मोकळ्या, टेकाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचं स्वप्न पूर्ण करणारा निसर्गप्रेमी आज त्याच्या याच कामामुळे वनरक्षक म्हणून ओळखला जातो आहे. ‘जंगलबुक’ या सदराच्या सुरुवातीपासून अनेक निसर्ग, वन्यजीव संशोधक तरुण-तरुणींच्या कार्याची ओळख आपण करून घेतो आहेत. यापैकी अनेकांनी रीतसर शिक्षण घेऊन विचारपूर्वक निसर्ग संशोधनाची वाट निवडली आणि त्यातल्याच एका शाखेत त्यांनी विशेष यश मिळवलं. या संशोधकांविषयी जाणून घेत असताना स्वयंस्फूर्तीने निसर्ग संशोधनाकडे वळलेल्या किंवा प्रत्यक्ष वन संरक्षणाच्या कार्यात उतरलेल्यांचीही ओळख झाली. कुठल्याही प्रशिक्षण, अर्थसाहाय्य अशा सोयीसुविधांअभावी निसर्ग संरक्षणाच्या कामात झोकून देणाऱ्यांच्या या कथाही नवल वाटाव्या अशाच आहेत. नांदेडमधील समर्पित वनरक्षक म्हणून ओळखले जाणारे शिवसांब बाबुराव घोडके हेही अशाच निसर्गवाटा निर्माण करणाऱ्यांपैकी एक.

जिल्हा नांदेड, तालुका कंधार आणि तिथल्याच पानभोसी या छोट्याशा गावातल्या सर्वसामान्य तरुणाने एक असामान्य, प्रेरणादायी अशी चळवळ सुरू केली. ‘दररोज एक रोप’ ही त्याची चळवळ. या माध्यमातून १४३३ दिवसांत तब्बल २३ हजार वृक्षांची लागवड आणि संवर्धन ज्यांनी केलं ते शिवसांब बाबूराव घोडके. आज नांदेड वन विभागातील एक समर्पित वनरक्षक असा लौकिक त्यांनी आपल्या कामातून मिळवला आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…’ या संत तुकारामांच्या ओळी लहानपणापासूनच त्यांच्या मनात रुजल्या होत्या. निसर्गाविषयीचं प्रेम हे प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवं याबद्दलची त्यांची जाण खऱ्या अर्थाने त्यांना या कार्यात पुढे जाण्यासाठी महत्त्वाची ठरली. शिवसांब घोडके यांनी १ जानेवारी २०२२ रोजी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या १७ एकर माळावर एक वटवृक्ष लावून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. उघडे-कोरडे माळरान, पाण्याचा अभाव या सगळ्या अडचणी त्यांच्याही समोर होत्या, मात्र एकेक करत या समस्येवर उत्तर शोधत त्यांनी ‘दररोज एक रोप’ हा उपक्रम पुढे नेला. सुरुवातीला १८० दिवस रोजच्या पाण्याच्या टंचाईमुळे फार अवघड परिस्थिती त्यांच्यासमोर असायची, मात्र घोडकेंची चिकाटी जराही ढळली नाही. गावातील तरुणांना एकत्र करून त्यांनी ‘निसर्ग सेवा गट’ स्थापन केला. स्वतःच्या शेतांमधून पाइपलाइन टाकणं, ग्रामपंचायतीकडून नळयोजना, स्थानिकांची साथ अशा अनेक हातांनी केलेल्या सहकार्यामुळे हा माळरानाचा पट्टा आज देशी, दुर्मीळ व औषधी वनस्पतींच्या सहा हजारहून अधिक रोपांनी फुललेलं नंदनवन बनला आहे. गोडा-मन्याड खोऱ्यातील हे ठिकाण आज ‘मयूर सिद्धेश्वर अभयारण्य’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. या परिसरात पक्षी, फुलपाखरं, सूक्ष्मजीव, वनऔषधी, गवत प्रजाती यांची समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते.

शिवसांब घोडकेंनी वनसंवर्धनाच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक सशक्त सामाजिक परंपरा रुजवल्या, ज्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने एक रोप, लग्नानंतर नववधू-वरांकडून वृक्ष लागवड, मुलगी जन्मल्यावर स्वागत म्हणून रोप आणि प्रिय व्यक्तींच्या स्मृतीनिमित्त वृक्ष लागवड करवून घेतली. या चळवळीत सहभागी विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका व ग्रंथालयात प्रवेश उपलब्ध करून देत शिक्षण आणि निसर्ग-जागरूकता यांचा अद्वितीय संगम घोडकेंनी साधला आहे. घोडकेंनी गावात पहिली स्टील प्लेट बँक सुरू करून प्लास्टिकमुक्त उपक्रमाला गती दिली. त्यांनी स्वतः संकलित केलेल्या ३५० पेक्षा जास्त औषधी बीजांची ‘सीड बँक’ उभारली आहे. आत्तापर्यंत माळाकोळी पोलीस ठाण्यात पाच हजार रोपांची लागवड त्यांनी केली आहे. लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतही त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. आतापर्यंत ६७ पेक्षा जास्त शाळा-विद्यार्थ्यांनी या नंदनवनाला भेट दिली आहे.

बी. एस्सी व वनस्पतिशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणानंतर घोडके सध्या दुर्मीळ वनस्पतींवर पीएच.डी. करत आहेत. त्यांचं ‘नांदेडची वनसंपदा’ हे पुस्तक वन विभागाने प्रकाशित केलं आहे. तसेच राज्य सरकारचा सुवर्णपदकासह राज्यस्तरीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. याचबरोबर ‘ट्री मॅन ऑफ पानभोसी’, ‘राष्ट्रनिर्माता पुरस्कार’ यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. एक व्यक्ती- एक दिवस- एक रोप अशा पद्धतीने सातत्याने केलेल्या प्रयत्नांतूनच हरित भारताचं स्वप्न साकार होईल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. दररोज एक रोप लागवड ही केवळ मोहीम नाही, तर एक विचार, संस्कार आणि राष्ट्राच्या हरित भविष्यासाठी आवश्यक असलेलं सामूहिक उत्तरदायित्व आहे, असंही शिवसांब घोडके सांगतात. त्यांचा हा विश्वास, निसर्गप्रेमाबरोबरच निष्ठेने त्यासाठी कार्य करत राहणं यातून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.