फॅशन कॉन्शस आधुनिक मुलगीदेखील दिवाळीसारख्या सणाला ‘ट्रॅडिशनल वेअर’चा विचार करते तेव्हा मराठमोळ्या पैठणीची तिला अजूनही भुरळ पडते. महाराष्ट्राच्या या ‘महावस्त्रा’च्या बदललेल्या स्वरूपाविषयी..
‘ओल्ड इज गोल्ड’ या म्हणीचा प्रत्यय आता सातत्यानं येऊ लागला आहे. जुनी फॅशन नवीन अवतार घेत असते. त्यात सोन्या-चांदीची जर असलेली पठणी तर आऊटडेटेड होणं केवळ अशक्यच! दरवर्षी येणारे नवनवीन ट्रेण्ड, फॅशन फॉलो करणाऱ्या मुलीलासुद्धा पारंपरिक मराठमोळ्या पैठणीची अजूनही भुरळ पडते. दसरा-दिवाळीच्या निमित्तानं ट्रॅडिशनल वेअरचा ती विचार करते तेव्हा हीच पैठणी तिला आपली वाटते. महाराष्ट्रात ‘महावस्त्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  येवल्याच्या पठणीची हवा म्हणूनच अजूनही झोकात आहे. पठणीच्या एकंदर लुकमध्येही बदल होताना दिसत आहेत.
गेली २५ र्वष मुंबईत पैठणीचं प्रदर्शन भरवणाऱ्या सन्निधा भिडे यांनी पैठणीच्या नवीन ट्रेण्ड्सची माहिती दिली. न्यू वेव्ह पैठणी या नावानं त्यांचं हे प्रदर्शन दरवर्षी भरतं. यंदा प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान हे पैठणींचं प्रदर्शन खुलं आहे. ‘‘गेल्या काही वर्षांत पिढीनुसार पैठणीच्या मागण्याही बदलल्या आहेत. पूर्वी पैठणीचे जांभळा, गुलाबी, मोरपंखी, निळा असे टिपिकल रंग असायचे. आता मागणीनुसार आम्ही पांढरा, काळा, अ‍ॅश कलर, पिवळा आणि इतरही काही पेस्टल कलर आणतो. पदरावरच्या आणि काठावरच्या डिझाइनमध्ये थोडं वैविध्य आलंय. नेहमीच्या पोपट आणि मोरांखेरीज आता मटका, जॉमेट्रिक डिझाइन्स आता पैठणीच्या पदरावर आली आहेत,’’ असं सन्निधा भिडे म्हणाल्या.
साडीपलीकडेही बरंच काही
पैठणीची क्रेझ कायम असल्याचंच या फेस्टिव्ह सीझनमध्ये दिसतं. पैठणी म्हटल्यावर केवळ साडीच डोळ्यापुढे येत असेल तर थोडं थांबा. पैठणीचे ड्रेस, स्टोल, दुपट्टा, स्कार्फ, कुर्ते असे अनेक ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. न्यू वेव्ह पैठणीच्या प्रदर्शनात या गोष्टींनाही तरुणींकडून मागणी असते, असं आयोजकांनी सांगितलं. हल्ली तरुण मुलांमध्ये पैठणीची क्रेझ आहे, हे वाचल्यावर बिचकू नका. कारण पैठणी कुर्ते मुलांसाठी नवीन ‘इन थिंग’ आहे. नेहमीच  असं म्हटलं जातं की, मुलांना कपडय़ांमध्ये काहीच खास ऑप्शन्स नाहीत. नेहमीचे जीन्स, शर्टस, कुर्ता, टी-शर्टस किंवा शेरवानी घालणाऱ्या मुलांना पैठणी काठाच्या शाही कुर्त्यांमुळे एक रिफ्रेिशग लुक नक्की मिळेल.
लग्नाला किंवा कुठल्याही स्पेशल ऑकेजनला जाताना आपल्या एथनिक ड्रेसवर किंवा साडीवर कोणती पर्स सुटेबल आहे, याचा ‘गहन’ विचार मुलींकडून केला जातो. मग ही पर्स नको, खूप साधी आहे.. ती ‘फंकी’ आहे, ही ‘कॉलेज-गोइंग- कॅज्युअल वाटतेय, ती ओल्ड फॅशन आहे, असं कन्फ्यूजन सुरू होतं; पण आता नव्याने बाजारात आलेले क्लच हा त्यावरचा उत्तम पर्याय ठरतोय. साडीपासून बनवले जाणारे क्लचेस आणि हँडमेड बॅग्ज साडीवर अगदी फिट्ट वाटतात. लग्नात मिरवायला किंवा स्पेशल ऑकेजनला हवा असणारा ट्रॅडिशनल आणि रिच लुकही देतात. साडीचे काठही अगदी आकर्षक  पद्धतीने क्लचेसना लावलेले दिसतात. याचं हँडलही नजाकतीनं सजवलेलं दिसतं. त्यामुळेही रिच लुक येतो. दिवाळीसाठी बाजार आता पारंपरिक उत्सवी रंगात फुलला आहे. त्यामुळे असे नवनवीन तरीही ट्रॅडिशनल ऑप्शन्स मार्केटमध्ये दिसायला सुरुवात  झाली  आहे. बस.. अपनी आँखे खुली रखो और लाभ ले लो!