पैठणीची गोष्ट

‘कालेबाऊट’ या बेल्जियम कंपनीचे चॉकलेट व शुगर पेस्ट वापरून हा पैठणी डच ट्रफल केक तयार करण्यात आला आहे.

मितेश रतिश जोशी viva@expressindia.com
गेल्या पंधरा दिवसांपासून वजट्रिक, चिंचपेटीसारख्या आभूषणांनी परिपूर्ण असलेल्या पैठणी साडीचा फोटो असलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नवल वाटेल पण ती पैठणी आणि त्यावरचे सगळे दागिने हे खरे नसून तो चक्क केक आहे. पुण्यातील तन्वी पळशीकर या केक आर्टिस्टने आपल्या हाताने हा केक बनवला असून सगळ्यांनाच आश्चर्याचा गोड धक्का तिने दिला आहे. जाणून घेऊयात तिच्या प्रवासाबद्दल..

काही वर्षांपूर्वी केक हा फक्त वाढदिवसाच्या निमित्तानेच आणला जायचा, पण आता छोटय़ात छोटय़ा निमित्तालासुद्धा केक कापला जातो. केक हे या सगळ्या साजरीकरणातलं वैशिष्टय़ ठरू पाहातं आहे. पूर्वी व्हॅनिला आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन असलेला, रेड चेरीने सजवलेला के क हे खास आकर्षण असायचे, पण आता केक इंडस्ट्रीनेसुद्धा कात टाकली आहे. वेगवेगळ्या तऱ्हेने डिझाइन के लेले केक समाजमाध्यमांवर व्हायरल होऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित करत आहेत. असाच एक पैठणी केक गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलाच व्हायरल झाला आहे. हा केक पुण्यातील सुप्रसिद्ध जेडब्ल्यू मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमधील केक आर्टिस्ट तन्वी पळशीकरने तयार केला आहे. तिच्याशी बातचीत केल्यावर या केकसंदर्भातील अनेक बाबी तन्वीने उलगडल्या. तन्वी म्हणाली, ‘एका ग्राहकाने त्याच्या बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या केकची ऑर्डर दिली होती. या आधी अशा पद्धतीचे केक मी बनवले होते. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दोन हिरव्या आणि पिवळ्या रंगांच्या पैठणीच्या साडीवर चिंचपेटी, वजट्रिक, कुंकवाचा करंडा, नथ, कानातले, बांगडय़ा, मोगऱ्याची फुलं अशा सौभाग्य अलंकारांनी युक्त असा हा केक डिझाइन करण्यात आला आहे. हे अलंकार स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत. या सगळ्यांची स्त्री मनाला सहज भुरळ पडते. त्यामुळे के कवर या गोष्टी पाहायला मिळाल्या तर तो त्यांना अधिक आवडेल, या विचारातून मी केक अशा पद्धतीने डिझाइन के ला.’  हा केक तयार करायला दोन दिवस लागले. या केकसाठी आवश्यक असणारे कोणतेही मोल्ड  माझ्याजवळ उपलब्ध नव्हते. त्यामुळे संपूर्ण केक हा त्यावरील डिझाइनसह पूर्णपणे हाताने बनवलेला आहे, असेही तन्वीने सांगितले.

‘कालेबाऊट’ या बेल्जियम कंपनीचे चॉकलेट व शुगर पेस्ट वापरून हा पैठणी डच ट्रफल केक तयार करण्यात आला आहे. केकच्या सजावटीसाठी मुख्यत: फॉण्डंट म्हणजे साखरेपासून विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या आयसिंगचा वापर केला गेला. हे आयसिंग पूर्णपणे सुकण्यासाठी कमीतकमी ४८ ते ७२ तास लागतात. त्यासाठी सजावटीचे साहित्य दोन दिवस आधीच बनवावे लागते. म्हणून या केकसाठी सर्वात पहिले तन्वीने सर्व दागिने तयार केले आणि नंतर त्याचा बेस तयार केला. हा केक नसून हुबेहूब पैठणी वाटावी यासाठी तिने सलग दोन दिवस मेहनत घेतली. केकची सजावट हीसुद्धा दोन पद्धतीची असते. खाण्यायोग्य नसलेली केवळ दिखाव्यापुरती असलेली सजावट आणि दुसरी फॉण्डंट वापरून केलेली खाण्यायोग्य सजावट असते. हा केक या दुसऱ्या पद्धतीत मोडतो. म्हणून सजावटीसाठी वेळ आणि मेहनत जास्त लागते. त्याला संयमाचीही जोड लागते, असं ती सांगते.

तन्वी ही मुळात इंटेरिअर डिझायनर. अनेक वर्ष तिने त्या क्षेत्रात काम केलं. २०१३ साली एका मासिकात केकची कृती वाचून तिने केक तयार केला. तिला त्यातच आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे केक ती शिकत गेली, बनवत गेली आणि चुका सुधारत गेली. काही महिन्यांतच तिने घरून केक बनवून विकायला सुरुवात केली. तिचे केक चोखंदळ पुणेकरांना इतके आवडले की, २०१५ साली तिने इंटेरियर डिझायनर म्हणून काम करत असलेल्या नोकरीचा राजीनामा दिला व फुल टाइम केक बिझनेसमध्ये उतरली. एकदा तिच्या वाचनात पुणे मेरियटमध्ये केक आर्टिस्टसाठी जॉब असल्याची माहिती आली. म्हणून ती तिथे मुलाखत द्यायला गेली व तिला तो जॉब मिळाला. जेडब्ल्यू मेरिएटचे एक्झिक्युटिव्ह पेस्ट्री शेफ विकास विभूती यांच्या हाताखाली तन्वी तयार झाली. इंटेरियर डिझायनिंगला कायमचा रामराम ठोकून तिने केक आर्टिस्ट म्हणून स्वत:साठी नवी वाट निर्माण के ली.

पूर्वी तन्वी दिवसाला एक किं वा जास्तीत जास्त दोन केक तयार करायची, पण आता दिवसाला सहा ते सात केक ती रोज तयार करते. हा पैठणी केक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर तिला चहूबाजूंनी शाबासकीची थाप मिळाली. सर्वानी हा केक पाहण्यासाठी हॉटेलमध्ये सतत ये-जा केली, पण हा केक ज्याने ऑर्डर केला होता तो घेऊन गेला. म्हणून तन्वीने तसाच हुबेहूब दुसरा केक तयार केला. हा केक अजूनही जेडब्ल्यू मेरिएट हॉटेल पुणे येथे लोकांना पाहण्यासाठी ठेवला आहे. सौंदर्यदृष्टी आणि कल्पकतेच्या बळावर तन्वीने नेहमीच्या के कलाही असाधारण रूप बहाल के ले आहे. के क तर काय आपण नेहमीच खातो, मात्र नितांतसुंदर डिझाइन्स, आकर्षक रंगसंगती, बारीक कलाकु सर आणि चवीतही तितकाच बहारदार असा आगळा प्रयत्न आपल्यासमोर येतो तेव्हा त्याचे कौतुक झाल्याशिवाय राहात नाही. अशा सर्जक नवनिर्मितीतूनच नवनव्या वाटा धुंडाळण्याचा तरुणाईचा प्रयत्न निश्चितच वाखाणण्यासारखा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Paithani saree inspired cakes by artist tanvi palshikar from pune zws

Next Story
खुलला खरेदीचा श्रावण
ताज्या बातम्या