‘आमच्या काळी असं होतं’ हे म्हणून आपल्या काळातल्या छान छान गोष्टींचा अभिमान आणि आनंद मिरवायची हौस प्रत्येकालाच असते. प्रत्येकाच्या काळात काही ना काही वेगवेगळं घडून गेलेलं असतं, मात्र आपल्या काळात इतक्या भारी गोष्टी होत्या हे नुसतं फ्लेक्स करत आताची तरुण पिढी थांबलेली नाही, तर जुन्या काळातली ती जादू पुन्हा अनुभवायचीच असा जणू चंगच त्यांनी बांधला आहे. अनेक जुने सिनेमे ओटीटीवर सतत बघणारी ही पिढी टेक सिनेमे थिएटरमध्येही बघायला गर्दी करते आहे, नव्हे त्यांच्यामुळे अजून काही जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा पुन्हा रिलीज होत आहेत.ज्या सीरियल्स पाहत ही तरुणाई मोठी झाली, त्या तर ते पुन:पुन्हा ओटीटीवर पाहत आहेतच. अगदी ‘सीआयडी’, ‘आहट’पासून ते पार ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ अशा तुलनेने अलीकडच्या काळातील मालिकाही पुन्हा आवडीने पाहिल्या जात आहेत. त्याच सीरियल परत परत पाहून मनाला फ्रेश वाटतं आणि जुने दिवस आठवू लागतात. सीरियल्स फक्त ओटीटीपुरत्या मर्यादित राहतात, मात्र गेली कित्येक वर्षं ‘मराठा मंदिर’मध्ये सातत्याने सुरू असलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट प्रत्येक पिढी आपल्या तरुण वयात जाऊन पाहून आलेली आहे.

गेल्या काही वर्षांत जुने सिनेमे पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करायचा ट्रेण्ड चांगलाच जोर धरताना दिसतो. तो केवळ मुंबई किंवा बॉलीवूडपुरता मर्यादित नाही, तर मल्याळम, तेलुगू, तमिळ या भाषांमधले पिक्चर्सही पुन्हा थिएटरमध्ये पाहायला मिळताहेत. नवीन पिक्चर्सपेक्षा जास्त बिझनेस अनेकदा हे जुने पिक्चर्स देऊन जाताहेत. नवीन पिक्चर्सपेक्षा तरुण पिढीची जास्त गर्दी ही जुन्या मूव्हीजसाठी पाहायला मिळते.‘ये जवानी है दिवानी’, ‘शोले’, ‘जब वी मेट’, ‘बाहुबली : द एपिक’, मोहनलालचा ‘देवदूतन’ आणि ‘छोटा मुंबई’, रजनीकांतचा ‘थलपती’, ज्युनिअर एनटीआरचा ‘सिंहाद्री’ अशा अनेक री-रिलीज झालेल्या मूव्हीजना मोठ्या प्रमाणावर तरुणाईची गर्दी पाहायला मिळते. साऊथ इंडियन मूव्हीज तिथेच पुन्हा रिलीज होतात, तेव्हा पुन्हा त्याच उत्साहात स्टार्सची पोस्टर्स लावली जातात, बॅनर्स लावले जातात. मोहनलाल, रजनीकांत अशांचे मोठमोठे कट-आऊट्स उभे केले जातात, त्यांना हार घातले जातात. जसा मूव्ही पहिल्यांदा रिलीज होताना या सुपरस्टार्सच्या कट-आऊट्सना दुधाचा अभिषेक घातला जातो, तसाच री-रिलीज केलेल्या सिनेमांच्या वेळीसुद्धा घातला गेला. हा सगळा माहौल अनुभवण्यासाठी नवीन पिढी कायम या चित्रपटांना गर्दी करते.

ओटीटीवर अनेक वेळा पाहूनही काही मूव्हीजच्या बाबतीत मन भरत नाही. आपण ही मूव्ही थिएटरला बघायला पाहिजे होती किंवा ही मूव्ही थिएटरला रिलीज झाली होती, तेव्हा आपण मोठे असायला हवे होतो, अशी खंत वाटणारी ही जेन झी आणि मिलेनियल्सची पिढी या री-रिलीज मूव्हीजसाठी थिएटर्समध्ये सगळ्यात जास्त गर्दी करते. छोट्या स्क्रीनवर अनुभवता न आलेलं मूव्हीचं ‘मॅजिक’ थिएटरमध्ये अनुभवता येतं. पहिल्यांदा थिएटरमध्ये बघितला असेल तरीही पुन्हा तीच मूव्ही थिएटरमध्ये जाऊन पाहणारेसुद्धा यात आहेत. अगदी हातातल्या मोबाइलवर जवळपास सगळे पिक्चर्स उपलब्ध झाले आहेत, तरीही बिग स्क्रीनचा प्रभाव काही कमी झालेला नाही.

‘नवीन मूव्हीज पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणं हा एक एक्सपिरिमेंट असतो, मूव्ही चांगली नसेल तर डिसअपॉइंटमेंट वाटते. अनेकदा तर आजकालच्या कॅज्युअल मूव्हीज निराशाच करतात. त्यापेक्षा सेफ मूव्हीजसाठी थिएटरला पैसे घालवणं काय वाईट? अनुभवही नवीन मिळतो आणि निराशा होणार नाही याची खात्रीही असते,’ असं आताच्या जेन झीचं म्हणणं आहे.सायकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा ट्रेण्ड काही विशेष वेगळा नाही. आपल्याला माहिती असलेल्याच गोष्टी पुन्हा करताना किंवा अनुभव घेताना ‘सेफ्टी’ ही भावना प्रबळ असते. अपेक्षाभंग होण्याची भीती नसते, कम्फर्ट असतो. उलट तीच गोष्ट नव्याने पाहत असल्यामुळे अनुभव नव्याने येण्याची, नवीन गोष्टी समजण्याची, नवीन अर्थ उलगडण्याची शक्यता वाढते.

जेव्हा कोणतीही गाणी परत ऐकली जातात, मूव्हीज पुन्हा पुन्हा बघितले जातात, सीरियल्स पुन्हा बिंज वॉच केल्या जातात, तेव्हा पहिल्यांदा पाहतानाचे अनुभवसुद्धा गाठीशी असतात. अनेकदा त्या काळात आपण कसे होतो, त्याचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी हे मीडियम ठरतं. अनेक आठवणी पुन्हा ताज्या करता येतात, काही क्षण त्यात शांतपणे घालवता येतात. मेंदूला माहीत असलेलीच गोष्ट पुन्हा करत असल्याने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नसतो. नवीन मूव्हीतला सस्पेन्स समजून घेण्यापेक्षा किंवा त्याचे अंदाज बांधण्यापेक्षा जुन्या मूव्हीतल्या त्याच त्याच विनोदांना हसणं मेंदूसाठीसुद्धा आरामदायी असतं.

सिनेमे री-रिलीज करण्याचा हा ट्रेण्ड इतक्यात तरी मागे पडणार नाही, कारण आताच्या तरुणाईला नॉस्टॅल्जिया अनुभवायला, त्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या असलेल्या मूव्हीज हा मोठा फॅक्टर आहे. सतत बदलत्या जगातल्या सततच्या नवीन चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी हाच नॉस्टॅल्जिया आणि हाच कम्फर्ट त्यांना बळ देतो आहे.