मृण्मयी पाथरे
सध्या अठरा वर्षांच्या असलेल्या नकुलला लहानपणापासूनच एका जागी दोन मिनिटं स्थिर बसतानाही त्रास व्हायचा. सतत पाय हलवत राहणं, हाताशी जी गोष्ट मिळेल तिच्याशी खेळत बसणं, मन एकाग्र करू न शकणं, गोष्टी विसरणं, लहानसहान गोष्टींमुळे लक्ष विचलित होणं, अभ्यासाचा किंवा कामाचा डोंगर पुढय़ात असतानाही सतत दिवास्वप्नात (daydreaming) रमणं, मल्टीटास्क करण्यास अडचणी जाणवणं, गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर चिडचिड करणं, वस्तूंची आदळआपट करणं, राग अनावर होणं अशा कित्येक समस्यांना तो मोठेपणीही सामोरं जात होता. लहानपणी तो यासाठी सौम्य डोस असलेल्या गोळय़ा घेत असला, तरी कॉलेजला गेल्यावर मात्र मित्र चिडवायला लागल्यामुळे (pill shaming) ठरावीक वेळेस मित्रांसमोर गोळय़ा घ्यायला त्याला संकोच वाटायचा. त्यामुळे त्याचे पालक त्याच्या नकळत त्याला जेवणातून या गोळय़ा द्यायचे. नकुलला याबद्दल अंदाज आला तेव्हा त्याने घरचं जेवण आणि पालकांशी बोलणंच बंद केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझे बाबा गेल्या तीन वर्षांपासून नैराश्याच्या गोळय़ा (anti- depressants) घेत आहेत, पण त्याचा त्यांना फार काही उपयोग झाला नाही. बाबांना अजूनही कित्येकदा उदास, असहाय्य आणि अगतिक वाटतं. आम्ही सगळे त्यांच्यासोबत असूनही त्यांना एकाकीपणा जाणवतो. त्यांना कितीही सकारात्मक गोष्टींकडे लक्ष वळवायला सांगितलं, तरी त्यांचं लक्ष नकारात्मक गोष्टींकडेच जातं. मानसोपचारतज्ज्ञांनी त्यांच्या गोळय़ा दोन-तीनदा बदलून आणि त्यांचे डोस कमी-जास्त करूनही पाहिले, पण काही फरक जाणवला नाही. वरून या गोळय़ांमुळे केस गळणं, भूक आणि झोप कमी-जास्त होणं यांसारखे होणारे साइड-इफेक्ट्स आहेत ते वेगळेच! इतक्या गोळय़ा घेऊनही जर काही फायदा जाणवत नसेल, तर गोळय़ा घ्यायच्याच कशाला?, आशुतोष मेटाकुटीला येऊन विचारत होता.

अन्विता गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रचंड अँक्झायटी (anxiety) अनुभवत होती. करोनामुळे शैक्षणिक वर्ष लांबलं गेलं होतं. पदवीची शेवटची परीक्षा देऊन दोनेक महिने होऊन गेले असले, तरी निकाल न लागल्यामुळे अन्वितासमोर आलेल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करण्याच्या संधीवर तिला पाणी सोडावं लागत होतं. त्यात स्वायत्त (autonomous) कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे निकाल लवकर हाती मिळाल्याने इतर मंडळींना नोकरी मिळण्यात फारशा अडचणी येत नव्हत्या. अन्विताचे बाबाही पुढच्या एका महिन्यात निवृत्त होत असल्याने तिलाही आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हायचं होतं आणि घराला हातभार लावायचा होता. हे प्रेशर अनुभवताना तिला दरदरून घाम फुटायचा, हात-पाय थरथरायचे, छातीत दुखायला लागायचं, हृदयाचे ठोके संपूर्ण शरीरात जाणवायचे. तिचे बाबाही यापूर्वी स्ट्रेस कमी होण्यासाठी काही गोळय़ा घेत होते, हे तिला लक्षात होतं. त्यामुळे तिला ताण असह्य झाल्यावर पालकांचं लक्ष चुकवून तिने बाबांच्या एक-दोन गोळय़ा घेतल्या.

आपल्यापैकी अनेक जण बरं वाटत नसेल, तर आधी घरगुती उपाय करून पाहतात. हे उपायही कामी आले नाहीत, तर मेडिकलमधून सहज उपलब्ध असलेली औषधं (over the counter medicines) आणतात. अगदी त्याचाही काहीच उपयोग झाला नाही, तर शेवटी नाईलाजास्तव एखाद्या डॉक्टरकडे जातात. जर शारीरिक समस्यांसाठीच आपण डॉक्टरकडे जायला एवढे आढेवेढे घेतो, तर मानसिक समस्यांची काय बात? त्यामुळे मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी मनोचिकित्सक (psychiatric) औषधं घेण्याबद्दल आपल्या मनात कित्येक शंका आणि प्रश्न असू शकतात. मी एकदा गोळय़ा घ्यायला सुरुवात केली तर मला आयुष्यभर औषधं घ्यावी लागतील का, मी या गोळय़ांवर अवलंबून राहीन का, इतरांना कळलं तर ते काय म्हणतील ही भीती कित्येकांच्या मनात घर करू शकते.

खरं तर, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात कधी ना कधी मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं. पण आपल्या सगळय़ांनाच औषधं घेण्याची गरज मात्र भासत नाही. काही जणांना होणारा मानसिक त्रास केवळ थेरपीने कमी होऊ शकतो, तर काही जणांचा त्रास थेरपी आणि औषधं घेतल्याने कमी होऊ शकतो. ही औषधं शरीरातील आणि मेंदूतील रसायनांवर (neurochemicals) आणि संप्रेरकांवर (hormones) काम करतात. पण आपल्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत दीर्घकाळ टिकणारे बदल आणण्यासाठी थेरपीसुद्धा तितकीच आवश्यक आहे. जर मानसिक समस्यांची तीव्रता जास्त असेल, तर समुपदेशनाव्यतिरिक्त (counselling ) ऑक्युपेशनल (occupational therapy) आणि पुनर्वसन (rehabilitation) यांचाही मानसिक स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

आजकाल आपल्याला ‘क्विक फिक्स’ची (quick fix) सवय लागल्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या थेरपीपेक्षा झटपट औषधं घेऊन मोकळे होऊया, असंही काही जणांना वाटू शकतं. किंवा, कधीकधी औषधांचा फायदा त्वरित दिसून आल्यामुळे उरलेली औषधं न घेण्याचा निर्णयही काही जण पटकन घेऊन टाकतात. यामुळे इतक्या कमी काळात मानसिक समस्यांची लक्षणं जरी वरवर दिसली नाहीत, तरी त्यांचं मूळ आहे तसंच राहू शकतं आणि कालांतराने परत डोकं वर काढू शकतं. याला (relapse) असंही म्हणतात. या मानसिक समस्या परत डोकं वर काढायला लागल्यावर काही जण स्वत:हून औषधांचे डोस बदलून तीच औषधं (self- medication) घ्यायला लागतात किंवा आपल्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीला दिलेल्या गोळय़ांपैकी एखाद-दुसरी गोळी घेतात. आपल्या समस्या दिसायला सारख्या असल्या, तरी अशा पद्धतीने औषधं घेणं फायदेशीर ठरण्यापेक्षा हानीकारकही ठरू शकतं. म्हणूनच निष्णात मानसोपचारतज्ज्ञ एखादं औषध लिहून देताना त्या औषधामुळे होणारे फायदे साईड इफेक्ट्सपेक्षा जास्त आहेत की नाही हे कॉस्ट – बेनिफिट ॲनालिसिस करून पडताळून पाहतात.

याशिवाय, जर औषधं न घेणाऱ्या एखाद्या व्यक्तीला (जी स्वत:च्या आरोग्याबद्दलचे निर्णय स्वत: घेऊ शकत असेल आणि जिच्यापासून स्वत:च्या किंवा इतरांच्या जीवाला काही धोका नसेल) नकळतपणे पाण्यातून किंवा जेवणातून औषधं दिली जात असतील, तर त्या व्यक्तीची संमती न विचारता आपण तिचा मानवी हक्क हिरावून घेतो. यामुळे त्या व्यक्तीला मदत होण्याऐवजी तिच्या मनात आपल्याविषयी कटुता निर्माण होऊ शकते आणि एकूणच औषधांबद्दलच्या शंकाही अधिक वाढू शकतात. याबरोबरच काही विशिष्ट औषधं वेगळय़ा द्रव्यात किंवा पदार्थात मिसळून दिल्यामुळे त्यांची परिणामकारकतासुद्धा ( effectiveness )कमी होऊ शकते. त्यामुळे औषधांच्या बाबतीत कोणतेही प्रश्न असले, तर डॉक्टरांना विचारून माहितीपूर्ण निर्णय (informed decision) घेतलेला बरा, नाही का?
viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multitask study work playing pills pill shaming daydreaming amy
First published on: 12-08-2022 at 00:05 IST