scorecardresearch

तंदुरुस्तीचा आहार मंत्र

सध्याच्या सतत बदलत राहणाऱ्या दिनचर्येत एक गोष्ट जी आपण विसरतो आहोत ती म्हणजे योग्य आहार.

dietary changes in young generation
(संग्रहित छायाचित्र)

वैष्णवी वैद्य मराठे

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात तरुणाईचा बराचसा कल पौष्टिक आणि निरोगी आहाराकडे झुकला आहे. विशेषत: करोनानंतर प्रत्येकाच्या संपूर्ण जीवनशैलीतच आमूलाग्र बदल झालेले पाहायला मिळत आहेत. निरोगी आणि दर्जेदार जीवन आयुर्मान याचे सगळय़ांना महत्त्व पटलेले आहे. सध्याच्या सतत बदलत राहणाऱ्या दिनचर्येत एक गोष्ट जी आपण विसरतो आहोत ती म्हणजे योग्य आहार. त्याचे अनुमान, मर्यादा आणि दर्जा हे जर आपल्याला नीट जमले तर नक्कीच निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. सध्या ‘नॅशनल न्यूट्रीशन वीक’ चालू आहे. यानिमित्ताने सुपोषित भारत, सशक्त भारत अशा मोहिमा राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्या पिढीने आहाराच्या बाबतीत केलेले बदल, त्यांचे विचार नक्की काय आहेत त्याबद्दल घेतलेला हा आढावा.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

शुद्ध शाकाहारी आहार (विगन फूड) हा उपयुक्त आहे का?

या पद्धतीचा आहार आता फक्त काही समुदायांपुरता मर्यादित राहिलेला नाही. सिनेस्टार्स किंवा स्पोर्ट्स सेलिब्रिटीजना फॉलो करत बरेचसे तरुण आता विगन प्रकारचा शाकाहारी आहार पसंत करतात. हा आहार नेहमीच्या शाकाहारी अन्नापेक्षा थोडा वेगळा असतो. याला सामान्य भाषेत वनपस्ती आधारित आहार (प्लांट-बेस्ड डाएट) असेही म्हणतात. बरेचसे धावपटू आणि क्रीडा खेळाडूंनी ही आहारपद्धती स्वीकारली आहे. क्रीडा पोषण आणि आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत-पटवर्धन सांगतात, ‘आपण एखाद्यामुळे प्रभावित होऊन जेव्हा डाएट करतो तेव्हा त्या व्यक्तीचे राहणीमान कसे असते हेसुद्धा पाहिले पाहिजे. खरे तर विगन फूड हे आपल्या शरीराला परिपूर्ण नाही. आपण एका विशिष्ट अन्नचक्राचा भाग आहोत, जेव्हा आपण त्यातला एक घटकच पूर्ण नष्ट करतो तेव्हा ते आपल्यासाठी घातकच असते. विगन फूडमुळे बी-१२ कमतरता, इतर व्हिटॅमिनची कमतरता अशा समस्या तुम्हाला भासू शकतात’. तर आहारतज्ज्ञ नम्रता विभुते सांगतात, ‘विगन फूड वाईट नाही, काही लोकांची आवड किंवा काही लोकांच्या धर्मात तसा आहार असतो, पण त्यातून परिपूर्ण पोषण मिळण्यासाठी तुम्हाला नियोजन करणे आवश्यक आहे. कारण व्हिटॅमिन डेफिशिअन्सी झाली तर तेही तुमच्या शरीरासाठी घातक आहे’.

हेही वाचा >>> साठवणीतील भेट

पोषणयुक्त आहार म्हणजे काय आणि तो का केला पाहिजे?

सध्या कॅलरीज हा शब्द अगदी सहज आपल्याला ऐकायला मिळतो. या कॅलरीज वाढायला नकोत अशा भीतीने आपण आज परिपूर्ण अन्न सेवन करणेच विसरलो आहोत. शाळेत असताना विज्ञानात आपण एक धडा शिकलो, संतुलित आहार (बॅलन्सड डाएट) म्हणजेच प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, काबरेहायड्रेट्स अशी सगळय़ा प्रकारची पोषणतत्त्वे आहारातून मिळवणे. ‘फळे, भाज्या, धान्य, डाळी यामधून तुम्हाला पोषण तत्त्वे मिळतात. अशा पद्धतीच्या आहारामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होते. तसेच टाइप २ डायबेटीस, काही प्रकारचे कॅन्सर, हाडांचे आजार यांपासून तुम्ही दूर राहता. आपल्याकडे असे सहज म्हटले जाते की अमुक अमुक भाजीत इतके इतके पोषण असते, परंतु ती भाजी कच्ची असते तेव्हाची पोषणमूल्ये आणि त्यावर चिरणे, शिजवणे या प्रक्रिया केल्यावर त्यामधली पोषणमूल्ये यात फरक असतो. म्हणूनच तुमच्या शरीराला सगळय़ा प्रकारची पोषणमूल्ये मिळणे अत्यावश्यक आहे’ असेही आहारतज्ज्ञ पल्लवी सांगतात. तरुणांचा कामाचा वेळ, वेग आणि गरजही भरपूर आहे. आज आपण पाहिले तर जवळपास १०-१२ तास वर्किंग अवर्स असतात. इतक्या वेळात आपले तन, मन, डोके सगळेच फ्रेश राहायला हवे. म्हणूनच आहारतज्ज्ञ पल्लवी सांगतात, १८ वर्षांवरील वयोगट म्हणजे जेव्हा शरीराची भरपूर हालचाल आणि बांधणी होत असते, याच वेळी तरुणांचा आहार हा परिपूर्ण आणि सगळी पोषणतत्त्वयुक्त असायला हवा. थोडक्यात काय तर या वयात तुम्ही जे कराल त्याचे चांगले-वाईट परिणाम उर्वरित वयात तुम्हाला पाहायला मिळतील.

डिटॉक्स म्हणजे काय?

सरळ भाषेत डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीराची आतून स्वच्छता करणे. आपण अनेक वेगवेगळय़ा पदार्थाचे वेळी-अवेळी सेवन करत असतो. काही पचतात तर काही पचत नाहीत. ज्याने विविध आजार भविष्यात आपल्याला होऊ शकतात. म्हणून आठवडय़ातून एकदा किंवा आहारतज्ज्ञ / डॉक्टर यांचा सल्ला घेऊन तुम्ही बॉडी डिटॉक्स करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त पातळ आणि पचायला हलके पदार्थ – पाणी, फळे, भाज्या (स्टॉक), ज्यूस, सूप्स अशा आहाराचे सेवन करायचे असते. हे रोजच्या जेवणापासून शरीराच्या स्वच्छतेसाठी थोडा ब्रेक आणि जेवणाव्यतिरिक्त केलेला प्रयोग आहे म्हणून फक्त आणि फक्त डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे करणे गरजेचे आहे. प्रत्येक शरीर, त्याची गरज, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असते हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याच मुद्दय़ावर आहारतज्ज्ञ नम्रता विभुते सांगतात, ‘तुम्ही पौष्टिक अन्न खाताय याचा अर्थ तुम्ही डाएट करताय असे नाही. खाण्यापिण्याच्या वेळा, प्रमाण, त्यातून दिवसभरासाठी मिळणारी एनर्जी याचा ताळमेळ साधता आला पाहिजे. तसेच बऱ्याच लोकांचा समज असतो, कमी खाल्ले की वजन कमी होते, ते अगदी शंभर ट्क्के चुकीचे आहे. तुमच्या शरीराला जेवढी भूक आहे तेवढे तुम्ही खायलाच हवे, नाहीतर त्याचा उलट परिणाम शरीरावर होतो. तुम्ही जे खाताय त्याचा बॅलन्स साधणे फार गरजेचे आहे’. शरीराला जास्तीत जास्त पाणी मिळत राहणे हा कुठल्याही आहारातील सगळय़ात महत्त्वाचा मुद्दा आहे हे दोन्ही आहारतज्ज्ञांनी अगदी आग्रहाने सांगितले. शरीर हायड्रेटेड असेल तर तुम्ही अगदी निरोगी राहू शकता.

हेही वाचा >>> आधी फोटोबा

साखर चांगली की वाईट?

सेलिब्रिटीजकडून इन्फ्लुएन्स करणारा हा अजून एक प्रकार. हल्लीच्या तरुण पिढीला साखरेची भीती वाटायला लागली आहे. सगळेच पदार्थ त्यांना विदाऊट शुगर हवे असतात, पण त्याचाही अतिरेक घातक ठरू शकतो. नम्रता विभुते याबद्दल सांगतात, ‘साखरेचे सेवन सगळय़ांनीच कमी केले पाहिजे, परंतु काही विशिष्ट पदार्थामधून किंवा आहारामधून जसे की कोल्ड ड्रिंक्स व प्रिझव्‍‌र्हेटिव्ह ज्युसेस या माध्यमातून मिळणाऱ्या साखरेपासून वजनवाढ, दाढदुखी, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होणे अशा समस्या तुम्हाला येऊ शकतात’. 

नवे माध्यम आणि तंत्रज्ञानामुळे तरुणवर्ग पोषक आहाराबद्दल सजग होऊ लागला आहे. माहितीचे वेगवेगळे पर्याय, साधने, इतर लोकांचा प्रभाव अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे तरुण वर्गाचा कल पोषक आहाराकडे झुकला आहे. आहारतज्ज्ञांच्या मते हे चांगले आहे, परंतु आपल्यासाठी काय आणि किती गरजेचे आहे हे आपणच विचारपूर्वक ठरवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हे वर्ष मिलेट इअर म्हणून साजरे केले जात आहे, यानिमित्ताने सरकारसुद्धा अनेक वेगवेगळय़ा योजना, प्रकल्प राबवत आहे. ज्यातून पौष्टिक आहार, प्रादेशिक आहार याचे महत्त्व सांगितले जात आहे. थोडक्यात काय तर आपण माणूस म्हणून, देश म्हणून कितीही प्रगती केली तरीही आपल्या मुळांशी जोडलेले राहणे आवश्यकच आहे हे समजून घेतले पाहिजे. ते राहण्यासाठी आहार हा सगळय़ात मोठा दुवा आहे. सगळेच आहारतज्ज्ञ पूर्वीची पिढी, त्यांचा आहार, त्यांची दिनचर्या किती समर्पक होती हे सांगतात आणि आजच्या तरुणाईने ते समजून घेतले पाहिजे असा आग्रहही ते धरतात. करोनासारख्या वैश्विक आजारामुळे का होईना तरुण पिढीने आपल्या आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यास सुरुवात केली आहे हेही स्वागतार्हच आहे. viva@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2023 at 05:06 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×