार दिला. घरच्यांची नाराजी पत्करून केलेल्या या कामामुळे भोवतालची जैवविविधता तिला कळली आणि त्याच ओघात या क्षेत्रातल्या संधींविषयी जाणीवही झाली. या कामात गुंतल्याने परीक्षेच्या पेपरचे फॉर्म भरण्याची तारीख उलटून गेली आणि ते पुढल्या वर्षी द्यायचे ठरले. तिने याच क्षेत्रात ठोस काम करून दाखवायचा निश्चय केला. ती समाजमाध्यमांद्वारे नेटवर्किंग वाढवायला लागली. तज्ज्ञांना प्रश्न विचारायला लागली. अक्षय खांडेकरने तिला सखोल वाचन करण्याचा सल्ला दिला आणि तो तिने लगेच प्रत्यक्षात आणला. 

सगळं गाडं रुळावर येतं आहे असं वाटतं तोच करोनाचं संकट उभं ठाकलं. पण या संकटातून संधी शोधून तिने अनेक ऑनलाइन कोर्सेस जॉइन केले. त्यापैकी वेबिनारमुळे महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांचा खूप पाठिंबा मिळाला आणि त्यांच्यामुळे या क्षेत्रातील अनेकांच्या ओळखी झाल्या. वेळोवेळी त्यांना प्रश्न विचारल्यामुळे तिच्या माहितीत भर पडत गेली. त्या काळात हाती असलेली साधनं अर्थात कान-डोळे आणि सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा वापर करून गावातल्या पक्ष्यांचं निरीक्षण करून ते नोंदवून ठेवण्याचा सल्ला शरद आपटे यांनी मृणालीला दिला. ही माहिती ‘ईबर्ड’ या प्लॅटफॉर्मवर अपलोड करायला सांगितली. दुर्बीण नाही ही तक्रार केव्हाच मागं पडली असून फक्त आवाजावरून तिला पक्षी अचूकपणे ओळखता येतात. ते बघून वन खात्यातील मिथुन चौहान यांनी स्वत:ची दुर्बीण तिला सहा महिन्यांसाठी दिली. त्यामुळे अगदी चिमुकले पक्षी दिसू लागले आणि अभ्यासाचा हुरूप वाढला. 

त्या काळात स्वत:च्या पायावर उभं राहायचा प्रयत्न तिने सुरू केला होता. काहीजणांच्या टय़ुशन्स घेत होती. कालांतरानं काही कोर्सेस सशुल्क झाले आणि फीच्या पैशांतून ते शुल्क भरता आले. तिची मैत्रीण भाग्यश्री पांडेनं ‘डब्ल्यूआयआय’मध्ये जाण्यासाठी अनिरुद्ध चावजी यांचं मार्गदर्शन घ्यायला सुचवलं. मृणाली सांगते की, ‘त्यांनी फील्डवर्कविषयी विचारल्यावर मला अनुभव नाही हे सांगावं लागलं. मग त्यांनी करिअरविषयी मार्गदर्शन करून घरच्यांचं मन वळवण्याविषयीही सुचवलं. चावजीसरांनी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटा’मध्ये पीएचडी करणाऱ्या शिवोना भोजवानी हिच्याशी ऑनलाइन ओळख करून दिली. काही ऑनलाइन मीटिंग्ज आणि मेसेजेसनंतर शिवोनाच्या रूपानं मला जणू एक मोठी बहीण आणि मैत्रीण मिळाली. माझी मेहनत आणि माहितीचा अंदाज घेऊन तिने मला निरीक्षण आणि माहिती संकलनाचं काम दिलं. तिचा प्रोटोकॉल येईपर्यंत मी साइट्सवर जाऊन छायाचित्र वगैरे काढून आले’.

दरम्यानच्या काळात एक बातमी आली होती की, भंडाऱ्यात फुलपाखरांच्या ६६ प्रजाती आहेत. मात्र ते वाचताना पक्षीनिरीक्षण करताना तिला साकोलीतच त्याहून अधिक प्रजाती आढळल्या होत्या, हे आठवलं. मग केलेल्या पाहणीत जवळपास २० आढळल्या. त्या सुमारास तिला ‘फॉरेस्ट वाइल्ड लाइफ अ‍ॅण्ड कन्झर्वेशन’ या तीन महिन्यांच्या कोर्ससाठी प्रकल्प करायचा होता. मात्र फुलपाखरांची माहिती नव्हती. पण समाजमाध्यमाद्वारे संपर्क साधल्यावर मकरंद कुलकर्णी, डॉ. आशीष टिपले, डॉ. वरुण सातोसे या तज्ज्ञांनी फुलपाखरांविषयी खूप मार्गदर्शन केलं. तिची जिद्द पाहून हेमंत ओगले यांनी त्यांचे पुस्तक भेट दिले. मग ती एकटी रोज नेटानं हे काम करू लागली आणि तिला जवळपास ८६ प्रजाती सापडल्या.

तिने भंडाऱ्यातील एनएनटीआर ते पीटीआर या कॉरिडॉरमध्ये ‘सेव्ह इकोसिस्टम अ‍ॅण्ड टायगर’ या संस्थेसोबत काम करायचा अनुभव गाठीशी बांधला. काही काळाने ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स’ या संस्थेच्या कामासाठी तिची निवड झाली. पेंचमधल्या तिथल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करणे आणि मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून त्याचे विश्लेषण करण्याचे काम आमच्या टीमने अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्या दरम्यान जंगलात वावरताना घ्यायची काळजी, पावलांचे ठसे, खुणा, आवाजातील फरक ओळखण्यासारख्या अनेक बारीकसारीक गोष्टींची माहिती मिळाली. तो अनुभव फार छान होता. दरम्यान शिवोनाच्या प्रकल्पाचा प्रोटोकॉल आला आणि पूर्वकल्पना दिलेली असल्याने एनसीबीएसच्या प्रकल्पातून परतावं लागलं. शिवोनानं एक महागडी दूर्बीण तिच्या कामासाठी पाठवून मृणालीवरचा विश्वास दाखवून दिला. या प्रकल्पासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पाणथळ जागी असणाऱ्या पक्ष्यांचं तीनही ऋतुमध्ये निरीक्षण आणि नोंदणी करण्याचं काम मृणाली करते आहे. अजूनही पक्षी निरीक्षण सुरू असून जे पक्षी मोबाइल कॅमेऱ्यात पकडता येत नाहीत त्यांचं स्केचेस करणं सुरू असतं.   

मधल्या काळात सहकाऱ्यांशी गप्पा मारताना पुढल्या करिअरविषयीच्या धूसर कल्पना अधिक ठळक करण्यासाठी तिने पुन्हा स्वत:चे विचार पडताळून पाहिले. तेव्हा तिला जाणवलं की, आपल्याला पक्षी आणि फुलपाखरं, कीटक आवडतात, त्यांचा अभ्यास करताना वनस्पतींचं विश्व आवडायला लागलं. सरीसृप प्राणी आवडायला लागले आहेत. पुढे डॉ. वरद गिरी यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांच्याशी होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून तिने उभयसृप प्राण्यांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यात रस वाटू लागला. मात्र सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला आवडणं हे छंद आहेत आणि आता करिअर कशात करायचे आहे, हे ठरवायची वेळ आली असल्याचा सल्ला एका प्राध्यापकांनी दिला. तेव्हा विचार केल्यावर सरीसृप प्राण्यांचा अभ्यास आणि संशोधन करायला आवडेल असं मृणालीला वाटलं. या संदर्भात ‘बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन’ यांचे ऑनलाइन कोर्सेस तिने केले असून अभ्यास आणि वाचन सुरू आहे.

अलीकडेच ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल एज्युकेशन’ या संस्थेने आयोजित केलेल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिसंवादातील भारतातल्या सहा सहभागींपैकी ती एक होती. त्याआधी ईबर्ड या प्लॅटफॉर्मवर तिने २०० हून अधिक केलेल्या चेकलिस्ट आणि १८३ पक्ष्यांच्या निरीक्षण नोंदी यामुळे भंडारा जिल्ह्यातील २०२० मधली टॉप बर्डर ठरली. पाठोपाठ ठाण्याच्या ‘हियर ऑन प्रोजेक्ट एन्व्हायर्नमेंट’अर्थात होप या संस्थेतर्फे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये नवीन पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक घडण्यासाठी पक्षी अभ्यासात रुची असणाऱ्या शालेय—महाविदयालयीन विद्यार्थ्यांना ‘उदयोन्मुख पक्षीनिरीक्षक’ आणि ‘उदयोन्मुख पक्षीमित्र’ असे दोन पुरस्कार दरवर्षी दिले जात असतात. त्यापैकी ‘उदयोन्मुख पक्षीमित्र’ हा पुरस्कार मार्चमध्ये मृणालीला मिळाला. आतापर्यंत तिला नावं ठेवणाऱ्या सगळ्यांना तिच्या कामातूनच तिने ’उत्तर दिलं. शिवोनासाठी करत असलेल्या कामामुळे करोनाकाळात आर्थिक आधार मिळाल्याने ‘घर चालवणं’ म्हणजे काय तेही कळलं. 

पण काही धक्के बसायचे बाकी होतेच. अजून करोनामुळे ‘डब्ल्यूआयआय’ची परीक्षा आधी पुढे ढकलली गेली. नंतर कळलं की ते एमएस्सीचा कोर्स बंद करत आहेत. ‘द राम हत्तीकु डुर अ‍ॅडव्हान्स्ड ट्रेनिंग इन कन्झर्वेशन’ या संस्थेतर्फे चार महिन्यांचे प्रशिक्षण होते. त्यासाठी माहिती पाठवून पुढे मुलाखतींचे टप्पेही तिनं पार केले. देशातून फक्त दहाजणांची निवड केली जाते. मात्र केवळ एकच लसीकरण झाल्याने तिची निवड होऊ शकली नाही. मात्र या गोष्टींमुळे न डगमगता तिचा अभ्यास सुरू आहे. सध्या ती कॉन्सेप्ट ऑफ इकॉलॉजी, इव्होल्यूशन अ‍ॅण्ड जेनेटिक्सचा अभ्यास करते आहे. या वाटेत अनेक अडीअडथळे आले. काही समज—गैरसमज झाले, पण हेही दिवस जातील हा विश्वास तिला वाटतो. आहे त्यात समाधानी न राहता ती स्वत:शीच स्पर्धा करत राहते. करोनाकाळात सगळी काळजी घेऊन ती निरीक्षण करायला जायची. फक्त दोन महिने तिचं काम ठप्प झालं होतं. शिवाय स्वत: केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी ठेवणंही सुरू असतं. ती भोवतालच्या परिसरातील शाळकरी मुलांना आणि नागरिकांना निसर्ग समजावून सांगून संवर्धन करायचा प्रयत्न करते. सध्या तिने ठाण्याच्या ‘बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स’मध्ये एमएस्सीला प्रवेश घेतला आहे. मुंबईत अनेक चांगल्या संधी मिळतील, तज्ज्ञांशी संवाद साधता येईल, अशी आशा तिला वाटते. तिच्या करिअर प्रवासाकडे पाहून ‘इक्बाल’ चित्रपटातल्या गाण्याच्या ओळी आठवतात – ‘कुछ पाने की हो आस आस। कुछ अरमाँ हो जो खमस खमस। आशाएँ..’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mrunali raut india biodiversity portal zws

Next Story
स्टे-फिट : दी आर्ट ऑफ इटिंग
ताज्या बातम्या