आजची तरुणाई केवळ शिक्षण आणि नोकरी इतपत मर्यादित राहिलेली नाही. नवनवीन ठिकाणं पाहणं, वेगळे अनुभव घेणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं हे तरुण पिढीसाठी प्रमुख आकर्षण ठरतं आहे. मात्र, पर्यटन म्हणजे फक्त फिरणं नव्हे; तर अनुभव, रोजगार आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारं ते प्रभावी माध्यम आहे. ‘नॅशनल टुरिझम डे’च्या निमित्ताने तरुणाईची पर्यटनासंदर्भातली ही बदलती भूमिका समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

आज पर्यटन क्षेत्र झपाट्याने वाढतं आहे आणि त्यात सर्वाधिक सहभाग तरुणांचा दिसतो. आंतरराष्ट्रीय सहलींपेक्षा आपल्या देशातील समुद्रकिनारे, जंगल सफारी, डोंगररांगा आणि ऐतिहासिक किल्ले अनुभवणं ही तितकीच समृद्ध अनुभूती ठरू शकते, याची जाणीव आता तरुणांना होऊ लागली आहे. ट्रेकिंग, कॅम्पिंग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, जंगल सफारी अशा विविध प्रकारच्या पर्यटनांतून तरुणांची केवळ करमणूकच होते असं नाही, तर आत्मविश्वासही वाढतो. शिस्तही अंगी बाणली जाते आणि निसर्गाशी जवळीकही साधायला मिळते, असा तरुणाईचा अनुभव आहे.

प्रवासामुळे वेगवेगळ्या संस्कृती समजतात, संवाद वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. याचबरोबरीने पर्यटन हे मोठं रोजगारनिर्मितीचं क्षेत्रही बनतं आहे. टूर गाइड, होमस्टे, स्थानिक हस्तकला, शेतीपूरक व्यवसाय, फोटोग्राफी, ट्रॅव्हल कंटेंट क्रिएशन अशा अनेक संधी यातून निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अनुभवसंपन्न प्रवासातून तरुणांना केवळ आनंदच नाही, तर त्यावर आधारित उद्योग उभारण्यासाठी प्रेरणा मिळते आहे. निसर्गाशी असलेलं त्यांचं नातं अधिकच घट्ट होत आहे.

पर्यटन आणि उद्योग यांची यशस्वीपणे सांगड घालणार्‍या तरुण उद्योजकांपैकी एक उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पंचनदी गावातील मयूरेश श्रीनिवास मोडक. दहावीनंतर इंजिनीअरिंगसाठी शहरात गेलेला मयूरेश शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीऐवजी पुन्हा गावाकडे परतला. शेती आणि निसर्ग यांची सांगड घालत त्याने २०२२ मध्ये ‘मनकुपी कॅम्पिंग अँड फार्म ऑफ पीस’ हा इको-टुरिझम उपक्रम सुरू केला.

पंचनदी धरणाच्या काठावर, जंगल व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या परिसरात त्यांनी आउटडोअर कॅम्पिंग, डिजिटल डिटॉक्स, जंगल ट्रेल्स, सेंद्रिय शेतीचा अनुभव, मुलांसाठी समर-विंटर कॅम्प्स, पक्षीनिरीक्षण, वनभोजन आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांची सुरुवात केली. मानसिक आरोग्यासाठी निसर्ग हा प्रभावी उपचार ठरू शकतो, या विचारातून त्याने ‘इको थेरपी’ अर्थात ‘फॉरेस्ट बाथिंग’ या संकल्पनेवर आधारित कॅम्प्सही सुरू केले. त्याचबरोबर कोकणात आढळणार्‍या संकटग्रस्त ‘कोकण दीपकाडी’ या फुलाच्या संवर्धनासाठी मयूरेशने मनकुपी येथे छोटी रोपवाटिकाही उभारली आहे. ‘निसर्ग टिकला तरच पर्यटन टिकेल आणि कोकण टिकेल’, हीच त्याची भूमिका आहे.

असाच आणखी एक सकारात्मक प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास गावात सुरू आहे. कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात वैभवी संतोष जोशी हिने ‘पूर्णब्रम्ह होमस्टे’च्या माध्यमातून गावकेंद्रित पर्यटनाला चालना दिली आहे. एम.ए., एलएलबी शिक्षण पूर्ण करून सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम करणार्‍या वैभवीने शहरातील नोकरी सोडून पुन्हा गावाकडे वळण्याचा निर्णय घेतला. वेळास हे सुमारे अडीचशे घरांचं छोटंसं गाव असून येथे सुंदर समुद्रकिनारा, नारळी-सुपारीच्या बागा आणि गेली २० वर्षे सुरू असलेला कासव महोत्सव हे प्रमुख आकर्षण आहे.

होमस्टेच्या माध्यमातून आलेल्या पर्यटकांना हॉटेलच्या चार भिंतींपलीकडे नेऊन गावचं जीवन अनुभवायला मिळावं म्हणून वैभवी प्रयत्न करते. केळीच्या पानावर जेवण, शेणाने सारवलेली घरं, पारावरच्या गप्पा, शेतीचं काम, पक्षीनिरीक्षणाचा अनुभव आणि गावची शुद्ध हवा हे सगळं तिथे येणार्‍या पर्यटकांना अनुभवायला मिळतं. त्याच जोडीला सुमारे दोनशे वर्षे जुना वाडा वैभवीने जपला आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श ती घालून देते आहे. शहरात कोंडलेल्या माणसांना मोकळा श्वास घेण्याची संधी देणं, हेच तिच्या या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.

अर्थात, पर्यटनाबरोबर काही समस्यांनाही तोंड द्यावं लागतं आहे, याकडेही तिने लक्ष वेधलं. वाढत्या पर्यटनाबरोबर पर्यावरणावरचा ताणही वाढतो आहे. कचरा, प्लास्टिक वापर, अनियंत्रित बांधकाम आणि गर्दीमुळे निसर्गाला धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे आज गरज आहे संवेदनशील आणि जबाबदार पर्यटनाची, असं मत ती व्यक्त करते. पर्यटनाच्या ठिकाणी कचरा न टाकणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणं आणि निसर्गाचा आदर राखणं ही प्रत्येक तरुण पर्यटकाची जबाबदारी असल्याचे वैभवी आग्रहाने सांगते.

पर्यटन म्हणजे केवळ परदेशी सहली नव्हेत. आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि अगदी आपल्या गावांच्या आसपासही निसर्ग, शांतता आणि समाधान देणारी असंख्य ठिकाणं आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासाला पर्याय म्हणून स्थानिक पर्यटन स्वीकारलं, तर खर्च कमी होतो, निसर्ग सान्निध्याचे अनुभव माणसाला समृद्ध करतात आणि स्थानिकांना रोजगारही मिळतो. आजची तरुणाई जर आपल्या मातीतलं हे सौंदर्य ओळखून, निसर्गाशी जोडलेलं पर्यटन स्वीकारेल, तर भटकंतीबरोबरच मानसिक समाधान-शांतता त्यांना अनुभवता येईल. निसर्ग जपला गेला, तरच पर्यटन टिकेल आणि गाव, संस्कृती तसेच पर्यावरण यांचं भविष्यही सुरक्षित राहील. त्यासाठी गावखेड्यातून तरुण पर्यटक उद्योजकांचे विविध पद्धतीने सुरू असलेले छोटे छोटे प्रयत्नही भविष्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडवतील अशी आशा करायला हरकत नाही.

viva@expressindia.com