अश्विनी खांडेकर
इतक्या वर्षांच्या नोकरीत अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. पण, त्यात मला कायम गंमत वाटलेली एक गोष्ट म्हणजे Notice Period! गंमत नोटीस पीरियड या संकल्पनेची नाही, तर प्रत्येक माणूस ती किती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतो याची आहे.
काही लोक शेवटच्या दिवसापर्यंत रात्री दहा-दहा वाजेपर्यंत काम करतात. आपलं काम पूर्ण झालं पाहिजे, व्यवस्थित हँडओव्हर झालं पाहिजे, यासाठी त्यांची धडपड सुरू असते. तर काही जण राजीनामा देण्याआधीच हँडओव्हर तयार ठेवतात आणि संपूर्ण नोटीस पीरियड निवांत घालवतात. काहींचा अनेक वर्षांच्या कामाचा हँडओव्हर एका ईमेलमध्ये संपतो, तर काही जण शेकडो एक्सेल शीट्स, प्रेझेंटेशन्स आणि डॉक्युमेंट्स मागे ठेवून जातात. कधीकधी वाटतं, हे सगळं समजून घेण्यासाठी पुढच्या माणसाला वेगळा नोटीस पीरियड लागेल की काय!
यापेक्षाही जास्त मजेशीर आहेत ती नोटीस पीरियड सुरू होण्यामागची कारणं… माझ्या निरीक्षणानुसार याचे साधारण तीन प्रकार आहेत.
आनंददायी नोटीस पीरियड
हा बहुतेक सगळ्यात छान प्रकार! एखाद्याला चांगली संधी, मोठी जबाबदारी, चांगला पगार किंवा अनेक दिवसांपासून हवी असलेली नोकरी मिळालेली असते. साहजिकच ती व्यक्ती खूश असते. नवीन कंपनी, नवीन रोल याबद्दल उत्साहाने बोलत असते. मग फेअरवेल लंच, फोटो, भेटवस्तू आणि संपर्कात राहण्याची आश्वासनं देत आनंदाने निरोप घेतला जातो.
अवघडलेला नोटीस पीरियड
जेव्हा कंपनीच एखाद्या कर्मचार्याला नोकरी सोडायला सांगते, तेव्हा परिस्थिती बरीच अवघड होते. एका आठवड्यात तुम्ही पुढच्या तीन महिन्यांचं प्लॅनिंग करत असता आणि पुढच्याच आठवड्यात तुमच्या लास्ट वर्किंग डेची चर्चा सुरू होते. कर्मचार्याने याची तयारी केलेली नसते. राग, निराशा, गोंधळ किंवा कधीकधी फक्त शांतता असते. कालपर्यंत सहज होणारे संवादही अचानक अवघडल्यासारखे वाटतात.
मनाने आधीच बाहेर पडलेला कर्मचारी
माझ्या मते हा सगळ्यात वाईट प्रकार. कर्मचारी ऑफिसमध्ये येत असतो, मीटिंग अटेंड करतो, ईमेल्सना उत्तरं देतो. पण, काहीतरी बदललेलं असतं. पूर्वी प्रत्येक मीटिंगमध्ये दहा नवीन कल्पना मांडणारी व्यक्ती आता फक्त एकच उत्तर देते, ‘ओके’. ना प्रश्न, ना सूचना, ना वाद. कदाचित राजीनामाही दिलेला नसतो, कंपनीने जायलाही सांगितलेलं नसतं. पण, मनाने ती व्यक्ती कधीच बाहेर पडलेली असते.
आणि अनेकदा हे कुणाच्या लक्षातही येत नाही. माझ्या मते ही परिस्थिती म्हणजे कर्मचारी आणि कंपनी यांच्यातलं नातं कुठेतरी बिघडल्याचं लक्षण आहे. कारण, माणसं नेहमी राजीनामा दिल्यावरच कंपनी सोडतात असं नाही. काहीजण त्याच्याही कितीतरी आधी मनाने बाहेर पडलेले असतात. अशा वेळी नोटीस पीरियडपेक्षाही तो सुरू होण्याआधी नेमकं काय घडलं? हे महत्त्वाचं असतं. आणि इथे एचआरची भूमिका खूप महत्त्वाची असते. माझ्या मते, काही गोष्टींमुळे एम्प्लॉयीज सॅटिसफॅक्शन आणि वर्क कल्चर यात अंतर असू शकतं.
न्यूट्रल आणि ॲप्रोचेबल एचआर : कर्मचार्यांना कोणतीही भीती न बाळगता मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. एचआरने मॅनेजमेंट आणि एम्प्लॉयीज या दोघांचंही म्हणणं समजून घेतलं पाहिजे.
रोजचा संवाद : फक्त फीडबॅक आणि सर्वेजवर अवलंबून न राहता, कर्मचार्यांशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडचणी वेळेत समजून घेणं महत्त्वाचं आहे.
अपेक्षा आणि सुधारणांविषयी स्पष्ट कल्पना: कामाबद्दलच्या अपेक्षा आणि सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी वेळेत सांगितल्या गेल्या पाहिजेत. कर्मचारी बाहेर पडते वेळी त्याच्या हातात गंभीर फीडबॅक ठेवणे कोणाच्याही दृष्टीने फायद्याचे नाही.
एम्प्लॉयीज एन्गेजमेंट : फक्त सेलिब्रेशन्स आणि टीम आऊटिंग्ज म्हणजे एन्गेजमेंट नव्हे. कर्मचार्यांना कामात समाधान मिळतंय का, त्यांना ग्रोथच्या संधी आहेत का आणि त्यांच्या मताला महत्त्व दिलं जातंय का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
अर्थात, ही जबाबदारी फक्त एचआरची नाही, तर रिपोर्टिंग मॅनेजर्स आणि लीडरशीपचीही असते. कर्मचारी समाधानी आहेत की नाही, त्यांच्याशी वेळच्या वेळी संवाद, कामाबद्दलच्या अपेक्षांची स्पष्ट कल्पना देणं आणि चांगलं वर्क कल्चर निर्माण करणं ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. कारण, कर्मचार्यांचं समाधान कशात आहे, हे तो राजीनामा देऊन बाहेर पडताना ‘Exit Interview’ मध्ये समजून घेण्याची गोष्ट नाही. तर कर्मचारी कंपनीत कार्यरत असताना त्याच्या क्षमता-अपेक्षांचा विचार झाला पाहिजे.
नोटीस पीरियड नक्की कोणाचा? कदाचित हा प्रश्न फक्त शेवटच्या तीस दिवसांपुरता मर्यादित नसावा.
viva@expressindia.com
