– स्नेह एरंडे

आमच्या जेन झी पिढीतल्या अनेकांनी ‘नर्फ गन’ (Nerf gun) पाहिली आहे किंवा लहानपणी त्या गनसोबत खेळले आहेत. दिसायला ती गनसारखी असते. तिला ट्रिगर असतो, एम करायचं आणि समोरच्यावर शूटही करायचं, पण यात खर्‍या बुलेट्स नसतात. त्याऐवजी फोमचे मऊ डार्ट्स त्यात असतात. ते हलके असतात, फार लागत नाहीत, दुखत नाहीत आणि म्हणूनच घरात, अंगणात किंवा मित्रांसोबत खेळताना ही नर्फ गन मजेशीर वाटते. खर्‍या गनची कल्पनाच मुळात डेंजरस आहे, पण नर्फने त्याच गोष्टीचं मऊ, कमी धोकादायक आणि खेळण्यासारखं रूप बनवलं. आणि इथूनच येतो आजचा शब्द, ‘नर्फ्ड’ (Nerfed).

‘नर्फ्ड’ (Nerfed) म्हणजे एखाद्या गोष्टीची ताकद कमी करणं, तिचा प्रभाव कमी करणं किंवा तिला आधीपेक्षा कमी पॉवरफुल बनवणं. समजा क्रिकेटची मॅच सुरू आहे आणि त्यामध्ये आपल्या टीमकडे सगळ्यात चांगला बॅट्समन आहे, पण कॅप्टनने त्याला सगळ्यात शेवटी बॅटिंगला पाठवलं. मॅच हरल्यावर कुणीतरी म्हणालं, ‘‘कॅप्टनने आपली टीमच नर्फ केली.’’ म्हणजे आपल्या टीमकडे असलेली ताकद आपण स्वत:च कमी केली. दुसरं उदाहरण बघूया… एखादा मित्र खूप चांगलं प्रेझेंटेशन देतो, पण त्याला फक्त दोनच मिनिटं बोलायला दिलं गेलं. तेव्हा आपण म्हणू शकतो, ‘‘त्याला मर्यादित वेळ देऊन पूर्ण नर्फ केलं.’’ एखादा लॅपटॉप बॅटरीवर असताना त्याचा परफॉर्मन्स कमी होतो, एखाद्या प्लेयरवर काही रीस्ट्रिक्शन्स येतात किंवा एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी स्ट्रेंन्थ त्याला वापरू दिली जात नाही, अशा अनेक ठिकाणी ‘नर्फ’ हा शब्द सहज बसतो.

मला नर्फ्ड या शब्दातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते, तर हा शब्द नेमका आला कुठून…त्याचा अर्थ काय आहे, यापेक्षाही त्याची जन्मकथा अधिक रोचक आहे. ‘नर्फ’ हा एक टॉय ब्रँड आहे. या ब्रँडने धोकादायक दिसणार्‍या गोष्टीचं मऊ आणि खेळण्यासारखं रूप बनवायला सुरुवात केली. पुढे गेमिंगमध्ये या कल्पनेमागचा विचार हा एखाद्या गोष्टीची ताकद कमी करणं या अर्थाने वापरला जाऊ लागला. आणि आता आम्ही तोच शब्द रोजच्या बोलण्यातही वापरतो. भाषा कशी तयार होत जाते, याचं हे खूप छान उदाहरण आहे. आपल्याला भाषा फक्त पुस्तकं, शाळा किंवा डिक्शनरीमधून शिकायला मिळत नाही. आपण ज्या गोष्टींसोबत मोठे होतो, त्यातूनही आपली भाषा तयार होत जाते.

आमच्या जनरेशनसाठी टॉईज, गेम्स आणि इंटरनेट हे लहानपणापासून आयुष्याचे अविभाज्य आणि व्यापक भाग आहेत. माईनक्राफ्ट खेळताना आम्हाला लाकूड, दगड, लोखंड, कोळसा, हिरा यांचे वेगवेगळे उपयोग समजत गेले. गेम्समधूनच हेल्थ, डॅमेज, लेव्हल, अपग्रेड, रीस्पॉन, मिशन, मेन क्वेस्ट, साईड क्वेस्ट असे शब्द सतत कानावर पडत राहिले. मग हेच शब्द हळूहळू खेळातून बाहेर रोजच्या आयुष्यातही आले. आज एखादा माणूस खूप थकलेला असेल तर तो म्हणू शकतो, ‘‘आज माझी एनर्जी नर्फ्ड आहे.’’ एखाद्या रुलमुळे आपलं काम अवघड झालं तर आपण म्हणतो, ‘‘या रुलने आपल्याला नर्फ केलं.’’ एका फोम डार्टच्या टॉयपासून सुरू झालेला हा शब्द गेमिंगमध्ये काय वापरला गेला, तिथून तो इंटरनेटवर आला आणि आता रोजच्या बोलण्यात वापरला जातो. मग तुमचं काय? अलिकडे कुणी किंवा कशाने तुम्हाला नर्फ केलं आहे का?

viva@expressindia.com