ताल से ताल..

केवळ लोकप्रियतेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयोग असे दोन प्रवाह सध्या पाहायला मिळत आहेत..

(संग्रहित छायाचित्र)

गायत्री हसबनीस

प्रयोग करून एक वेगळा ट्रेण्ड सेट करणं हे तर आज वेगळंच गणित झालं आहे. वर्षांनुवर्षे संगीत, नृत्य, कला यात बदल होत आला आहे, तो अशा सतत होणाऱ्या प्रयोगांमधून.. नृत्य हे करमणुकीचे साधन आहे तसे ते विचार, आशय आणि संदेश पोहोचवण्याचेही साधन आहे. त्यामुळे एकीकडे त्यातील तंत्र समजून घेऊन केलेले प्रयोग करणे आणि केवळ लोकप्रियतेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयोग असे दोन प्रवाह सध्या पाहायला मिळत आहेत..

नृत्यकला जितकी आपल्याला स्वावलंबी बनवते तितकंच आपली स्वत:ची अशी एक वेगळी शैली त्यात निर्माण करण्यासाठी मोहातही पाडते. काही तरी नवीन, आपल्या कल्पनेच्याही पलीकडचे, पाहताच क्षणी मंत्रमुग्ध होण्याइतपत वेगळं तंत्र नृत्यात विकसित करणारे बरेच जण आज आपल्याला पाहायला मिळतील. पारंपरिक नृत्य प्रकारात आणि त्याच्या तंत्रात सुधारणा करणे किंवा तो नृत्य प्रकारच बदलणे असे प्रयोग करण्याची गरज फारशी जाणवलेली नाही, कारण आपल्याकडच्या पारंपरिक नृत्य प्रकारांचा पायाच इतका मजबूत आहे की, त्या नृत्य प्रकाराने निर्माण केलेला ताल आणि ठेका धरायला लावणारे नृत्य संगीत कोणीही मोडू शकत नाही. भारावून टाकण्याची किमया या पारंपरिक नृत्याने अबाधित ठेवली आहे. त्यात प्रयोग झालेच नाहीत, असे नाही, मात्र ते स्वतंत्र नृत्य प्रकार म्हणूनच नावारूपाला आले. ट्रॅडिशनल-वेस्टर्न फ्यूजन डान्स जे अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरले ते या पारंपरिक नृत्याला पर्याय म्हणून नाही तर स्वतंत्र नृत्य प्रकार म्हणून पाहिले जातात.

‘इंडियन क्लासिकल’ आणि ‘वेस्टर्न फ्यूजन डान्स’ किंवा ‘कन्टेम्पररी इंडियन क्लासिकल-वेस्टर्न फ्यूजन डान्स’ असे काही प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतील. नृत्यातील प्रयोगांनी देशोदेशी एक वेगळा ट्रेण्ड सेट केला आहे. त्यामुळे होतकरू डान्सर्सही सातत्याने काही ना काही प्रयोग करत वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करतात. आजच्या घडीला आपण केलेले नृत्यातील प्रयोग लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवणे सहज शक्य झाले आहे, पण त्यांचा उपयोग कधी कधी चांगल्या प्रकारे, तर कधी सवंग प्रसिद्धीसाठी केला जातो. ‘टिकटॉक’सारख्या अ‍ॅप्समुळे हौशी डान्सर्सना हक्काचा मंच मिळाला आहे, एका रात्रीत त्यांनी टाकलेले डान्सचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने ढोबळमानाने अतिरंजित आणि उडत्या चालीच्या नृत्य प्रकारांचे व्हिडीओ या अ‍ॅप्सवरून लोकप्रिय होतात. आता याला डान्समधील प्रयोग म्हणायचे का? प्रचलित नृत्य प्रकारांमध्ये काही वेगळ्या स्टेप्स बसवणे, नवीन तंत्राच्या आधारे सादरीकरण करणे हे प्रयोग योग्य की नृत्याचे कुठलेही तंत्र अवगत नसताना केवळ हौस म्हणून आणि काही तरी भन्नाट सुचले म्हणून उत्साहात केलेले नृत्य हे प्रयोग म्हणायचे की उद्योग.. असे अनेक प्रश्न सध्या हे ट्रेण्ड्स पाहून पडू लागले आहेत. मात्र याच सोशल मीडियाने काही चांगल्या नृत्य प्रकारांची ओळख करून दिली हेही नाकारता येणार नाही.

गेल्या वर्षी ‘द ट्रॅन्गल’नामक एक फिटनेस डान्सचा प्रकार खूप व्हायरल झाला होता. त्याची संकल्पना अशी होती की, तीन जणांनी एकमेकांचे खांदे घट्ट पकडून त्रिकोणी रचनेत तिथल्या तिथेच उडय़ा मारायच्या. यातून कोऑर्डिशेन, ग्रुप वर्क आणि कार्डिओ फिटनेस साधता येतो. यात काही त्रुटीही आहेत, म्हणजे जितका वेळ हा फिटनेस डान्स करायचा आहे तितका वेळ चेहरा सरळ ठेवणं, दम लागणं अशा काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे हे प्रकार पाहायला चांगले वाटले तरी पूर्ण तंत्र अवगत झाल्याशिवाय, त्याचे परिणाम अभ्यासल्याशिवाय केलेले प्रयोग इतरांना तापदायकच ठरू शकतात.

तरीही डान्समध्ये प्रयोग करण्याची ओढ काही कमी होत नाही, हेदेखील नाकारता येत नाही. बरीच वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि उत्तम डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ए-स्टाइल डान्स स्टुडिओ’चे सर्वेसर्वा निमेश बिजलानी यांच्या मते, डान्स नव्या-जुन्या पिढीला कायम आकर्षित करत आला आहे. डान्समध्ये करिअर करण्याची इच्छा आजही बहुसंख्य जनता मनात बाळगताना दिसते. नवे विचार, नवे तंत्र आणि नवे बदल हे डान्समध्येदेखील सतत होताना दिसतात, कारण या आधुनिक काळात नवनवे प्रयोग करणारी एक पिढी तयार होते आहे. डान्समध्ये युनिक स्टाइल्स आणि डान्स मूव्हज विकसित केल्या जातात. विविध नृत्य प्रकारांचे फ्यूजन किंवा सादरीकरणात त्यांना एकत्र आणणे असे वेगवेगळे प्रयोग सातत्याने केले जातात. त्यातले काही गमतीशीरही आहेत. सिनेमासृष्टीतल्या संवादावर म्हणजेच ज्याला आपण ‘डायलॉग्ज’ म्हणतो अशा डायलॉग्जवर नृत्य सादर करण्याची एक वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. मध्यंतरी एका डान्स ग्रुपने असा प्रयत्न के ला आणि तो प्रचंड लोकप्रिय झाला, असं ते सांगतात. इन्ट्रुमेंटल संगीत आवडत असल्याने त्यावर केले जाणारे नृत्य, पारंपरिक गाण्यांवर पॉपिंग करणं हे प्रयोगही खूप लोकप्रिय झाले, असं निमेश यांनी सांगितलं.

जगभरात नामवंत कलाकार मंडळी स्वत:चे काही वेगळे प्रयोग नृत्यात करत असतात आणि त्यात यशस्वीही होतात. ‘डान्स फिल्म सेल्फी’ या नावाने लोकप्रिय झालेला प्रकार असाच एका कलाकाराच्या प्रयत्नातून जन्माला आला आहे. जय कॅ रलॉन या अमेरिकन तरुणाने आपली पहिली ‘डान्स फिल्म सेल्फी २०१८’ केली आणि आज ती इन्स्टाग्राम, फेसबुक, वायमिओवर आणि ट्विटरवर ‘#डान्सफिल्मसेल्फी’ याद्वारे प्रचंड व्हायरल होते आहे. सेल्फी मोडवर आपल्याला आवडता डान्स चित्रित करून ते पोस्ट करण्याचा हा प्रकार पब्लिक प्लॅटफॉर्मवर कुठेही आणि केव्हाही करता येतो. त्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. असे व्हिडीओज बनवून नवीन डान्स स्टाइल्सही विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कुठलंही बंधन नसल्याने अगदी स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे केलेल्या नव्या स्टेप्स इथे सहज लोकप्रिय होतात. आणखी एक वेगळा प्रयोग सध्या चर्चेत आहे तो म्हणजे हिप-हॉपमध्ये विन्डमिल (पवनचक्की) मूव्हचा. यातही बी-बॉय, नो-हॅण्डेड असे उपप्रकार आहेत. त्याचबरोबर हेलिकॉप्टर मूव्ह (यातही कॉफी ग्राईंडर बी-बॉय मूव्ह, रिव्हर्ज हेलिकॉप्टर मूव्ह असे प्रयोगही आढळतात.), टर्टल मूव्ह आणि हॅमर डान्स असे नानाविध प्रयोग सध्या जोर धरत आहेत. ब्रेकडान्स ‘पॉवर मूव्ह’मध्ये करणं हा सध्या खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळणारा प्रकार आहे. ‘विन्डमिल मूव्ह’मध्ये प्रयोग करणारे अवली डान्सर पुढे येत आहेत. हा डान्स मूव्ह कॉमिकली लोकांना कसा आवडेल याबाबतीत तसे प्रयोग करून विविध स्टेप्स शिकवल्या जातात. बॅलेट डान्समध्ये प्रामुख्याने म्युझिकच्या आधारे विविध प्रयोग केले जातात. पण हे सगळेच प्रयोग खरं तर सोशल मीडियामुळे लोकप्रिय झालेले प्रकार आहेत, हे लक्षात घ्यायला हवं.

पारंपरिक भारतीय नृत्यात म्हणजे भरतनाटय़मसारख्या नृत्य प्रकारातदेखील तितक्याच ताकदीने नवे प्रयोग होत आहेत. अगदी नवोदित नृत्यांगनापासून ते नामांकित नृत्यांगना वेगवेगळ्या प्रकाराने एक खास शैली विकसित करत आहेत. यात प्रामुख्याने स्टोरी टेलिंगवर केलेले प्रयोग पाहायला मिळतात. या कथन प्रकारात बैठी नृत्यशैलीदेखील आहे ज्यात कथन तर आहेच, पण त्याचबरोबर देहबोली, ताल आणि संगीताचा उत्तम मेळही त्यात साधला जातो. पद्मिनी चित्तूर या लोकप्रिय नृत्यांगना आहेत. त्यांनी ‘वॉल डान्सिंग’, ‘विंग्स अ‍ॅण्ड माक्स’ असे काही लक्षवेधी प्रयोग केले आहेत. ‘वर्णम’ या नृत्य प्रकारातही विविध प्रयोग त्यांनी केले आहेत. २०२० पासून रोबोट, मूनवॉक, पॉपिंग, बॅलेट, वर्क-आऊट डान्स असे डान्स ट्रेण्ड्स लोकप्रिय असतील.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्या मते, नृत्यात सातत्याने प्रयोग होत राहिले पाहिजेत. कन्टेम्पररी हा प्रकार आपल्याकडे खूप नावाजलेला आहे. आम्ही यातले तांत्रिक प्रयोग करतो. म्हणजेच ‘इन्डो-कन्टेम्पररी’ आणि ‘मॉडर्न मूव्हज’ एकत्रित करून त्यामध्ये फोक डान्स आणि बॅलेट डान्सचं मिश्रण करतो. हा प्रकार फार हटके आहे. त्यात फिटनेस, ग्लॅमर आणि पारंपरिक ठेक्याचे बेमालूम मिश्रण असल्यामुळे ते अनुभवायलाही आकर्षक असे असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, बॉलीवूड डान्समध्येही नाना तऱ्हेचे प्रयोग करता येतात, असं ते म्हणतात. बॉलीवूड हा डान्स प्रकार एक तर खूप लोकप्रिय आहे, त्यामुळे त्यात डान्स स्टेप्समध्येच होणारे प्रयोग लगेच ट्रेण्डमध्ये उतरतात, असं त्यांनी सांगितलं. ‘आम्ही सध्या एक नवा फॉर्म वापरत आहोत आणि तो म्हणजे ‘भांगरा-स्वॅग’. हाही तसा पारंपरिक आणि पाश्चात्त्य ठेक्याचा एकत्रितपणे साधलेला प्रकार आहे. भांगरा हा ट्रॅडिशनल डान्स असला तरी त्यात एक मॉडर्न फ्लेवर आहे. त्यामुळे आम्ही विविध पाश्चात्त्य, देशीय आणि पारंपरिक म्युझिक किंवा कोणतंही व्हायरल होणारं ट्रेडिंग म्युझिक घेऊन त्यावर भांगरा डान्स बसवतो आणि एक वेगळा ‘स्वॅग’ आपोआपच निर्माण होतो. भांगरा ठेक्यावर वेस्टर्न हिप हॉपचं मिश्रणही आम्ही करतो, असं सांगणाऱ्या शामकच्या मते अशा पद्धतीचे विविध डान्स कॉम्बिनेशन्स एकत्र करणे यालाच प्रयोग म्हणायला हवं. मात्र हे करत असताना दोन नृत्य प्रकारांची गुंफण इतक्या लाजवाब पद्धतीने व्हायला हवी की ती कोणत्याही काळात तितकीच लोकप्रिय, सहज वाटेल, असं ते आवर्जून सांगतात.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: New style dance styles abn