नुकताच २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. विकसित भारताच्या प्रवासाला गती देणाऱ्या महिला वैज्ञानिकांना यंदाचा राष्ट्रीय विज्ञान दिन समर्पित करण्यात आला आहे. या निमित्ताने विज्ञानाच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव होईल आणि शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या विज्ञानक्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणाही मिळेल.
नासाच्या लँग्ले रिसर्च सेंटरमधला तो एक अत्यंत तणावाचा दिवस. अंतराळातून पृथ्वीवर परतणाऱ्या कॅप्सूलचे अचूक अवतरण नेमके कुठे होणार, याचे गणित काही केल्या सुटत नाही. नियंत्रण कक्षात सगळे पुरुष वैज्ञानिक आकड्यांच्या जंजाळात अडकलेले. वेळ हातातून निसटत चाललेली आहे. अशा निर्णायक क्षणी गणितज्ञ कॅथरीन जॉन्सन आत्मविश्वासाने पुढे येते. फळ्यावर वेगाने उमटणाऱ्या खडूच्या रेषांमधून ती अवघड समीकरणांची गाठ सोडवते. आकडे जुळतात, आणि अंतराळवीर सुरक्षित परतण्याची खात्री निर्माण होते. फक्त महिला आणि त्यातही कृष्णवर्णीय म्हणून आजवर दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रीची ही बुद्धिमत्ता निर्णायक ठरते. सत्य घटनेवर आधारित ‘हिडन फिगर्स’ या गाजलेल्या चित्रपटातील हे दृश्य विज्ञानाच्या इतिहासात दडलेल्या अशा अनेक ‘अदृश्य’ योगदानांची आठवण करून देते.
विज्ञान हे पारंपरिकपणे पुरुषप्रधान क्षेत्र मानले गेले असले, तरी अनेक महिला वैज्ञानिकांनी विज्ञानाच्या जवळजवळ प्रत्येक प्रमुख शाखेत अमूल्य आणि दूरगामी योगदान दिले आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटीच्या संशोधनातून आधुनिक अणुविज्ञानाला दिशा देणाऱ्या मेरी क्युरी पासून ते डीएनएच्या संरचनेचा उलगडा करणाऱ्या रोझालिंड फ्रँकलिनपर्यंत, विज्ञानाचा इतिहास महिलांच्या बुद्धिमत्तेने समृद्ध झाला आहे. संगणक विज्ञानात पहिली प्रोग्रॅमर मानल्या जाणाऱ्या अडा लव्हलेस यांनी डिजिटल युगाची बीजे रोवली, तर पर्यावरणशास्त्रात रेचल कार्सन यांच्या लेखनामुळे पर्यावरण चळवळीला जागतिक चालना मिळाली. अंतराळ विज्ञानात कॅथरीन जॉन्सन यांच्या अचूक गणनांनी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या, तर वैद्यकीय विज्ञानात तू यूयू यांच्या संशोधनामुळे मलेरियावरील प्रभावी औषध उपलब्ध झाले.
सुरुवातीच्या काळात लिंगभेद, संस्थात्मक अन्याय आणि सामाजिक मर्यादा अशा अनेक अडथळ्यांवर मात करत त्यांनी संशोधनाची नवी दारे उघडली. अनेकदा त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी लेखले गेले किंवा योग्य श्रेय नाकारले गेले; तरीही त्यांच्या शोधांनी आधुनिक वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणीय अभ्यास आणि इतर अनेक क्षेत्रांचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. या सर्व योगदानाची नव्याने उजळणी करण्याचे निमित्त म्हणजे यावर्षीची राष्ट्रीय विज्ञान दिन थीम होय. ‘Women in Science: Catalysing Viksit Bharat’ या संकल्पनेतून विकसित भारताच्या प्रवासाला गती देणाऱ्या महिला वैज्ञानिकांना यंदाचा राष्ट्रीय विज्ञान दिन समर्पित करण्यात आला आहे.
२८ फेब्रुवारी हा दिवस देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, १९२८ मध्ये भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी प्रकाशाच्या विकिरणासंदर्भातील आपला महत्त्वपूर्ण शोध – रामन परिणाम जाहीर केला. या मूलभूत संशोधनासाठी त्यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्देश केवळ वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे एवढाच नाही, तर समाजाच्या सर्व स्तरांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, प्रश्न विचारण्याची सवय वाढवणे आणि अंधश्रद्धेऐवजी विवेकाला प्रोत्साहन देणे हाही या दिवसाचा महत्त्वाचा हेतू आहे. आणि या वर्षीच्या विषयातून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या महिला वैज्ञानिकांचा सन्मान तर होईलच पण तरुणींना विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यास प्रेरणादेखील मिळेल.
भारतीय विज्ञानाच्या इतिहासात महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १८८६ मध्ये आनंदीबाई गोपाळराव जोशी अमेरिकेत वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९३९ मध्ये कमला सोहोनी विज्ञानात पीएच.डी. मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेताना फक्त महिला म्हणून प्रवेश नाकारल्यावर त्यांनी दिलेल्या लढ्यातून महिलांसाठी वैज्ञानिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला. पुढे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेवर कमलांनी ‘नीरा’ या पेयातील घटकांचा अभ्यास केला, ज्यामुळे आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन व गर्भवती महिलांसाठी स्वस्त, पूरक आहार तयार करता आला आणि आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्यांच्या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेले.
१९४३ साली अय्यलसोमयाजुला ललिता या पहिल्या महिला अभियंता बनल्या, त्यांनी पुरुषप्रधान अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांसाठी वाट सुकर करून दिली. जानकी अम्माल यांनी वनस्पतीशास्त्रात आणि जनुकीय संशोधनात नेतृत्व करत गोड उसाच्या नवीन जाती तयार केल्या. रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी यांनी औषधनिर्मितीत, विशेषतः मलेरिया आणि अपस्मार यांच्या औषधांमध्ये महत्त्वाचे संशोधन केले. अन्ना मणी भारतातील हवामानशास्त्र आणि ओझोन मापन यंत्रणा क्षेत्रात अग्रणी ठरल्या. राजेश्वरी चॅटर्जी यांनी मायक्रोवेव्ह आणि अँटेना अभियांत्रिकी क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कमल रणदिवे यांनी मुंबईतील इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये भारतातील पहिली टिशू कल्चर रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली. इरावती कर्वे पहिल्या भारतीय महिला मानववंशशास्त्रज्ञ ठरल्या, त्यांनी १९६३ मध्ये पुणे विद्यापीठात मानववंशशास्त्र विभागाची स्थापना केली. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. या आणि अशा अनेक महिलांनी विज्ञानाच्या विविध शाखांत लक्षणीय कामगिरी करत देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला गती दिली, तसेच समाजापुढे आदर्श प्रस्थापित करून नव्या पिढीतील तरुणींना विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात प्रवेश करण्याची प्रेरणा दिली. याच परिणामस्वरूप आज विज्ञान संशोधन संस्था आणि वैज्ञानिक क्षेत्रांत महिलांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ अग्रेसर आहे. भारताची रॉकेट वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ रितू करीधल यांनी ‘मार्स ऑर्बिट मिशन’च्या उपसंचालक आणि ‘चांद्रयान २’ या मोहिमेच्या प्रकल्प संचालक म्हणून समर्थपणे जबाबदारी पार पाडली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञ- ‘रॉकेट वुमन’ टेसी थॉमस यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्रोच्या विविध मोहिमा यशस्वी करण्यात मुथय्या वनिता, अनुराधा टी. के., मौमिता दत्त, नंदिनी हरिनाथ, मीनल रोहित, कृती फौजदार अशा किती तरी महिला वैज्ञानिक अग्रेसर आहेत. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी गेल्या वर्षी म्हटल्याप्रमाणे, इस्रोच्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा वाटा सुमारे २० टक्के आहे आणि लवकरच हे प्रमाण ४०% हून अधिक होण्यासाठी इस्रो प्रयत्नरत आहे.
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील पुलाच्या निर्मितीमध्ये मुख्य भू-तांत्रिक सल्लागार प्रोफेसर जी. माधवी लता यांनी तब्ब्ल १७ वर्षे काम करून जगातील रावत उंच रेल्वे पूल निर्माण करून दाखवला आहे. डॉ. गगनदीप कांग यांनी लशीविषयक संशोधनातून सार्वजनिक आरोग्यासाठी जागतिक स्तरावर मोठे योगदान दिले आहे. संगणकशास्त्रज्ञ ‘निरामयी हेल्थ ॲनालिटिक्स’च्या संस्थापक डॉ. गीता मंजुनाथ स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी एआय-आधारित थर्मल इमेजिंग विकसित करत आहेत. आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांनी स्थानिक पातळीवर नामशेष होऊ पाहणाऱ्या ‘हरगिला’ ( ग्रेटर ॲडज्युटंट स्टोर्क ) या नामक पक्ष्याच्या संवर्धनासाठी मोठे कार्य केले आहे. याची दखल घेत त्यांना टाइम्स मासिकाचा ओमन ऑफ द इयर -२०२५ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
नासा आणि इस्रोच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी याविषयी बोलताना, संशोधन करण्यासाठी आवश्यक असणारे चिकाटी, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, संयम हे गुण महिलांमध्ये उपजतच असतात, असं सांगतात. ‘दीर्घकाळ सातत्याने काम करणे, समस्येच्या मुळाशी जाणे, विविध अंगांनी विचार करणे या बाबींमध्ये महिलांची क्षमता ठळकपणे दिसून येते. जगभरातील अनेक महिला शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की, योग्य संधी मिळाल्यास महिला विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतातच, पण नवे मानदंडही निर्माण करतात. भारतही याला अपवाद नाही. इस्रो हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेच, पण इतरही अनेक वैज्ञानिक संस्थांत महिला वैज्ञानिक आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. महिलांच्या या वाढत्या वैज्ञानिक सहभागात शासकीय पर्यटनाचाही मोलाचा वाटा ठरतो आहे’, असेदेखील त्या नमूद करतात.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शालेय स्तरापासून ते संशोधनाच्या विविध टप्प्यांपर्यंत भारत सरकारद्वारे अनेक योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मुलींमध्ये विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रुची निर्माण करण्याच्या दृष्टीने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे ‘विज्ञान ज्योती’ हा उपक्रम महत्वपूर्ण ठरतो आहे. याद्वारे विशेषतः ग्रामीण भागातील ९ ते १२ वी इयत्तेतील गुणवंत विद्यार्थिनींसाठी विज्ञान शिबिरे, मार्गदर्शन व्याख्याने, शास्त्रज्ञांसोबत थेट संवाद, प्रयोगशाळांना भेटी असे विविध उपक्रम राबवले जातात. २७ ते ४५ वयोगटातील महिलांना मूलभूत आणि उपयोजित विज्ञानांमध्ये संशोधन करण्यासाठी WISE पीएच.डी.फेलोशिपद्वारे आर्थिक साहाय्य केले जाते. तर WISE पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपद्वारे पीएचडीनंतरच्या कारकीर्दीत संशोधनात सातत्य राखण्यास मदत होते आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रात संशोधन करणाऱ्या वरिष्ठ महिला शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी WIDUSHI (Women’s Instinct for Developing and Ushering in Scientific Heights & Innovations) हा उपक्रम आखला जातो आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, वैयक्तिक कारणे किंवा इतर अडथळ्यांमुळे संशोधनापासून काही काळ दूर राहिलेल्या महिलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी Women Scientist Scheme-A (WOS-A) ही योजना मदत करते आहे.
फक्त शासन नाही तर अनेक अशासकीय संस्थादेखील विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देत आहेत. विज्ञान भारतीचा ‘शक्ती’ उपक्रम याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. विज्ञान भारतीच्या डॉ. मानसी माळगावकर याविषयी सांगतात,‘शक्ती हे महिला वैज्ञानिक, विद्यार्थिनी आणि संशोधक यांच्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ आहे. ‘शक्ती विज्ञान संवाद’सारखी संमेलने तसेच विविध विषयांवरच्या कार्यशाळा, चर्चासत्रे आयोजित करून विज्ञानाच्या विविध शाखांत कार्यरत महिलांना एकमेकांना भेटण्याची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. शक्तीद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील युवतींना विविध स्तरीय प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते’.
या अशा विविध प्रयत्नांतून महिलांना विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी आवश्यक संधी, पाठबळ आणि आत्मविश्वास मिळतो आहे. परिणामी भारतीय विज्ञान अधिक समावेशक, सशक्त आणि नावीन्यपूर्ण होत असून देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळत आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या मध्यवर्ती विषयाच्या निमित्ताने ही प्रेरणा अधिक बळकट होईल यात शंका नाही.
