अर्थपूर्ण बंधन!!

आत्तापावेतो आंघोळीचा साबण हा भेटवस्तूंच्या यादीत स्थान पक्का करता झाला आहे.

राखी पौर्णिमा साजरी करताना भावाला आकर्षक व ट्रेंडी राखी बांधावी याकडे तरुणींचा कल दरवर्षी असतो. हाच कल पाहता ऑनलाइन व ऑफलाइन बाजारात वेगवेगळ्या स्वरूपातील राख्यांची रेलचेल सुरू झाली आहे.

मितेश रतीश जोशी

नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. रक्षाबंधनाच्या या सणासाठी हल्ली दरवर्षी पारंपरिक राख्यांपेक्षा काहीतरी हटके कलाकुसर असलेल्या राख्यांचा ट्रेण्ड बघायला मिळतो. हा हटके  राख्यांचा ट्रेण्ड यंदाही बघायला मिळत असून टाळेबंदीमुळे मिळालेल्या रिकाम्या वेळेचा फायदा घेत अनेक तरुणींनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर राखीचे वेगवेगळे अवतार डिझाइन के ले आहेत. या वैविध्यपूर्ण राख्या सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. साबणाच्या राखीपासून ते नवसर्जनाची प्रेरणा देणाऱ्या वनस्पती राखीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या या हटके ट्रेंडच्या यादीत आल्या आहेत. के वळ दिसायला सुंदर इतपतच मर्यादित न राहता नवे विचार देणारे वा उपयुक्त ठरेल असे काही त्या राखीशी जोडण्याचा प्रयत्न तरुणाईने के लेला दिसून येतो आहे.

आत्तापावेतो आंघोळीचा साबण हा भेटवस्तूंच्या यादीत स्थान पक्का करता झाला आहे. एखाद्या सणाच्या निमित्ताने हॅण्डमेड साबण गिफ्ट करण्यात येतात, मात्र या साबणाने चक्क रक्षाबंधनाच्या सणातही नव्याने प्रवेश के ला आहे.  ‘साबणाची राखी’ नामक हटके  प्रकार पुण्यातील रश्मी देशमुख यांनी बाजारात आणला आहे. त्या गेली काही वर्षे हॅण्डमेड १०० टक्के  नैसर्गिक साबण बनवतात. दरवर्षी वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने हे हॅण्डमेड साबण वेगवेगळ्या रूपात त्या विकत असतात. या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी साबणालाच राखीचे रूप दिले आहे. याबद्दल रश्मी सांगते, हा साबण १०० टक्के  कोरफडीपासून बनवला आहे. या साबणाच्या आत जे वेगवेगळे छोटे छोटे कार्टून्स आहेत ते खोडरबर आहेत. या राखीचे दोन फायदे आहेत. ही राखी वापरून झाल्यावर त्यावर असलेला  साबण कोणीही वापरू शके ल. तसेच या साबणाच्या आत दडलेला खोडरबरही पुढे मुलं वापरू शकतील. रश्मीच्या या हटके राखीला चोखंदळ पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

‘चंदना क्रिएशन्स’ या स्वत:च्या बॅनरखाली फू ड मिनिएचर आर्टिस्ट चंदना रानडे पुंडे यांनी फुडी फ्रीज मॅग्नेट राख्या तयार केल्या आहेत. लहानपणापासूनच चंदना वेगवेगळ्या राख्या घरीच तयार करायची. त्यातूनच तिला फूड मिनिएचर आर्टची वाट सापडली. आपल्या भावाच्या आवडीचा पदार्थ राखीच्या रूपात भेट देण्याची संकल्पना मी गेल्या वर्षीपासून राबवते आहे, असे चंदना सांगते. या राख्यांना ग्राहकांचा छान प्रतिसाद आहे. ही राखी पॉलिमर क्लेपासून बनवली जाते. त्यावर कुठेही पेंटिंग केलेलं नाही, शिवाय ही राखी पूर्णपणे हाताने बनवलेली आहे, अशी माहिती तिने दिली. ही राखी नंतर फ्रीज मॅग्नेट म्हणून वापरता येते. शिवाय ती पाण्याने स्वच्छ धुता येत असल्याने ती टिकाऊही आहे. एकदा हातावर बांधलेल्या या अनोख्या राखीच्या माध्यमातून बहिणाबाईंचे प्रेम बंधुराजे अनेक वर्षे जतन करून ठेवू शकतात. या राख्यांमध्ये लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना आवडतील अशा व्हेज – नॉनव्हेजच्या पदार्थाच्या प्रतिकृती डिझाइन के लेल्या पाहायला मिळतात.

पर्यावरणाचा विचार यंदा राखीच्या निर्मितीतही के लेला पाहायला मिळतो. ‘फ्रीहँड क्रिएशन्स’च्या दीपा लिमये यांनी ‘प्लँटेबल राखी’ बाजारात आणली आहे. या राखीचे वैशिष्टय़ सांगताना दीपा म्हणते, या पारंपरिक लोकरीच्या राखीच्या मधोमध निळ्या गोकर्णाच्या बिया ठेवल्या आहेत. राखी ऑर्डर केल्यावर कोकोपिट, माती, ग्रीटिंगकार्ड व राखीचा समावेश असलेला सुंदर बायोडिग्रेडेबल बॉक्स तुमच्या घरी येतो. राखी पौर्णिमेनंतर तुम्ही याच बॉक्समध्ये आम्ही दिलेल्या मातीचे मिश्रण टाकोयचे. त्यात संपूर्ण राखी किंवा त्यामधील नुसत्या बिया काढूनही तुम्ही या मातीच्या मिश्रणात टाकू शकता. बरेच जण राखी विकत घेतात, पण बी रुजवण्याची प्रक्रिया विसरून जातात. त्याचा विसर पडू नये म्हणून आम्ही माती व बॉक्ससकट राखी पाठवतो, असं दीपा सांगते. या राखीच्या किटमधील एकही गोष्ट कचऱ्यात न जाता थेट निसर्गात जाते, असं ती विश्वासाने सांगते. बहीण-भावांच्या नात्याला दिलेली ही हिरवी किनार ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहे.

या आधुनिक राख्यांबरोबरच पारंपरिक ठेवा जपणाऱ्या राख्यासुद्धा बाजारात आल्या आहेत. पुण्याच्या मधुरा देशपांडे या तरुणीने पारंपरिक खणाच्या राख्या बनवल्या आहेत. मधुराला पारंपरिक खणाच्या कापडापासून पुरुषांसाठी दागिना करावा ही इच्छा होती .त्यासाठी तिने राखीचा आधार घेतला. खणाच्या वेगवेगळ्या रंगांमध्ये गणपती, ओम वा स्वस्तिक अशा शुभचिन्हांकित राख्या तिने डिझाइन के ल्या आहेत. खणाच्या कापडापासून बनवलेल्या या राख्याही आवडीने खरेदी के ल्या जात आहेत.

साबणाच्या राखीप्रमाणे चॉकलेटची राखीही सध्या भावाबहिणींमधील प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी उपलब्ध झाली आहे. अनेक घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणींनी ही खास चॉकलेट राखी बाजारात उपलब्ध करून दिली आहे. तर इतर सगळ्या गोष्टींप्रमाणे सध्या राखीलाही डिजिटल स्पर्श झाला आहे. भावाबहिणींचे फोटोज असलेल्या राख्या डिजिटल स्टुडिओमध्ये डिझाइन करून दिल्या जात आहेत. खण, साबण, चॉकलेट या दैनंदिन गोष्टींचा कल्पकतेने राखीत समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राखीच्या माध्यमातून व्यक्त झालेले हे प्रेमबंध निसर्गाच्या साथीने दृढ करण्याची कल्पनाही पर्यावरण विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रेरक ठरणारी आहे. राखीमागच्या या विविध कल्पना आणि विचार हे रक्षाबंधनाच्या सणाला नवविचारांची जोड देणारे, हे क्षण अधिक अर्थपूर्ण करणारे आहेत.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narali purnima raksha bandhan rakhi festival brother sister love ssh

ताज्या बातम्या