वाचनाची आवड ही व्यक्तिमत्त्वाला आकार देते आणि आपली मातृभाषा अधिक समृद्ध करत असते. गेल्या काही वर्षांत मराठी भाषेत विविध विषयांवर अर्थपूर्ण आशयनिर्मिती होऊ लागली असून अनेक उत्तम पॉडकास्ट प्रेक्षकांना अनेक विषयांतील ज्ञान देत आहेत. याच प्रवाहातला ‘अमुक  तमुक’ हा पॉडकास्ट समाजमाध्यमांवर मुशाफिरी करणार्‍यांना नवीन नाही. या पॉडकास्टमुळे ओंकार जाधव आपल्याला सर्वांनाच परिचित आहे. तो एक उत्तम आशय निर्माता आणि संवादक तर आहेच, मात्र त्याच्या वाचनवाटाही खास आहेत. सहज शब्दांशी खेळणारा हा पॉडकास्टर वाचनाच्या बाबतीतही चोखंदळ आहे. त्यातही कवितेचा प्रांत त्याला विशेष प्रिय असून अनेकदा कवितांचे उत्स्फूर्त लेखनही तो करत असतो.

ओंकारला वाचनाची खरी आवड निर्माण झाली ती शालेय जीवनात. शाळेतील वाचनालय आजही अनेकदा आठवतं, असं तो म्हणतो. त्याला वाचनाची आवड होतीच, त्याचबरोबर पुस्तकं भराभरा वाचून पूर्ण करायची सवयही होती. एका वेळी एकच पुस्तक घरी नेण्याचा नियम कोणत्याही शाळेच्या वाचनालयात असतो, तसा तो त्याच्या शाळेतही होता. ओंकार म्हणतो, ‘मी मात्र या नियमाला अपवाद होतो. माझी वाचनाची आवड पाहता वाचनालयातील बाई मला एकाच वेळी दोन पुस्तकं घेऊन जाण्याची परवानगी देत असत. शिवाय, आमच्या शाळेत अनेकदा काही तासांना पुस्तक वाचन होत असे. त्यामुळे आपसूकच नव्या पुस्तकांची माहिती होऊन वाचनाची आवड निर्माण झाली आणि पुढे पुढे ती आणखीन वाढत गेली.’ वाचनालयांना ओंकारच्या जीवनात विशेष स्थान आहे. शालेय जीवनानंतर महाविद्यालयीन जीवनातही त्याचा पुन्हा वाचनालयाशी जवळचा संबंध आला. शिक्षण घेत असतानाच तो अर्धा वेळ वाचनालयात काम करत असे. यादरम्यान तीन-चार वर्षं त्याला अखंड पुस्तकांचा सहवास लाभला. मराठी पुस्तकं तर तो पूर्वीपासूनच वाचन होता, पण वाचनालयामुळे त्याला इंग्रजी पुस्तकांचीही गोडी लागली. तो म्हणतो, ‘वाचनालयात येणारे वाचक विविध इंग्रजी पुस्तकं घेत असत. ती पाहून आपणही इंग्रजी भाषेतील पुस्तकं वाचली पाहिजेत असं वाटू लागलं. शिवाय, यामुळे आपलं इंग्रजीतील संभाषणकौशल्यही विकसित होईल असं वाटून मी इंग्रजी वाचनाकडे वळलो. आणि मग मराठीसोबतच माझी इंग्रजी पुस्तकांशीही गट्टी जमली आणि पुढे माझं इंग्रजी वाचन वाढत गेलं.’ 

ओंकारने इंग्रजी वाचनाच्या सुरुवातीच्या काळात सुधा मूर्तींची भरपूर पुस्तकं वाचली. मूर्तींच्या भारतीय वळणाच्या इंग्रजी पुस्तकांमुळे आपली भाषेशी मैत्री होते, असं तो म्हणतो. प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी, रस्किन बॉण्ड, सिडनी शेल्डन, अगाथा ख्रिस्ती, अर्ल स्टॅन्ली गार्डनर, पेरी मेसन, खलील जिब्रान आणि युवाल नोआ हरारी ही ओंकारची आवडती लेखक मंडळी आहेत. तर मार्क हॅडनचं ‘दि क्युरियस इन्सिडेंट ऑफ द डॉग इन द नाइट – टाइम’, ‘दि हॅपिनेस ॲडव्हान्टेज’ – शॉन ॲकर, ‘दि करेज टू बी डिसलाईक्ड’, ‘दि ॲनाटॉमी ऑफ मोटिव्ह’ – जॉन डग्लस तर मुराकामीची ‘व्हॉट आय टॉक अबाऊट व्हेन आय टॉक अबाऊट रनिंग’, ‘नॉर्वेजियन वूड’ आणि ‘काफ्का ऑन द शोर’ ही त्याची इंग्रजीतील काही आवडती पुस्तकं आहेत असं त्यानं सांगितलं.

‘अमुक तमुक’ या पॉडकास्टच्या  माध्यमातून मराठी बोलणार्‍या समाजातील पिढ्यांसाठी एक सांस्कृतिक पूलच जणू ओंकार आणि त्याचा सहकारी उभारतो आहे. अशातच भाषेशी असलेली गट्टी, निरीक्षणशक्ती आणि वाचनाची आवड या त्रिसूत्रींच्या माध्यमातून उत्तम आशयनिर्मिती करता येऊ शकते याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे, असं म्हणता येईल. पॉडकास्टमुळे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी संवाद साधण्याचा योग येतो आणि त्यांच्याकडून भरपूर नव्या पुस्तकांची माहिती होती.

 त्यातील शक्य तितकी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न असतो. सध्या कामांमुळे वाचन काहीसं कमी झालं आहे, असं ओंकारनं सांगितलं. पण गाडी चालवताना उत्तम पॉडकास्ट ऐकणं किंवा ऑडिओ बुक्स ऐकणं हे सुरूचं असतं. पूर्वी मला अशी सवय होती की झोपण्यापूर्वी काही वेळ पुस्तक वाचन करायचं. आता पुन्हा त्या सवयीकडे वळणार आहे. मागील काही दिवसांत खूप पुस्तकांची खरेदी झाली आहे. आता ती वाचायला सुरुवात करणार, असं त्याने सांगितलं.

पुस्तकांविषयी पुढे बोलताना ओंकारनं विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती दिली. ‘व्हेन ब्रेथ बिकम्स एअर’ हे डॉ. पॉल कलानिथी याचं पुस्तक हे मनाच्या अतिशय जवळ असणारं पुस्तक आहे, असं त्यानं सांगितलं. पॉल हे न्यूरोसर्जन होते. त्यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्याच काळात त्यांनी या पुस्तकाचं लेखन करायला घेतलं. ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नीनं हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि हे डॉ. पॉल याचं एकमेव पुस्तक आहे. यामुळे एका वेगळ्याच जाणिवेची ओळख आपल्या या पुस्तकातून होते. हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखं आहे, असं तो म्हणाला. तसंच आनंद यादव लिखित ‘झोंबी’, ‘एक होता कार्व्हर’ – वीणा गवाणकर, ‘पर्व’ – एस. एल. भैरप्पा, ‘वाळूचा किल्ला’ – व्यंकटेश माडगूळकर, ‘काजळमाया’ आणि ‘सांजशकुन’ – जी. ए. कुलकर्णी, ‘एकेक पान गळावया’ – गौरी देशपांडे, ‘विशाखा’ – कुसुमाग्रज, ‘बरेच काही उगवून आलेले’, ‘भरून आलेले आकाश’ – द. भा. धामणस्कर, ‘कुछ इश्क किया कुछ काम किया’ – पीयूूूष मिश्रा ही त्याची काही आवडीच्या पुस्तकांची यादी आहे. नव्या काळातील लेखकांविषयीही ओंकार आश्वस्त आहे. प्रणव सखदेवसह काही नव्या लेखकांची पुस्तकंही तो आवर्जून वाचत असतो. तसंच डॉ. भूषण शुक्ल त्याला अनेक पुस्तकं सुचवत असतात. ते माझे ‘पुस्तकमित्र’ आहेत, असं त्याने सांगितलं. ओंकारकडे भरपूर पुस्तकांचा संग्रह आहे. कवितेची आवड असल्याने अनेक कवितासंग्रह त्याच्याकडे आहेत.

मराठीत बालसाहित्याची उत्तम परंपरा आहे. माधुरी पुरंदरे तसंच इतर लेखकांनी त्यात आणखीन भर घातली आहे. मात्र, आणखीन बालसाहित्याची निर्मिती होणं गरजेचं आहे, असं ओंकारचं मत आहे. तो म्हणतो, ‘बालसाहित्यामुळे लहान मुलांना आपल्या मातृभाषेतील साहित्याची ओळख होते. तो प्राथमिक टप्पा आहे. त्या टप्प्यानंतर आपल्याकडे पुस्तकांचं इतकं व्यापक आणि वैविध्यपूर्ण दालन उपलब्ध आहे की वाचणार्‍या कुणासाठीही तो फार मोठा खजिनाच आहे, पण तिथं वळण्याआधी बालसाहित्याच्या मांडावाखालून जाण्याची गरज असते. आणि त्यासाठीच अधिकाधिक बालसाहित्याची निर्मिती होणं गरजेचं आहे.’ ज्यांना मुळातच वाचनाची आवड नाही त्यांना वाचनाची सुरुवात कशी करावी, हा प्रश्न असतो. याविषयी सांगताना ओंकार म्हणाला, ‘आपल्या आवडीच्या विषयापासून सुरुवात करून आपण आपली आवड हळूहळू का असेना, पण विकसित करू शकतो. हल्ली अनेक जण पुस्तकं वाचत असतात, त्याविषयी व्यक्त होत असतात आणि हे चित्र नक्कीच आश्वासक आहे.’

viva@expressindia.com