‘मिस इंडिया’चा मुकूट जिंकल्यानंतरही निकिता पोरवालचा प्रवास रंगभूमी, सामाजिक कार्य अशा विविध अंगाने बहरत राहिला. सध्या व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या ‘मिस वर्ल्ड’ २०२६ च्या ऐतिहासिक अमृतमहोत्सवी सौंदर्यस्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या निकिताने नव्या पिढीची ट्रेन्डसेटर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. वयाच्या आठव्या वर्षी लेखनाला सुरुवात करणारी, ६० हून अधिक नाट्यप्रयोगांमध्ये काम करणारी, ‘कृष्णलीला’सारखे ३५० पानी नाटक लिहिणारी आणि स्वत:ची ‘रंगरेज’ ही नाट्यसंस्था उभी करणार्या निकिताशी तिची आजवरची वाटचाल, सौंदर्यस्पर्धांचे बदललेले स्वरुप, आव्हानं अशा विविध मुद्यांवर संवाद साधता आला.
मागे वळून पाहताना निकिताला आपल्या प्रवासातील सर्वांत निर्णायक क्षण एखादा किताब जिंकण्याचा वाटत नाही. तिच्या मते, रंगभूमीने नकळत तिला एका मोठ्या स्वप्नासाठी तयार केले होते. ‘मी मिस इंडिया होऊ शकते का?’ या प्रश्नापासून ‘का नाही?’ या प्रश्नापर्यंत झालेला मानसिक बदल तिच्यासाठी महत्त्वाचा ठरला. माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात कुठल्याही गुरुपेक्षा रंगभूमीचा वाटा मोठा आहे, असे ती सांगते. ‘एक कलाकार रंगभूमीवर काम करतो तेव्हा नकळतणे स्वत:शी आणि प्रेक्षकांशी प्रामाणिकपणे संवाद साधणं, तणावात असतानाही शांत राहणं, बोलण्याआधी समोरच्याला जाणून घेणं असे संस्कार त्याच्यावर होत असतात. माझ्यावरही ते झाले आणि म्हणूनच ‘मिस वर्ल्ड’च्या मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करतानाही प्रेक्षकांशी प्रामाणिकपणे जोडलं जाणं हाच माझा उद्देश आहे’ असं तिने स्पष्ट केलं. अभिनय आणि कलासादरीकरणाच्या अनुभवातून उत्तम संवादफेक, देहबोली आत्मसात करण्याबरोबरच लेखन-कथाकथनाची आवडही तिला लागली, वयाच्या आठव्या वर्षी ‘स्माईल्स ऑल द वे’ हे पुस्तक लिहिण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे ‘कृष्णलीला’ या ३५० पानी नाटकापर्यंत पोहोचला. रंगभूमीशी असलेली ही नाळ तिने आजही जपली आहे. ‘रंगरेज’ या स्वत:च्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील कलाकारांना एकत्र आणत तिने रंगभूमीशी असलेलं हे नातं अधिक दृढ केलं आहे.
‘मिस इंडिया’ किताब जिंकल्यानंतर ‘मिस वर्ल्ड’ म्हणून देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही अभिमानाची बाब असली तरी त्याबरोबर मोठ्या अपेक्षा आणि दबावही येतो, असं निकिता सांगते. ‘आजच्या अतिशय गळेकापू स्पर्धेच्या युगात कधीकधी स्वत:वरच शंका यावी असे क्षण येतात, दबाव अधिक वाढतो; पण अशा वेळी मी परिपूर्णतेचा अट्टाहास करत नाही. प्रामाणिकपणे आपलं काम करणं आणि दररोज सर्वोत्तम देत राहणं हेच मला महत्त्वाचं वाटतं’ असं तिने सांगितलं.
‘ब्युटी क्वीन्स’ म्हणून लोक तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघतात, तेव्हा अनेक वेगळ्या भूमिका तुम्हाला निभवाव्या लागतात. त्याचं दडपण घेण्यापेक्षा आपल्यात चांगला बदल घडवून आणण्याची संधी म्हणून त्याच्याकडे पाहायला हवं. तुमची मतं, स्वभाव यापेक्षाही तुमचं ध्येय, आजूबाजूला घडणार्या घटनांविषयीची जागरूकता आणि इतरांना चांगल्या कार्यासाठी प्रेरित करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी, ही अपेक्षा
असते. सौंदर्यस्पर्धा जिंकून मिळणारा हा मुकूट सन्मानापुरता मर्यादित नाही, तर तो जबाबदारीचे प्रतीक आहे, असं सांगतानाच प्रेक्षकवर्ग बदलल्याने स्पर्धेचं स्वरूपही बदललं आहे. ‘सर्वांत सुंदर कोण?’ यापेक्षाही ‘सकारात्मक बदल कोण घडवून आणू शकतं?’ हा निकष महत्त्वाचा मानला जात असल्याचं तिने स्पष्ट केलं.
सोशल मीडियाने सौंदर्यस्पर्धांचा चेहराच बदलून टाकला आहे. पूर्वी स्पर्धकांचा प्रवास काही ठरावीक टप्प्यांपुरता आणि प्रेक्षकांचा सहभागही निकालापुरता मर्यादित असे; आज मात्र प्रत्येक स्पर्धकाची तयारी, व्यक्तिमत्त्व, विचार आणि सामाजिक कामगिरी थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. या बदलामुळे तरुण मुलींना या क्षेत्राकडे जवळून पाहण्याची आणि त्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली असली, तरी त्याचवेळी तुलना, परिपूर्ण दिसण्याचा दबाव आणि सतत व्हॅलिडेशन मिळवत राहणं या समस्याही निर्माण झाल्या आहेत. याबद्दल ती म्हणते, ‘सोशल मीडियाचा उपयोग प्रेरणा देण्यासाठी व्हायला हवा, स्वत:ची किंमत ठरवण्यासाठी नव्हे. तंत्रज्ञान आणि एआय माहिती निर्माण करू शकतात, प्रभाव निर्माण करू शकतात; पण खरे भावनिक बंध, सहानुभूती आणि करुणा निर्माण करण्याची ताकद अद्याप माणसांमध्येच आहे. परीक्षक तुमच्या खरेपणावर जास्त भावतात. जे स्पर्धक खरे असतील ते परीक्षकांच्या जास्त लक्षात राहतात. आत्मविश्वास आणि सादरीकरणामुळे तुम्ही कदाचित इतरांपेक्षा वेगळे ठरू शकाल, पण तुमचा खरेपणा, अस्सलपणाच वाखाणला जातो.’
निकिताचा प्रवास आजच्या जेन झीसाठी म्हणूनच विशेष ठरतो, कारण तिची कहाणी केवळ ‘ब्युटी क्वीन’ होण्याची नाही, तर स्वत:च्या अनेक आवडी, क्षमता आणि विचारांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आहे. ‘परफेक्ट’ दिसण्यापेक्षा प्रामाणिक असणं, केवळ प्रसिद्धीपेक्षा आयुष्याचं उद्दिष्ट शोधणं आणि आपल्या मुळांशी जोडलेलं राहून मोठी स्वप्नं पाहणं, हे तिचे गुण इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत.
स्वप्नांची एकच एक दिशा नसते आणि स्वत:ची वाट निवडून पुढे जाताना स्वत:ला कुठल्याही चौकटीत अडकवण्याची अजिबात गरज नाही, हे निकिताने तिच्या आजवरच्या वाटचालीतून दाखवून दिलं आहे जे या सौंदर्यस्पर्धांमधून स्वत:ला सिध्द करू पाहणार्या अनेक तरुण-तरुणींसाठी मार्गदर्शक ठरतं आहे.
viva@expressindia.com
